सय्योनी- पूजा खाडे पाठक
रात्री २ वाजता दार वाजलं तशी ती जागी झाली .. आपले लांब-सडक काळेभोर केस वर अम्बाड्यात बांधून ती दार उघडायला उठली .. दार उघडले .. समोर तोच उभा होता ..
समीर. सगळ्या जगाला आपल्या संगीतानं , शब्दांच्या जादूनं आणि अजून कशा कशानं वेड लावणारा. रात्री २ वाजता तिच्या दारात उभा होता. फाटक्या अवतारात.
न बोलता तिने त्याला आत घेतले. कसलासा मळकट शर्ट .. चेहऱ्याची दशा झालेली .. लाल डोळे , विस्कटलेले कपडे आणि खुंटलेली दाढी.
काही न बोलता बसून राहिले दोघे बराच वेळ.
“समीर ..” तिने हाक मारली .. त्याने तिच्याकडे बघितलं .. “उफ्फ ये शिद्दत , ये इझ्तिरार , ये जुस्तुजू किस चीज कि है इन आँखो में .. ” म्हणत तिने त्याला कुशीत घेतले .. अगदी बाळाला कुशीत घेतात तसं .. तिच्या कुशीत त्याने घट्ट डोळे मिटून घेतले .. तिला घट्ट बिलगून ..
“खूप भरकटल्यासारखं होतंय .. काहीच सुचत नाहीये .. असं वाटतंय बास .. बंद करावं हे सगळं आणि लांब लांब जाऊन राहावं डोंगरात कुठेतरी .. ” तो म्हणाला ..
“इतकं भेदरलेलं कोकरू कसं झालं रे तुझं .. वाघासारखा सगळ्यांवर धावून जाणारा .. हे काय आता ?” ती म्हणाली .. तो काहीच बोलला नाही .. बराच वेळ ती त्याला जवळ घेऊन बसून राहिली ..
अचानक स्वतः ला सोडवत ती आत गेली आणि तेल घेऊन आली .. “तेल लावून देते डोक्याला .. झोप शांत .. सकाळी बरं वाटेल .. झोप झाली नसणारे कितीतरी दिवस .. डोळे किती खोल गेलेत बघ ..” ती काळजीने म्हणाली ..
त्याच्या डोक्यावर जाणारा तिचा हात हलकेच पकडत तो म्हणाला .. “नको .. “
“नको?”
“अं हं .. “
“मग काय हवं ?”
“….. “
—
फुटलेल्या ढगासारखा तो तिच्यावर बरसत होता .. अंदाधुंद .. आणि ती प्रत्येक थेम्ब ,प्रत्येक तुषार अनुभवत होती .. त्याला कुरवाळत , चेतवत , कधी हळुवारपणे तर कधी धसमुसळेपणाने .. त्याच्या आत चाललेला सगळा सगळा कल्लोळ तिच्यावर झेलत होती .. त्याचं हे असं पिसाटून तुटून पडणं नवीन नव्हतं तिच्यासाठी .. कधीही चिडला, रडला .. हरला .. कि हे नेहमीचंच .. जणू काही त्या प्रत्येक स्पर्शातून , फुललेल्या त्या प्रत्येक श्वासातून त्याची घुसमट सांगायचा तो तिला ..
खूप खूप वेळाने कधीतरी त्याचा आवेग ओसरला .. तिच्या गर्दरेशमी केसांच्या जंजाळात हरवून जायला नेहमीच आवडायचं त्याला .. म्हणून सगळे केस त्याच्या चेहऱ्यावर , डोक्यावर पसरवत ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली होती ..
“सगळी मायूसी .. सगळी आतिष संपलेली , विझलेली दिसतेय .. ” ती म्हणाली ..
“तुझ्याशिवाय कोणावर काढणार ..” तिच्या लांबसडक केसांतून बोटं फिरवत तो म्हणाला ..
“आता सांग, काय झालं .. ” त्याच्या बोटात बोटं गुंतवत ती म्हणाली .. “मन नाही लागत .. मी लिहिलेल्या , गायलेल्या, सगळ्या सगळ्या गोष्टींची लक्तर तोडून हे लोक मला तिसरच करायला सांगतात .. काहीतरी विदुषकासारखं .. तो मी नाहीच .. जान च राहिली नाही आता यात .. यंत्रासारखं काम करणं .. बास आता नाही सहन होत .. ” तो म्हणाला ..
“मग सोडून दे त्यांना .. ” ती म्हणाली. “काहीतरी बोलू नकोस ” तिची बोटं झिडकारत तो म्हणाला .. “ज्यांना तू हवा आहेस ते तुला कधीच बदलणार नाहीत समी .. स्वतः ला हरवू नकोस .. ” ती त्याच्या छातीवर हनुवटी टेकवत म्हणाली .. तो शून्यात बघत विचार करू लागला ..
“जगात कुठेही उत्तरं मिळाली नाहीत कि माझ्याजवळ येतोस .. तरीही माझ्यावर विश्वास कधीच ठेवत ठेवत नाहीस .. ” ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली ..
“मग कशाला करतेस हे सगळं माझ्यासाठी .. मी आहे कोण .. ” तिला स्वतः भोवती घट्ट लपेटून घेत तो मिश्कीलपणे म्हणाला ..
“सय्योनी .. ” ती म्हणाली .. तो बघतच राहिला तिच्याकडे .. स्तिमित होऊन ..
“तुला माहितीये ना तुझ्याशिवाय माझं पान ही हलणार नाही ते .. ” तो म्हणाला .. “माहितीये मला .. तुझ्यासाठीच तर इतकी दूर राहते .. तुझ्यापासून .. दोघंही हरवलो तर कोण कोणाला शोधणार आणि कोण कोणाला सांभाळणार ?”
तिच्या कपाळावर ओठ टेकवून तो तिच्या केसांतून आपली बोटं फिरवत राहिला ..
रात्र अजून गहिरी होत गेली ..
Image by Free-Photos from Pixabay
Latest posts by Pooja Pathak (see all)
- दिवाळी २०२० स्पेशल- १९ - November 27, 2020
- दिवाळी २०२० स्पेशल- ३ - November 13, 2020
- पाडस - October 23, 2020
Mast