बोगनवेल- प्राजक्ता काणेगावकर
सरस्वती बंगल्याच्या मागच्या अंगणात एक भले मोठे आंब्याचे झाड होते. तसे ते प्रसन्न झाड होते. लांबरुंद. आडवेतिडवे पसरलेले. सुगंधा लग्न करून सरस्वती बंगल्यात आली तेव्हा अण्णांनी तिच्या सासऱ्यांनी तिच्यासाठी म्हणून हौसेने झाडाच्या फांदीला कडीपाटाचा झोपाळा बसवून घेतला होता. सुगंधाची ती रोज साडेचार वाजता येऊन बसायची जागा होती. सासू नसल्याने अण्णा आणि नवरा श्रीधर आणि ती इतकीच इन मीन माणसे घरात होती. गाता गळा गोड म्हणून सुगंधाला तिच्या वडिलांनी अण्णांकडे गाणे शिकायला पाठवली. अण्णांकडे कितीतरी वर्षे ती गाणे शिकत होती. उपजत गोड गळ्याला स्वरांचे कोंदण अगदी सुरेख बसले होते. अण्णांनीच मग तिच्या वडिलांकडे शब्द टाकून तिला सून करून घेतली. श्रीधरची ना असण्याचे काही कारण नव्हते. सुगंधाला मैफिली करण्यात काहीही रस नव्हता. अगदीच वाटले तर ती झोपाळ्यावर बसून रियाज करत असे दुपारी. साधारण साडेचार पासून ते सहापर्यंत ही तिची खास स्वतःची वेळ असे. या वेळेत ती शक्यतो बाकी काही कार्यक्रम, येणेजाणे ठेवत नसे. तो कोपराही मोठा सुरेख होता. कुंपणाचे वळण असल्याने तिथे आपसूक एक आडोसा तयार झाला होता. बाकीच्या बंगल्यांसारखे तारेचे सिमेंटचे कुंपण न करता अण्णांनी घराभोवती बोगनवेल फिरवली होती. हिरवागार आंबा, त्याच्यापासून राजापासून अदबीने अंतर ठेवून नोकर वर्गाने राहावे अशी ती बोगनवेल आणि त्यावरचा तो झोपाळा. पायाखाली रुजली तर कधी हिरवळ नाहीतर चक्क थोडी चोपलेली माती.
सुगंधा आजही तिथे बसून मुक्त आवाजात गात होती. तिचे भान हरपले होते. राग संपवून तिने डोळे उघडले तर समोर श्रीधर उभा होता. तो अनिमिष तिच्याकडे बघत होता. त्याच्या नजरेने सुगंधा बावरली. एरवी त्यालाही मैफिली दौरे यातून वेळ काढणे मुश्किल होई. मग एखाद दिवशी तो मुद्दाम तिच्यासाठी म्हणून घरी थांबे. आज त्याचा खरतर कार्यक्रम होता थोड्या वेळात. त्यासाठीच तो तिला शोधत आला होता. तिचे गाणे ऐकून तो तिथेच खिळून उभा राहिला होता. त्याच्याने तिची समाधी मोडवेना. तिचे गाणे संपल्यावर ती उठली.
“काही हवे होते का तुम्हाला?”
“हो”
“काय?”
“आत चल. मग सांगतो”
सुगंधा त्याच्या मागोमाग घरात शिरली. त्यांच्या खोलीत शिरल्यावर श्रीधरने पटकन दार लावून घेतले आणि सुगंधाला जवळ ओढले.
“अहो”
“काही बोलू नकोस”
सुगंधाचे शब्द हरवले. श्रीधरने तिच्या ओठांवर ओठ टेकले. आसुसून तिचे गाणे ऐकत असल्यासारखे त्याने तिला मिठीत घेतले. सुगंधा विरघळली.
“अहो”
“बोल”
“जायचंय ना तुम्हाला?”
