आई- महिला दिवा विशेष- ऋषिकेश अम्बये

8 मार्च हा प्रातिनिधिक आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे असं मला वाटतं! कारण ह्या पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जी आकार, संस्कार आणि थोडक्यात जडणघडणीसाठी लागणारं सगळं काही देते… एवढेच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून  हिरीरीने काम करते व सगळ्या भूमिका लीलया पेलत जी कार्यरत असते, त्या महिलेचा एखादाच दिन हा ’गौरव दिन“ कसा असू शकतो? हा एक अखंड व अक्षय उपक्रम आहे असं मला वाटतं.

एक स्त्राr विविध रूपात वावरते.. आई, बहिण, मैत्रिण, पत्नी… त्याचप्रमाणे नात्यांच्या व व्यवसायानुरूप येणारी अनेक रूपं! मावशी, काकी, आत्या, सासू, शिक्षिका, परिचारिका आदि. ह्या प्रत्येक रूपात ती केवळ देण्याचेच काम करते. मुळातच माया हा तिचा गाभा असल्याने वात्सल्याचा झरा अखंड वाहत असतो. अगदी प्रेमिका / बायको ह्या रूपात देखील प्रेम हाच गाभा असतो. असो. वात्सल्य, प्रेम, करूणा ह्याचं काकणभर जास्त प्रमाण स्त्रियांकडेच असतं.

आजच्या ह्या विशेष दिनी मी जेव्हा माझ्या आयुष्यात आलेल्या खास महिलांकडे पहातो, तेव्हा सर्वप्रथम माझी आईच डोळ्यासमोर येते. तिने केवळ आम्हाला जन्म दिला नाही, तर आम्हाला घडवलं !

आईचा जन्म वसईचा! एका मोठ्या कुटंबात ती वाढली. एकंदरीत 7 भावंडं… त्यात ती मधली. पारंपारीक वातावरण, वडलांचा / काकांचा धाक ह्या गोष्टींमुळे बालपणी स्वातंत्र्य नव्हतं. तिला आत्ताच्या मुला-मुलींसारखं स्वतःचं मत मांडायचं धारिष्ट्य नव्हतं. मोठ्याने बोलणं पण दूरची गोष्ट होती. मोठ्यांची जरब होती. त्यामुळे स्वभाव भिडस्त! पण आईचे (आमच्या माई-आजीचे) सुंदर संस्कार होते व हे सगळं आमच्या सर्व मावशी-मामामध्ये दिसून येतं. ’यमूची मुलं छान हो“, असं सगळेच अजूनही म्हणतात. आमच्या सगळ्या मावश्या पण एकमेकीची सावली आहेत, एकीला झाकावं, दुसरीला काढावं.

शिक्षण पूर्ण करू शकली नाही माझी आई! पण तरी व्यवहार उत्तम केला तिने.  बचतीचं गणित कुठून शिकली ते माहित नाही, पण जे काय मिळेल आणि जसं काही जमेल ते करून तिने बचत केली. आम्हाला आश्चर्य वाटायचं की कधी-कधी संकटकाळी ही कशी आम्हाला तारून न्यायची! शिवणकाम, गायन हे तिचे छंद ! आत्तापर्यंत इतकं शिवणकाम केलं असेल, इतक्या गोधड्या बनविल्या असतील आणि इतके बाळंतविडे बनवले असतील, त्याला तोड नाही! अजूनही आमच्या घरात शिवणयंत्र आहे, ह्यावरून त्याची कल्पना येईल. आवाज गोड व मृदू असल्यामुळे तिच्या गायनाचा आम्ही नेहमीच आस्वाद घेतला. शालू हिरवा पाचू नी मरवा, देव कधी जर मला भेटला, निंबोणीच्या झाडामागे, शुभम्करोति म्हणा… ही काही तिची आवडीची व तिच्या तोंडून ऐकलेली गाणी. तसा तिच्याकडे स्टॉक बराच होता व त्याची प्रचिती अंताक्षरी खेळताना यायची. तिच्या चारही नातवंडाना तिने देव कधी जर मला भेटला आणि परी अंतरी जी तृप्त न होते ही गाणी गाऊन झोपवताना पाहिलेले आहे. (आमच्यासाठी पण तिने तेच केले असणार.)

