गोष्ट… एका लग्नाची – भाग – ३- अभिजीत इनामदार

केवळ दहा मिनिटेच भेटून मला आताच लग्नाचा विचार करायचा नाही हे सांगायला आलेली रेश्मा चांगली दोन तास थांबली होती. राजवीर मध्ये पण काही तरी जादू आहे हे तिला जाणवले होते. राजवीरचा स्वभाव तिला तसा बरा वाटला होता.

निघता निघता… रेश्मा राजवीर ला म्हणाली होती

रेश्मा – चलो मग. मी निघू? बोलू नंतर.

अन एवढंच बोलून ती निघून गेली. ती ज्या दिशेने गेली, त्या दिशेला राज बराच वेळ पहात राहिला. कधीतरी मग भानावर आला.

रात्री त्याने आई आणि मावशीला रेश्माला भेटल्याचे सांगितले. त्या दोघींना खुप उत्सुकता होती की तो काय म्हणतो ते. मावशीने तर तर लगेच त्याला चिडवायला सुध्दा सुरुवात केली होती. पण एवढ्यात लगेच काही सांगता येत नाही असे म्हणून त्याने वेळ मारून नेली. खरं तर रेश्मा त्याला आवडली होती. आगदी फर्स्ट साईट मधेच. पण आपण लगेच बोललो तर आई मावशी लगेच पुढच्या तयारीला लागतील उद्यापासून अन तेच नको होते. शिवाय रेश्मा कडून या उत्तर येते ते खुप महत्वाचे होते.

तिकडे रेश्माच्या घरी तिच्या आईने तिला प्रश्न विचारुन भांडाऊन सोडले.
– अगं लगेच येणार होतीस ना? आवडला की काय राज? कसा आहे गं बोलायला? स्वभाव कसा आहे? काय काय म्हणाला गं?

रेश्मा – आई… आत्ता भेटून येतीय ना. जरा श्वास तर घेऊ दे. अन एका भेटीत काय लगेच आवडला वगैरे?

आई – अच्छा म्हणजे पुन्हा भेटणार आहात का तुम्ही?

रेश्मा – मी कधी असे म्हटले?

आई – तूच म्हणालीस ना की एका भेटीत लगेच आवडला का काय वगैरे? म्हणून विचारले की आवडण्यासाठी आणखी भेटी गरजेच्या आहेत काय?

रेश्मा – आई तू पण ना. असे म्हणून चेहऱ्यावर नाटकी राग आणून पण खरंतर आईच्या बोलण्याने लाजेने चेहऱ्यावर आलेली लाली लपवत रेश्मा तिच्या रुममध्ये पळाली.

दोन्ही घरच्या मोठ्यांची फोनाफोनी झाली. दोघांनीही विचार करायला वेळ हवा आहे असे कळले. मावशीकडून राजला तिला अजून वेळ हवा आहे हे समजले अन उगाच कसलीशी रुखरूख मनाला लागून राहिली.

खरं तर काल रात्री जेव्हा पासून रेश्माला तो भेटून आला होता, तेव्हा पासून त्याचे चित्त थाऱ्यावर नव्हते. एक दिवसांपुर्वी माहिती नसलेली कोण कुठली रेश्मा काल भेटल्या क्षणापासून त्याच्या मनात घर करुन गेली.

मी तिच्या प्रेमात वगैरे पडलो की काय? दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राज अॉफिस मधून आल्यावर फ्रेश होऊन टीव्ही पहात पहात विचार करत होता.

पण कसे शक्य आहे एका भेटीत प्रेम वगैरे? तो स्वतःलाच विचारत होता.

आज दिवसभर त्याचे कशातच मन लागत नव्हते. या ना त्या कारणाने उगाचच त्याला रेश्माची आठवण होत होती. त्यामुळेच त्याला वाटले की आपण तिच्या प्रेमात पडलो की काय?

छे छे असे काही नाही. त्याने मनाला समजावले.

