तुमचं आमचं प्रत्येक वेळी सेम नसत- भाग्यश्री भोसेकर
“त्यांची तातडीने केमो करावी लागेल, शिवाय तुम्ही ब्लड बँकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये रहा” डॉक्टर सांगत होते रवींद्रच्या कानावर शब्द फक्त आदळत होते पण डोक्यात काहीही शिरत नव्हत.
साधारण दोन वर्षांपूर्वीचा प्रसंग आत्ता एकदम आठवण्यामागचं कारणही तसं खास होत.आज रवींद्र एकदम छान तयार होत होता, इकडे वर्षाही. फक्त वर्षाच्या डोळ्यातील पाणी आज थांबायला तयार नव्हत.
वर्षा, रवींद्र यांचा प्रेम विवाह . पत्रकारिता करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले. दोन्ही घरून जात वेगळी असल्याने विरोध होण गृहितच धरल होत. दोन वर्ष आपापल्या, एकमेकांच्या घरच्यांना समजावून वाट पाहून झाली पण घरचे काही ऐकेनात म्हणून मग या दोघांनी एक दिवस सरळ कोर्ट मॅरेज करून स्वतःचा संसार थाटला. दोघेही विचारांचे पक्के आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे त्यामुळे घरच्यांची साथ नसूनही दोघांनी एकमेकांना एकटेपणा भासू दिला नाही.कधी एकमेकांचे मित्र मैत्रीण बनले,कधी पालक बनले, कधी एकमेकांशी भांडले देखील पण हे नात टिकवण्याची इच्छा असल्याने दोघांमध्ये कधी दुरावा आला नाही. वर्षाची एकच अट होती की आपण दोघांनी खूप खूप फिरायच आणि रवींद्रची एकच अट होती की त्याला मुल नको होत कधीच. दोघांनी एकमेकांवर असणाऱ्या प्रेमापोटी अटी कधीच मान्य केल्या होत्या आणि त्यांचा संसार छान सुरू होता पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळच होत.
दोन वर्षांपू्वी आजच्याच दिवशी वर्षाला कॅन्सरची लागण झाली असल्याचं निदान झालं आणि या आजाराने त्या दोघांची मनस्थिती चांगलीच पोखरली. पण रवींद्र ठामपणे बायकोच्या पाठीशी उभा राहिला आणि त्याने या आजारात तिला समर्थ साथ दिली. ते दिवस दोघांकरताही खूप कठीण होते. सतत हॉस्पिटल मध्ये असल्याने मनावर एक प्रकारचा ताण यायचा, वर्षाला त्या ट्रीटमेंटमूळे अशक्तपणा यायचा शिवाय तिच्यासाठी बरच पथ्य पाणी होत ते रवींद्रला सांभाळाव लागायचं. कित्येकदा ते दोघे एकमेकांच्या नकळत एकमेकांसाठी रडले होते, पण हरले नव्हते. रवींद्र त्याच ऑफिस , घर सांभाळून वर्षाची तब्येत सांभाळायचा.बऱ्याचदा वर्षाला वाटायचं आज रवींद्रची साथ नसती तर मी या जगात अक्षरशः एकटी पडले असते, कोणी केलं असत माझं? तर रवींद्रला वाटायचं की पूर्ण जगाचे टोमणे झेलून, स्वतःच्या घराला,आई बापाला सोडून माझ्यावर विश्वास ठेवून वर्षाने माझ्याशी लग्न केलं, आता मी तिच्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची वेळ आहे. एवढं करून हाती यश लागेल की नाही याची खात्री नव्हती पण एकमेकांची साथ सोडायची नाही हा निर्धार पक्का होता.
सलग दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर सगळ्यांच्या पदरी यश पडल. नियतीला या दोघांच्या प्रेमापुढे हार मानावी लागली आणि वर्षा या आजारातून बरी झाली. हॉस्पिटलच्या वाऱ्या थांबल्या आता फक्त रेगुलर चेक अपसाठी तीन महिन्यातून एकदाच काय ते जावं लागणार होत.
आज दोघांच्या लग्नाचा पंधरावा वाढदिवस. पंधरा वर्षातील मागची दोन वर्ष मात्र वनवास घडला होता. एकूणच आत्तापर्यंतच्या संसारातील क्षण दोघांच्याही मनातून सरकत होते. आज वर्षाने पूर्ण घर सजवल होत, गेली दोन वर्ष पथ्य पाण्यामुळे केक खता आला नव्हता पण आज मात्र तिने स्वतःच्या हाताने केक बनवला होता. रवींद्रने त्या दोघांसाठी परदेश वारी बुक केली होती आणि तो आज वर्षाला सरप्राइज देणार होता. दोघेही छान तयार झाले, एकमेकांसमोर आले आणि मग मात्र दोघांनाही रडू आवरलं नाही.दोघांनी मिळून केक कापला, रवींद्र ने वर्षाला सरप्राइज दिलं , दोघेही खूप खुश आणि आनंदी होते. आता या आनंदाला नजर लागू नये अशी प्रार्थना करत होते.
या दोघांच्या जागी इतर कुणी असत तर कदाचित मनातून पोखरल गेलं असत. घाबरून एकमेकांची साथ सोडायचा देखील निर्णय घेतला असता पण दोघांनीही निखाऱ्यावर चालण्याचा निर्णय घेतला, यशही संपादन केलं.
आज मंगेश पाडगावकर यांच्या कवितेच्या ओळी थोड्याशा बदलल्या असत्या,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
तुमचं आमचं प्रत्येक वेळी सेम नसत
Image by jakob-wiesinger from Pixabay
- सासूबाई will you be my valentine?- भाग्यश्री भोसेकर - February 23, 2020
- तुमचं आमचं प्रत्येक वेळी सेम नसत- भाग्यश्री भोसेकर - February 20, 2020
- गोष्टी लेखकांच्या –गौरी शिंदे - November 13, 2019