“आज तूही चल मैफिलीला”
“अहो नको. स्वयंपाक व्हायचाय ना अजून”
“अण्णांना सांगितले आहे मी. आज ते म्हणले तुम्ही दोघेही बाहेर जा. मी माझे बघतो काय करायचे ते”
“म्हणजे सगळे ठरवूनच आलाय तुम्ही”
सुगंधाच्या खोट्या रुसण्याकडे बघून श्रीधर हसला.
“आज ती मोरपंखी साडी नेसशील?”
सुगंधा लाजली. ती साडी श्रीधरनेच तिच्यासाठी आणली होती. त्याची खूप आवडती साडी होती ती. ती तयार होऊन बाहेर आली आणि तिच्याकडे तो बघतच राहिला. टपोऱ्या डोळ्यांमध्ये काजळ, मोठे कुंकू, मोजके दागिने आणि त्याला आवडतो तसा मोठा अंबाडा आणि त्यावर गजरा. श्रीधरला मनातून आजची मैफिल रद्द झाली तर फार बरं असे वाटले एक क्षण.
दोघेही कार्यक्रमाच्या सभागृहात पोचले. आज त्याने सुगंधाला समोर बसवले त्याच्या अगदी. एरवी ती आतल्या ग्रीन रूम मध्ये तरी बसे नाहीतर मुद्दाम मागे कुठेतरी गर्दीचा एक भाग बनून बसे. आजचे त्याचे गाणे फक्त तिच्यासाठी होते. कधी वीज, कधी रिमझिम पाऊस, कधी गारवा कधी हळुवार झुळूक असे त्याचे गाणे सुगंधा ऐकत होती. आजचे गाणे फक्त तिच्यासाठी आहे हे तिलाही ठाऊक होते. ती कधी लाजत होती. कधी स्वतःशीच हळूच हसत होती. कधी त्याच्याकडे बघत होती. त्यांच्यात चाललेला हा शब्दांवाचूनचा संवाद फक्त जसा काही त्या दोघांनाच कळत होता. गाणे संपले. टाळ्यांच्या कडकडाटाने दोघेही भानावर आले. गर्दीतून वाट काढत निघायला बराच वेळ लागला दोघांना. गाडीत बसल्यावर श्रीधरने अलगद तिच्या हातावर हात ठेवला. सुगंधाच्या अंगावर शिरशिरी उठली.
“कुठे जाऊया?”
“तुम्ही न्याल तिकडे.”
श्रीधरने तिला जवळ घेतले. बऱ्याच दिवसांनी त्यालाही निवांत संध्याकाळ मिळाली होती. घरी परतले दोघे तेव्हा बरीच रात्र झाली होती.
“ऐक ना”
“काय?”
“काही नाही” असे म्हणत त्याने तिला मिठीत घेतले. तसेही शब्दांनी कुठे सांगता आले असते काही त्याला वाटून गेले.
श्रीधरच्या लोकप्रियतेत दिवसागणिक भर पडत होती. सुगंधासारखाच तोही अण्णांकडे लहानपणापासून गाणे शिकत होता. आवाज सुंदर होताच त्याचा पण त्याला अण्णांच्या कडक आणि प्रसंगी कठोर वाटणाऱ्या शिस्तीनेही वळण लावले होते. स्वतःचा मुलगा म्हणून अण्णांकडून त्याला कुठलीही सवलत मिळाली नव्हती कधी. त्याच्या गाण्यातली तयारी ही निश्चित अण्णांची देण होती त्याला. आताशा श्रीधरला चित्रपटांचीही गायची संधी मिळाली होती. ते त्याचे क्षेत्र नसले तरी तिथेही त्याने आपला ठसा उमटवला होता. त्याचे कार्यक्रम, रेकॉर्डिंग या सगळ्यात तो आधीपेक्षाही प्रचंड व्यस्त झाला होता. सुगंधाच्या वाट्याला तर तो कमीच येत असे हल्ली. तिला मनातून खूप वाटे त्याला थांबवून घ्यावे एखादा दिवस म्हणून. पण श्रीधर व्यावसायिक तत्त्वांवर तडजोड करणार नाही हे ठाऊक असल्याने ती कधी त्याला काही म्हणत नसे.
