गंध- अभिजीत इनामदार

“सो सिद्धार्थ, हाऊ वॉज युअर फर्स्ट वीक इन ऑफिस?”

रागिणी तिच्या ऑफिसच्या इंजिनिअरिंग टीम मध्ये नवीन जॉईन झालेल्या कलीगला म्हणाली. रागणी म्हणजे साधारण ५ – ५.५० च्या आत बाहेरची उंची, गोल चेहरा, त्याच चेहऱ्याला सूट होईल अशी केशरचना, नाक, ओठ आणि गाल यांची सुबक ठेवण, पिंगट गहिरे डोळे, हसलीकी गालावर पडणारी खळी, अंगावर आवश्यकती सुबकता. कुठल्याही माणसावर प्रसन्न छाप पडेल असे तिचे व्यक्तिमत्व. णीही तिला एकदा पाहिले आणि इग्नोर करून पुढे गेले असे होऊच शकत नसे. तकतकीत कांती बरोबरच प्रचंड आणि असामान्य बुद्धिमत्तेचे तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत असे. प्रसन्न आणि कॉन्फिडन्ट बोलण्याने ती सहज समोरच्याला आपलेसे करून टाकत असे. आपल्या अपार कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षीच ती, तिच्या ऑफिसच्या जनरल मॅनेजर पदावर विराजमान होती. तिची बॅकग्राऊंड फायनान्सची पण ती सगळ्या डिपार्टमेंटची इतंभूत माहिती ठेऊन असे. कामाचाच भाग म्हणून ती सिद्धार्थची चौकशी करत होती.

सिद्धार्थ जुवेकर, हा अतिशय मेहनती मुलगा होता. उंचापुरा, ६ फूट उंचीचा, काळ्या पण पाणीदार डोळ्यांचा, कुरळ्या केसांचा आणि मजबूत शरीरयष्टीचा तरुण होता. लहानपणी अनेक हालअपेष्टा  सहन करीत त्याने मोठ्या मेहनतीने आपले शिक्षण पूर्ण केले होते. वयाच्या १०व्याच वर्षी आई वडिलांच्या अचानक झालेल्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या चुलतमामाने सांभाळले. दुसरे कोणी नातेवाईक नसल्याने ह्या मामाने दया येऊन त्याला सांभाळायची जबाबदारी घेतली.

मामाची परिस्थिती बेताची. घरात खाणारी ७ तोंडे त्यात ह्याची भर पडली. एका बँकेत तो प्युन होता. जात्याच हुशार सिद्धार्थला परिस्थितीचे भान तेव्हाच आले. मामानी कधी छळ जरी केला नाही तरी  कष्ट भरपूर करून घेतले. स्वतःचे आवरून, लहान भावंडांचे आवरायचे, त्यांचे अभ्यास, आपला अभ्यास, घरातील इतर कामे ह्यात त्याचा वेळ कसा जात असे ते कळत नसे.

घरच्या खर्चासाठी अधिक पैसे मिळतील म्हणून मामाने नुकतेच परफ्युम आणि अत्तर बनवण्याचे  काम हाती घेतले. सिद्धार्थने ते काम देखील शिकून घेतले आणि त्यात तरबेज झाला. त्याच्या कल्पकतेने त्याने असे काही खास मिश्रण करून काही वेगळ्याच गंधाचे परफ्युम तयार केले. अन त्यातील सगळेच सर्वांना आवडू लागले. त्याच्या या कामामुळेच त्याच्या कपड्याना आणि तो असलेल्या भागात एक प्रकारचा गंध दरवळत असे. आजूबाजूच्यांना सुखावणारा असा हा गंध होता.

पुढे मामावर भार नको म्हणून त्याने स्कॉलरशिप मिळवून आणि कमवा आणि शिका योजनेतून  शहरात कॉलेजला ऍडमिशन घेतले. अपार कष्टनी तो इंजिनीअर झाला. कॅंपस इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन होऊन त्याने एक कंपनी जॉईन केली आणि ४ वर्षांनंतर आता तो रागिणीच्या कंपनीमध्ये गेल्या आठवड्यात जॉईन झाला.

