चंद्र आणि चांदणी….

मंथ एन्डच प्रेशर. आज तर सबमिशनचा शेवटचा दिवस. क्लायंटचे कोट्यवधींचे क्वार्टरली हिशोब जुळवून सबमिट करून निघेपर्यंत तिला पाणी प्यायची देखील शुद्ध नव्हती. एमएनसी कन्सलटिंग मध्ये दिसणारे टिपिकल चित्र. “तुम मुझे खून दो मैं तुम्हे पैसा देता हूं” कल्चर मधील ती एक प्रवासी होती. काम संपवून लॅपटॉप आवरून निघेपर्यंत रात्रीचे दोन कधी वाजले ते तिला कळलंच नाही. अजूनही आपल्या ‘खूनची आहुती’ देत असलेल्या कलीग्सना बाय म्हणून ती निघाली. बीकेसी ते गोरेगाव. आता रस्ता मोकळा असेल म्हणजे घरी वीस मिनिटात पोहोचणार ह्याचा आनंद मानत तिने त्या काचेच्या थंड पिंजऱ्यातून बाहेर येऊन ओला ऍप सुरू केलं. आणि तिला परिस्थितीची जाणीव झाली. ओला आणि उबरचा संप होता! उद्या व्हाउचर टाकल्यावर ओलाचं भाड तिच्या खात्यात कंपनी जमा करणार असली तरी तिची कंपनी संप मिटवू शकत नव्हती! तिच्या घराच्या जवळपास राहणारे सर्व कलीग्स केव्हाच घरी गेले होते. तिने फार वेळ न घालवता रिक्षाने जायचा निर्णय घेतला. रिक्षा स्टॅण्ड जवळच्याच कोपऱ्यावर होता. ती कानात इअरफोन खुपसून, प्ले लिस्ट सुरू करून स्टँडच्या दिशेने चालत निघाली.
मुळचं आरस्पानी सौंदर्य, आखीव शरीर, त्यात तिचा उत्तम फॅशन सेन्स आणि त्यानुसार तिने परिधान केलेल्या फॉर्मल अटायर मध्ये ती प्रचंड आकर्षक दिसत असे. मुख्य म्हणजे ह्याची तिला पुरेपूर जाणीव होती. ती प्रेझेंटेशन करताना तिने मेहेनतीने बनवलेल्या पीपीटी पेक्षाही लोकांचं, अगदी त्यांच्या फर्मच्या पार्टनर्सच देखील लक्ष तिच्याकडे असे ह्याची तिला सवय झाली होती. अजूनही मनासारखा कोणी न दिसल्याने ती “सिंगल नॉट रेडी टू मिंगल” स्टेटस राखून मिळणारे अटेंशन एन्जॉय करत होती!
तर त्या रात्री आकाशातून जमिनीवर अवतरलेल्या चटक चांदणीसारखी ती अंधाराला प्रकाशमान करत रिक्षा स्टॅण्डकडे निघाली होती. त्या कोपऱ्यावर कॉफी आणि सिगारेट विकणाऱ्या सायकलवाल्याच्या बाजूला  कॉल सेंटरचे काही अंधार यात्री आणि रिक्षावाले कोंडाळ करून सिगारेटींची वलय आणि गुटख्याचे तोबरे ह्यांचा आनंद लुटत होते! ती रिक्षाच्या शोधात तिथे पोहोचल्यावर त्यांच्या आनंदाला उधाण येऊन अचानक पंचवीस तीस नजरा तिच्या अंगावर साप फिरत असल्यासारख्या तिला ओंगळ स्पर्श करू लागल्या. ती मुद्दाम एका रिक्षाजवळ जाऊन उभी राहीली.
त्या रिक्षाचा सिंगल फसली चालक इतर सहकाऱ्यांना सूचक डोळा मारून तिच्याजवळ येत तिला न्याहाळत लाल तोंडाने म्हणाला “किधर?” तिला त्याची आरपार जाणारी नजर बोचली. मग संबंध प्रवासात रेअर व्ह्यू मिरर मधून तिला बघत तो हायवेवर रिक्षा बुंगाट सोडणार किंवा भावनेवर नियंत्रण राहील नाही तर काहीतरी गैर प्रकार करणार ह्या कल्पनेने ती म्हणाली “नहीं जाना है!” इतकं म्हणून ती पलीकडल्या रिक्षाजवळ गेली. मग तिच्या लक्षात आलं की सगळेच थोड्याफार फरकाने तसेच आहेत. आता काय करायचं ह्या संभ्रमात ती जास्त व्हलनरेबल दिसू लागली आणि तिथे जमलेले सगळे त्याची मजा घेऊ लागले! मगाशी अंगावर फिरणाऱ्या नजरा आता नको तिथे स्पर्श करू लागल्याचं तिच्या लक्षात आलं! क्लायंटचे कोट्यवधींचे फायनान्शियल प्रॉब्लेम चुटकीसरशी सोडवणार्या तिला स्वतःच्या घरी कसं जायचं ह्या प्रश्नाच उत्तर सापडत नव्हतं. तिथे थांबणं अशक्य होतं आणि एकटीने रस्त्यावर चालणं देखील. परत ऑफिसात जावं तर उद्या सकाळच्या फ्लाईट ने बंगलोर गाठायचं होतं! ती रडकुंडीला आली!
