“आई मोठ्ठी झाली”-महिला दिवस विशेष

त्या मानाने माझं लग्न खूपच लवकर झालं. तेव्हा मी तेवीसचा, आणि पत्नी सव्वा बावीस होती. कायद्याने परवानगी दिली होती लग्नाची, पण मेंदूने किंवा अकलेने मात्र नाही. भावनेच्या भरात, जन्मदात्या आईचा विरोध पत्करून लग्न केल होत. ते म्हणतातना? #@..ची नाही अक्कल..आणि म्हणे माझं लग्न करा..अगदी तसच झालं होतं. लग्न करून चूक केली अस नाही म्हणणार..पण नवरा लवकर गेल्यावर..शिक्षण पूर्ण करून ..एमए इन इकोनॉमिक्स ते डॉक्टरेट..आणि ज्युनिअर कॉलेज ची प्राध्यापिका ते कॉलेज ची मुख्याध्यापिका असा प्रवास स्वतःच्या हिमतीवर करताना…दोन मुलांना जीनं लहानच मोठ केल..तिला मात्र दुखावल्याच शल्य, आजही आहे. म्हणजे आता सगळ ठीक ठाक आहे..पण “ अरे जरा वर्ष दोन वर्ष थांब..निट सेटल हो,आणि मग कर लग्न”..हे कळवळून सांगणाऱ्या आई पेक्षा प्रेयसीची बायको करण्याचा अट्टाहास मी करत होतो..केला होता..आम्हाला सकाळी साडेसहा वाजता शाळेत पिटाळून..सात दहाच्या लेक्चर साठी धावत सुटणारी….मुल सव्वाबाराला घरी येतील…लवकर नाही पोचले तर उपाशी बसून राहतील..या ओढीने साडेबाराच लेक्चर संपवून पुन्हा धावत घर गाठणारी..दिवसभर आमची खाणीपिणी ..अभ्यास..ट्युशन..छंद वर्ग..यात स्वतःचा एम.फील…आणि पुढे पीएचडी कम्प्लीट करणारी… माझ्या आईच लग्न पण तिच्या अठराव्या वर्षी झालं…विसाव्या वर्षी मोठी बहिण अपर्णा आणि एकविसाव्या वर्षी मी झालो…पुढे ३..४ वर्षात एका अपघातात बाबा गेले..आणि आमची दोघांची जबाबदारी तिच्या एकटीवर पडली…अवघी २५/२६ वर्षाची असेल तेव्हा…स्वतःची आवड..छंद…सगळ बाजूला ठेऊन पूर्ण लक्ष फक्त तिच्या मुलांच्या संगोपनात घातल….(खर म्हणजे हे सांगायला नको..पण सांगतोच) म्हणजे मी लग्न करायच्या अलीकडे पर्यंत…माझ्या अंडरवेअर आणि बनियन सुद्धा तीच विकत आणायची….पुढे ती जबाबदारी पत्नीने स्वीकारली….कारण चड्डीची चाळण होत नाही तोपर्यंत वापरायची माझी सवय….फरक एव्हडाच होता..आई sando आणायची..आणि पत्नीला मात्र व्हीआयपी आवडायच्या..असो…विषयांतर पुरे झालं.

इतकी वर्ष माझ्यासाठी खस्ता खाणार्या आईचा तो सल्ला मात्र ऐकायच्या मनस्थितीत नव्हतो..आणि आयुष्यात येऊन २ वर्ष पण जुन्या न झालेल्या मुलीशी लग्न केल…विरोध नव्हता..पण इतक्या लवकर लग्न करण्यावर आक्षेप होता… अजाणत्या वयात केलेल्या लग्नाचा पहिला झटका बसला जेव्हा पत्नीला दिवस गेले..अक्षरशः पाचवर धरण बसली माझी…अजूनही कमी अधिक प्रमाणात माझे संगोपन माझी आई करत होती..मुल जन्माला घालून त्याचे संगोपन करण्याची ऐपत आणि अक्कल आम्हा दोघांकडे नव्हती..म्हणून नाईलाजाने आम्हाला निर्णय घ्यावा लागला..अबॉरशन करण्याचा. (यालाही आई चा विरोध होता,पण ऐकलो नाही आम्ही.) पुढे दोन वर्षांनी मात्र सगळ ठाक ठीक झालं..व्यवस्थित इनकम सुरु झालं..कुटुंबाची जबाबदारी घेण्याची आर्थिक आणि मानसिक सुधृडता आली..आणि मग मात्र आम्ही निर्णय घेतला..आमच्या बाळाला जन्म देण्याचा….