आणि आज रागिणी त्याला विचारात होती:

रागिणी : “सो सिद्धार्थ, होऊ वॉज युअर फर्स्ट वीक इन ऑफिस?”

सिद्धार्थ : “इट वॉज फँटॅस्टिक ऍण्ड आय एम ग्लॅड टू रिसिव्ह सच वॉर्म वेलकम इन द ऑफिस. आय  ऍप्रिशिएट”

रागिणी : “यु डिझर्व धिस. आम्ही बेस्ट टॅलेंट हायर केले आहे. बट नाऊ इट्स युअर टर्न टू प्रूव्ह अस राईट  बाय युअर हार्डवर्क”.

सिद्धार्थ : “आय विल ट्राय माय लेव्हल बेस्ट. आय विल गिव्ह माय २००% एफर्टस”.

रागिणी : “आय डोन्ट बिलिव्ह ऑन एनी पर्सेंटेज. रादर आय बिलिव्ह इन सिन्सिअर एफर्टस अँड मोस्ट  इम्पॉर्टन्ट द रिझल्ट्स”

रागिणी हे एक अजब रसायन आहे आणि तिच्या अपेक्षांना उतरण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतील हे सिद्धार्थला कळून चुकले. बेस्ट विशेष घेऊन तो बाहेर पडला.

इकडे सिद्धार्थ केबिनमध्ये आल्यापासून रागिणीला एक मंद असा सुगंध जाणवत होता. हा सुवास  तिने या आधीही घेतल्यासारखे वाटत होते. पण कुठे ते आठवत नव्हते. त्याच्याशी बोलताना तिच्या मेंदूतील एक डिपार्टमेंट जुन्या आठवणीतील फाईल्स तपासण्यात गुंतले होते. पण ते तिला आठवत नव्हते. त्याच्याशी बोलणे संपून तो जेव्हा बाहेर जायला वळला तेव्हा रागिणीने त्याला “एक मिनिट” म्हणून हटकले खरे पण त्याला काय विचारणार? हा गंध कसला म्हणून? आपली नी त्याची ना धड ओळख. त्याला काय वाटेल. उगाच गैरसमज नको म्हणून तिच्याकडे वळलेल्या सिद्धार्थला तिने “काही नाही” असे म्हणून जाऊ दिले.

तिकडे बाहेर पडताना सिद्धार्थला देखील थोडेसे हे खटकल्यासाखे झाले. शिवाय या रागिणीला  बऱ्याच दिवसांपूर्वी वा वर्षांपूर्वी कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते. पण कुठे ते आठवेना. तो आपल्या डेस्कवर आला आणि कमला लागला.

नवीन ऑफिसमधील नव्याचे नऊ दिवस संपले. सिद्धार्थ ऑफिसमधे रुळला. दिवस भरभर संपत होते. कंपनीला नवनवीन प्रोजेक्ट्स मिळत होते. रागिणीच्या लीडरशिपखाली सगळे प्रोजेक्ट व्यवस्थित आणि वेळेवर सुरु होते. रागिणीचे फायनान्सचे नॉलेज आणि टेक्निकल टीमचे हार्डवर्क कामाला येत होते. इकडे सिद्धार्थ एकट्याने दोन प्रोजेक्ट हॅण्डल करत होता. त्याची प्रगती पाहून रागिणी खुश होती. जेव्हा जेव्हा सिद्धार्थ समोर यायचा त्यावेळेस रागिणीला तिच्याभोवती एक अनामिक पण हवाहवासा सुगंध दरवळत आहे असे वाटे. पण कामाच्या रगाड्यात ते तिला बाजूला सारावे लागे.

एकदिवस सगळ्या प्रोजेक्ट्सचे रिव्ह्यू संपले. सगळेजण कॉन्फरन्सच्या बाहेर पडले. रागिणी देखील उठली पण सिद्धार्थने तिला थांबवले.

रागिणी : “कोणत्या प्रोजेक्ट मध्ये काही इश्यू आहे का”?

सिद्धार्थ : “नाही… थोडे वेगळे बोलायचे होते”.

