कुछ मीठा हो जाये- कौस्तुभ केळकर

माई आणि आण्णा.
एक दुजे के लिये.
तेरे मेचे बीच में,
कैसा है ये बंधन अन्जाना…?
हम सब नें जाना.
अगदी लक्ष्मीनारायण.
चाळीसस वर्ष.
चाळीस वर्षांचं आनंदी सहजीवन.
प्यारवाली लवस्टोरी.
एक दूसरोंकें नस नस से वाकीफ.
डाॅक्टरला सलाईन लावताना सुद्धा,
ईतकी अचूक नस पकडता आली नसेल…
खरे हमसफर.
भरभरून प्रेम केलं एकमेकांवर.
आयुष्यावर.
रूसवे, फुगवे, भांडण तंटा, कुरूबूर , अबोला…
सगळं टर्न बाय टर्न.
फिरभी..
माॅरल आॅफ दी स्टोरी ?
तुझ्यावाचून करमेना…
एकमेकांचा जीव ,
एकमेकांत अडकलेला.
एकुलती एक मुलगी.
लग्न होवून तिकडे नागपुरी.
सहा महिन्यातून एखादी चक्कर.
लेक, नातवंडे, जावई.
तो खरा आनंदाचा मान्सून सेल.
एरवी पुण्यात ही दोघंच दोघं..
चालतंय की…
दोघं आनंदात.
अजून दोघांपैकी कुणीही..
कुणीही दवाखान्याची पायरी सुद्धा चढलेलं नाहीये.
टचवूड.
बाप्पा प्रसन्न.
अगदी कालचीच गोष्ट.
माईंना जरा चक्कर आली.
आण्णा कासावीस.
शेजारच्या ननूला बोलावला.
ननूनं गाडी काढली.
लगेच डाॅक्टर डाॅक्टर..
‘काळजीचं काही कारण नाही.
तरीही…
ब्लड टेस्ट करून घेऊ.
ऊद्या रिपोर्ट घेवून जा.
मग ठरवू…’
डाॅक्टर ऊवाच.
आण्णा आत्ता येतीलच रिपोर्ट घेवून.
माई आण्णांच्या लग्नाला ,
या फेब्रुवारीत चाळीस वर्ष होतील.
तिथीनं आजच लग्नाचा वाढदिवस.
आण्णा सकाळीच बाहेर पडलेत.
माई तयारीला लागल्या.
आळूची भाजी, बटाट्याची सुकी भाजी.
वरणभात, कोशींबीर, भजी, आणि शेवयाची खीर…
अगदी चाळीस वर्षांपूर्वीचा मेनू.
आण्णा नक्की खूष होणार…
दोघांनीच सेलीब्रेट करायचं.
आण्णा बारा वाजता हाशहुशत आले.
चेहर्यावर बारा वाजलेले.
“हात पाय धुवून घ्या.
जेवायला वाढते लगेच.”
मुँह लटकाके आण्णा जेवायला बसले.
पानाकडे लक्षच नाही.
पन्नास वर्षांपूर्वीची आठवण नाही.
कुठंतरी विचारांच्या जंगलात हरवलेले .
” अहो , जेवून घ्या.”
आण्णा भानावर आले.
समोर लक्ष गेलं.
वाटीतली शेवयाची खीर तेवढी दिसली.
आता माझी सटकली.
आण्णा गरजले..
“ती खीर कशाला केली ?
तुमचे रिपोर्ट आणायला गेलो होतो.
माझीही टेस्ट करून घेतली.
म धु मे ह..
मधुमेह निघाला.
आजपासून गोड बंद.
नकोय ती खीर मला..”
‘अरे देवा.
बरं बाबा मधुकरा.
स्वागत असो तुझं आमच्या’ घरात.
ऊशीरच केलास यायला.
तुम्ही एवढे गोडघाशी.
तुमचं गोड बंद झाल्यावर,
मला खीर गोड लागेल होय ?
वाण्याला सांगायला हवं.
आजपासून घरातली साखर बंद.”
माईंनी खिरीच्या दोन्ही वाट्या,
दूर सारल्या.
आण्णांनी माईंकडे बघितलं.
शब्दांवाचून कळले सारे,
शब्दांच्या पलिकडले..
किती सहज..
माईंनी ‘गोडवा’ सोडून दिला.
साखरेचं खाणार त्याला देव देणार..
माई आण्णांच्या प्रेमाला,
कुणाची नजर ना लागो.
माई होत्या म्हणूनी…
आण्णांच्या डोळ्यात पाणी.
प्रीतीभोजन आवरलं.
सुपारी कातरत आण्णा झोपाळ्यावर बसले.
स्वयपाकघरातलं आवरून माई बाहेर आल्या.
हातात दोन वाट्या.
त्याच खिरीच्या.
आण्णांच्या चेहर्यावर क्वश्चनमार्क.
“अहो नटसम्राट,
बरा अभिनय जमतो बरं तुम्हाला.
मला ठाऊक आहे.
आमच्या माहेरची परंपरा आहे ती.
माझ्याकडे पोचायला मधुकराला जरा ऊशीरच झाला.
मी कालच ओळखलं होतं.
तो मधुमेह माझ्याच वाट्याला येणार.
मी नाही की तुम्ही नाही.
माझ्यासाठी तुम्हीही गोड सोडणार.
म्हणूनच ननूकडनं मागवून घेतली सकाळी.
शुगरफ्री खीर आहे हो.
खावा मनापासून…”
मेड फाॅर ईच आदर.
खिरीतली शुगरफ्री साखरसुद्धा,
या गोड प्रेमानं डायबेटीस झाल्यासारखी लाजली.
कुछ मीठा हो जाये ?
याहून गोड दुसरं काही ?
शक्यच नाही…
हॅप्पी व्हॅलेन्टाईन माई आण्णा.
Image by Claudia Peters from Pixabay 
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!