मिडीयम स्पायसी…

बँकेत साहेबांनी casa च टार्गेट दिल होत.  दर वर्षी टार्गेट फक्त येऊन जात असे. यंदा management त्या बाबतीत जरा जास्त सिरीयस होती. टार्गेट अचिव्ह करणार्यांना बक्षीस देखील जाहीर केलं होत. त्यामुळे एकूण सगळेच कर्मचारी सिरीयस होते. आपले वरिष्ठ क्लार्क वसंतराव कुलकर्णी  देखील नेटाने कामाला लागले होते. अनेकदा त्यासाठी क्लायंटच्या कचेरीत, hni लोकांच्या घरी जाव लागे. म्हणून त्यांनी  “केंब्रिज” मधून दोन नवीन शर्ट, एक pant आणि एक टाय विकत घेतला होता. बॅंकेत कसही बसलं तरी क्लाएन्त कडे जाताना बर इम्प्रेशन पडावं  म्हणून त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी घ्यायच्या कपड्यांचं बजेट आधीच खर्च करून मस्तपैकी केम्ब्रिज मधून जोरदार खरेदी केली होती.

टार्गेट गाठायच्या मागे लागल्यामुळे त्यांना हल्ली अनेकदा घरी यायला उशीर होत असे. ठरलेली गाडी चुकली की ठाण्याला होणार्या सीटच्या अदला बादलीत ह्यांच्या बुडाला वाटा नसे. त्या गाडीतले नेहमीचे ग्रुप हे कॅसलिंग आपापसात करत. जड पोटामुळे डोंबिवली पर्यंत लटकत जाऊन पाठ दुखू लागे. पण सर्वात जास्त खाती आणणाऱ्या व्यक्तीला पहिलं बक्षीस म्हणून महाबळेश्वरला बँकेच्या रेस्ट हाउस मध्ये दोन रात्रींचा family holiday होता. तो पण फुकटात. डोंबिवली ते डोंबिवली गाडी होती. अनेक वर्ष सहकुटुंब महाबळेश्वर बघायचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. वसंतराव फुल ऑन टार्गेटला भिडले होते. घरी आशा ताई म्हणायच्या पण “अहो कशाला इतकी दगदग करता ह्या वयात?” ते म्हणायचे “महाबळेश्वर ट्रीप फुकट मिळणार आहे. इथे वाणी चिंचोके पण फुकट देत नाही. जाऊया आपण बघ मी जिंकतो की नाही ते.”

टार्गेटचा महिना संपला. सर्वांनी आपापली नवीन खाती उघडून दिली होती. त्या दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर करायला बँकेचे जीएम स्वतः आले होते. त्यांनी सर्वांच्या मेहेनतीच कौतुक केल. निकाल जाहीर करायला सुरुवात केली. पाहिलं बक्षीस मनस्विनी जागुष्टे नामक घट्ट मुट्ट  बाईंना मिळाल. आता खात उघडायल त्या ज्या क्लाएन्तकडे जायच्या तो  त्यांचा स्लीव्हलेस, त्यांचे दणकट दंड, त्यांचा मेकप केलेला चेहरा ह्यात इतका हरवे की एकाच्या जागी सगळ्या कुटुंबाची खाती उघडत असे. जीएम साहेबांनी देखील जागुष्टे बाईंच्या डोंगर, दर्या आणि त्यातील वळणाच्या वाटा न्याहाळत पहिल बक्षीस त्यांच्या हवाली केल. दुसर बक्षीस होत मिक्सर. ते रघु अय्यरला मिळाल. आपले वसंतराव व्यथित झाले. तिसर बक्षीस होत जिलेटचा शेव्हिंग रेझर किंवा विजेती बाई असेल तर एक लेडी परफ्युम. जीएम साहेबांनी तिसर्या विजेत्याच नाव वाचल. वसंतराव जिंकले होते. त्यांनी हसत ते जिलेट ब्लेड साहेबांकडून स्वीकारलं. कलीग्स नि काढलेल फोटो लगेच घरी आणि family  ग्रुपवर टाकले.

मुळात निखळ यश कधीच वाट्याला न येत बहुतांश वेळेला अपयश अनुभवणाऱ्या वसंतराव किंवा त्यांच्या कुटुंबियांना ह्या लहानश्या यशाच देखील खूप कौतुक होत. मग एका रविवारी वसंतरावांचा मुलगा आदित्यने त्या जिलेट रेझरच वेष्टण उघडून ते वसंत रावांच्या हवाली केल. वर्षानुवर्ष त्यांच जुनं रेझर, टोपाझ ब्लेड आणि डबीतील साबण ह्यांनी कुठे ना कुठे कापून घेत दाढी करणाऱ्या वसंतरावांना जिलेट ने न कापता सुळकन होणारी दाढी स्वर्गीय सुख देऊन गेली. त्याच रेझर ने चार ते पाच महिने दाढी घोटून शेवटी दाढी होईनाशी झाल्यावर वसंतराव आदित्यला म्हणाले” ह्याची धार गेलेली दिसते. आता काय करायचं?” आदित्य म्हणाला “बाबा ती दांडी राहू दे. नवीन रेझर आणा विकत. ते ह्या दांडीला लावायचं”

वसंतराव ऑफिसला जाताना ते रेझर बरोबर घेऊन गेले. लंच टाईम मध्ये बरंच च्या शेजारच्या केमिस्टकडे सेम रेझरची मागणी केली. त्याची भरमसाठ किंमत ऐकून त्यांनी  जीलेटचा नाद सोडून त्यांच्या जुन्या रेझरला बसणारी साध ब्लेड विकत घेतल. रात्री आदित्यने विचारलं “काय बाबा घेतली ना रेझर विकत?” वसंतरावांनी आपल्या bag मधून साध ब्लेड काढून दाखवलं आणि म्हणाले “ते म्हणजे नाळ सापडली म्हणून घोडा घेण्यासारख होत. त्यापेक्षा हे बर. दाढीच करायची आहे ना? ह्याने थोडी कापेल. अरे त्याची सवय आहे. पण  ह्याने माझा खिसा  कापला जाणार नाही त्या जिलेट सारखा!” हे बोलून वसंतराव आपल्याच जोक वर हसले अगदी त्यांच्या मिडीयम स्पायसी स्टाईल मध्ये!

Image by mcthrissur from Pixabay 

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

One thought on “मिडीयम स्पायसी…

  • February 29, 2020 at 7:52 am
    Permalink

    आई शप्पथ… एका छोट्या गोष्टीत कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाची सगळी स्वप्नं, निराशा, तडजोडी, कुटुंब वत्सलता… अनेक गोष्टी दाखवल्या आहेत. हॅट्स ऑफ 🙏🏻

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!