पतंग…
त्याला पतंग उडवायची प्रचंड आवड. संक्रांतीच्या सकाळी गच्चीवर तो सालाबादप्रमाणे सर्वात आधी पोहोचला. मांजा बांधून सकाळच्या जोरदार वाऱ्यावर पतंग टिकली केल्यावर त्याला आजूबाजूला बघायची उसंत मिळाली. डोळ्यावर रेबॅन गॉगल लावलेला तो मुलींच्या “प्रभास” क्याटेगारीत मोडणारा होता. पतंग उंच हवेत स्थिर होता आणि तो आजूबाजूच्या इमारतींवर किती गर्दी जमली आहे ह्याचा अंदाज घेत होता. इतक्यात शेजारच्या गच्चीत ती अचानक अवतरली. सौंदर्याचे सगळे निकष पूर्ण करणारी. आधी कधीच बघितली नव्हती तिला. तिने पतंगाला मांजा बांधला आणि चक्क पतंग उडवला. तो आपला ‘पतंग’ सोडून त्या ‘फुलपाखरात’ अडकला!
अचानक हाताला जाणीव होऊन त्याचा पतंग कापला जात असल्याच लक्षात आल्यावर तो वळला. पण तोवर त्याचा पतंग हातापासून घसटून एक लाल पतंग वेगाने आकाशात झेपावला. त्याचा पतंग कापायची हिम्मत खूप कमी लोकात होती. पतंगाचा मास्टर म्हणून त्याचा दरारा होता एरियात. अमेरिकेत एका प्रोजेक्टवर गेलेला असताना तिथे पतंग प्रात्यक्षिक दाखवून त्याने फिरंगी लोकांना वेड लावलं होत. मग आज सकाळी सकाळी त्याचा पतंग कापणारा हा कोण हे बघायला त्याने लाल पतंगाचा मांजा फॉलो करत नजर खाली आणली. त्या पतंगाचा मांजा तिच्या नाजूक हातात स्थिरावलेला होता! ती जोरजोरात “कायपो छे” ओरडत आनंद व्यक्त करत होती. त्याच्या हृदयाचा पतंग तिला पाहून स्वप्नांच्या आकाशात भरारी मारू लागला होता. त्याने फक्त अंगठा दाखवून “ग्रेट” अस कौतुक केलं आणि तो पुढचा पतंग मांजाला बांधू लागला!
मग हळू हळू लोक जमत गेले. दोन्ही गच्या लोकांनी फुलून गेल्या. स्पीकर वर लावलेली गाणी, कायपो छे च्या आरोळयांनी परिसर दुमदुमून गेला. तो अनेक पेच लावत त्याच्या लौकिकाला जागत अनेक पतंगांच शिरकाण करत होता. पण त्याची नजर नजाकतीने अनेक पतंग हातापासून कापून आकाशात झेप घेणाऱ्या तिच्या पतंगावर आणि प्रत्येक पतंग कापल्यावर होणाऱ्या आनंदाने अधिकच सुंदर दिसणाऱ्या तिच्या लोभस चेहऱ्यावर होती. ऊन वाढत गेलं तसा तिचा गोरा चेहरा गुलाबी झाला. तिलाही आता तिच्यावर असलेल त्याच लक्ष लक्षात आलं होतं. त्याच पतंग उडवण्यातील कौशल्य तिलाही भावल होत. तोवर ती शेजारच्या चाळीतील संदीपची बडोद्याची कझीन असल्याची खबर त्याने मिळवली होती. दुपार सरेपर्यंत बिनधास्त नजरानजर सुरू झाली होती. एखाद्या झकास पतंग कापणीला हळूच टाळ्या वाजवून दाद दिली जात होती. ती दादच आता दोघांना अधिकाधिक पतंग कापायला प्रोत्साहन देत होती.
संध्याकाळ झाल्यावर दोन्ही गच्चीत गर्दी वाढली. दोघांना एकमेकांच दर्शन होण्यात अडथळे येऊ लागले. त्याने एक आयडिया केली. तो दहाएक पतंग आणि फिरकी घेऊन कौलावर गेला. कौलावर तोल सांभाळत, एका हातात फिरकी धरून काही वेळ पतंग आणि बाकी वेळ तिच्याकडे बघण्यात तो हरवून गेला. आता वारा जोरात वाहू लागला होता. तिला काळजी वाटत होती. जरा जरी पाय सरकला तरी चौथ्या मजल्याच्या उंचीच्या कौलांवरून सरळ खाली पडून चाळीच्या चौकात लावलेल्या दगडी फारश्यावर कपाळमोक्ष व्हायची प्रचंड शक्यता. बरं ओळख ना पाळख त्याला सांगावं तरी कसं? ती चिंतेत होती. त्याच्याकडे बघत होती. तो त्याच्याच धुंदीत होता. तिच्याकडे बघत होता. इतक्यात त्याच्या पायाखालच एक कौल सरकल. तो गडगडत गेला आणि हवेत तरंगत खाली जाऊ लागला. त्याच्या हातातले रंगीबेरंगी पतंग देखील त्याच्याबरोबर हवेत तरंगू लागले! तिने हातातला पतंग सोडला आणि गच्चीच्या पायऱ्यांकडे धाव घेतली.
तिला अशी अचानक निघालेली बघून तो कौलांवरून गच्चीवर आला. गच्चीच्या जिन्यापर्यंत आला तर समोर ती उभी होती. धावल्यामुळे दम लागलेली. दोघे एकमेकांकडे बघत होते. ती म्हणाली “कौलांवर चढण डेंजर आहे. मला एका कल्पनेनेच भीती वाटली! हाय मी अमृता.” तिने शेक हॅन्ड साठी पुढे केलेला, मांजाने कापलेला तिचा हात हातात धरत तो म्हणाला “मी अमित. चल पतंग उडवूया? मग मस्त कॉफी घ्यायला जाऊ आणि बोलू” तिने लाजून मानेने होकार दिला.
आता हवा मस्त होती. त्या दोघांनी आपापले पतंग क्षणात आकाशात उंचावर नेले. ते दोन पतंग एकत्र एकाच लयीत विहार करत आकाशात शेजारी शेजारी स्थिरावले होते. “आयुष्यात संक्रांत येणे” ह्याचा अर्थ निदान त्या दोघांसाठी तरी बदलला होता. आजूबाजूच्या गर्दीच अस्तित्व त्यांच्या दृष्टीने संपल होत. त्या गच्चीत ते दोघेच होते. एकमेकांना बघत असणारे, नजरेत साठवून घेणारे आणि विश्वास निर्माण करत असलेले आणि मावळतीला कललेल्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर होते त्यांचे दोन पतंग, एकत्र उंच उंच जात असलेले, स्वच्छंद! मावळत्या सूर्याच्या पलीकडे दिसत असलेल्या सुंदर पहाटेला शोधत असलेले! ©मंदार जोग
Image by Achim Scholty from Pixabay
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
छान
सही
छानच
मस्तच ….माझं माहेर बडोद्याच आहे…संक्रांतीच्या आठवणी ताज्या झाल्या
Wa