मिडीयम स्पायसी….
वसंतराव महाराष्ट्र बँकेत वरिष्ठ क्लार्क. लग्नात टक्कल होतंच. त्यांची एकमेव वडिलोपार्जित इस्टेट! भवन्स कॉलेजातून ऐशीच्या दशकात सेकंड क्लास बीकॉम झाल्यावर बँकेची परीक्षा देऊन महाराष्ट्र बँकेत जे चिकटले ते अजून लटकून आहेत. उंची साडेपाच फुटांच्या आतली. सुटलेलं पोट. घरी ढगळ टीशर्ट आणि ढगळ शॉर्ट असा पेहेराव. आता बऱ्यापैकी पिकलेली दाढी आणि बारीक मिशी. कानातून वाढणारे केस ते नियमित कापत असत.
आशाताई म्हणजे खारेपाटणच्या छोटु वेलणकरांची चौथी कन्या आशा. चौथी कन्या झाल्यामुळे त्यांनी रागाने तिचं नाव निराशा ठेवलं होतं. पण सगळे तिला आशाच म्हणत. जेमतेम सातवी शिकल्यावर आशा शाळा सोडून घरी मदत करू लागली आणि छोटुभाऊंनी मुंबईच्या वसंतच स्थळ आल्यावर फार चौकशी वगैरे न करता काही किलो कांदे आणि पोहे खर्च करूनही खपत नसलेली आपली पोरगी लगेच उजवून टाकली. तशीही आशा म्हणजे हेमा मालिनी नव्हती. जेमतेम पाच फुटांच्या आतली उंची, एकूण वजनी मामला, गावात तेव्हा पार्लर वगैरे नसल्याने भरपूर वाढ झालेला “वरचा ओठ”! पण चाळीत राहात असल्याने लग्न न जमून बरीच वर्षे तुंबलेल्या वसंतला ती पसंत पडली आणि निराशा वेलणकरची ऑफिशियली आशा कुलकर्णी झाली!
मूळ जमीन आणि बीज अगदीच सकस असूनही पैशांचा मेळ जमल्यावर जरा उशिराने संसाराच्या वेलीवर दोन फुलं उगवली. पहिला मुलगा आदित्य. म्हणजे आदी. तो झाला त्या काळापासून असलेली मुलांचं आदित्य नाव ठेवायची फॅशन आजवर जिवंत आहे. त्याचा जन्म मुंबईत. आदित्यच्या जन्मापेक्षा डिलिव्हरीचा सगळा खर्च ग्रुप इन्श्युरन्स मधून मिळाल्याचा वसंतरावांना जास्त आनंद होता. दोन वर्षांचा आदी चाळीत बागडू लागल्यावर आता नियमित अपर लीप करणाऱ्या आशाचा वसंत ऋतूत वसंताने घेतलेला किस तिचा पिरियड मिस होण्यावर येऊन थांबला आणि छोटी आदिती तिच्या पोटात बागडू लागली!
असेच चाळीत बागडत आदित्य आणि आदिती मोठे होत असताना वसंतरावांनी बँकेतून सवलतीच्या दराने मिळणाऱ्या कर्जातून डोंबिवली मध्ये एक “ऐसपैस डबल रूमचा संडास बाथरूम घरात असलेला ब्लॉक” घेतला. दर महिन्याच्या पगारातून हप्ते कट होऊ लागल्यावर आशा ताईंनी टिफिन सर्व्हिस सुरू करत संसाराला हातभार लावायला सुरुवात केली. रोज ट्रेन मधून प्रवास करून कावलेले वसंतराव सुरुवातीला दर रविवारी एका तरी नातेवाईकाला सहकुटुंब त्यांचा ब्लॉक बघायला आणि जेवायला बोलवत. मग तो “हवेशीर, भरपूर उजेड असलेला” ब्लॉक दाखवताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून येई. बेडरूमच्या खिडकीतून दिसणारा हिरवा गार डोंगर म्हणजे आपला ऑक्सिजनचा वैयक्तिक खजिना असल्यासारखे ते मिरवत. मग उन्ह उतरल्यावर टेकडीवर चक्कर मारून पाहुण्यांना भेळ वगैरे खायला घालून पाठवणी केली की त्यांना कृतकृत्य वाटत असे.
हळू हळू पाहुणे म्हणून येणारे अनेक नातेवाईक डोंबिवलीतच राहायला आले. आदित्य आणि आदिती मोठे होत होते. आता आदित्य कॉलेजात आणि आदिती नवव्या इयत्तेत आहेत! आज आदित्यचा वाढदिवस आहे. सगळे डिनरसाठी घराजवळच्या “व्हेज रेस्टरन्ट” मध्ये आले आहेत. दोन वन बाय टू टॉमेटो सूप, एक आलू पालक आणि एक व्हेज कडाई विदाऊट मशरूम, फोर प्लस फोर प्लेन रोटी आणि नंतर एक दाल खिचडी ऑर्डर करून स्टार्टर म्हणून एक मसाला पापड मागवून झालेला आहे.
ऑर्डर परत वाचून कन्फर्म केल्यावर वेटर म्हणाला “और कुछ?” त्यावर वसंतराव म्हणाले “नाही. अजून काही नाही. फक्त जेवण जरा पटापट आणा आणि जेवण जरा…” सगळे एका सुरात म्हणले “मिडीयम स्पायसी!”
Image by mcthrissur from Pixabay
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
😀😀
Mastach