तीळ गुळ घ्या- (संक्रांत विशेष)
“आज थंडी जरा जास्तच आहे. आई थोड्या वेळाने गेलीस चालायला तरी चालेल”.
पण तेजसचे हे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच विजयाकाकू गेट उघडून बाहेर पडल्या देखील.
“ही आई पण ना, कधी ऐकेल तर शपथ”. पाठमोऱ्या जाणाऱ्या आईकडे पाहून त्याने मान हलवली आणि आपले आवरायला पळाला. सुनीधी म्हणजे त्याची बायको आधीच उठली होती. तिचे आवरून झाले होते आणि ती सगळ्यांच्या ब्रेकफास्टची तयारी करत होती. त्यांची दोन्ही मुले म्हणजेच पार्थ आणि स्पृहा
दोघेही स्कुलसाठी तयार होत होते.
विजयाबाई बाहेर पडल्या आणि सुनिधिने मान हलवली. तेजसला त्याचा अर्थ कळत होता, पण आत्ता सकाळच्या गडबडीत उगाच वाद नको म्हणून तो काहीही न बोलता त्याचे आवरायला गेला. सगळ्यांचे आवरून झाले आणि सगळे ब्रेकफास्टला आले तोच विजयाबाई देखील चालून आल्या. सगळ्यांनी नाश्ता केला आणि आपापल्या मार्गाने निघाले. म्हणजेच मुले स्कुलबसकडे आणि सुनीधी आणि तेजस ऑफिसला. ऑफिसला जाण्यापूर्वी सुनिधीने “आई मी सगळे आवरून घेतले आहे. तुम्ही आता आराम करा जरा”. असे सांगितले.
पण लगेच “अगं तू आता ८ वर्षांपूर्वी आलीस. त्याआधी माझे मीच सगळे आवरत होते. तेव्हा कुठे कोण होते माझ्या मदतीला”?
हे त्यांचे नेहमीचे वाक्य आले. तिने नुसते तेजसकडे पाहिले पण त्याने नजर चोरत चला आता उशीर झालाय असे म्हणून घाईघाईने बाहेर पडला.
ह्या घराला हे काही नवीन नव्हते. आईला काही सांगायला गेले तर ती लगेच मी किती आणि काय काय केलंय? कसं एकटीने त्याला लहानाचे मोठे केले आहे हे सांगत असे. त्यात तिने शिक्षक म्हणून केलेली नोकरी. तिची शिस्त मोडण्याची आपली काय हिम्मत होती? वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी, जिथल्या तिथे. खाणे पिणे, शाळा, अभ्यास, खेळणे, आणि झोपणे ह्या गोष्टी अगदी वेळच्या वेळी व्हायला हव्यात असा त्यांचा हट्ट असे. तेजसला त्याची सवय झाली होती म्हणा किंवा ते अंगवळणी पडले होते म्हणा. त्याची काही हरकत नव्हती. कॉलेज संपवून तेजस फायनान्स कंपनीत नोकरीला लागला आणि तिथेच त्याला सुनिधी भेटली. गोल चेहऱ्याची, रेखीव भुवयांची, गोऱ्या गोऱ्या गोबऱ्या गालांची, पाणीदार तपकिरी डोळ्यांची, कुरळ्या केसांची सुनिधी त्याला पाहताक्षणी आवडून गेली.
दोघेही एकाच प्रोजेक्टवर काम करू लागले. विचार जुळले आणि काही दिवसातच दोघानांही आपण एकमेकांना आवडू लागल्याचे समजले. पण बोलणार कोण? तेजस काही बोलयला तयार होईना म्हणून शेवटी सुनिधीनेच त्याला प्रपोज केले. पुढे मग घरून थोडाफार विरोध आणि मग शेवटी मुलांच्या इच्छेखातर लग्न. नव्याचे नऊ दिवस संपले आणि मग विजयाबाईंचा प्रयेक गोष्टीत वक्तशीरपणा, जिथल्यातिथेपणा, काटेकोरपणा सुनिधीला जमेना. तिची दमछाक होऊ लागली. मग विजयाबाईंचे बोलणे ऐकावे लागत असे. तेजस आईपुढे काही बोलत नसे. तो सुनिधीलाच शांत राहायला सांगत असे. दिवस सरत गेले पण विजयाबाईंचा काटेकोरपणा आणि तितकेच काटेरी बोलणे हे कमी होण्याऐवजी वाढतच गेले.
