कालातीत- पूजा खाडे पाठक
भयंकर अंधारातही अगदी पायाखालची वाट असल्यासारखी ती चालत होती .. प्रत्येक दगड न खडा माहित असल्यासारखी .. रस्त्याची चांगलीच सवय असल्यासारखी .. बराच म्हणजे बराच पल्ला संपला होता , अगदी थोडा च वेळ आता .. स्वतः शीच म्हणत ती चालत होती .. धापा टाकत होती .. गुढगे धरून, वाकून दम खात परत वर बघत होती आणि परत चालत होती ..
आता अगदी नजरेच्या टप्प्यात आलं ते शेवटचं वळण .. एव्हाना किंचित लालसर प्रकाश दिसत होता पूर्वेकडे .. स्वतः शीच हसून तिने ते शेवटचे वळण ओलांडले ..
समोरच 20 फुटी पठार .. लागूनच असलेली खोल खोल दरी .. आणि पठारावरून दिसणारं हे विहंगम दृश्य ..
पठारावर असलेला एकमेव दगड.. त्यावर तो आधीच येऊन बसला होता .. तिला माहित होतंच की तो असणारच तिथे .. तिने आपला श्वास आवरता घेतला, आणि अगदी हळू हळू चालत त्याला मागून “भॉ” करणार, इतक्यात त्याने मागे वळून पाहिलं. चेहऱ्यावर तेच स्मित. कालातीत.
“नेहमी कसं कळतं रे तुला मी यायच्या आधीच ?” लटक्या रागाने ती म्हणाली .. काहीच न बोलता त्याने तिचा हात हातात घेतला, आणि तिच्या पालथ्या मुठीवर ओठ टेकवून बसून राहिला फक्त ..
खूप खूप मन भरेपर्यंत चाललेल्या त्या निःशब्द संवादानंतर त्याने तिच्याकडे बघितले .. ती त्याच्याकडे च बघत होती ..
“भेटलोच शेवटी, नेहमीप्रमाणे !” तो म्हणाला .. “हम्म .. एक तर दिवस मिळतो आपल्याला भेटायला ..” ती म्हणाली ..
आता थोडं थोडं उजाडलं होतं .. त्याने सोबत थर्मास आणला होता .. “तुला आवडते तशी माझ्या हातची कडक डार्क कॉफी!” तो म्हणाला .. “एकदा कधी मी बोललेलं तू किती लक्षात ठेवतोस रे!” म्हणत तिने थर्मास घेतला, आणि त्यातल्या मग मध्ये कॉफी घेतली ..
इतक्यात तो म्हणाला, “समोर बघ पटकन!”
तो क्षण आला होता ! समोर अंथरलेली धुक्याची चादर .. चादर कसली, धुक्याचा समुद्र च चोहोबाजूंनी ! त्यातून हळूच डुबकी मारून वर येणारा सूर्य .. केशरी लालसर .. त्याच रंगात न्हाऊन निघालेला धुक्याचा एक पट्टा .. आणि आजूबाजूला दिसणारी शिखरांची टोकं .. संधिप्रकाशासारखा दिसणारा वेगळाच प्रकाश पसरला होता ..
“परफेक्ट!” ती म्हणाली .. हेच बघायला आले होते ते दोघे .. येत होते दरवर्षी .. हेच बघायला .. कदाचित हेच बघायला ..
काही क्षणांनी तो धुक्याचा पदर ढळला आणि समोर गर्द जंगल दिसू लागलं .. उन्ह एव्हाना वाढली होती ..
आता परतीचा रस्ता धरायची वेळ झाली होती ..
दोघांचा हात एकमेकांत घट्ट गुंफला गेला .. तिने आर्त नजरेने त्याच्याकडे पाहिले .. तिचा प्रश्न हि नेहमीचाच .. आणि त्याच्या थंड, स्निग्ध डोळ्यांतून तिला मिळालेले उत्तर .. तेही नेहमीचेच ..
तिच्याकडे मन भरेपर्यंत बघून त्याने दीर्घ उसासा टाकला .. आणि काही कळायच्या आत पळत जाऊन दरीतून उडी मारली ..
ती जागच्या जागी थिजली .. क्षणभरात भानावर येऊन ती पळत दरीच्या टोकाशी आली .. त्याची आकृती हळू हळू खोल खोल जात लहान लहान होत होती .. “नचिsss” ती जोरात ओरडली .. तिचा आवाज दरीच्या खोऱ्यांतून घुमत राहिला ..
ती खडबडून जागी झाली .. तिला दरदरून घाम फुटला होता .. स्वप्न संपलं असलं तरी अजून ती तिथेच होती मनाने ..
तो धक्का अजूनही संपला नव्हता .. हृदयाची धडधड इतकी वाढली होती की आता हृदय बाहेर येईल की काय असं वाटत होतं ..
आज त्या ऍक्सिडेंट ला 4 वर्ष होतील .. त्याच डोंगरावर जात होतो आम्ही .. आणि तो ऍक्सिडेंट झाला .. वर पोहोचायच्या आधीच ! मला वाचवताना तो मात्र गेला .. फक्त शेवटच्या क्षणी वचन देऊन गेला की आपण भेटू .. कुठे कसं कधी काही काही माहित नाही .. पण आपण भेटू ..
तेव्हापासून दरवर्षी त्याच दिवशी फक्त येतो तो स्वप्नात .. त्याच ठिकाणी .. तीच तो असण्याची जाणीव आणि तो नसल्याची जाणीव करून द्यायला .. क्षणभर का होईना पण त्याचा खराखुरा स्पर्श द्यायला .. तेच ते फोडीव लाकडासारखे बाईक चालवून चालवून राठ झालेले तरीही गोरेपान हात हातात धरायला ..
त्या डोंगरावर मी परत कधीच गेले नाही .. जाणारही नाही .. मला जे स्वप्नात दिसतं ते तसंच आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर च नकोय मला .. कारण त्यातून नको त्या शक्यता वाढत जातील ..
भास – आभासातलं हे अंतर टिकून राहिलं च पाहिजे ..”
तिचा कंठ दाटून आला होता .. तिने आवंढा गिळला .. तोंडातली कडवट कॉफी ची चव तिचा मेंदू बधिर करत गेली ..
Latest posts by Pooja Pathak (see all)
- दिवाळी २०२० स्पेशल- १९ - November 27, 2020
- दिवाळी २०२० स्पेशल- ३ - November 13, 2020
- पाडस - October 23, 2020
👌👌
Bapare khup painfull hot ,sarv chitrach samor ubh rahil…Chan likhan