सासूबाई will you be my valentine?- भाग्यश्री भोसेकर

आज विकेंड असल्याने संपूर्ण जगाला तशी उशिराच जाग आली होती. कोंबडेदेखील शनिवारी, रविवार उशिरा बांग देत असावेत जणू. बरोब्बर 8 वाजता रेवतीच्या मोबाईलमधील कोंबडा वाजला आणि ती उठली. महेश अजूनही गाढ झोपेत होता त्याच्या कुशीत रिया स्वप्नरंजन करत असावी, कारण रियाच्या चेहऱ्यावर हसू फुललं होत. रेवती त्या दोघांकडे, विशेषतः रियाकडे डोळे भरून पहात होती. सासरी दोन पिढ्या मुलगी नाही , त्यामुळे रेवतिला दिवस गेल्यावर मुलगीच व्हावी याकरिता अख्ख घरदार नवस सायास, जे जे जमेल ते करत होत. रिया झाली आणि सगळ्यांना आकाश ठेगण झालं. बघता बघता रिया आता दोन वर्षांची होत आली होती.

कशी गेली दोन वर्षं कळलच नाही रेवतीच्या मनात आल. खरं तर दोन वर्षे कशी गेली हे तिच्याशिवाय अजून कुणालाच व्यवस्थित कळल नसेल. कारण रिया साधारण सात महिन्यांची असतानाच तिला ऑफिस जॉईन करावं लागलं, रिया जस जशी मोठी होत होती त्याप्रमाणे अख्ख्या घराचं रूटीन बदलत होत. पण सुदैवाने सासू सासरे सहकार्य करणारे असल्याने हे सगळे बदल सांभाळण सुकर झाल होत. रिया आजी आजोबांच्या प्रेमळ सहवासात दिसामासा वाढत होती, खऱ्या अर्थाने डेव्हलप होत होती. सोमवार ते शुक्रवार म्हणजे अगदी लढाईचे दिवस असायचे. सकाळी लवकर उठून , दहा हातांनी काम करत बरोबर साडे नऊ वाजता रियाला पापी देऊन घर सोडायचं. लंच ब्रेक मध्ये रियाला आणि तिच्या आजी आजोबांना एखादा व्हिडिओ कॉल आणि नंतर रात्री 8 वाजताच भेट. सकाळी रेवती रियाच सगळ आवरून, स्वयंपाक करून जायची, यात तिच्या  सासूबाईंची मोठी मदत असायची.मग दिवसभर सासू सासरेच रियाला सांभाळायचे.संध्याकाळी देखील सासूबाई जमेल तेवढं करूनच ठेवायच्या , थोडक्यात घरच्या सगळ्या लढाया यशस्वीपणे पार पाडण्याच काम या सासुसून करायच्या.

रेवतीच घड्याळात लक्ष गेलं, विचार करता करता साडे आठ झाले, ती पटकन उठली आणि तिच्या लक्षात आलं की आज सासू सासऱ्यांचा ग्रुप ट्रिपला जाणार होता. बाहेर येऊन बघते तर काय ते दोघेही निघून गेले होते. एरवी त्यांना कुठे बाहेर जाता येत नाही आणि आजही ते लवकर ,आवाज न करता निघून गेले, आपल्याला उठवलं का नाही याची चुटपुट रेवतील लागून राहिली. तिने सासूबाईंना फोन केला

“हॅलो, आई , तुम्ही कधी निघालात?”

“अग झाला तासभर”

“काही खाल्लत का? मला उठवायच ना”

“अग हो सँडविच बनवलं होत…अग तुला धावावच लागत की सोमवार ते शुक्रवार…म्हणून नाही उठवलं”

बाकी घरी आल्यावर बोलू आता त्यांना एन्जॉय करू द्यावं असा विचार करून रेवती म्हणाली

“बरं बरं…आता तुम्ही एन्जॉय करा, बाकी नंतर बोलू”

आवरता आवरता रेवती विचार करत होती, सासूबाईंनी तिच्यावर अगदी आईच्या मायेचं छत्र धरलं होत. त्यांची शक्यतो तक्रार नसायची, नेहमी हसतमुख असायच्या. भांड्याला भांड लागलच नाही असं झालं नाही पण ती सगळी पेल्यातली वादळ असायची, लगेच शमून जायची. रेवतीने कॅलेंडर पाहिलं तर सासू सासर्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता पुढच्या महिन्यात. तिने त्या दोघांना काहीतरी सरप्राइज द्यायचं ठरवलं.

इकडे रेवतीच्या सासूबाई ट्रिप एन्जॉय करत होत्या. त्यांचा 15-20 जणांचा ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप. बऱ्याचदा ट्रिप, वेगवेगळे कार्यक्रम यांची रेलचेल असायची. कुणाची मुल इथे तर कुणाची परदेशात होती. प्रत्येक ट्रिपमध्ये घरचे विषय निघायचे. कुठे आनंदाचा सुर लागायचा ,कुठे तक्रारीचा पण रेवतीच्या सासूबाईंचा स्वभाव मुळात आनंदी त्यामुळे जमेल तितकं चांगलच बोलण्याकडे त्यांचा कल असायचा.