नातवंडं झाल्यावर तरी त्या थोड्या रमतील अन काटेरी बोलणे कमी करतील हा अंदाज खोटाच ठरला. जसजशी नातवंडे वाढू लागली तसतशा त्या आणखीच आपल्या कोशात ओढल्यासारख्या झाल्या. आई असे का वागते हे तेजसला कळत नसे. त्यात त्याला कोणी भाऊ बहीण नसल्याने तो हे कोणाबरोबर शेअर ही करू शकत नव्हता. बघता बघता ८ वर्षे लोटली पण आई तशीच का? ह्याचे उत्तर आजही तेजसकडे नव्हते. सुनिधी आणि आई यांच्या कात्रीत तो सापडत होता. तशी सुनिधी सगळे व्यवस्थित करत होती पण तिच्या मुद्द्यांवर त्याच्याकडे उत्तर नसे आणि यातून मार्ग काढणे त्याला जमत नव्हते.
आज ऑफिसमध्ये विशेष कामही नव्हते. त्याने घड्याळ पाहिले. ३ वाजले होते. काहीतरी ठरवून त्याने लॅपटॉप बंद केला आणि आईला फोन केला.
विजयाबाई – आत्ता कसा फोन केलास? रोज तर तुझा या वेळी फोन नसतो.
तेजस – मी घरी येतोय.
विजयाबाई – काय झाले तब्येत तर ठीक आहे ना?
तेजस – तब्येत बारी आहे. काळजी करू नकोस. मी घरी येतोय आल्यावर बोलू म्हणून त्याने फोन कट केला.
विजयाबाईंना वाटले आता हिने काय कान भरलेत कोणास ठाऊक? पाहू आल्यावर समजेलच. पण मी आहेच खमकी प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला.
तेजस घरी येताना आईची आवडती चाफ्याची फुले घेऊन. ती पुढी उघडून तिच्या हातात दिला आणि फ्रेश व्हायला गेला. फ्रेश होऊन मग येऊन बसला. विषयफोड कशी करावी म्हणून विचार करत असतानाच.
विजयाबाई – चिरंजीव बोला आज काय तक्रार आहे आमच्याबद्दल? इतक्या वर्षात तुम्हाला आई कधी चुकीची वाटली नाही पण आता गेल्या आठ वर्षात आई खूपदा चुकीची वाटू लागली आहे? सांगा काय काय आरोप आहेत आमच्यावर?
आईच्या अशा काटेरी बोलण्याने तेजस चमकला. मग सावरून म्हणाला
तेजस – आई असे का वाटते तुला कि मी काही आरोप करायला आलोय म्हणून? आणि शिवाय सुनिधीने मला पाठवले आहे असे का वाटते तुला?
विजयाबाई – हो त्याशिवाय का तू असा बोलायला आला आहेस? इतक्या वर्षात तुला कधी मी चुकीची वाटले नाही. पण आता वाटते. इतक्या कष्टातून तुझ्या बाबांच्या माघारी घर सांभाळले, तुझ्या कोणत्या काकाने मदत केली नाही तरी मी उभी राहिले. नोकरी केली. काडी काडी जमवून घर उभारले. तुला लहानाचे मोठे केले, चांगले शिक्षण दिले. आणि आता त्याचे चांगले पांग फेडतोयस बाबा.
तेजस – आई तुझे कर्तृत्व कोण कोण नाकारते आहे? ना मी ना सुनिधी. अन तुला असे का वाटते गं कि आम्हाला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही? उलट आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. तू जे काही केले आहेस माझ्यासाठी, आपल्या घरासाठी ते मी कधीच विसरू शकत नाही.
विजयाबाई – हो पण तरीही माझ्याशीच बोलायला आलास. माझी समजूत काढायला आलास ना?
तेजस – आई हे बघ मी काय म्हणतो ते पाहिले ऐकून घे. सुनिधीची निवड मी केली याचा तुला राग आला होता हे मला माहिती होते. पण ती काही वाईट मुलगी नव्हती आणि आताही नाही. ती तिच्यापरीने सगळे करते. आता तिला नसेल जमत तुझ्यासारखे काटेकोरपणे वागायला. पण ती मानाने वाईट नाही गं.
विजयाबाई – अशीच बाजू घेणारं कोणी मला मिळाले नाही हे माझे दुर्दैव.
तेजस – म्हणून तिचा दुस्वास करतेस का?
तेजसच्या या वाक्याने विजयाबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. तेजस त्यांच्याजवळ जाऊन बसला. त्याने आईचे डोळे पुसले.
विजयाबाई – मी पण सगळे केले. ते पण वक्तशीरपणे. एकटीने. मी कधी ऑफिसमधून कंटाळून आले म्हणून तुला जेवण पार्सल मागवले नाही. कितीही कंटाळा आला तरी सगळे केले.
तेजस – आई अगं तुझे कर्तृत्व आम्ही नाकारत नाही. अन त्या काळी तसे पार्सल मागवणे त्यावेळच्या इन्कम मध्ये शक्य नव्हते. आता काळ पण बदलला. तुला सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे हव्या असतात. आता आहेत घरात लहान मुले केला त्यांनी थोडा दंगा, केला पसारा तर काय बिघडते? इतके निटनिटके राहून तरी काय करायचे आहे? अगदीच पसारा असावा असे माझे म्हणणे नाही पण इतकेही स्ट्रिक्ट राहायला नको ना एवढेच माझे म्हणणे.