इतक सगळ वाचल्यावर तुमचा असा समज झाला असेल कि हि कथा माझ्या आईची आहे….पण नाही…हि कथा मला जन्म देणाऱ्या आईची नसून….जिला ‘मी’ जन्म दिला…माझ्या ‘त्या’ आईची आहे..म्हणजेच माझ्या मुलीची..मल्लिकाची…
रात्री सव्वानऊ वाजता मल्लिकाचा जन्म झाला…..(पाळण्यातल नाव..मल्लीकागौरी) गोर्या रंगाची..गडद चोकलेटी डोळ्यांची, फिकट पिंग्या केसांची,साई सारख्या मुलायम त्वचेची,लालसर गुलाबी तळव्यांची, घट्ट आवळलेल्या मुठींची, झोपेत सुद्धा हसरा चेहरा असलेली मल्लिका..मी तासन तास पहात राही तिच्याकडे…तिच्याकडे पाहताना माझ्यातला पुरुष सुखावत असे..मी जन्म दिलाय हिला..याचा अभिमान वाटत असे…तीच कौतुक ऐकताना कान तृप्त होत असत..तिच्या आईने तिच्यासाठी वेदना सहन केल्या असतील..पण मला मात्र माझेच कौतुक वाटे…माझी मुलगी..माझी मुलगी..माझी मुलगी….

अस म्हणतात ना?..एखादा मुलगा बिघडलेला असेल तर.. ‘लग्न लावा त्याच..सुधारेल’….मला मात्र माझ्या मुलीन सुधरवल..लग्न झालं तरी रात्रीचा नाका कधी चुकवला नाही मी…नव्याची नवलाई संपली पण नव्हती..पण मित्रांसोबतची saturday night कधी चुकवली नाही….पण हि बया आली..आणि माझी सिंड्रेला झाली…गोष्टीतली सिंड्रेला जशी रात्री बाराच्या ठोक्याला पळत सुटली..मी सुद्धा अर्धा तास नाही झाला कि मित्रांच्या कंपू मधून पळ काढू लागलो…सुरवातीचे काही दिवस दुपट्यात नुसती वळवळ करणारा आमचा किडा..हळू हळू पालथा पडू लागला..पोटावर सरपटू लागला, इवले फुलपाखरी पंख फडफडवू लागला….माझं पुरत माकड केल तिने..रात्री अपरात्री उठते..तिला घेऊन बसावं लागत..तिला वास येईल..त्रास होईल…तब्बल दोन वर्ष दारू…बंद केली होती मी….ऑफिस मध्ये असलो तरी तीन तीन वेळा फोन करून..काय आजची प्रगती?..असे विचारत राही..कधी एकदा घरी जातोय अशी अवस्था…कधीतरी उशीर व्हायचा..मी जाई पर्यंत मल्लिका झोपलेली असायची..मग हळू आवाजात तिची आई म्हणायची….. “मल्लिकाचे बाबा आआले”.. हे शब्द आईकून कि काय माहित नाही..माझं फुलपाखरू हलकच हसायचं…माझी कॉलर आणखी टाईट व्हायची…माझी मुलगी…माझी मुलगी….माझी मुलगी…

तेव्हा सुरवातीला मी बोरिवलीला राहायचो..एखाद्या रविवारी..दुपट्यात गुंडाळलेला किडा एका हातात घेऊन गिरगावात आईकडे जायचो…दिवसभर मग आज्जी आणि नातीचे खेळ व्हायचे..संध्याकाळी घरी परत….मल्लिका एक वर्षाची होता होता पुन्हा गिरगावात राहायला गेलो..आणि जीवनाचा नवा अध्याय खर्या अर्थाने सुरु झाला….ते बोबडे बोल..त्या अदा..ते दुडू दुडू धावण..पडण…पुन्हा उठून धावण…मोठी गम्मत होती सगळी….हळू हळू गाल गोबरे होऊ लागलेले…केस मुलायम होतेच पण आता त्यात मस्त कर्ल येऊ लागलेले…नाक डोळे यांना थोडासा आकार येऊ लागलेला…मुख्य म्हणजे मोडका तोडका का असेना..तिचा बोबडा संवाद सुरु झाला होता….