इतक्यात बुलेटचा छातीत धडकी भरणारा आवाज ऐकू आला. लांबून एक प्रखर हेडलाईट तिच्या दिशेने येत होता. काही क्षणात बुलेट तिच्या शेजारी थांबली. त्यावरील मुलाने हेल्मेट काढून भुक्कड कॉफीवाल्याला एक कॉफी देना कडक असा आदेश दिला. कुरळे केस, पिळदार शरीर, गोरा रंग, करारी डोळे असलेला तो बेफिकीर तरुण फॉर्मल कपड्यात खूप आकर्षक दिसत होता. जणू ह्या चटक चांदणीच्या मागोमाग त्या रात्री जमिनीवर अवतरलेला पौर्णिमेचा चंद्र. त्याने कॉफी पिऊन पैसे दिले आणि बाईक सुरू केली आणि निघून गेला. ही पुन्हा तशीच उभी. दोन मिनिटात तो परत आला. हिच्या शेजारी थांबून म्हणाला “तुम्हाला मी कुठे सोडू शकतो का?” ती एक दशांश क्षणात “गोरेगाव पूर्व” अस म्हणून त्याच्या खांद्यावर हात ठेवून बाईकवर बसली देखील. तिला सुटका झाल्याचा इतका आनंद झाला होता की आपण किती घाई करतो आहोत हे पण तिच्या लक्षातही आलं नाही. ते लक्षात येईपर्यंत बुलेट हायवेला लागली होती.
रात्रीची निरव शांतता, तुरळक ट्राफिक, मोकळा..न संपणारा लांब रस्ता, बुलेटचा अंगावर कंपन निर्माण करणारा आवाज आणि तिने धरलेल्या त्याच्या खांद्यांचे तिच्या हाताला जाणवणारे पुष्ट मसल्स! दिवसभराच्या थकव्याने ती दमून गेली होती. त्यात हे सर्व तिला खूप सुखावत होतं! तिने बांधलेले केस मोकळे सोडले. त्याच्या उंची परफ्युमचा वास तिला वाऱ्याबरोबर जाणवत होता. बुलेटच्या हँडलवर असलेल्या त्याच्या पिळदार मनगटांचा तिला उगाच मोह पडत होता. ती मागे बसलेली असल्याने थोडा पुढे सरकून बसून तिला कम्फर्टेबल करण्याचा त्याचा सभ्यपणा तिला भावाला होता. बाईकच्या आरशात हेल्मेट मधून जेमतेम दिसणारा त्याचा चेहरा बघायचा ती प्रयत्न करत होती!
इतक्यात बुलेट गोरेगावात शिरली. त्याने विचारलं “गोरेगाव मध्ये कुठे?” ती म्हणाली “हनुमान नगर, woodland सोसायटी.” त्याने दुसऱ्या मिनिटाला गाडी तिच्या सोसायटीच्या गेट जवळ लावली! ती उतरून त्याला थँक्स म्हणाली. निघायच्या ऐवजी उगाच घुटमळली. त्याने हेल्मेट काढत तिला विचारलं-
तो- तुम्ही बीकेसी मध्ये काम करता का?
ती- हो. आज तुम्ही अगदी योग्य वेळी येऊन माझी मदत केली!
तो- ते माझं कर्तव्य आहे. Not a big deal at all! बरं तुमचा फोन नंबर मिळेल का?
ती- (क्षणभर आवाक होत पण खुश होऊन) शुअर. 982…….
तो- thanks. बाय.
तो बाईक सुरू करून निघून गेला. ती त्याला मनात साठवून घरी पोहोचली. चेंज करून फ्रेश होऊन ती बेडवर पडली आणि फोन मध्ये मेसेज वाजला. तिने घाईघाईत फोन हातात घेऊन मेसेज वाचला. मेसेज अपेक्षेप्रमाणे त्याचाच होता. त्याने लिहिलं होतं “मी आज तुमची मदत करून माझं कर्तव्य केलं. मी पण बीकेसी मध्येच काम करतो. घरी आल्यावर आजचा प्रसंग मी माझ्या गर्लफ्रेंडला सांगितला. तिने मला शाबासकी दिली आणि म्हणाली की अशीच मदत करत जा. आता भाऊबीज येते आहे. त्या मुलीला ओवाळणी घाल. तिला विचार आपण तिच्या घरी भाऊ बिजेसाठी किती वाजता जाऊ शकतो. म्हणजे तुझ्या इतर सर्व बहिणींच्या टाईम टेबल मध्ये तिचा टाईम पण सेट करता येईल. ताई प्लीज सांगाल का आम्ही किती वाजता येऊ शकतो भाऊबीजेसाठी? आपला भाऊ, आदित्य”
हा मेसेज वाचून तिने फोन बेडच्या कोपऱ्यात भिरकावला आणि उशीत तोंड खुपसून ती झोपी गेली. त्या पिळदार, रुबाबदार चंद्राची हुशार चांदणी मात्र त्याच्या कुशीत रात्र जागवत होती!
Image by MikesPhotos from Pixabay 
mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

8 thoughts on “चंद्र आणि चांदणी….

    • January 25, 2020 at 11:37 am
      Permalink

      Thanks

      Reply
  • January 25, 2020 at 5:21 pm
    Permalink

    मला वाटलं नेहेमीची लव्ह स्टोरी असेल…. ☺️ पण नाही… छान वाटलं end वाचून

    Reply
    • January 26, 2020 at 11:18 am
      Permalink

      Thanks

      Reply
  • March 18, 2020 at 3:08 pm
    Permalink

    sundar jagavegli gosht very nicely written

    Reply
  • June 3, 2020 at 7:41 am
    Permalink

    हाहाहा मस्त.

    Reply
  • June 5, 2020 at 5:52 am
    Permalink

    वेगळी कथा , 👌👌

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!