करकोचा आणि कादंबरी- प्रशांत पटवर्धन.
मी पाहिलेलं सर्वात मॅचिंग जोडपं हे करकोचा आणि कादंबरी या दोघांचं होतं. ही दोघं एकत्र येण्याची कथाही तशी रंजक आहे. यातला बराचसा भाग माझ्या नजरेसमोरच घडला होता, तर काही या दोघांनी नंतर कधीतरी बोलताना सांगितला, अर्थात दोघे एकत्र नसताना. कारण एकत्र असले, की या दोघांची नजर एकमेकांवरून हटली, तर या दोघांना जगाचं भान येईल ना ! अर्थात सभोवताली असलेल्या जगापासून भरपूर दूरच रहावं असं वाटावं असाच अनुभव या दोघांना आला होता म्हणा.
करकोच्याचं बारसं, कॉलेजच्या पहिल्या दिवशीच झालं होतं. कवीश रघुनाथ कोचरेकर असं नाव धारण करणारा त्याचा १५० सेंटिमीटर उंचीचा, झिडपिडा, किरकोळ देह पहिल्याच दिवशी कॉलेजच्या गेट मधून आत शिरला, तेव्हा वॉचमननेही त्याच्याकडे फिदीफिदी हसत पाहिलं होतं. भगवंतानी रंधा मारून त्याच्या अंगावरचं अनावश्यक मांस काढून टाकलं होतं. हातातले फासे खुळखुळ करून फेकल्यावर वेडेवाकडे पडावेत तसे त्याच्या तोंडाच्या बोळक्यात दात सांडले होते. डोळ्यांवर जाडसर भिंगांच्या चष्म्याचं ढापण होतं. आणि या सर्वांवर कडी करणारी, कासवानं कवचाबाहेर काढावी तशी लांबुळकी, टंगाळी मान चोहीकडे वळवत, उडत उडत चालायची त्याची लकब होती !!
कॉलेजच्या आत दबा धरून बसलेल्या सिनियर्सच्या टोळक्याने, त्याला अलगद कोपच्यात घेतला. त्याला नाव विचारताच, फर्ड्या मराठीत, क.र.कोचरेकर असं नाव त्याने सांगताच, “अरे हा तर खराखुरा करकोचा !!” असे उद्गार लोकमान्यांप्रमाणे काढून एका सिनियरने, त्याला अख्ख्या कॉलेजसाठी करकोचा बनवून टाकलं ! पुढे अनेक दिवस तो चालत असला की रात्रीच्या अंधारात अगम्य जागेवरून कोल्हेकुई उमटावी, तशी “ए करकोच्याऽऽऽ” ही साद कुठल्याही कॉरिडॉर किंवा वर्गातून उमटत असे.
कोचऱ्या माझ्याच वर्गात होता. सुरवातीला काही दिवस इतर मुलं त्याची टिंगल करताना, मी देखील त्यांना हसून साथ दिली होती. पण लवकरच त्याने काहीही वावगं केलेलं नसताना, उगाच त्याला चिडवणं मला झेपेनासं झालं. त्यातून तो माझ्याच बेंचवर बसायचा, त्यामुळे, आमची मैत्री म्हणणं जरा धाडसाचं ठरेल, पण आमचा संवाद सुरू झाला. माझ्या लक्षात आलं की कोचर्या अगदी ब्रिलियंट नसला तरी हुशार आणि सुस्वभावी मुलगा आहे. आता त्याला उगाचच चिडवणार्या मुलांचा मलाच राग यायला लागला. पण टेलिफोटो लेन्स वापरून नको असलेली बॅकग्राउंड ब्लर करून टाकावी, तसा कोचर्या त्याच्यावर फेकली जाणारी निगेटिव्हिटी मेंदूआड करायचा ! (ही त्याचीच उपमा बरं का).
अनेक वेळा सिनियर्सच नाहीत, तर आमच्या इयरची मुलं देखील कोचर्याला पिडायची. इतर कुणाकडून अपमान किंवा चेष्टा झालेला एखादा लुख्खा मुलगा देखील, त्याचा बिघडलेला आत्मसन्मान, कोचर्याला पिडून पुनर्स्थापित करून घ्यायचा. स्मार्टनेसच्या हायरार्कीत वरच्यांकडून खाल्लेल्या लाथा, शेवटच्या पायरीवरच्या कोचर्याकडे फॉरवर्ड केल्या, की त्या इतरांकडून हिणवलं गेलेल्या मुलाला बरं वाटायचं. त्यातून कवीश कधी प्रतिवाद करत बसायचा नाही. हाताला न चिकटणार्या पार्याप्रमाणे तो या सगळ्या प्रसंगात असून नसल्याप्रमाणे वागायचा.
