होमवर्क…..
माझी शाळा.
भयानक आवडायची मला.
पण…
होमवर्क , पार डोक्यात जायचा.
आणि बर्याच वेळा डोक्यावरूनही.
आईचा स्वयपाकाचा अंदाज कधी चुकतो का ?
एक वेळ ऊरेल , पण पुरणार नाही असं कधीच होणार नाही.
मग शाळावाल्यांना वेळ पुरत नाही, हे कसं काय ?
जो काय अभ्यास माथी मारायचाय तो शाळेतच मारा की राव.
घरचा अभ्यास म्हणजे, मरे हुवे फिर से मारनेवाली साजिश.
शाळा म्हणजे माझ्यासाठी मस्ती करण्याची जागा असे.
अगदीच नाईलाज झाला तर अभ्यास करायचा.
निदान तशी अॅक्टिंग तरी.
पेन्सिल चावत , हाताच्या पसरणीवर मान रेलून , फळ्याकडे बघत स्वप्नांच्या दुनियेत हरवून जाणं, ही खरी शाळा.
आता शाळेतच अभ्यास कधी केला नाही, तर घरी काय करणार कप्पाळ ?
होमवर्क म्हणजे रखडपट्टी असायचा.
नाही जमला तर खरडपट्टी.
‘आऊटसोर्सींग’.
होमवर्कनं जगाला दिलेला सुंदर साईडईफेक्ट.
आमच्या काळात बाराच्या शाळेला, अकरालाच पोचायची महान परंपरा होती.
प्रत्येक वर्गात एक तरी, सिन्सीयॅरीटीला रिडिफाईन करणारा कोणी तरी असतोच.
तो बिचारा कौतुकाचा भुकेला असायचा.
मान मोडून आदल्या रात्री होमवर्क करणार.
त्याला ऊचित मान द्यायचा.
झेराॅक्सला लाजवेल इतक्या स्पीडनं त्याचा होमवर्क काॅपी करायचा.
निगरगट्ट चेहर्यानं होमवर्कची वही दप्तरबंद करायची.
बस..
विषय संपला.
आऊटसोर्सींग , काॅपी अॅन्ड पेस्ट..
दॅटस् आॅल अबाऊट होमवर्क.
माझ्या लेकी फारच सिन्सीयरली होमवर्क करतात.
बहुतेक त्यांच्या टीचरला घाबरतात.
हमारे जमाने में , आमचे मास्तर आम्हाला वचकून असायचे.
जमाना बदल गया है….
पण आता , कभी कभी वाटतं.
होमवर्कची सवय लागायला हवी होती.
शालेय आयुष्यासाठी नाही , आयुष्याच्या शाळेसाठी.
मला आठवतंय , कोणी माहितीतला पाहुणा येणार असेल तर , आजी मुद्दामहून त्याच्या आवडीची भाजी करायची.
पाहुणा प्रचंड खूष….
याबाबतीतला तिचा होमवर्क जबरदस्त असायचा.
समोरच्याचा आवडीनिवडी लक्षात घेवून , थोडसं का होईना त्याच्या मनासारखं, मनापासून वागलं की ,
तो माणूस फेविकाॅलपेक्षाही घट्ट जोडला जाणारच.
हे होमवर्क जमायला हवं.
आता बरीच मंडळी वर्क फ्राॅम होमवाली असतात.
अरेरे..
आपल्याला नाही जमणार.
सगळं पितळ ऊघडं पडणार.
दिवसभर आम्ही राब राब राबतो, असं कुठल्या तोंडानी सांगणार ?
जाऊ देत.
सुखी जीवनाची माझी डेफिनेशन काय ?
मी एक दुकानदार.
आगे दुकान , पीछे मकान.
दोघांना जोडणारा चोरदरवाजा.
गिर्हाईक नसलं की घंटा वायवायची.
बांगडी किणीण्ण करणारा हात दरवाजातून हळूच डोकावणार.
फुरफुरत मी दिवसातून ऐकोणीसवेळा चहा ढोसणार.
हे खरं होमवर्क….
एका होमवर्कला मात्र आपला दिलसे सलाम.
बायका दिवसभर जे काम करतात, त्याला तोड नाही.
आॅफिसवर्क आणि होमवर्क दोन्ही लढाया लढत.
ग्रेट..
नरजन्माचा निर्लज्ज हेवा वाटतो तो अशावेळीच.
तसा जमेल तेवढा हातभार लावतो आम्हीही.
माझा एक तरूण मित्र आहे.
ताजं ताजं लग्न झालेला.
आमच्यासारख्यांना तोंडात मारावा असा जोडा.
परफेक्ट ट्युनींग.
सदैव खुष.
साले हे कधी भांडणार ?
शेवटी त्याच्या बायकोला विचारलंच .
‘ईस खुषी का राज क्या है ?’
ती वदली.
“होमवर्क…
थँक्स सासूबाई.
सासूबाईंनी हातपाय चालवायची सवय लावली होती.
जोडीनं “होम”चं वर्क करतो आम्ही.
म्हणूनच एकमेकांना भरपूर वेळ देवू शकतो.”
मी कच्चकन जीभ चावली.
आई आणि बायको कुठंतरी हळदी कुंकवाला गेलेल्या.
थोडक्यात वाचलो.
आयुष्याच्या वहीला चुकून होमवर्कचा टिळा लागायचा.
हो हो…
उद्यापासून जमेल तसा होमवर्क करणार आहे मी..
Image by Jasmine Trails from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
Mast 👌👌👌👌
छान लिहिलंय