रागिणी प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. तिने हातानेच त्याला बोल असा इशारा केला

सिद्धार्थ : “रागिणी मी सिद्धार्थ जुवेकर…”

रागिणी : “हे मला माहिती आहे सिद्धार्थ. आत्ता तुला नेमके काय सांगायचे आहे?”

सिद्धार्थ : “तसे नव्हे, तू मला ओळखले नाहीस. आपण पूर्वी राजारामपूरला एकत्र होतो, लहानपणी. दीनानाथ निरगुडकर माझे मामा. तुझ्या बाबांच्या बँकेत ते प्युन होते. तुझे बाबा नेहमी माझ्या मामांना मदत करत. मी आणि मामा घरी परफ्युम बनवायचो. तुझ्या बाबाना मी घरी बनवायचो त्यातील एक स्पेशल कॉम्बिनेशन खूप आवडायचे. ते नेहमी तो परफ्युम घ्यायचे. एक-दोनदा मी स्वतः तो द्यायला तुझ्या घरी देखील आलो होतो. खुपवर्षांपूर्वी गाव सुटले. काल अचानक  कानेटकर सरांची गाठ पडली. त्यांनी मला ओळखले. शिक्षण कसे पुर्ण केले ते विचारले. आणि सगळी विचारपूस झाल्यावर सगळ्यात पहिले मी अजूनही तो परफ्युम  बनवतो का हे विचारले. मी आता फक्त स्वतःपुरता परफ्युम बनवतो म्हटल्यावर त्यांचा चेहरा उतरला होता. म्हणून मग काल घरी जातानाच सगळे साहित्य घेऊन गेलो आणि आज येताना हा त्यांच्या आवडीचा परफ्युम बनवला. तेवढा त्यांना देशील प्लिज?”

असे म्हणून त्याने एक छोटा परफ्युम बॉक्स खिशातून काढून टेबलवर ठेवला. रागिणी हे सगळे ऐकून अवाक झाली. तिच्या डोळ्यात एक आनंदाची चमक आली. तिला सतत भेडसावणारा सुगंधाचा  प्रश्न सुटला होता. तिने आनंदानें तो बॉक्स उचलला आणि निघाली. खूप वर्षांपूर्वी तिचे बाबा वापरायचे तो परफ्युम आज तिच्या हातात होता. ज्या गंधाने ती मोहून जायची त्या गंधाचा बॉक्स आज तिच्या हातात होता. सिद्धार्थच्या शहरात जाण्याने सुटलेला हा गंध खूप वर्षांनी तिच्या जवळ आला होता, जवळपास साडेतीन वर्षांपूर्वी, गंधारच्यारूपाने.

कॉलेजनंतर एका कंपनीच्या इंटरव्ह्यूच्यावेळी त्याची ओळख झाली होती. त्याचा पेन हरवल्याने  त्याने रागिणीकडे पेन मागितला होता. इंटरव्ह्यूला पेन आणला नाही? असे रागणीने विचारल्यावर त्याचा पेन हरवल्याचे त्याने सांगितले. त्या कंपनीत रागिणी सिलेक्ट झाली. पण गंधार नाही. नंतर सेम बसस्टॉपवर गाठ पडल्याने रागिणी आणि गंधारची ओळख वाढली. नंबर्स एक्सचेंज झाले. काही काळातच ते प्रेमात पडले. गंधारच्या प्रेमात पडल्यावर तिने एक गोष्ट नोटीस केली ती म्हणजे गंधार वापरत असलेला परफ्युम. तो अगदी सेम तिचे बाबा खुप वर्षांपुर्वी वापरत असत तसाच परफ्युम वापरत असे. त्याला विचारले असता, त्याचा एक मित्र त्याला हा परफ्युम देतो हे तिला कळले. एव्हाना गंधारला देखील चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळाला होता. दोघांचे एकदम अलबेल सुरु होते.