तर, सगळं कॉलेज करकोच्याची खिल्ली उडवत असताना, तब्बल महिनाभर उशीराने कॉलेजच्या त्याच गेटमधून कादंबरी प्रवेश करती झाली. तिच्याकडे पाहून हसण्याची वॉचमनची देखील हिम्मत झाली नाही, कारण आमच्या सव्वापाच फूटी वॉचमनपेक्षा ती फूटभर उंच होती ! त्या उंचीला शोभेल अशी रुंदी देखील तिला प्राप्त झाली होती. कधी शर्ट घालायची वेळ आली असती, तर मेन्सच्या ५२” मापाचा शर्टं तिला लागला असता ! आईबापाने प्रेमाने नामकरण केलेल्या कादंबरीचं सद्य स्वरूप महाकाव्याचं झालं होतं ! नुसतं तिच्याकडे पाहिलं तरी मनावर दडपण यावं आणि स्वतःचं खुजेपण जाणवावं असा तिचा करिश्मा होता. या अगडबंब देहातल्या कादंबरीचं मन मात्र चिमणीचं होतं.
अशी एक अगडबंब मुलगी कॉलेजमधे दाखल झाल्याची वार्ता, आगीसारखी सर्वत्र पसरली. आमच्या डिव्हिजनच्या मुलांनी लगोलग तिच्या दर्शनाचा लाभ घ्यायचा प्लॅन बनवला. मलाही त्यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलंच. खोटं का बोला? मलाही त्या मुलीला पाहायची उत्सुकता होतीच. मी त्या मुलांना पुढे व्हायला सांगितलं आणि कोचर्यालाही चल म्हणालो. माझ्या या बोलावण्याने तो दुखावल्यासारखा वाटला. त्याने माझ्याकडे एक व्याकुळ कटाक्ष टाकला. मला त्याच्या नजरेचा अर्थ कळला. मी त्याला म्हटलं, “चिडवायला नाही रे बोलावत तुला. फक्त एकदाच नुसतं बघून तर येवूया कोण मुलगी आहे ती.” त्याच्या अगदी मनाविरुद्ध कोचर्या यायला तयार झाला.
आमच्या डिव्हिजन प्रमाणे, इतर अनेकांनीही तसाच प्लॅन बनवल्यानं आमच्या लक्षात आलं. तिचा क्लास सुरू असलेल्या वर्गाबाहेर नुसती जत्रा भरली होती. क्लास संपल्याची बेल झाली तशी एक विचित्र उत्सुकता सर्वत्र पसरली. वर्गाबाहेर पडणार्या कामकरी मुंग्यांच्या मोहोळात, राणीमुंगी सारख्या अवाढव्य आकारमानाच्या कादंबरी केळकरने वर्गाबाहेर पाऊल टाकलं आणि अनेकांनी श्वास रोखून धरला. जनसामान्यांच्या त्या लोंढ्यात एखाद्या पुराणकालीन योध्याच्या आकारमानाची कादंबरी अगदीच वेगळी दिसत होती. खरंतर दिसायला सुंदर होती ती. लख्खं गुलाबी गोरा वर्ण, घारोळे डोळे आणि नाकीडोळी नीटस. पण हे सगळं तिच्या प्रचंड देहापुढे लपून जात होतं.
लोकांच्या नजरांची तिला सवय असावी थोडीशी, पण त्याचा असा सामूहिक आविष्कार मात्र तिला नक्कीच अनपेक्षित असावा. तिने मान खाली घातली, पण तिच्या कानाच्या पाळ्या लाजेने लालबूंद झाल्या. कुणाच्या अध्यात मध्यात नसल्यासारखी ती मुठी आवळून कॉरिडॉरमधून चालत निघाली. तेवढ्यात कुणीतरी “अरे, हा तर विशालगड !!!” अशी काहीशी कमेंट टाकली आणि त्या फालतू विनोदावर जमलेल्या समस्त पोरापोरींची गर्दी कसलासा सूड उगवल्यासारखी खदाखदा हसायला लागली. काही क्षणातच हुर्योचे आवाज उमटायला लागले. “विशालगड…. विशालगड…. विशालगड” असा मंत्रजाप उमटायला लागला. सगळ्या कॉलेज समोर झालेलं असं विडंबन सहन न होऊन, दोन्ही हातांनी तोंड लपवत, हुंदके देत कादंबरी तिथून पळत सुटली. पब्लिकने ते देखील हसून घोषणा देऊन सेलिब्रेट केलं !! झुंडीची अमानुष वर्तणूक पाहून मी देखील हादरून गेलो होतो.