सकाळी अंघोळीचा सोहळा सुरु झाला..नंतर तासभर बादलीत बसून बोटांनी पाण्यात बुडूक बुडूक आवाज काढण सुरु झालं…तीच सगळ मी आवडीने करायचो..ढुंगण धुण्या पासून ते कपडे घाले पर्यंत…अंघोळ झाली कि नागडी गादीवर उभी राहायची..मग टॉवेल ने जोर जोरात मी वारा घालायचो..हुष हाश..अस म्हणत उड्या मारायची…मग तशीच उचलायची आणि तीच ढुंगण एसी च्या ब्लोअर समोर धरायचो..त्या गारठ्यामुलळे हु हु हु करत खिदळायची…तिच्या एक एक लीला पाहता पाहता वेळ जायचा…वाटत राहायचं..हि एव्हडीच राहावी..मोठी होऊच नये…माझी मुलगी..माझी मुलगी…माझी मुलगी….

माझ्या मित्रांमध्ये लग्न माझं सगळ्यात आधी झालं..बाकीच्यांची सावकाश झाली..पण त्यांना मुल व्हायला आणखी काही वर्ष गेली…आपल्यातली पहिली मुलगी….काका अशी हाक देणारी पहिली जिवणी …आता आमचा नाका घरीच भरू लागला होता..रोज रात्री दिमतीला ४/५ काका असायचेच तिच्या…एकाच्या मांडीत बसलेली..दुसरा खीमटीची वाटी चमचा हातात घेऊन..तिसरा माकडचेष्टा करून तिची करमणूक करतोय..बाकीचे..आता मला घेउदे तिला..अश्या वादात…कॉमन गेल्लरी मधल्या स्टुलावर बसून अक्खी चाळ जमवून रात्रीचे भोजन होत असे…

केजी ची शाळा सुटून साडे अकरा वाजता बयेच आगमन होई..पण वर घरी यायला तिला बारा वाजत..कधी ट्रेफिक हवालदाराच्या कडेवर बसून शिट्ट्या फुंक..खालच्या पेपर वाल्याच्या गल्ल्यातली चिल्लर फुटपाथ वर फेक…गजरे वाल्या शकूची फुलं चिवडत बस..असे उद्योग करून झाले कि घरी यायची…सगळ्या जगाला तीच कौतुक…आणि ते कौतुक पाहून हरखून जाणारा तिचा बाप…माझी मुलगी…माझी मुलगी…माझी मुलगी….

मुली या वडलाना जास्त attach असतात हे in general बोललं जात. मल्लिकाच माहित नाही..पण मी मात्र तिच्याशी खूप attach आहे हे मला मात्र पक्क माहित होत.माझ्यासाठी ती म्हणजे जणू एक ट्रॉफीच होती..आहे…साउथ मुंबईतल्या नामांकित convent मध्ये तिला घातल होत..हळू हळू शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ती येऊ लागली होती..त्याच वेळी मी माझ्या नोकरीत खूप प्रगती करत होतो..खूप टुरिंग करत होतो..आणि हळू हळू मल्लिकाचा ताबा तिच्या आईकडे जाऊ लागला होता. माझं जास्त घरात नसणं…सारख बाहेरगावी असण..मुंबईत असलो तरी उशिरा घरी येणं..या मुळे माझी मुलगी माझ्यापासून दुरावेल अशी नेहमी भीती वाटायची..या बाबतीत पत्नी सुद्धा मला प्रतिस्पर्धी वाटायची…मुलगी मोठी होताना..वयात येताना..आईच contribution फार म्हत्वाच असत..आणि तिच्या आईच तस होत देखील….मी पूर्वीसारखा तिला वेळ देऊ शकत नाही..फिरायला नेऊ शकत नाही..मला खंत वाटत होती..मुलगी दुरावेल याची भीती वाटत होती..पण एकदा काय झालं..मी जवळ जवळ सहा महिन्यांनी एक प्रोजेक्ट पूर्ण करून घरी परतलो होतो..रात्री उशिरा फ्लाईट होती..मल्लिका बहुदा झोपलेली असेल अशी खात्री होती..कडकडून भेटता येणार नाही अस वाटत असतानाच घरी पोचलो..पत्नीने दार उघडल..समोरच्या भिंतीकडे नजर गेली…तिथे पेपर कट करून मोठ्ठी अक्षर चिकटवली होती.. “welcome home baba”….मला कमालीचा आनंद झाला..मल्लिका किचन मधून केक घेऊन बाहेर आली आणि मला बिलगली…आयला माझी मुलगी माझीच आहे कि?..पुन्हा खात्री पटली..बापाच्या काळजाची धडधड वाढली…तिला जवळ घेऊन तिच्या पाप्या घेताना आतला आवाज पुन्हा आईकू आला..माझी मुलगी…माझी मुलगी…माझी मुलगी……

