हळदी कुंकू- (संक्रांत विशेष)

तो असेल काहितरी नववी, नाही नाही दहावी मधे. क्लासमधे एकेदिवशी सरांनी सांगितलं, “या संक्रांतीला मुलींचं हळदीकुंकू दुपारी चार वाजता करायच हं.” हे सर अगदी हौशी वगैरे होते. क्लासच्या उजव्या बाजूला एक चैतन्याची लहर उठली.
याचं लक्ष हल्ली हल्ली त्या बाजुलाही जायला लागलं होतं. ती बाजू अगदीच दुर्लक्ष करण्यासारखी नसून, कधीतरी परत वळून बघण्यासारखीही दिसू शकते, याचा त्याला हल्लीहल्लीच साक्षात्कार झाला होता. त्यातल्यात्यात दुसर्‍या रांगेतली कडेची जागा तर फारच.
येडबंबू सारखं त्याने विचारलं, “आणि मुलांचं हळदीकुंकू किती वाजता आहे सर?” त्याच्या या प्रश्नावर मुलं खदाखदा, तर मुली गुदमरून हसल्या. बोलावलं असतं तर, नटून थटून आलेल्या, परग्रहावरून आल्याप्रमाणे सुंदर दिसणार्‍या मुलींसोबत वेळ घालवायला, क्लास मधला प्रत्येक मुलगा, सगळी कामं टाकून नक्कीच आला असता. पण इथे मात्र सगळे याला हसत होते.
बाकी कुणी हसलं, तरी याचं चोरटं लक्ष, दुसर्‍या रांगेतल्या कडेच्या जागेकडे होतंच. ती मात्र हसली नव्हती. उलट लाजून जरा गोरिमोरीच झाली होती. मग क्लास संपला तसा मुलांचा दंगा आणि मुलींचं प्लॅनिंग सुरू झालं आणि तो विषय वाहून गेला.
याचा क्लास अगदी याच्या घरामागच्या गल्लीतच होता. हा हा म्हणता संक्रांतीचा दिवस जवळ येवू लागला. त्याच्या टवकारलेल्या कानावर उजव्या बाजुच्या चर्चेतले काही तुकडे पडले होतेच. सगळ्या काळी साडी नेसून यायचं ठरवत होत्या. कुणी कुठे भेटायचं, काय दागीने घालायची घरून परवानगी मिळेल वगैरे चर्चा हिरिरिने सुरू होत्या.
तेवढयात एक मंजूळ किणकिणता स्वर उमटला, “ए माझ्याकडे काळी साडीच नाहिये गं !” शब्दवेध करणार्‍या धनुर्धराचं लक्ष वेधलं जावं, तशी याची मान गर्रकन दुसर्‍या रांगेतल्या कडेच्या जागेकडे वळली. ’अरे आता ही कॅन्सल वगैरे तर करणार नाही ना !!” त्याचं ह्रुदय जागच्याजागी हिंदकळलं. तिच्या वाक्यावर अपेक्षित गलका झालाच. इतक्या उशीरा कसं सांगत्ये, कुणाकडून आणायची साडी वगैरे चर्चा सुरू झाली.
त्याला शक्य असतं तर त्याने तिच्या घरापासून क्लासपर्यंत काळ्या साड्यांच्या पायघड्या घातल्या असत्या ! अर्थात त्याला विचारायला कोणी येणार नव्हतं ते सोडा. शेवटी, ’काळी नाही पण वेगळ्या रंगाची साडी नेसून’ ती येणार एवढं नक्की झालं !
आता त्याच्या मनात त्याचं स्वतःचं प्लॅनिंग सुरू झालं. त्याकाळी अवतीभवती “साध्या वेशातल्या पोलीसांचा” कडक पहारा असायचा. आईच्या मैत्रिणी, बाबांचे मित्र, ताईच्या ठमाकाकू मैत्रिणी, ही सर्व मंडळी अतिशय बारीक लक्ष ठेवून असायची. चुकून कुणाच्या नजरेला संशयास्पद असं काही जाणवलं तर भरलीच गच्छंती !
संक्रांतीच्या दिवशी दुपारपासूनच याची उलाघाल सुरू झाली. शेजारच्या गच्चीवर पतंग उडवायला जायच्या निमित्ताने हा घराबाहेर तर सटकला, पण गच्चीवर फिरकलाच नाही. उगाच पतंगामागे धावतोय असं दाखवून गल्लीच्या टोकापर्यंतही हा जावून आला, पण पुढे जायचं धाडस काही याच्याने होईना. शेवटी रथात शस्त्रं टाकून बसलेल्या अर्जुनासारखा हा हतप्रभ होवून वाडीच्या अंगणात गेटवर उभा राहिला. आता कसली हळद आणि कसलं कुंकू…
साडेतीन वाजत आले असतील. रस्त्यात दूरवर एक पिवळा धम्मक ठिपका उमटला. संथ गतीने तो याच्या दिशेने येवू लागला. दोन गल्ल्यांच्या तिठ्यावर तो ठिपका जरासा घुटमळला. एक गल्ली क्लासची आणि एक गल्ली याची.
अडखळत्या, घाबरल्या पावलांनी तो ठिपका अखेर याच्या गल्लीत शिरला. हा जणु नजरबंदी झाल्यासारखा त्या ठिपक्याच्या वाटचालीत अडकून पडलेला. पिवळी धम्मक साडी नेसलेली आणि केसात लालभडक गुलाबाचं फूल माळलेली, दुसर्‍या रांगेत कडेच्या जागेवर बसणारी ती, जराही इथेतिथे न पहाता, झरझर याच्या डोळ्यांसमोरून निघून गेली.
याला ओलांडून जाताना, हलक्याश्या, लाजर्‍या हास्याची पडछाया तिच्या चेहेर्‍यावरून सरकून गेल्याचा भास याला झाला. याच्या हातापायतला जोरच निघून गेलेला. बराचवेळ तिथेच गोठून उभं राहिल्यावर, शक्तीपात झाल्याप्रमाणे हा निमूटपणे घरात आला. जे घडलं ते सत्य की भास हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं. बास इतकच.
दुसर्‍या दिवशी कुण्या क्लासमित्राने खवचटपणे मोठ्यांदा विचारलं, “काय मग? तू गेला होतास का हळदीकुंकवाला?” “छे रे !” हा मोठ्याने म्हणाला आणि फक्त दुसर्‍या रांगेत, कडेच्या जागेपर्यंतच ऐकू जाईल असं पुटपुटला, “हळदीकुंकूच माझ्याजवळ आलं होतं !!”
पिवळसर गोर्‍या गालांवर तेव्हाही लालचुटुक गुलाब फुललेले कळलेच त्याला !!
Image by Dimitris Vetsikas from Pixabay 

2 thoughts on “हळदी कुंकू- (संक्रांत विशेष)

  • January 15, 2020 at 4:41 am
    Permalink

    झकास 👌👌

    Reply
  • January 15, 2020 at 11:16 am
    Permalink

    क्या बात!!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!