थोड्या विमनस्कपणे मी कोचर्याकडे पाहिलं, तर तो झपाटून गेल्यासारखा, कादंबरी गेलेल्या दिशेकडे पाहत राहिला होता. मी त्याच्या खांद्याला हात लावून त्याला भानावर आणलं, तर माझ्याकडे तो एकदम अनोळखी नजरेने पाहत राहिला. “काय रे? काय झालं?” या माझ्या प्रश्नांनी तो भानावर आला आणि काहीही न बोलता चालायला लागला. मलाही त्या उन्मादी गर्दीपासून दूर जायचं होतं म्हणून मी त्याच्या पाठोपाठ निघालो. काही पावलातच मी कोचर्याला गाठला, तशी माझ्याकडे बघून तो अगदी मनापासून मला “थॅन्क यू !!” म्हणाला. मी आरपार गोंधळूनच गेलो, काही कळेच ना मला. अत्ता काही क्षणांपूर्वी सगळ्या कॉलेजने एका साध्या मुलीला, त्यांच्या विचित्र वर्तणुकीने ओरबाडून काढलं असल्याची घटना घडली असताना, हा साधारण तशाच वागणुकीने होरपळला गेलेला मुलगा, माझे आभार का मानत होता? माझा चेहरा विचित्र झाला असणार, कारण स्पष्टीकरण देण्याच्या सूरात तो म्हणाला, “मी फक्त तुझ्यामुळे इथे आलो. म्हणून हा प्रसंग मला पाहता आला. तिला आधाराची गरज आहे आणि तो द्यायला माझ्यापेक्षा एकही लायक मुलगा, अख्ख्या कॉलेजात दुसरा सापडणार नाही. म्हणून थॅन्क यू म्हटलं तुला.” मला असं अधांतरी सोडून तो निघून गेला.
त्या दिवसापासून कोचर्या माझ्या सोबत असेनासाच झाला. त्याने आपणहून कादंबरीशी ओळख करून घेतली. सावली सारखा तो तिच्या मागे असायचा. क्लासेस संपल्यावरचा सगळा वेळ आता ते दोघे एकत्र दिसायला लागले. सगळ्या कॉलेजची बारीक नजर त्या दोघांवर होती. त्यांना लगेच सुगावा लागला होता याचा. पण पहिल्या दिवसाच्या त्या प्रकारानंतर कादंबरीला फारसा सार्वजनिक त्रास कुणी दिला नव्हता. त्या दिवशीच्या वर्तणुकीचा एक प्रकारचा ’गिल्ट’ असावा सगळ्यांच्या मनात ! पण कुजबुज मात्र नक्की सुरू झाली.
होवू घातलेल्या करकोचा-विशालगड विवाहाची आणि त्यानंतरच्या मधुचंद्राची सुरस वर्णनं खाजगीत हमखास हास्यस्फोट घडवून आणू लागली. सर्वांच्या प्रतिभेला नानाप्रकारचे धुमारे फुटायला लागले. झाडांवरती एका मोठ्या बदामाने चिरडलेल्या एका छोट्या बदामाच्या आकृती मिरवायला लागल्या. सुरवातीला कोचर्या आणि कादंबरी अगदी आवश्यक तितकाच वेळ कॉलेजात घालवायचे आणि कॉलेजमधून निघून जायचे. पण काही स्वयंसेवकांनी त्यांचा कॉलेजबाहेरही पाठलाग करून, त्यातला फोलपणा दोघांच्या लक्षात आणून दिला. दोघांचं वागणं अगदी सभ्य, सुशील असूनही परत मुलामुलींच्या नजरेस टोचू लागलं. खरंतर ते दोघे साधा हातात हात घेवूनही कधी बसले नव्हते. पण आता त्यांच्या नुसत्या एकमेकांसाठी असण्याचाही सगळ्यांना त्रास व्हायला लागला. गिल्ट आता ओसरत चालला होता.