कोलेजात जायची वेळ आली..मला आता नवीन भीती वाटू लागली..आता हिचे बॉयफ्रेंड होणार..मुल हिच्यावर लाईन मारणार..मग माझं नवीन तंत्र सुरु झालं..तिचे मित्र घरी आले कि मी उगाचच गुरगुरू लागलो…मल्लिकाचा बाप खवीस आहे..असा सर्व मुलांचा समज व्हावा आणि ते मल्लिका पासून दूर राहावेत याचा केविलवाणा प्रयत्न होता…मुल कशी वागतात..कसे एडव्हान्सेस करतात…याचे धडे मी तिला देऊ लागलो..ओव्हर प्रोटेक्शन नाही..पण निदान तिला अवेअरनेस असावा एव्हडीच माफक अपेक्षा होती…माझी आई म्हणायची..कि तू बहुदा मल्लिकाच लग्न होऊ देणार नाहीस…कारण तुला सगळ्या मुलांमध्ये काहीतरी खोट दिसते…आणि समजा झालं तीच लग्न..तर ते तू टिकू देणार नाहीस..कारण पहिल्या भांडणाला तू तिला घरी घेऊन येशील..आणि अजिबात परत त्या नालायक नवर्याकडे जाऊ नको असे सांगशील…मला आईची गम्मत वाटे..पण कुठेतरी ती बरोबर बोलते आहे हे सुद्धा जाणवायचं.हल्ली जग खूप पुढे गेलय..घरातले संस्कार आहेत पण बाहेरचे संस्कार सुद्धा मान्य करून घ्यावेच लागतात..बाहेर जाणं..इंडिपेंडन्स..या स्नक्ल्प्नांचा पगडा आहे हल्ली…मी स्वतः सेटल होत नाही तो पर्यंत लग्न करणार नाही,अस सांगणारी हि पिढी..मी मल्लिकाला एकच सांगितल आहे..तुला जस हव तस आयुष्य जग..पण तुझ्या बाबतीत जे होईल..तो तुझा चोईस असला पाहिजे..तुझ्यावर कोणतीही गोष्ट लादली जाता कामा नये..बस..

तशी मल्लिका अतिशय शांत स्वभावाची..संयमी..कधीही मोठ्या आवाजात बोलणार नाही..वागायला पण अतिशय सुसंस्कृत आणि शालीन..म्हणजे माझ्या सारख्या चांडाळाच्या पोटी इतकी चांगली मुलगी जन्म घेऊच कसा शकते अशी अनेकांना शंका यावी. कधीही आवाज चढवण नाही..भांडण झालं तरी आवाजाची पट्टी चुकून सुद्धा वाढणार नाही…चुकुनही एखादा अपशब्द तोंडातून बाहेर पडणार नाही अशी मल्लिका..म्हणजे माझ्या बरोब्बर उलट होत सगळ…तिची आई नेहमी चिडवायची…आठव्या महिन्यात पोटा जवळ येऊन ती अश्लील कविता गाऊन दाखवली होतीस ना तिला?..त्याचा राग आहे तिच्या मनात बहुदा..असेल सुद्धा..पण माझ्यासारख्या थोड्या आक्रस्ताळेपणा करणाऱ्या माणसाच्या पोटी हि जन्मली म्हणजे बाभळीला प्राजक्ताच फुल जणू.