तेवढ्यात टीव्ही वर चॅनल बदलताना एका चॅनलवर तो थांबला. एक अॅड फिल्म सुरू होती. कुठल्याशा उत्पादनाच्या कंपनीची अॅड होती. अन राजला मोजीतोचा ग्लास हातात घेतलेली रेश्मा दिसत होती. अॅड संपली अन तो भानावर आला. आपल्याला काय झाले याचाच तो विचार करत पडुन राहिला.

इकडे रेश्माची सुद्धा काहीशी राज सारखीच अवस्था होती. पण आता लगेच लग्न करायचे नाही हे आईला ठणकावून सांगितले होते त्यामुळे आत्ता आपण स्वतः काही बोलू शकत नाही हे तिला कळून चुकले होते.

पुढचे दोन दिवस कोणीच काहीच विषय काढला नाही. ना राजच्या मावशीने ना रेश्मा च्या आईने. त्यामुळे या दोघांच्या मनात उगाचच चलबिचलता वाढली होती. न राहवून राजने रेश्मा ला मेसेज केला

राज – हाय
रेश्मा ने त्याचा मेसेज पाहिला. अनामिक अशा गुदगुल्या तिच्या मनाला झाल्या. म्हणजे आपण ज्या गोष्टीची वाट पाहत असतो ती झाली की जो आनंद होतो तशीच काहीशी तिची अवस्था झाली. खरंतर ती दोन दिवसांपासून त्याच्या फोन वा मेसेज ची वाट पाहत होती. पण आपण जर लगेच रिप्लाय दिला तर त्याला वाटेल की ही वाटच पाहत होती. म्हणून मग चांगले दोन तास मनावर दगड ठेवून तिने रिप्लाय दिला.
रेश्मा – हाय
राज तिच्या मेसेज ची वाट पाहत होता.
राज – राज धीस साईड.
आता रेश्मा ने उगाचच वेड पांघरले.
रेश्मा – राज???
बापरे दोन दिवस इथे माझ्या जीवाला चैन नाही अन ही बया कोण राज असा विचार करतेय?
राज – रविवारी आपण भेटलो होतो. कॉफीशॉप, राजवीर काही आठवतंय का?
मिश्किलपणे रेश्मा त्याला छळत होती
रेश्मा – ओह येस. येस. आय एम सॉरी. कामात बिझी होते ना सो चटकन लक्षात आले नाही.
राज थोडा धीर धरुन
राज – बिझी असशील तर नंतर बोलायचं का?
रेश्मा – नो नो. इट्स ओके. आता आहे वेळ. आता बोलू शकतो.
राज – अच्छा.
रेश्मा – बोल काय म्हणतोस? काही काम होतं का?

आपण त्याला खुपच छळतोय हे तिला कळत होतं पण तिलाही हे करताना मजा येत होती.

राज आता हिला काय काम आहे म्हणून सांगावे या विचारात पडला.

आता त्याच्या कडून काही रिस्पॉन्स येईना त्यामुळे रेशमाच्या मनात पण चलबिचलता वाढली. आपण उगाचच भाव खाल्ला काय असे वाटून गेले.

शेवटी राज काहीतरी रिस्पॉन्स करतोय. काहीतरी टाईप करतोय ते पाहून तिला बरे वाटले.

राज – नाही काम असे काही नाही. आगदी सहज मेसेज केला.

रेश्मा – ओके

राज – कशी आहेस तू?

रेश्मा – मी छान मस्त.

माझी आठवण आली का या दोन दिवसात हा आगदी ओठांवर असलेला प्रश्न न विचारता. राज फक्त – ओके ओके एवढंच म्हणाला.

आता पुढे काय बोलावे यावर दोघेही विचारात पडले. अशी ही कमालीची शांतता. स्तब्धता दोघांनाही अस्वस्थ करत होती. शेवटी आपण तिला आवडलोय की नाही हे राजला जाणुन घ्यायचे होते. अन ती कमालीची शांतता बाळगून आहे. तिच्या मनाचा काही थांग लागत नाही अन त्यामुळे तो कमालीचा अस्वस्थ झाला. आता ही शांतता भंग करणे गरजेचे होते म्हणूनच त्याने न राहवून तिला मेसेज केला होता पण आता तिच्या थंड प्रतिसादाने त्याच्या मनात उगाचच शंका येऊ लागली होती की हिला कदाचित आपण पसंतच नाही.