अशात काही महिने गेले आणि व्हॅलेंटाईन्स डे जवळ आला. आपआपल्या खास व्यक्तीला त्या दिवशी गुलाब देण्याचं अनेकांचं प्लॅनिंग सुरू झालं. त्या दिवसाचं निमित्त साधून तिला/त्याला प्रपोज करण्याचे बेतही आखले जायला लागले. नवल म्हणजे हे सगळं करतानाच, या दोघांचं काय चाललंय? याची सखोल निरीक्षणं करणं सुरू होतंच ! दुसर्याचं वाकून पाहणं हे अनेकदा, आपलं झाकून ठेवायला सोयीचं असतं !!
एकदाचा “D Day” उजाडला. नटून थटून आलेल्या तरुण-तरुणींनी कॉलेजचा परिसर फुलून आला होता. उत्साहाची कारंजी फुलवत, फुलपाखरासारखी तरुणाई सर्वत्र थुईथुई नाचत होती. प्रेमाचा उत्सव सुरू होवून चंगले दीड-दोन तास उलटून गेले होते. जिथे आर्जवाचा स्वीकार झाला, तिथे गुलाबी हवा पसरली होती. काहींनी साशंक मनानी आर्जवांना “ऑन होल्ड” ठेवलं होतं, तिथे आशेची धुगधुगी तग धरून होती. अस्वीकार झालेले काही काळ चेहरे पाडून झाल्यावर, नव्या फुलांच्या शोधाच्या तयारीस लागले होते.
त्याच वेळी कॉलेजच्या करकोच्याने हातात एक टप्पोरा लाल गुलाब घेवून गेटमधून प्रवेश केला. इतस्ततः पसरलेल्या मंडळींची नजर, त्याने चुंबकाप्रमाणे ओढून घेतली. तो काय करणार याकडे सारेच कुतूहलाने बघू लागले. कुतूहल वाटण्यासारखं वास्तविक त्यात काहीही नव्हतं. तो काय करणार आहे, हे त्याच्या हातातला गुलाब ओरडून सांगत होता आणि ती कृती गेल्या दोन तासात अनेकांनी केली होती. पण करकोच्याप्रमाणे दिसणारा, सगळीकडून लाथाडायला लायक ठरवलेला, सामाजिक उतरंडीच्या शेवटच्या पायरीवरचा तुच्छ जीव, ती कृती करून सगळ्यांची बरोबरी करणार, ही गोष्ट अनेकांना खटकली.
सगळी जनता, त्याच्या मागोमाग निघाली. सुगावा लागलेले इतर, दुसऱ्या बाजूनी कादंबरी बसली होती तिथे सुटले. हा हा म्हणता परत त्या दोघांच्या सभोवती जत्रा भरली. त्या दोघांचं मात्र कुणाकडेच लक्ष नव्हतं. कवीश एकटक कादंबरीकडे बघत तिच्या दिशेने निघाला होता आणि कादंबरीची नजर त्याच्या नजरेत गुंतून पडली होती. दोघे जणू जगाचं भान विसरले होते. पण जग मात्र त्यांचं भान विसरलं नव्हतं.
कवीश कादंबरीपाशी पोहोचला, एका गुढग्यावर बसत त्याने हातात धरलेला गुलाब तिच्यासमोर धरला आणि आता तो काहीतरी बोलणारच एवढ्यात आमच्या कॉलेजमधे गुंड म्हणून कुप्रसिद्ध असलेला सनी ताडताड पावलं टाकत त्याच्यापर्यंत पोहोचला आणि “हा काय फालतूपणा चाललाय तुमचा?” असं मोठ्यांदा ओरडला. आज सनीचं डोकं आधीच फिरलं होतं. त्याने आज चांगले तीन गुलाब द्यायचा प्रयत्न केला होता पण तिन्ही ठिकाणी नकारघंटा वाजली होती.
कोचर्या शांतपणे उभा राहिला. “तुझा काय संबंध? मी तुला काही केलंय?” ठाम स्वरात त्याने विचारलं. “एऽ जास्त शहाणपणा करू नकोस. मला नडलास ना, तर इथेच बडवून काढेन तुला. पाहायचं आहे सॅम्पल?” असं म्हणत सनीने कोचर्याची कॉलर धरली. “साले जगायची लायकी नाही आणि प्रेमाची थेरं करतायंत इथे.” असं म्हणत सनीने हात उगारला.