एकदा मात्र तिच्या स्वभावाची तीन प्रचीती मला दिली….
तिच्याच वाढदिवसा निमित्त आम्ही सगळे जेवायला गेलो होतो..तिच्या फेवरेट चाईनीज restorant मध्ये..माझी आई..तिची आई..तिच्या आई ची आई..तिचा मामा,मावशी..माझ्या बहिणीची मल्लिकाच्या बरोबरीची मुलगी..असा मोठा कंपू होता. restorant एकदम एलिट वगैरे होत..अनेक कुटुंब हळू आवाजात आपापसात गप्पा मारत जेवणाचा आस्वाद घेत होते..आमची सुद्धा धमाल मस्ती सुरु होती. आमच्या बरोब्बर मागच्या टेबलवर एक चाईनीज मुला मुलींचा ग्रुप बसला होता…साधारण पणे २० ते ३० वयोगटातील चीनी मुल आणि मुली…जेवण झालं होत त्याचं..पण बीअरपान सुरु होत..टेबलवर रिकाम्या बाटल्यांचा खच होता..आणि पोटात गेलेली बीअर ओठा वाटे बाहेर येऊ लागली होती..कर्कश्श आवाजात त्यांच ची..चू..चा..सुरु होत..इतक..कि आजू बाजूच्या टेबलवर बसलेल्या सगळ्यानाच त्याचा त्रास होत होता..आपापसात सुद्धा बोलता येण शक्य नव्हत..समोर बसलेली व्यक्ती काय बोलते आहे ते सुद्धा समजत नव्हत..एक दोन वेळा मी तक्रार केल्यावर एकदा मेन स्टूअर्ड शांत राहायची विनंती करून आला..१ मिनिट शांतता..पुन्हा गोंगाट सुरु..शेवटी चीनी मालक..चीनी भाषेत विनंती करून आला…दोन मिनिटे शांतता आणि पुन्हा गोंगाट सुरु..अस बराच वेळ सुरु होत…सगळ्या सेलिब्रेशन ची कशी झाली होती..गपगुमान समोरच्या बशीतल खाणे..एव्डेच करत होतो…आणि एका क्षणी माझा तोल सुटला..उठलो..मागच्या टेबल जवळ गेली..आणि पुलंच्या भाषेत…य ते ज्ञ आणि भ ते म पर्यंत सगळ्या आद्याक्षराने सुरु होणार्या शिव्या..राष्ट्रभाषेत दिल्या…ते हॉटेल सोडा..अक्ख्या गल्लीत ऐकू जाईल इतक्या मोठ्ठ्या आवाजात आणि परत टेबलवर येऊन बसलो….हॉटेल मध्ये पिन ड्रोप सायलेन्स..मागच्या टेबलवर स्मशान शांतता..इतर गेस्टच्या माझ्याकडे आभारयुक्त नजरा..तिसर्या मिनिटाला चीनी dragon सेना गुपचूप हॉटेलच्या बाहेर…मी विजयी मुद्रेन सगळ्यांकडे पहात असताना मल्लिका मात्र अतिशय रागाने माझ्याकडे पहात होती..ती प्रचंड संतापली होती…मला काही समजेच ना?..मी तिला विचारलं काय झालं?..तर माझ्यावरच ओरडली….this is not the way to behave baba….you have spoiled my day… च्यायला..म्हणजे करायला गेलो एक..आणि झालं भलतच होत…मी थोडा अंतर्मुख झालो होतो…बेबाक..बिंधास..आपण कुणाला घाबरत नाही..हटाव गांडू….अश्या माझ्या विचारधारेच नेहमी कौतुकच झालं होत…आज पहिल्यांदा त्याला विरोध झाला होता..तो सुद्धा मल्लिका कडून..मी थोडा हादरलो होतो…नव्या जमान्याच्या manners च्या व्याखेत हे वागण बसत नाही याच रीअलाइजेशन झालं होत…माझी आई लहानपणी मस्ती केली म्हणून पहिल्यांदा ओरडली होती..तेव्हा सुद्धा असाच शांत झालो होतो…मल्लिका शांतपणे डीश मधल्या नूडल्स खात होती..माझी आई गालातल्या गालात माझ्याकडे हसून बघत होती….चला..याला वेसण घालणारी कोणीतरी आली..याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता…मी पुन्हा चोरट्या नजरेन मल्लीका कडे पाहिलं..आणि पहिल्यांदा जाणवल..माझी मुलगी..नव्हे माझी आई मोठी होत होती…