दिवस सरला, सासू सासरे  ट्रिपहून परत आले. दिवसभर काय काय घडलं याच्या गप्पा झाल्या, सगळे जेवून झोपायला जाणार इतक्यात रेवतिने रियाच्या हातात काहीतरी दिलं आणि आजीला दे अस सांगितलं. रियाने लगेच त्याप्रमाणे आपल्या आजीच्या हातात ते नेऊन दिलं.

“हे काय?? काय ग गुंड्या…कोणी दिलं?”

“आईने” इतकं सांगून रिया दुसरं काहीतरी खेळायला निघून गेली. रेवतीच्या सासूबाईंनी ते नीट पाहिलं तर राजस्थान ट्रिपची दोन तिकीट होती. त्यांनी काय हे अशा नजरेने रेवतिकडे पाहिलं त्यावर रेवती म्हणाली

“तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाचं आमच्याकडून गिफ्ट. तुम्हाला अडकायला होत , जरा बाहेर जा,एन्जॉय करा”

सासूबाईंच्या डोळ्यात पाणी उभ राहिल. त्या काही बोलणार इतक्यात सासरे म्हणाले

“तुम्ही दोघी सेमच विचार करता की”

“म्हणजे?” रेवतीने विचारल

“थांब सांगतो” म्हणत सासरे आत गेले आणि हातात काहीतरी घेऊन आले आणि ते त्यांनी रेवती महेश यांच्या हातात सोपवल

महेशने ते उघडलं, वाचलं आणि म्हणाला भूतानचे तिकीट आहे,

“पण काय हो बाबा, एकच तिकीट आहे?”

“अरे आमच्याकडून भेट आहे ती सूनबाईंना… रेवतीच्या वाढदिवसानिमित्त”

“आई, तुम्हाला कसं कळल मला सोलो ट्रिपला जायचे आहे ते?” रेवतीचे डोळे चमकत होते

“जसं तुला कळल की आम्हाला ब्रेक हवा आहे ते, अग मागे ती घाडग्यांची मुलगी गेली होती सोलो ट्रिपला तेव्हा ती ते सगळ सांगत असताना तुझ्या डोळ्यात वाचलं मी. खूप तडतड होते तुझी, जा छान एन्जॉय कर, रियाची बिलकुल काळजी करू नको”

रेवतीच्या देखील डोळ्यात पाणी आल. घरात सपोर्ट सिस्टीम नसल्यामुळे जॉब सोडाव्या लागणाऱ्या, किंवा मग खूप आघाड्यांवर लढत जॉब करणाऱ्या अनेक स्त्रिया तिच्या डोळ्यासमोर आल्या. आपल्या आजूबाजूला आपल्याला जाणणारी माणसं आहेत याचा विचार करून आपण खूप भाग्यवान असल्याची जाणीव तिला पुन्हा एकदा झाली.

Image by pasja1000 from Pixabay 

Bhagyashree Bhosekar

Bhagyashree Bhosekar

मुळची महाराष्टात जन्म घेऊन इथेच वाढलेली भाग्यश्री सध्या बंगलोर मध्ये आयटी क्षेत्रात नोकरी करते आणि विविध माध्यमात लिखाण पण करते. मराठी लेखनामुळे तिची मराठी मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. लिखाणातून तिचा मराठी भाषेशी जोडलेली राहण्याचा प्रयत्न असतो. भाग्यश्रीला लघु कथा, दीर्घकथा लिहायला विशेष आवडतात. आत्तापर्यंत तिने दोन shortfilms साठी पटकथा लिहिली आहे. शिवाय 2017 साली तिचं बॉम्बे बिट्स नावाचं मराठी पुस्तक प्रकाशित झालं आहे. याव्यतिरिक्त अवांतर वाचन हा तिचा छंद आहे.

17 thoughts on “सासूबाई will you be my valentine?- भाग्यश्री भोसेकर

  • February 23, 2020 at 7:17 am
    Permalink

    छान आहे कथा

    Reply
    • February 24, 2020 at 3:43 am
      Permalink

      मनापासून आभार🙏

      Reply
  • February 24, 2020 at 10:24 am
    Permalink

    अगदी माझी गोष्ट!!!! 😇😇

    Reply
  • February 24, 2020 at 1:06 pm
    Permalink

    Khup mast..

    Reply
  • February 25, 2020 at 8:02 am
    Permalink

    Aga A!! Mazya ghari pan nahi alis tu. Ani kasa kay same lihilas?? Sasubaina vachun dakhwte…Love ur write up as alws.

    Reply
    • March 10, 2020 at 4:37 pm
      Permalink

      Khup awadli goshta

      Reply
  • February 27, 2020 at 7:17 am
    Permalink

    मस्त लिहिली आहेस गं.. जाम आवडली मला..💓👍

    Reply
  • October 3, 2020 at 2:43 pm
    Permalink

    कथा आवडली. असा समंजसपणा नात्यात हवाच.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!