आई, पत्नी और ……वो !- महिला दिवस स्पेशल, लेखक-अनंत गद्रे
एक मिनीट. ‘वो’ म्हणजे त्या संजीवकुमारच्या चित्रपटातली ती ‘रंजीता’ किंवा तशी ‘वो’ नाही.
तर त्या ‘वोह’ मधे अशा अनेक महिला ज्यांनी मला माझ्या वैयक्तिक जीवनात स्फुर्ती दिली, आनंद दिला, कळत नकळत माझ्या आयुष्याला वळण दिले, त्या. ज्यात माझ्या आजी पासून नाती पर्यंत, अनेकींचा सहभाग आहे. आता ‘वो’ बद्दल का लिहायचं? कटुंबामधील आई, पत्नी यांच्या बद्दल लिहील जातं, बोललं जातं अनेकदा. माझ्याकडून. आपल्याकडून. तसं आपल्या इतर कुटूंबीयांबद्दल बोललंच जातं, त्यांची लिहून नोंद घेतली जातेच असं नाही.
आज महिला दिना निमित्त म्हणून त्या काही ‘वोह’ महिलांबद्दल बद्दल सांगावंसं वाटतय.
पहिले माझ्या आजी बद्दल. राधाबाई कृष्णाजी गद्रे. माझ्या वडिलांची आई. अठरा एकोणीसाव्या वर्षी दोन मुलं पदरात असतांना वैधव्य आलेले. अशिक्षित होती. स्वाक्षरी करायला फक्त शिकलेली. पण हिकमतीने उभी राहिली. मुलं वाढवली, त्यांना शिकवलं, स्वत:च्या पायावर उभे केले. दोन्ही सूनांना शिकवलं. डिएड करून शिक्षिका बनवलं. घर कसं चालवल तिने? दुधाचा व्यवसाय करून, लाॅंड्री चालवून, हलव्याचे दागीने करून अन भांड्यांना कल्हई लावून. ती म्हणजे ‘संकटांवर मात करणं’ म्हणजे काय, याचा वस्तुपाठ.
माझ्या दोन्ही आज्या एकदम परस्परविरोधी व्यक्तीरेखा होत्या. एक वागायला अतिशय कठोर तर दुसरी जरा जास्तच मृदू स्वभावाची. ती म्हणजे आईची आई, इंदिरा गोविंद दातार. खुप खोड्या काढायचो तिच्या आम्ही नातवंड. ती आंम्हाला गोष्टी सांगे. चातुर्मासातल्या कहाण्या वाचून दाखवी. मुलांच्या जडणघडणीत गोष्टींचा मोठा हिस्सा होता त्या टिव्ही, मोबाईल नसलेल्या काळात. गोष्टी ऐकता ऐकता त्यातल्या प्रसंगांचं चित्र मुलांनी आपल्या मनात कल्पनाशक्तीने तयार करणे याचं काय महत्व असते ते आज कळतंय. जेवण झालंय अन आंम्ही नातवंडे आजीपाशी बसून गोष्टी ऐकतोय, असं भाग्य कुठे सगळ्यांच्याच वाटी येत?
तारूआत्या. माझ्या वडिलांची चुलत बहिण. नावाला चुलत, पण संबंध सख्ख्या बहिणीचे. भुसावळला रेल्वेक्वार्टर मधे रहायची कारण यजमान रेल्वेत होते. रिटायर झाल्यावर स्थायिक व्हावे म्हणून त्यांनी कुळगावला, म्हणजे बदलापुर पुर्वेला जागा घेऊन घर बांधायचे ठरवले. दुर्दैवाने आत्याचे मिस्टर ह्रदयविकाराने निवर्तले. इकडे घराचे काम सुरू होते. आत्या धाडसी होती. मजुरीचे कंत्राट दिले होते. बांधकाम साहित्य आपण पुरवायचे असे ठरले होते. ही बाई एकटी विटा, रेती, सिमेंट, सळ्या खरेदीकरायला कल्याण, मुंब्रा, अंबरनाथला कंत्राटदाराला सोबत घेऊन जाई अन स्वत: त्या ट्रकवाल्या सोबत बसून सामान घेऊन यायची. लक्षात घ्या मी ही गोष्ट १९६६ सालची सांगतोय. पन्नास वर्षांपूर्वीची. पुढे मिस्टरांच्या फंडातून तिने घर बांधून पुर्ण केले. त्यातल्या सहा खोल्या तिने पोस्टाला भाड्यानी दिल्या. शिवणकाम करी. पदार्थ करून विकी. दाण्याचा मैसुरपाक, चिरोटे , गवल्यांचा शिरा हे पदार्थ तिची खासीयत होती.
दिड दोन महिन्यातून आत्याची फेरी होई आमच्याकडे. फार आतुरतेने वाट पहायचो आम्ही. खाऊसाठी अन तिच्या तोंडून तिचे अनुभव ऐकायला. एक गंमत आठवते तिने सांगीतलेली. त्र्यंबकेश्वरला गेली होती ती. एके ठिकाणी नदीकाठी एका दगडावरच्या काही खुणा दाखवत ‘इथे शंकराने जटा आपटल्या’ सांगत तिथला पुजारी पैसे मागू लागला. हिने नाणे काढले. व त्याला दाखवून नदीत भिरकावले अन त्याला म्हणाली, ‘त्या तुझ्या शंकराने जटा आपटून झाल्यावर या पाण्यात त्या जटा धुतल्या, घे पैसे’.
