गोष्ट… एका लग्नाची भाग १- अभिजीत इनामदार
पावसाळी कुंद दिवस. आज रविवार, पावसाळी हवेत काळ्याभोर ढगांनी दाटी करावी तशीच रविवार म्हटलं की आजुबाजूच्या वातावरणात एक मंद आळसावलेपण भरुन राहिल्याचा भास होत होता. राजवीर ने घड्याळ पाहिले. काळ्या गोल डायल वरती काटे ११.२० झाल्याचे दाखवत होते. तशी सुट्टीच्या दिवशी राजवीरची उठण्याची जवळपास हीच वेळ होती. पावसाळी हवेमुळे एक ओलसर थंडावा वातावरणात भरुन राहिला होता. शेवटी आळस झटकून तो उठलाच. फ्रेश झाला. आत्ता त्याला गरज होती ती एक कप गरमागरम चहाची. त्याला आत्ता घरी चहा बनवून घ्यायची अजिबात इच्छा नव्हती. इतक्यात त्याला आठवण झाली ती तो राहत असलेल्या कॉम्प्लेक्स च्या बाजूच्या कॉम्प्लेक्स मधे नुकत्याच सुरु झालेल्या ‘अमृततुल्य’ ची. पटकन ट्रॅक पॅन्ट अन टी शर्ट अडकवून तो खाली गेला अन गरमागरम चहाची अॉर्डर दिली.
हातात आलेल्या गरमागरम वाफाळत्या चहाने त्याचे मन एकदम प्रसन्न झाले. आजुबाजूच्या थंड हवेत तो गरम, केशरी रंगाचा चहाचा कप म्हणजे पृथ्वी वरील अस्सल अमृत वाटून गेला. चहाच्या पहिल्या घोटाबरोबरच एक अनामिक प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावर पसरली. आता निवांतपणे चहा घेता घेता त्याने मोबाईल पाहिला. मावशीचा मेसेज होता अन काही फोटोज. मेसेज पाहून त्याला काल रात्री आईचे अन त्याचे झालेले बोलणे आठवले.
“राज बाळा ज्या त्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या”
ह्या डायलॉग नी शेवट झालेले संभाषण म्हणजेच आता लग्नासाठी स्थळ शोध मोहीमेला सुरुवात हे आता ठरलेलेच होते. राजने कितीही नको नको म्हणत असताना आईने मावशीला सांगितले होते अन दिपा मावशीने एका मुलीचे दोन फोटो अन लग्नासाठी तयार केलेले प्रोफाईल पाठवून सुध्दा दिले.
“हि आई पण ना… नको घाई करु म्हटले तरी ऐकत नाही” असे पुटपुटतच त्याने दिपा मावशीचा मेसेज उघडला. रेश्मा देसाई, बी. ई. कम्प्यूटर सायन्स. वर्किंग इन एम. एन. सी.
तिच्या कंपनीचे नाव वाचून तिचे अॉफिस आपल्या अॉफिस च्या आगदीच जवळ असल्याचे जाणवले. रेश्माचा फोटो पाहून कुठेतरी त्याच्या मनातून एक आनंदाची लहर मनातून गेल्याचे त्याचे त्यालाच जाणवले. त्याच आनंदात त्याने काऊंटरवरच्या रामला अजून एका चहाची अॉर्डर दिली आणि पुन्हा मोबाईल मधे डोके खुपसून रेश्माचे प्रोफाईल पाहू लागला.
तिकडे रेश्माच्या घरी –
रेश्मा – आई, हे काय गं? मी तुला सांगितलं होतं ना मला आत्ता लगेच लग्न वगैरे करायचं नाहीये, अन तू डायरेक्ट मला कोण कुठल्या राजवीर सरदेसाईचं प्रोफाईल दाखवतेस?
जसे राजवीरच्या घरी रेश्माचे प्रोफाईल पोहचले होते तसेच रेशमाच्या घरी राजवीरचं प्रोफाईल गेलं होतं. अॅक्च्युअली राजवीरची दीपा मावशी अन रेश्माची आई म्हणजेच अंजली देसाई शाळामैत्रीणी. जेव्हा राजवीरच्या लग्नाचा विषय त्याच्या मावशीच्या घरी निघाला तेव्हा तिला सगळ्यात पहिली आठवण झाली ती तीची मैत्रीण अंजलीची. राजवीर साठी मुलगी शोधण्यासाठी म्हणून ती अंजलीशी बोलता बोलता तिला रेश्माची आठवण झाली आणि दोघी मैत्रिणी आनंदाने किंचाळल्या. दीपाच्या बहिणीचा मुलगा म्हणजे आगदी दीपाचाच मुलगा. तिच्या घरी जर आपली मुलगी गेली घरीच मुलगी, तर आपल्याला काहीच काळजी नाही असा आपला साधा आणि सिंपल विचार रेश्मा च्या आईच्या डोक्यात.
पण रेश्माला अजून लग्न करायचे नाही हे तिच्या आईला माहिती होते. म्हणूनच मग जर रेश्मा आणि राजवीर यांची पसंती असेल तरच पुढे विचार करु असा दीपा मावशी अन अंजली यांनी विचार केला. पण त्यासाठी त्या दोघांना एकमेकांना भेटण्यासाठी तयार करणे गरजेचं होतं. त्याप्रमाणे दीपा मावशीने राजवीरला तर तयार केलेच होते. खरंतर रेश्मा चा फोटो पाहिल्यावर तिला भेटायला नकार देऊच शकला नाही. गोल चेहरेपट्टी, दुधाळ रंग, आगदी कोरल्यासारख्या रेखीव भुवया, लाल केशरी रसाळ ओठ, मध्यम बांध्याच्या रेश्माला भेटायला नाही म्हणने म्हणजे स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखे आहे, हे जाणवून राजवीर तिला भेटायला तयार सुध्दा झाला. आणि आज संध्याकाळी ४ वाजता तिला भेटू शकतो असे मावशीला कळवले देखील.
आई – अगं हे काय? मी तूला आज कुठे लग्न ठरवू म्हणतेय? अनायासे एक स्थळ आलेय. तुम्ही फक्त भेटा एकमेकांना. तुम्हाला ठीक वाटले तरच पुढे बघु.
रेश्मा – अगं पण पुढे जायचेच नाही मला. मला आत्ता लगेच लग्न करायचेच नाही.
आई – अगं बाई फक्त भेट एकदा. निदान आत्ता घाई करायची नाही. हेच सांगायला जा त्याला भेटायला.
रेश्मा – आई काय गं हे? मला तुझे हे वागणं अजिबात पटत नाही.
आई – अगं माझी ती मैत्रीण आहे ना, दीपा तिचा भाच्चा आहे हा. अन ती काही असे तसे कोणाचेही स्थळ सुचवणार नाही. मला खात्री आहे. तेव्हा तू फक्त एकदा भेटून ये.
काहीश्या अनिच्छेनेच रेश्मा भेटायला जायला तयार झाली.
रेश्मा – ओके पण एकदाच बरंका आई. अन मी स्पष्ट त्याला मला आत्ता लग्न करायचं नाही हे सांगणार आहे.
आई – हो गं बाई, ठीक आहे.
ते दोघे एकमेकांना पसंत करतीलच अशी आशा अंजली बाईंना आणि दीपा मावशीला होती.
क्रमश:
Image by rajesh koiri from Pixabay
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021