दोघांमध्येही नाकारण्यासारखे काही नव्हते, त्यामुळे त्यांच्या दोघांच्याही घरी काहीच प्रॉब्लेम नव्हता. दोघांनाही लग्नासाठी वेळ हवा होता म्हणून मग सर्वानुमते केलेला साखरपुडा. सहा महिन्यांनंतरची  काढलेली लग्नाची तारीख. सहज फिरायला म्हणून गेलेले गंधार आणि रागिणी. पावसात घसरलेली त्यांची बाईक. फेकली जाऊन बेशुद्ध झालेली रागिणी. दोन दिवसांनी तिला आलेली जाग आणि  गंधारच्या मृत्यूच्या बातमीने पुन्हा तिची हरपलेली शुद्ध. बऱ्याच दिवसांनी त्यातून बाहेर पडलेली रागिणी. महत्प्रयासाने शरदराव आणि कमलबाईंनी सावरलेली रागिणी. तिचा रोष नको म्हणून गेली तीन वर्षे तिच्याजवळ लग्नाचा विषय न काढणारे शरदराव. असेच अन बरेच क्षण रागिणीच्या डोळ्यासमोरून तरळून गेले.

घरी येऊन तिने परफ्युमचा बॉक्स बाबांच्या हातात दिला आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ती तिच्या  रूममध्ये गेली. रात्री ती न जेवताच झोपून गेली. सुकलेल्या गालांवरचे अश्रू पुसत आणि तिच्या डोक्यावर थोपटत शरदराव बराचवेळ रागिणीच्या रूममध्ये बसून राहिले. तिची ही अवस्था गंधारच्या आठवणीने आणि तिने सिद्धार्थकडून आणलेल्या परफ्युममुळे आहे हे सुद्धा त्यांनी जाणले.

दुसऱ्या दिवशी रागिणी आवरून ऑफिसला गेली आणि शरदराव बराचवेळ कोणाशीतरी फोनवर बोलत राहिले. साधारण दोन आठवडयांनी रविवारी दुपारी रागिणीच्या घराची बेल वाजली. दारात  सिद्धार्थला पाहून ती चमकली. पण शरदरावांनी त्याला बोलावले आहे, हे जाणून त्याला आत घेतले. पाणी दिले आणि बसायला सांगून तिने बाबांना बोलावले. बाबांनी सिद्धार्थला का बोलावले आहे हे तिला कळत नव्हते. चहा घेत घेत शरदरावांनी विषयफोड केली.

शरदराव : “रागिणी बेटा, हे बघ मी आज जाणीवपूर्वक सिद्धार्थला बोलावले आहे. ह्याला मी  लहानपणापासून ओळखतो. हा चांगला आणि निर्व्यसनी मुलगा आहे. शिक्षण चांगले झाले आहे. अन तुला माहित आहे? आपण राजारामपूरला असताना, मला जो परफ्युम आवडायचा तो हाच बनवायचा. पुढे इथे आल्यावर आणि गंधार भेटल्यावर मी तोच सुगंध त्याच्याकडून अनुभवाला होता. तुला माहित आहे बेटा? गंधार आणि सिद्धार्थ चांगले मित्र होते. गंधरलासुद्धा हाच परफ्युम आवडायचा आणि तो बनवणारा सिद्धार्थच होता.”

रागिणी : “पण बाबा तुम्हाला म्हणायचे काय आहे नेमके”?

शरदराव : “गंधाररुपी जो सुगंध तुझ्या आयुष्याततून हरवलाय तो या सिद्धार्थच्या रूपांनी पुन्हा तुझ्या आयुष्यात येऊ पाहतोय. तू डोळसपणे सिद्धार्थचा आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून विचार करावा असे  मला वाटते. हे बघ बेटा, आम्ही तुला सावरायला वेळ दिला. तुझ्या पाठीशी राहिलो म्हणून आता तुला इमोशनली ब्लॅकमेल करणे हा माझा हेतू नाही. माझा ना तसा स्वभाव आहे ना वृत्ती. आपल्या बाळाचे नेहमी चांगलेच व्हावे हे वाटणे चुकीचे आहे का? गंधारच्या बाबतीत जे झाले ते कोणालाच विसरणे शक्य नाही. पण बाळा आयुष्य हे एखाद्या आपल्या माणसाची सोबत आले तर ते जगणे सुसह्य होते. आता बघ तुझ्या आईची साथ नसती तर मी काही करू शकलो असतो का? प्रत्येकाच्या वाट्याला  सुख आणि दुःख येतीलच. पण सुख उपभोगताना आनंद शेअर करायला हक्काच्या माणसाचा हात किंवा दुःखाच्या प्रसंगी आपल्या खांद्यावर किंवा पाठीवर मी आहे असे दर्शवणारा हात हा वेगळीच उभारी देऊन जाते. मी आणि तुझी आई कायम तुझ्या सोबत, तुझ्या पाठीशी आहोतच. पण आम्ही आयुष्यभर पुरणार नाही. काळ हा कधीतरी आम्हाला तुझ्यापासून दूर घेऊन जाईलच.”