विजयाबाई – हो का? बरेच कळायला लागले तुला? ह्याच्या आधी कधी असा बोलला नाहीस तो?
तेजस – हो नाही बोललो कारण तुला उलटून बोलण्याची कधीच इच्छा नव्हती.
विजयाबाई – मग आता कोणाची शिकवणी घेतलीस मग?
तेजस – कायम असे तिरकसच बोलणार आहेस का तू? अगं मी फक्त घराबाबत बोलतोय असे नाही. तुला सुनिधीच्या हाताचे जेवण आवडत नाही. प्रत्येक गोष्टीत काहीतरी खोट काढायलाच हवी का? तिला सगळ्या गोष्टी तुझ्यासारख्या कशा जमतील? शिवाय जेव्हा तुझी नोकरी चालू होती तेव्हा ठीक होते. पण आता जरा थोडी रिलॅक्स जग ना. निवांत उठलीस, गेलीस थोडी उशिरा चालायला तर बिघडणार आहे का? मागच्या आठवड्यात तू चक्कर येऊन पडलीस. मला कळवले नाहीस पण मला कळायचे राहणार होते का? पेंडसे काकूंनी सांगितले मला तू कितीही लपवलेस तरी. आई तुझी काळजी वाटते गं. मला वाटते तू इतकी वर्षे परिस्थितीमुळे काटेकोरपणे, कठीण मार्गाने जागलीस त्यावेळेस पर्याय नव्हता गं आपल्याकडे. पण आता आहे. आता नातवंडांमध्ये रम, त्यांच्याशी दंगा कर, तुझे चाकोरीबद्ध आयुष्य थोडे बदल. एखादी गोष्ट अमुक एका वेळी आणि अमुक एक प्रकारेच व्हायला हवी हा नाद सोड. जगण्याचे ताळतंत्र सोडावे असे मी म्हणत नाही पण घरात तू आई किंवा आज्जी पेक्षा शिक्षकच जास्त वाटतेस. शिकांचा धाक हवाच आणि त्यांनी दाखवलेला योग्य मार्गही हवा त्याबद्दल माझे दुमत नाही. पण आम्हाला आमचे लाड करणारी आई देखील हवी. पार्थ आणि स्पृहाला आज्जी माया लावणारी आज्जी देखील हवी. शिवाय तुझ्या तब्येतीची देखील तू काळजी घ्यावीस असेच वाटते.
तेजसच्या मनातील या बोलण्याने विजयाबाई विचारात पडल्या. डोळे पाणावले.
तेजस – आणि आणखी एक आई. जसा मी सुनिधीचा पती आहे, स्पृहा आणि पार्थचा बाबुडी आहे तसाच तुझा लहानपणीचा गुंड्या देखील आहे. लहानपणी तू मला गुंड्या म्हणायचीस आठवते? मी आजही तसाच आहे गं. अन जसा ह्या सगळ्यांचा माझ्यावर हक्क आहे तसाच तुझाही आहे. तूच मी लग्ना झाल्यामुळे माझ्यापासून दूर दूर जात राहिलीस. मी तसाच तुझ्या कुशीसाठी तरसतो आहे गं.
विजयाबाईंना आता पुढचे काहीच दिसत नव्हते. डोळे पाण्याने डबडबले होते. आपला मुलगा हा आपलाच आहे आणि आपण उगाचच शंका घेत राहिलो ह्याचे त्यांना वाईट वाटले. लग्नानंतर मुलगा आपला राहत नाही म्हणतात ते चुकीचे आहे हे त्यांना आज समजले.
गद्गदलेल्या स्वरात त्यांनी हाक मारली – गुंड्या… गुंड्या
तेवढ्यात उद्या संक्रांत असल्याने त्याच्या तयारीसाठी सगळी खरेदी करून ऑफिसमधून लवकरच निघालेली सुनिधी घरात पोहचली. आई आणि लेखातील हा सीन तिला बुचकळ्यात टाकणारा होता. तेजस आपल्यासमोर एक आणि आई समोर एक असे वागतो काय असे क्षणभर वाटून गेले. हातातील सामान तिने किचन मध्ये ठेवले. आणि फ्रेश होऊन पुन्हा किचन मध्ये आली. तोच विजयाबाईंनी आवाज दिला.
विजयाबाई – सुनिधी काय करतेस?
सुनिधी – अहो शेंगसोलाची भाजी करायची आहे. बाजरीची भाकरी आणि अजून बरेच काही करायचे आहे. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मी गरम गरम वडे घेऊन आले आहे नाक्यावरून. दोन मिनिटात देते तुम्हा दोघांना. मुलेही येतीलच एवढ्यात.