पण शेवटी काय ते एकदा कळणे गरजेचे होते. म्हणून मग त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली.

राज – मी आज तुझ्या अॉफिस च्या एरियात येणार होतो कामानिमित्त. म्हणून सहज मेसेज केला होता.

रेश्मा च्या चेहर्यावर मंद स्मित पसरले. आपल्या प्रमाणेच तो सुद्धा आपलाच विचार करतोय तर. हा विचार तिला सुखावून गेला.

रेश्मा – अच्छा हो का? कुठे येणार होता?

आता काय सांगू? मला तुझी आठवण होते आहे अन तुलाच भेटायला यायची इच्छा होती हे सांगू? हे राज मनात म्हणाला. पण मग त्याने काही तरी कारण दिले ठोकून.

राज – अगं माझ्या एका मित्राकडे काम होते. म्हणून मी येणार होतो. म्हटलं तू बिझी नसशील तर भेटलो असतो. कॉफी वगैरे घ्यायला.

रेश्मा – पुन्हा भेटायचे?

ती रागावली की काय? या विचाराने एक थंड लहर त्याच्या अंगातून गेली.

राज – आगदी सहज विचार आला होता. तू बिझी असशील अन वेळ नसेल तर इट्स ओके.

मनावर दगड ठेवून त्याने हा मेसेजे पाठवला. अरे आपण जास्तच खेचली त्याची हे जाणवून रेश्मा म्हणाली

रेश्मा – तशी मी फार बिझी नाही.

आशेचा किरण उगाचच त्याच्या डोळ्यात चमकला.

राज – नाही आगदी सहजच म्हणालो मी. तुला जमत नसेल तर राहू दे.

आता रेश्मा वर विचार करायची पाळी आली.

रेश्मा – अरे नाही तसे काहीच नाही, पण

राज – पण… पण काय?

रेश्मा – भेटुयात पण कॉफी नको…

राज – मग…

रेश्मा – परवा सारखा मोजितो असेल तरच मी विचार करेन भेटण्याचा.

धडधडणारे काळीज हातात धरून बसलेल्या राजला हा सुखद धक्का होता. ती भेटायला तयार आहे या कल्पनेनेंच त्याचे मन सुखावून गेले. त्याने लगेच मेसेज टाईप केला

राज – परवा सारखा काय? परावाच्याच ठिकाणी घेऊ मोजितो, त्यात काय?

रेश्मा – ओके देन.

राज – मी आर्ध्या तासात तुझ्या अॉफिस खाली असेन.

रेश्मा – ओके.

राज रेश्मा च्या अॉफिस जवळ पोहचला. ती सुद्धा त्याचीच वाट पहात होती.

Image by rajesh koiri from Pixabay 

Abhijit Inamdar

Abhijit Inamdar

लेखक परिचय : नाव- अभिजित अशोक इनामदार. सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे माझे बालपण हे (वयाची पहिली १४ - १५ वर्षे) हे खेडेगावामध्ये गेले. मी इंजिनिअरिंग केले असून एमबीए इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये केले आहे. नोकरीनिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरून झाल्यानंतर सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राबद्दल जिव्हाळा आहे. काही नाट्यप्रयोग तर काही म्युझिकल शोज चे अँकरिंग केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपणही काहीतरी लिहू शकतो याची मनाला आस लागून राहिली होती अन म्हणूनच मग फेसबुक वर २०१२ पासून लिखाण सुरु केले. माझे क्षेत्र जरी यांत्रिकी असले तरी लिखाणामुळे नवी उर्जा मिळते.

4 thoughts on “गोष्ट… एका लग्नाची – भाग – ३- अभिजीत इनामदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!