श्रीधर हल्ली गप्प गप्प ही झाला होता खूप. त्याची चिडचिडही खूप वाढली होती. सतत काहीतरी हातातून निसटतय ही बोच त्याला अस्वस्थ करत होती. त्याचा वेळ प्रचंड मौल्यवान झाला होता. दिवसरात्र जे गाणे तो गात होता त्याच्याशी त्याचे सूर जुळत नव्हते. ते त्याला कळत होते ही आणि नव्हते ही. जणू काही कुठल्याशा अनामिक जगात तो वावरत होता जिथे फक्त त्यालाच प्रवेश होता. सुगंधाच्या आणि त्याच्यामधला संवाद जवळ जवळ संपला होता. काहीसे अबोल अलगद फुलणारे असे जे काही होते ते ही आता शांत झाले होते. ती दिवस दिवस त्याची वाट बघे. तो कशाच्या मागे धावतोय हे त्याला कळत नव्हते अणि त्याची वाट बघत राहण्याचे काय करावे हे तिला समजत नव्हते. एकदा कपाट उघडून त्याच मोरपंखी साडी वरून हात फिरवताना तिचे डोळे भरून आले ते थांबेतनाच.
आजही त्याच्या आठवणीने घायाळ होऊन ती तिच्या लाडक्या झोपाळ्यावर बसली होती. शांतपणे हळुवार झोके काढताना तिचा सूर लागला. मीरेची विरहिणी तिच्या ओठून बाहेर पडली. भान हरपून ती गात राहिली. गाणे संपले आणि तिने डोळे पुसले. बराच अंधार झाला होता. पाय खाली टेकणार इतक्यात समोर उभा असलेला श्रीधर तिला दिसला. त्याचे डोळे भरून आले होते. तिचा दुखरा सूर त्याच्या पर्यंत पोचला होता.
“कधी आलात तुम्ही? माझे लक्षच नव्हते”
श्रीधर काहीच बोलला नाही. त्याने तिला हाताला धरून घरात आणले. खोलीत पोचल्यावर त्याने दार लावून घेतले
“सुगंधा”
आणि ती पटकन त्याच्या मिठीत शिरली. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याला थांबवताना त्याची पुरेवाट झाली. त्याने तिला पलंगावर बसती केली. हलक्या हाताने तिच्या चेहऱ्यावरच्या बटा बाजूला करत तो म्हणाला
“काय झाले राणी?”
“काही नाही”
“असे उगाच डोळे भरून आले तुझे?”
सुगंधाने त्याच्याकडे मान वर करून बघितले. श्रीधरने तिच्या नजरेतले आर्जव ओळखले.
“आज नाही जात मी कुठेही”
त्याने फोन उचलला आणि सुगंधाने काही म्हणायच्या आत पटकन त्याचे बाहेर जाणे रद्द केले पण. सुगंधा त्याच्या कुशीत हरवली.
“अहो”
त्याच्या खांद्याची उशी करून झोपलेल्या सुगंधाकडे त्याने पहिले.
“बोल”
“एक सांगू?”
“काय?”
“तुम्ही रागावणार नाही ना?”
“नाही”
सुगंधाने त्याचा चेहरा ओंजळीत घेतला.
“तुम्ही स्वतःसाठी कधी गायलात इतक्यात?”
श्रीधरने तिची नजर चुकवली. त्याच्याकडे उत्तर नव्हते
“रागावलात?” तिने मृदू आवाजात विचारले.
“नाही”
तो क्षणभर शांत झाला. सुगंधच प्रश्न चूक नव्हता हे त्यालाही माहित होते. त्याच्या मनातला सल निघाला होता. नेमके काय चुकतेय ते त्याच्या लक्षात आले.