विजयाबाई – ते काही नाही. तू आधी ये आणि बैस बघू इथे. मी मस्त मसाला चहा करते आपल्या तिघांसाठी. आपण तिघे सोबतच नाश्ता करू.
सुनिधीला हे काय चालले आहे ते कळेना. आपण चुकीच्या घरी तर नाही ना आलो असे क्षणभर वाटले. तिने तेजसकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिले. तो अर्थपूर्ण आणि आश्वासक हसला. तेवढ्यात विजयाबाईंनी स्वतः चहा ठेवला आणि वडे खाण्यासाठी घेऊन आल्या. सुनिधी पुन्हा उठू लागताच त्यांनी हातानेच तिला पुन्हा बसवले आणि नाश्ता करायला लावला. पुन्हा स्वतः चहा घेऊन आल्या. आज काय सुरु आहे हे तिला कळेना. चहा घेऊन सुनिधी पुन्हा किचनकडे निघाली असता विजयाबाईंनी थांबवले.
विजयाबाई – सुनिधी आत्ता दमून आलीस ना बाळा. बस जरा निवांत.
सुनिधी – अहो पण आई सगळा स्वयंपाक करायचा आहे. त्यात मला भाकरी करायला वेळ लागतो.
विजयाबाई – मग नको करुस. अगं खरेच सांगते. बस इथे गप्पा मारू आपण. मी गुंड्याला पाठवते सुपनेकरांकडून पार्सल आणायला. त्यांच्याकडे शेंगसोलाची भाजी, बाजरीची भाकरी, मुगाच्या डाळीची खिचडी सगळे मस्त मिळते. तू आत्ता काही करू नकोस.
सुनिधी – आई चिडला आहात का माझ्यावर? काही चुकले का माझे?
विजयाबाई – नाही गं. माझेच चुकले. आता त्या चुका दुरुस्त करायच्या आहेत. उगाचच दुस्वास करत राहिले. आज गुंड्यानी डोळे उघडले बघ.
सुनिधी – हा गुंड्या…?
विजयाबाई – हो मग. तुझा हा हबुडी… पण मी लहानपणी त्याला गुंड्या म्हणत होते. अगदी कॉलेजला जायला लागेपर्यंत. आज त्यानेच आठवण करून दिली.
आता सुनिधीच्या चेहऱ्यावर हसू आले.
विजयाबाई – आणि उद्या तुम्ही दोघांनी काहीही करणे द्या ऑफिसात पण दोघांनीही सुट्टी घ्या. मुलांना सुट्टी आहेच. उद्या सकाळी तू तिळाच्या वड्या कर. छान असतात तुझ्या वड्या. ह्याआधी बोलले नाही पण आवडतात मला. आणि मी मस्त गरमागरम गुळपोळी करणार आहे स्वतःच्या हाताने. अन तुम्हा चौघांनाही भरवणार आहे. खूप खूप वर्षांनी मला असे आनंदाने आपल्या कोणासाठी तरी काहीतरी करावेसे वाटत आहे. आपण सगळे संध्याकाळी फिरून येऊ, तिळगुळ वाटायला जाऊ. कित्येक दिवस मी अशी आनंदाने गेलेच नाही कधी.
भारावलेली सुनिधी विजयाबाईंच्या गळ्यात पडून मुसमुसू लागली.
सुनिधी – आई ह्या अशा संक्रांतीची मी गेली आठ वर्षे पाहत होते. तुम्हाला आवडतात वड्या हे तेजसने सांगितले होते. म्हणूनच तर करायचे. पण…
तिचे वाक्य तोडतंच विजयाबाई म्हणाल्या – इतके वर्ष तू तिळगुळ देत राहिलीस, पण मी कधी गोड बोलले नाही. पण ह्यावर्षीपासून आपली खऱ्या अर्थाने संक्रांत साजरी करू. तू म्हण “तिगूळ घ्या” आणि मी इथून पुढे खरेच गोड बोलेन.
तेजसने आणलेल्या सोनचाफ्याचा दरवळ आता हॉल मधील वातावरणात प्रसन्न करीत होता. सुनिधी आणि विजयाबाई हसून रडत होत्या, रडत रडत हसत होत्या.
अपार श्रद्धेने स्वामी महाराजांच्या तसबिरीकडे हात जोडून तेजस म्हणाला – तिळगुळ घ्या… गोड बोला. तिळगुळ घ्या… गोड बोला.
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021
खूप छान
Thank you!
गोष्ट छान आहे पण गरम गरम गुळपोळी भरवणं केवळ अशक्य आहे.😀
सुंदर ….वाचताना डोळे पाणावले
Sunder