रागिणी : “बाबा हे काय बोलताय”?

शरदराव : “बेटा ऐकायला कितीही वाईट वाटले किंवा आवडत नसले तरीही हेच अंतिम सत्य आहे. ती घटना आत्ताच होईल असे नाही पण कधीतरी होईलच ना. जशी माझ्या सोबत तुझी आई आहे तसाच तुझ्या सोबत कोणीतरी हवा. म्हणून मी मघाशी काय वाक्य वापरले आठव… तू डोळसपणे विचार कर. तू भावनिक होऊन विचार कर असे माझे म्हणणे नाही. तुम्ही दोघे एकमेकांशी बोला. तुमच्या आवडी निवडी, स्वभाव जुळतील असे मला वाटते. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा  एकमेकांना सांगा. आपापल्या अपेक्षांच्या कसोटीवर एकमेकांना तोलून पहा आणि मगच निर्णय घ्या. सिद्धार्थ, तू सुद्धा बोल काहीतरी. तुला रागिणी पसंत आहे एवढेच म्हणालास मला परवा मी विचारले तेव्हा. पण तुझ्या ज्या काही अपेक्षा असतील त्या तू तिला सांग. हवे तर आम्ही आत जातो, किंवा तुम्ही बाहेर जाऊन बोला.”

रागिणीला क्षणभर काय बोलावे तेच सुचले नाही.

मग सिद्धार्थने बोलायला सुरुवात केली…

सिद्धार्थ : “रागिणी, हे बघ तू मला कधीपासून आवडायला लागलीस ते माझे मलाच कळले नाही. होय मी  तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तुझ्या दिसण्यापेक्षा तुझ्या कर्तबगिरीने मला तुझ्या प्रेमात पडण्याचा मोह आवरता आला नाही. तू ज्या प्रकारे संपूर्ण ऑफिस हँडल करतेस. तुझा कॉन्फिडन्स आणि पटकन आणि ऍक्युरेट निर्णय घ्यायची क्षमता मला आवडते. मला माझ्या जीवनसाथीकडून ज्या अपेक्षा आहेत त्यात तू परफेक्ट बसतेस. पण मला तू आवडतेस म्हणजे मी देखील तुला आवडायलाच हवा असे काही नाही. तुला तुझा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला गंधारबद्दल माहिती आहे. तो माझा चांगला मित्र होता. त्याचा प्रभाव किती असतो हे मी सतत गेली ८ वर्षे अनुभवले आहे, कारण कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून मी त्याला ओळखत होतो. पहिल्या दिवसापासूनच तो माझा चांगला मित्र झाला होता. मी तुला त्याच्या आठवणी मनातून काढून टाक असे कदापि सांगणार नाही, तसा हट्ट करणार नाही. कारण तसे करणे मलाच शक्य नाही तर तुला ते तुला तरी कसे शक्य होईल? मला फक्त तुझ्या हृदयाच्या कुपीत किमान गंधरूपानी स्थान दे एवढेच मागणे आहे.”

रागिणी : “मी काय बोलू हेच कळत नाही”

वातावरण हलके करायला शरदराव म्हणाले

शरदराव : “सिद्धार्थ तुझ्या ऑफिसमध्ये जुनिअर आहे म्हणून तर काही प्रॉब्लेम नाही वाटत ना”?

ह्या प्रश्नाने अवघडलेपण जाऊन सगळे खळखळून हसले. तोच धागा पकडून सिद्धार्थ म्हणाला,

सिद्धार्थ : “हे बघ असेही मला ऑफिसमध्ये लेडी बॉसची सवय आहे. म्हणजे घरी पण तू बॉसिंग केलेस तरी  माझी काही हरकत नसेल… बघ विचार कर”

सगळे पुन्हा एकदा हसले.