लग्नानंतर ती परुळेकरांची आंबये झाली. कांदीवलीच्या घरात सहजीवन सुरू  झालं. सोबतीला सासू व 2 जुळे दीर होते. आईला अन्नपूर्णा प्रसन्न असल्याने सगळ्यांचे नेहमी लाडच झाले. ’वहिनीच्या हातच्या जेवणाला सर नाही“, असे आमचे काका म्हणायचे. लग्नानंतरची सुरूवातीच्या काळातली आव्हानंदेखील तिने लीलया पेलली. लवकरच आमच्या मोठ्या बहीणीचा जन्म झाला, पुढे माझा जन्म झाला व 73 साली आम्ही गोरेगावात शिफ्ट झालो.

एका अत्यंत प्रभावी सामाजिक व्यक्तिमत्त्वाची व युनियन लीडरची (म्हणजेच आमचे वडील) ती पत्नी होती.  बाबा नाट्यकर्मी देखील होते. त्यामुळे नाटकाचे दौरे, युनियनचे काम व इतर सामाजिक बांधीलकीमुळे ते अनेकदा बाहेरच असायचे. त्यामुळे आईच आमची बाबा पण होती. आमची संपूर्ण जपणूक व जडणघडण पूर्णपणे तिच्याच देखेरेखीखाली झाली हे मी ठामपणे सांगू शकतो. आजच्या युगात जसं म्हटलं जातं तशी ती एक 100 टक्के होममेकर होती व तिने ती भूमिका जिवाभावाने निभावली. आमचं शिक्षण योग्य व्हावे म्हणून तिने कुठलीही कसर ठेवली नाही. मला आठवतं की सातवीत असताना मी जयप्रकाश नगर मध्ये शिकवणीला जायचो. आई रोज मला सोडायला यायची, क्लास होईपर्यंत तिथेच बसायची. अजून काय सांगू? लेकीच्या बाबतीतदेखील ती तितकीच possessive. जरा उशीर झाला की तिचा जीव कासावीस व्हायचा. तुम्हाला स्वतःच स्वतःला घडवायचय, हे तिने आमच्या मनावर कायम कोरलं व त्याचा आम्हा भावंडांना फायदाच झाला.

असा प्रश्न येऊ शकतो की सगळ्यांच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने असंच होत असतं, ह्यात वेगळं ते काय? पण फक्त हर्षदा (माझी बहीण) आणि मीच जाणतो, की त्यात वेगळं ते काय आणि त्यामुळे आम्ही फक्त कृतज्ञतेने तिच्यापुढे नतमस्तक होऊ  शकतो. पुढे जाऊन तिने आमच्यासाठी काही वर्षं पाळणाघर देखील चालवलं… तिला झेपेपर्यंत! सगळ्या मुला-मुलींची तिने आपल्या नातवंडांसारखी काळजी घेतली. पाळणाघरात अन्नपूर्णेच्या हातचं खायला मिळणे, ही पण एक भाग्याची बाब असते. सगळी मुलं पण चांगली होती. आता जवळजवळ सगळ्यांची लग्न झाली आहेत, सगळे स्थिरस्थावर झाले आहेत. आंबये काकूची आमच्याकडे चौकशी करतात, त्यांचे पालक भेटायला येतात, ही एक आनंदाची गोष्ट आहे.