वीज चमकावी तशी कोचर्याच्या मागून कादंबरी पुढे झाली. तिच्या उजव्या हाताचा घणाघाती चॉप सनीच्या कॉलर धरणार्या हाताच्या खांद्यावर आदळला, तसा सनीचा हात लुळा पडला. त्याच फ्लो मधे डाव्या हाताने एक अप्परकट तिने सनीच्या छातीच्या पिंजर्याखाली हाणला. भक्कऽन श्वास बाहेर पडून सनी कासावीस होत जमिनीवर तडफडू लागला. आता ती अजून एक लाथ घालून सनीला संपवणारच, तेवढ्यात कवीशने तिच्या हाताला हलकेच स्पर्श करून तिला थांबवलं. “त्याच्यावर तुझी लाथ फुकट घालवू नकोस. एवढं सॅम्पल आयुष्यभर पुरेल त्याला.”
थक्क होवून त्यांच्याकडे पाहणार्या गर्दीवर एकवार नजर फिरवत तो म्हणाला, “थर्ड डिग्री ब्लॅकबेल्ट आहे ती. मनात आणलं तर एका फटक्यात तुमच्यापैकी प्रत्येकाला लोळवण्याची क्षमता ठेवून आहे ती. खरंतर तिने ते पहिल्याच दिवशी करायला हवं होतं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती एक उत्तम माणूस आहे. त्या दिवशी तुम्ही सगळे तिच्या आकारावरून तिची थट्टा, चेष्टा करत होतात, पण मला मात्र तिने तिच्या मुठी आवळून पाळलेला संयम दिसत होता. तुम्ही कधीच तिच्या देहाच्या आकारापलीकडे पोहोचू शकला नाहीत, पण मी तिच्या मनापर्यंत पोहोचलो. कादंबरी उत्तम ओरिगामी करते, गाणं देखील छान म्हणते. एकदा तिच्या घरासमोरची बाग पाहा. तिच्या हाताचा स्पर्श झाल्यावर रसरसून आलेली तिथली झाडं पाहा. मग तुम्हांला कळेल की किती गुण भरले आहेत तिच्यात ते. तिच्या सोबत बोलताना भान हरपतं माझं…” कवीश अजून खूप काही बोलत राहिला असता, पण कादंबरीच्या गोड, किणकिण्या आवाजातल्या, नुसत्या, “पुरे कौतुक.” या शब्दांनी त्याला अडवलं.
मंत्रमुग्ध होवून हे सगळं पाहणार्या आम्हां अनेकांना जाणवलं, की कादंबरीचा आवाज आम्ही अगदी पहिल्यांदा ऐकला होता. तिच्या आवाजासरशी कवीश परत तिच्याकडे वळून तिच्या डोळ्यांत हरवून गेला होता. ते असेच जगाच्या अंतापर्यंत उभे राहिले असते, पण पहिल्या रांगेतून मी हलकेच खाकरून म्हटलं, “ते सगळं बरोबरच आहे. पण तुझ्या प्रपोजलला, कादंबरीचं उत्तर काय आहे?” दोघांचा ट्रान्स मोडला. माझा आवाज ओळखून कवीशने गालातल्या गालात हसत कादंबरीकडे प्रश्नार्थक पाहिलं आणि तिने लाजून होकारार्थी मान डोलावली.
“कॉन्ग्रॅच्युलेशन्स !!!” मोठ्यांदा ओरडत मी त्यांच्या दिशेने पळालो. सभोवतालच्या गर्दीनेही अगदी उस्फूर्त टाळ्या वाजवल्या. सगळा जल्लोष झाला. त्या गदारोळात सनी हरवून गेला.
सांगितलं ना, मी पाहिलेलं सर्वात मॅचिंग जोडपं हे करकोचा आणि कादंबरी या दोघांचं होतं.
आता मॅचिंग थोडं कॉन्ट्रास्ट होतं एवढंच.
Image by Alexas_Fotos from Pixabay
- मूळ पुरुष- भाग २/२ - March 5, 2020
- मूळ पुरुष- भाग १/२ - March 3, 2020
- करकोचा आणि कादंबरी- प्रशांत पटवर्धन. - February 16, 2020
सुरेख👌👌
मस्त, नेहमीप्रमाणे हटके स्टोरी!
समाजमनाची नस पकडलेली कथा
झकास