“श्रीधर तुम्ही फार अडकताय या सगळ्यात. असे नसेलही कदाचित. पण मला जाणवले म्हणून सांगितले. संगीत हे देवाचे देणे आहे. तुम्हाला ते लाभले आहे ते सांभाळण्याची ताकद तुमच्यात आहे म्हणून. विश्वासाने सोपवलेले धन आहे ते. त्याच्याशी तडजोड करू नका श्रीधर. स्वतःशी प्रामाणिक नसणे तर आहेच हे पण त्या नियंत्याचाही तो विश्वासघात आहे.
श्रीधर अजूनही शांत होता. तो फार बोलत नाहीये हे पाहून सुगंधा उठली. तिने आवरताना त्याच्याकडे वळून बघितले. तो अजूनही हरवला होता विचारात. दार उघडून ती खोलीच्या बाहेर कधी गेली ते ही त्याला कळले नाही.
काही वेळाने तो बाहेर आला. सुगंधा स्वयंपाकघरात होती. तिथल्या खिडकीतून तो मागचा आंबा आणि बोगनवेलीचे वळण दिसत असे. ती ओट्यापाशी काम करत होती. हरवून गेली होती पार. श्रीधर तिच्याकडे बघत राहिला. ही अशी तन्मयता आपल्याकडेही होती या विचाराने तो भानावर आला. तिला त्या लयीतून बाहेर काढावेसे त्याला वाटेना. तिच्याशी बोलायचे असूनही तो काहीच न बोलता तिथून बाहेर पडला.
आज बऱ्याच महिन्यांनी श्रीधरची मुलाखत होती. त्याने आवर्जून सुगंधाला ती बघायला सांगितली होती. त्यामुळे कधी नव्हे ते तीही टीव्ही लावून बसली होती.
“तुमच्या पत्नी नाही आल्या का आज स्टुडियो मध्ये?”
“नाही”
“का?”
“तिला आवडत नाही आणि तसेही मी काय बोलणार आहे हे तिला माहित असते”
“अरे वा. खरच की काय?”
“हो” श्रीधर म्हणाला आणि हसला.
“काय आहे ना, प्रेम शब्दातच मांडता आले पाहिजे असे थोडीच आहे? सुगंधा बोलत नाही फार. पण ती जे न बोलता सांगते ते मला कळते.”
“आणि तुम्ही जे सांगत नाही ते?”
“ते तर कळतेच तिला. खरे सांगू का? प्रेम हे कुंपणासारखे असावे”
श्रीधर थांबला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला.
“सुंदर दिसावे कुंपणाने बोगनवेलीसारखे. पण त्या काटेरी कागदी फुलांनी आतल्या सुकुमार गुलाबाला जपावे बाहेरच्या संकटांपासून. हे न सांगताही जिला कळले तिला मी अजून शब्दांनी काय वेगळे सांगू?”
श्रीधर घरी आला तेव्हा सुगंधा झोपाळ्यावर बसली होती. आज श्रीधरही तिच्या शेजारी टेकला. त्याने तिच्या हातावर हात ठेवला. सुगंधाने न बोलता त्याच्या हातावर गुलाबी रंगाचे कागदी पाकळ्यांचे बोगनवेलीचे फूल ठेवले.
Image by Shell brown from Pixabay
- Kaleidoscope- मुझे तुमसे मुहोब्बत है दिवानगी की हद तक - May 28, 2021
- Kaleidoscope- लव्ह ऍक्चुअली - April 29, 2021
- Kaleidoscope- दिल तो आखिर दिल है ना - April 14, 2021
फार सुंदर कथा.
कथेतला संदेश फार महत्वाचा. स्वतःसाठी जगणं आणि ओढून ताणून जगण्याचा फरक अधोरेखित करणारी.
मस्त
खूप सुंदर आहे ही कथा. फार फार दिवसांनी इतकी छान कथा वाचायला मिळाली
अप्रतिम❤️
या महिन्यातील सर्वात आवडलेली, भावलेली कथा. अगदी स्पर्शून गेली मनाला. चेरी आँन केक.
सुंदर. <3
छान कथा 👌
सुंदर कथा….खूपच भावली मनाला
अप्रतिम❤️
खूप सुंदर,आशय आणि हळुवार…..
Khup aavadali