मऊ पडलेलं चॉकलेट- प्रशांत पटवर्धन

रात्री अडीच वाजता पिल्लू नंबर दोन किरकिरत जागं झालं, तशी ती यंत्रमानवासारखी क्षणार्धात उठली. पिल्लाला जोजवून, दुधाची बाटली देवून शांत करताच, पिल्लू नंबर दोन शांत झोपी गेलं. तिने पिल्लू नंबर एक कडे साशंक कटाक्ष टाकला. हल्ली कट केल्यासारखे दोघे झोपेचा खो खो खेळत होते. एक झोपला, की लगेच दुसरा जागा व्हायचा. तिचा मात्र या सगळ्यात पिट्ट्या पडायचा. अत्ता मात्र दोघे अगदी शांत झोपले होते.
पण आता नेमकी तिलाच झोप येईना. मास्टर बेडरूम मधुन त्याच्या श्वासांचा लयबद्ध आवाज येत होता. अजीबात आवाज न करता ती हॉलमधे आली. इथेतिथे शोधाशोध करून एकदाचा तिला तिचा फोन सापडला. हल्ली कितीतरी दिवसात तिने शांतपणे फोन पाहिलाच नव्हता. वॉट्सऍप तर अनइन्स्टॉलच केलं होतं. सहज तिने फेसबुक उघडलं.
फेसबुकवर सर्वत्र गुलाबी हवा पसरली होती. अता हे का बरं? हा विचार करत असतानाच, तिला टाईमटेबल दिसलं. “ओहऽ वॅलेंटाइन वीक” ती स्वतःशीच म्हणाली. आज चॉकलेट डे होता वाटतं. बाप रे ! किती लांब आली होती ती आता या सगळ्यापासून. कॉलेजात असताना आणि नंतरही ते दोघे किती उत्साहाने साजरा करायचे तो आठवडा. रोझ, चॉकलेट, टेडी आणि कायकाय गंमत ! पण आता, दुधाच्या बाटल्या, डायपर, अंगडी-टोपडी, औषधं… हे राम !!
पुरषांना किती बरं असतं ना !! तिची उगाचच चिडचिड झाली. हे काही खरं नव्हतं, हे तिला स्वतःलाही मनातून माहित होतं. तो त्याला जमेल तितकी सगळी मदत करतच होता. शिवाय ऑफिसच्या कामाचं लोडही खूप वाढलं होतं. तिने ब्रेक घेतल्याने, त्याच्यावर थोडं प्रेशरही आल्म होतंच. तरी तो तिच्यासारखा असा बांधला गेला नव्हता. रोज नित्यनेमाने त्याला घराबाहेर पडायला मिळत होतं. बॉसपेक्षाही जास्त डिमांडिंग अशी दोन पिल्लं त्याला सांभाळायला लागत नव्हती !
’बाकी काही म्हणणं नाही माझं, पण अगदी पंधरा मिनिटांचा तरी “अस टाईम” याने मला का देवू नये? फक्त आम्हा दोघांपुरता’ तिच्या मनात येत होतं. हल्ली तर त्याच्या घरी येण्याच्या वेळांचाही भरवसा उरला नव्हता. शनिवार-रवीवार देखील कधीही फोन आला, की हा पळायचा ऑफिसला. त्याच्या वेळीअवेळी येण्याने डिस्टर्ब होतं म्ह्णून ती हल्ली पिल्लांसोबतच झोपायची दुसर्‍या बेडरूम मधे.
सकाळी घाईघाईत काही बोलणं व्हायचं नाही. ती पिल्लुकंपनी उठण्याआधी याला डबा करून द्यायच्या गडबडीत असायची. तेव्हा त्या दोन नंबरांपैकी कोणी उठलं, तर मात्र तो सांभाळायचा त्यांना. पण एकदा घराबाहेर पडला, की गुल. ती देखील त्याला उगाच फोन करून त्रास द्यायची नाही ऑफिसात. दोघांमधला संवाद जणू हरवून गेला होता. गुलाब सुकून गेला, चॉकलेट मऊ पडलं आणि टेडी मळून गेला त्यांच्या प्रेमातला.
आयुष्यातून काहितरी महत्वाचं, जिवनावश्यक असं गळून जातय आणि रिकाम्या, पोकळ डबड्यासारखा हा देह नुसता ढकलला जातोय अशी काहितरी विचित्र भावना तिला ग्रासुन टाकायला लागली. बेदम रडू यायला लागलं. हरवून गेल्या सारखं आणि हरल्या सारखं वाटायला लागलं. किती दिवसात नुसतं जवळही घेतलं नव्हतं त्याने तीला !! त्याला निदान डोळे भरून पहावं तरी म्हणुन ती पावलं न वाजवता त्यांच्या बेडरूम मधे गेली.
तो ऑफिसचे कपडेही न बदलता, तिच्याकडे पाठ करून बेडवर शांत झोपला होता. ती हलकेच त्याच्या जवळ गेली. तो चुळबुळून वळला तेव्हा तिला त्याने हाताच्या मुठीत धरलेलं काहीतरी दिसलं. झोपेत मुठीची पकड सैल झाली होती. तिने हळुच त्याच्या हातातून तो प्रकार सोडवुन घेतला. कागदात बांधलेली ’डेरी मिल्क’ होती ती. त्याच्या हाताच्या उष्णतेने लिपडी झालेली. तिने कागद पाहिला. चिठ्ठी होती ती, तिला लिहिलेली !!
“माऊ, इतके दिवस मी रेसच्या घोड्यासारखा नुसता पळत होतो. तुझ्याकडे पुरेसं लक्षही देता येत नव्हतं की पिल्लु कंपनीसोबत खेळताही येत नव्हतं. आज त्याचं फळ मिळालय. मी “एम्प्लॉई ऑफ द इयर” झालो आहे !! घसघशीत बोनस आणि इंक्रीमेंटही मिळालं आहे, ते देखील प्रमोशन सोबत !! आता आपल्याला तुझ्या मदतीला एखादी बाई ठेवता येईल. तु अगदी दमून जातेस. यू डिझर्व्ह अ ब्रेक. मी उद्या सुट्टी घेतली आहे. चौघे गाडीत बसून भटकायला जाउया. तेवढाच चेंज. तुला कित्ती दिवसांच कायकाय सांगायचं राहिलय, ते देखील बोलायचय.
बहुतेक मी घरी पोचेन तेव्हा तू झोपलेली असशील, तुला सरप्राईज म्ह्णुन ही चिठ्ठी लिहितोय. ही वाचताना तुझ्या चेहेर्‍यवरचे भाव मला पहायचे आहेत.
तुझा: चॉकलेट बोका”
तिच्या डोळ्यातून वेड्यासारखं पाणीच वहायला लागलं. तिने त्या वितळलेल्या चॉकलेटकडे एकदा पाहिलं आणि ती स्वतःलाच म्हणाली,
“एक बरं आहे, चॉकलेट वितळलं तरी त्याची चव बदलत नाही !!!”
खुदकन हसुन त्याच्या कुशीत शिरून ती पटकन झोपून गेली.
Image by TK McLean from Pixabay 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!