आंम्ही थक्क होयचो असले तिचे किस्से ऐकून.
हा लेख लिहीतांना मला प्रभामावशीची आठवण होत्ये. साताऱ्याजवळ खटावला ती राहायची तेंव्हा. सासरचे महा खाष्ट होते तिच्या. अन ही भोळसट. माझी आई विद्याविहारला सोमैय्या काॅलेजमधे डि.एड. करत होती. मी असेन दुसरीत वगैरे. आईची फायनल परीक्षा अन त्या आधी ते वर्गावर पाठ घेऊन दाखवण्याच्या प्रॅक्टिकल्स अशी तिची धावपळ चालू होती. त्यात परीक्षे आधी थोडेच दिवस माझी आजी वारली होती. या अशा अडचणीच्या वेळी हिच माझी मावशी एक महिना आमच्याकडे येऊन राहिली होती. सासरच्यांच्या विरोधाला न जुमानता. आईचे डि.एड्. चांगल्या ग्रेड मिळवून पुर्ण झाले. बाॅम्बे म्युनिसीपालटीच्या शाळेत तिला नोकरी लागली. आईच्या या यशात मावशीचा मोठा वाटा होता. तिला मात्र आमच्याकडून गावाला घरी परत गेल्यावर सासरच्यांनी टोचून हैराण केले असणार हे नक्की.
मी एकुलता एक. बहिण भाऊ नाहीत. पण मला सख्खी बहिण नाही असं कधीच जाणवलं नाही. किंबहुना ते माझ्या चुलत, मानलेल्या बहिणींनी मला कधी जाणवून दिले नाही. घरच्या कार्यांमधे त्या नेहमी माझ्यामागे असणार. राखी पौर्णिमेला गीता, राणी यांची राखी दोन दिवस आधी पोस्टाने येणार म्हणजे येणार. भाऊबीजेला जरी मी दरवर्षी जात असलो त्यांच्याकडे तरी पुष्पा, प्रतिभाचा, “येतो आहेस ना? दिवसभरात कधिही ये. वाट पहातोय” हा फोन येणारच. ‘जाऊदे, बोलवायला कशाला हवं, येईलच’ अस गृहित कधी धरल नाही. खरंतर नात्यात या औपचारीकपणाची गरज नसते. पण त्यांचे आठवणीने मला फोन करणे, माझ्या करता खास बाब आहे. आणि हो, यांचे स्वत:चे सख्खे भाऊ आहेत बरं.
आता थोडं मुली बद्दल व नाती बद्दल. बाकी कोणी नाही, पण मुग्धा, माझी मुलगी, मला खडसावू शकते. चुकले तुम्ही असे तोंडावर सांगू शकते. काही गोष्टी करायला भाग पाडू शकते. बाप मुलीचं नाते खास असते. अन आपलंही वागणं तपासून पहायला अस कोणीतरी बोलणारी लागतेच. नाही का?
नातीचे नाव आहे निहीरा. ती म्हणजे निव्वळ आनंदाचा झरा. मजा येते तिच्या समवेत. तिचे रांगणे, चालायला लागणे, बोलणे, लिहीणे हे बालपणातले टप्पे निरखण्यातली मजा काही और आहे. कसं असतं ना? हे सगळे मी मुलांच्या बाबतीत अनुभवलेले नाही आठवत फार. काय माहीत असं का. असो. तसे कुठलेही बाळ, मग ती मुलगी असो वा मुलगा, आपल्याला आनंदी करते. पण निहीराचे ते बाहुलीप्रेम, तिचा भातुकलीचा खेळ, ते खेळ खेळतानाचे तिचे प्रेमळ शब्द हे सगळे तिच्यातल्या स्त्रिव्यक्तीमत्वाची जाणीव या लहान वयात देखील सहज करून देते.
तर अश्या या ‘वोह’ महिला. माझ्या आयुष्यात आलेल्या.
समाजाच्या दृष्टीने कल्पना चावला, मेरी कोम, इंदिरा गांधी, राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, लता-आशा, दुर्गा भागवत या व अशा महिलांचे मोठे सामाजिक योगदान आहे. तितकेच महत्वाचे योगदान या ‘वों’चेही आहे, माझ्या वैयक्तिक जीवनात.
म्हणून हे चार शब्द त्या माझ्या ‘वों’ना आज अर्पण.
महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
Image by Bianca 2019log from Pixabay
- प्राजक्ताचा दरवळ - September 7, 2023
- सोळा नंबरच्या आजी - February 10, 2022
- पुढचं पाऊल- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सुचेता गोखले - July 7, 2021
तारूआत्या भन्नाट 🙏
माझ्या आजीचं नावही राधाबाई कृष्णाजी (करमरकर). अतिशय आनंदी आणि मायाळू व्यक्ती. आज्जीचा बटवा कसा विसरू आम्ही. प्रचंड मेहेनती आणि त्या पिढीतल्या स्त्रियांसारखं अष्टपैलू वैक्तिमत्व. स्वयपाकातलं सगळं, लहानसहान शिवणकाम, पूजापाठ, स्वच्छता, घरगुती औषधं, गोष्टी सांगणं, लाड आणि काय नाही. भरपूर खोड्या काढल्या. आताच्या काळात नात्यांची नावं तीच आहेत पण त्या हक्काची ती आता नाहीत.