कावेरीबाई म्हणाल्या मी खायला काहीतरी करते… सगळे इतर गप्पागोष्टींमध्ये रंगून गेले. रागिणी  बराचवेळ विचार करत आहे हे पाहून सिद्धार्थला काय बोलावे कळत नव्हते. संध्याकाळी निघताना दारात सोडायला आलेल्या रागिणीला तो म्हणाला

सिद्धार्थ : “हे बघ रागिणी कसलेही टेन्शन घेऊ नकोस आणि मनात काहीही ठेऊ नकोस. काहीही असेल तर हक्काने सांग. कुठलेही प्रेशर घेऊन नकोस. हे मी एक मित्र या तयाने सांगतोय. बाकी काही होईल ते होईल पण आपण एकमेकांचे चांगले मित्र नक्कीच होऊ शकतो असे मला वाटते. विचार कर.  आणि तू जो काही निर्णय घेशील तो मला मान्य असेल. तू असा का निर्णय घेतलास असे मी तुला एकदाही विचारणार नाही. आय प्रॉमिस.”

रागिणी : “यु आर नाईस गाय सिद्धार्थ आणि थँक्स फॉर प्रपोजल. खरे तर आज असे काही बोलणे होईल असे माझ्या मनात देखील नव्हते. तेव्हा मला जरा वेळ लागेल. ओके”?

सिद्धार्थ : “टेक युवर टाइम. टेक केअर. गुड नाईट.”

असे म्हणून सिद्धार्थ निघाला.

रागिणी नक्की विचार करते म्हणाली. ती विचार करते म्हणाली म्हणजे आशा आहे असे शरदरावांना वाटले.

—-

आजचा दिवस :

आज तो मंगल दिवस उजाडलाय. होय, आज रागिणी आणि सिद्धार्थचा विवाह समारंभ आहे. रागिणीने तब्बल दीड वर्ष वेळ घेतला. पण अखेर सिद्धार्थच्या प्रेमाने तिचे मन काबीज केलेच. त्याने, तिच्या ह्रदयाच्या कुपीत हलकेच गंधरुपाने शिरकाव केला. आणि अखेर रागिणी हो म्हणाली. शरदराव आणि कावेरीबाईंनी कित्येक वर्षे वाट पाहिलेला तो क्षण आला आहे. डाळिंबी रंगाचा शालू लेऊन,  मुंडवळ्या बांधून, वधूवेषात नटलेली रागिणी आणि मुंडावळ्या बांधलेला, क्रीम कलरच्या शेरवानीत खुलून दिसणारा सिद्धार्थ, दोघे अगदी एकमेकांना पूरक असे कपल वाटत आहेत. शुभमुहूर्तावर मंगलाष्टकांसाठी उभे असलेले सिद्धार्थ, रागिणी अगदी नक्षत्रासारखे दिसत आहेत आणि त्यांच्या अवतीभोवती दरवळत आहे, सिद्धार्थने स्वतःच्या हाताने बनवलेला आणि अत्तरदाणीतून सर्वत्र शिडकावा केला जाणारा, गंधरमयी आठवणी देणारा “गंध”.

Image by monicore from Pixabay 

Abhijit Inamdar

Abhijit Inamdar

लेखक परिचय : नाव- अभिजित अशोक इनामदार. सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे माझे बालपण हे (वयाची पहिली १४ - १५ वर्षे) हे खेडेगावामध्ये गेले. मी इंजिनिअरिंग केले असून एमबीए इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये केले आहे. नोकरीनिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरून झाल्यानंतर सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राबद्दल जिव्हाळा आहे. काही नाट्यप्रयोग तर काही म्युझिकल शोज चे अँकरिंग केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपणही काहीतरी लिहू शकतो याची मनाला आस लागून राहिली होती अन म्हणूनच मग फेसबुक वर २०१२ पासून लिखाण सुरु केले. माझे क्षेत्र जरी यांत्रिकी असले तरी लिखाणामुळे नवी उर्जा मिळते.

4 thoughts on “गंध- अभिजीत इनामदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!