पुढे आम्ही मोठे झालो… ग्रॅज्युएशन झालं, चांगली नोकरी मिळून मार्गाला लागलो. आमची लग्नं झाली, आईचा परिवार वाढला. जावई, सून, नातवंडं.. आई तिचे वेगवेगळे roles मनापासून करत राहिली. सासू, आजी… प्रत्येक ठिकाणी योग्य व्यक्तिरेखा साकारत राहिली… हवीहवीशी! प्राची-पार्थ-ओम-राधा ह्यांची ती सदैव लाडकी आज्जी राहिली, रवी-स्वातीची … अहो आई! तशी ती सगळ्याच नात्यांमध्ये most wanted होती.  लाडकी मावशी/मामी/काकी/विहिण… जे नातं सांगाल ते. माझी मंदा आत्या म्हणते, ’सगळ्या भावजयींमध्ये तुझी आई जवळची वाटते. स्वतःहून फोन करते, आपुलकीने चौकशी करते.“ किंवा माझ्या मावसबहीणीचे यजमान किशोर तिला भारताने क्रिकेट मॅच जिंकल्यावर सासूबाई, मॅच जिंकलो हे सांगायला फोन करणे, हे बरंच काही सांगून जातं.

आमच्या रेशीमगाठी परिवारात (म्हणजे आईच्या माहेरची मंडळी) किंवा आमच्या आंबये परिवारात ती सगळिकडे प्रिय आहे, ते तिच्या नाती जपण्याच्या स्वभावामुळे व मृदूवाणीमुळे! आमच्या मित्रमंडळींमध्ये देखील ती लाडकी आहे व राहील. ज्या कोणाला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देईल त्या ‘बार बार दिन ये आए’ हे गाणं म्हणूनच ! शेजाऱयांवर देखील तितकीच माया. अन्नपूर्णेचा तिला आशीर्वाद असल्यामुळे सगळेच तिच्या छत्रछायेत राहणं पसंद करतात. दिवाळीतील फराळ, गणपतीतील ऋषिची भाजी, फणसाची भाजी, आंबेहळदीचे लोणचे, पांढऱया कांद्यांची आमटी, गोळ्यांची आमटी, दडपे पोहे, कोरळाची भाजी, होळीच्या वेळी पूरणपोळ्या… the list is endless. ऋषिची भाजी आमच्या घरातून एवढया ठिकाणी जाते की विचारता सोय नाही. दिवाळीला फराळाला येणारी माणासं म्हणतात की बाकी काही नको चकली द्या…! आमच्या सुदृढ तब्येतीचं रहस्य म्हणजे तिच्या हातचं भोजन!

तिला वाचनाची खूप आवड… मासिकं, कथा, कादंबऱया… अगदी पोथी-पुराण देखील. दर दिवाळीला दिवाळी अंकांचा खच असतो आमच्याकडे! वयपरत्वे आध्यात्माची कास धरून तिने तिला जमलं तसं ईश्वर-सान्निध्य केलं, पण अगदी मनापासून…! तीला उमेदीच्या काळात फिरता आलं नाही, पण अर्धशतका नंतर तिने बरंच भ्रमण केलं… महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही! टि.व्ही. सिरियल्स, क्रिकेट मॅचेस हे तिचे वीक पॉईंटस. कधी कधी त्या सिरियलच्या व्यक्तिमत्वात एवढ़ी घुसते की त्याला/तिला शाब्दीक मार देऊन मोकळी होते…! क्रिकेटप्रेम एवढं की ऑस्ट्रेलिया-न्युझीलँड मधील मॅच असेल तर सकाळी 4  – 5 ला उठून मॅच पाहणार, वेस्ट इंडीजमध्ये मॅच असेल तर ती पाहत रात्री 1-2 ला झोपणार व आपला संघ जिंकल्यावर देवाला दिवा लावणार!

तिने आत्तापर्यंत 78 पावसाळे पाहिलेत!  पावसाळ्यासोबत अतिकडक उन्हाळे देखील अनुभवले आणि शीतल हिवाळे देखील enjoy  केले. तिने भरभरून प्रेम आणि फक्त प्रेम दिले. ओम आणि राधा मस्ती करतात तेव्हा ’मी आता घरातून निघून जाणार आहे दूर कुठेतरी“ असं म्हटलं असेल तिने…पण मला माहीत आहे की मनोमन सगळ्या नातवंडांवर अतोनात प्रेम करते ती!

नातं कसं जपावं ते तिच्याकडून शिकावं,  छान छान चमचमीत जेवण कसं बनवावं ते तिच्याकडून शिकावं, तोंडात एकही दात नसताना चिंबोरी कशी खावी हे ही शिकावं तिच्याकडून, सगळ्या जावयांची-सुनांची थट्टा कशी करावी हे तिच्याकडूनच शिकावं! लहानात लहान आणि मोठ्यांत मोठं कसं व्हावं ते तिच्याकडून शिकावं, आंबये-परुळेकर दोन्ही बाजूंना आपुलकीने कसं पकडून रहावं ते तिच्याकडून शिकावं! प्राची, पार्थ, ओम व राधा ह्यांची लाडकी आज्जीदेखील तीच आणि राजस्थानच्या टूर मध्ये best tourist  award मिळवावं ते देखील तिनेच!

पाक-कला, संगीत, वाचन, क्रिकेट, कॅरम आणि पत्ते ह्या तिच्या अभिरूची! सगळ्यांची (शेजारी, नातेवाईक, ओळखी-पाळखीचे) आस्थेने चौकशी करणारी व ‘काळजी’ करणारी देखील तीच. आज आम्ही आयुष्यात जे काही आहोत (शैक्षणिक D़ाथवा व्यावसायिक दृष्ट्या), आमची जी काही जडण-घडण झाली आहे, प्रथम संस्कार झाले आहेत, ते फक्त तीच्यामुळेच! कृतज्ञता व्यक्त नाही केली, तर ती कृतघ्नता ठरेल. प्रथम गुरू म्हणजे पालक असतात व गुरूमाऊली हा शब्द का प्रचलित झाला असेल, त्याचा अंदाज ‘आई’ ह्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं की बांधता येतो. त्यामुळे तिच्यातील गुरूतत्वाला देखील शतषः वंदन!

ऐन उमेदीच्या काळातील आव्हानांचा सामना करून तिने आम्हाला घडविले! डगमगली तर नाहीच पण आमचा मार्ग आम्हालाच ठरवायचा आहे, हे निक्षून सांगितले! व हेच तिचे वेगळेपण. जावयाशी व सुनेशी असलेले प्रेमळ नाते… (दोन्ही शब्द अनेकवचनात पण वापरता येतील)… किंबहुना सर्वांशीच असलेले आपुलकीचे नाते … बरेच काही सांगून जाते. ट्रीपला जायला सुलभाताईंना हमखास आग्रह होतो… खरं आहे ना!

पण गेले काही दिवस, आई,  तू किचनमध्ये गेलेली नाहीस, आवडीचे कार्यक्रम तू बघत नाहीस, ओम-राधाला तू ओरडत नाहीस… व हे आम्हाला खूप जाणवतय. लवकरात लवकर तू तुझी जुनी दैनंदिनी सुरू  कर हेच माझं विनवणं आहे तुला! ग्रिलमध्ये ठेवलेली तुळस तुझी वाट पाहत आहे, प्राची सी ए झाली आहे  – तिला तुझ्याकडुन कौतुकाची थाप हवी आहे, लक्ष्मी तुझ्याशी भांडायला आणि पार्वती तुझ्यासोबत चहा प्यायला आतुर आहे, मी-स्वाती-रवी-हर्षदा… काय सांगू……कशाकशाला आतूर आहोत! आम्हाला माहिती आहे की तुझी माया आणि तुझे आशीर्वाद सदैव आमच्यासोबत आहेत, तरी तुझ्या तोंडून ’देव कधी जर मला भेटला…“ हे गाणं ऐकत तुझ्या कुशीत झोपायचं आहे.

आजच्या ह्या विशेष दिनी, 8 मार्च – आंतरराष्ट्रीय महिला दिनी  – तुझ्या चांगल्या तब्येतीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना व तुझ्या माध्यमातून विश्वातील सगळ्या मातांना मनापासून वंदन!

Image by Bianca 2019log from Pixabay 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!