एकीकडे तीच शिक्षण संपत आलं होत..BMM करून मास्टर्स करायच्या आधी तिला नोकरी करायची होती..मी सुद्धा माझ्या कामात बुडलो होतो..ती मोठी होत असताना  मी सुद्धा मनाने नाही तरी शरीराने मोठा होत होतो..पण म्हणून डायरेक्ट म्हातारा म्हणावं मला?..नो वे ..मी म्हातारा नाहीये..बाबा..एकोणपन्नास वर्षाच्या लोकांना म्हातारेच म्हणतात..तुम्ही म्हातारे झाला आहात…
त्या bp च्या गोळ्या काय तरूण मुल खातात का?..मी गप्प…कारण माझी आई मोठी होत होती…
बाबा..प्लीज चड्डी बदला आणि  fullpant घाला, माझ्या मैत्रिणी येणार आहेत….मी गप्प..कारण..माझी आई मोठी होत होती…

बाबा त्या मेड च्या हातच खाऊन मला कंटाळा आला आहे..निदान रविवारी तरी तुम्ही कुक करत जा….मी गप्प..कारण..माझी आई मोठी होत होती..

बाबा..कितवी सिगरेट..प्लीज स्टोप धिस हेबिट नाऊ..i need you more ..मी गप्प..कारण माझी आई मोठी होत होती..

त्यादिवशी स्टुलावर चढून हि दिवाळीचा अजून न काढलेला कंदील काढत होती..तेव्हड्यात मी कुठून तरी आलो..अग अग..थांब..मी काढीन कि…एक जळजळीत कटाक्ष आणि मागोमाग वाक्य…बाबा जानेवारी उजाडला आता..मी गप्प कारण..माझी आई मोठी होत होती…
त्यादिवशी रात्री आठ वाजताच जेवायला बसुया म्हणाली..मी म्हटल का ग एव्हड लवकर?..तर म्हणाली उद्या तुमची लिपीड प्रोफाईल करायची आहे..fasting suger साठी बारा तास आधी खायचं नसत..सकाळी ९ वाजता ब्लड टेस्ट ला जायचय..जेवा गपचूप..मी गप्प..कारण माझी आई मोठी होत होती…
या रेट ने एक दिवस हि माझ्यासाठी अंडरवेअर आणि बनियन सुद्धा आणेल कि काय अशी भीती मला आता वाटू लागली आहे….तिला आता तिची मत आहेत..चूक कि बरोबर पण मत आहे हे म्हत्वाच…मागे एकदा LGBT सपोर्ट करायला मोर्च्याला गेली..मध्यंतरी गेटवे ऑफ इंडिया च्या आंदोलनात हजेरी लाऊन आली..राजकीय मतांतर असतील आमची..पण तिला तिची मत आहेत आणि ती एक्स्प्रेस करू शकते हे महत्वाच…मला ओरडते..रागावते..पण ते माझ्यावरच्या प्रेमामुळे हे मला माहित आहे..अंआंधळ प्रेम करता करता..संस्कार आपोआप झाले कसे याच आश्चर्य वाटत असतानाच..तिचा प्रचंड अभिमान वाटतो..म्हातारपणाची काठी नकोय.. तिने खूप उडाव..उंच भरार्या घ्याव्या असच वाटत….आम्ही लोकसत्ता आणि मटा मधून डोकं कधीच बाहेर काढलं नाही..पण हि टाईम्स ऑफ इंडिया कधी वाचायला लागली ते समजलच नाही….इतकी अक्कल आली कधी हिला?..समजलच नाही..कालपर्यंत हिचे डायपर बदलायचो मी..मला सुद्धा कधीतरी adult डायपर घालायची वेळ येईल आणि हि माझी आई..ते नक्की बदलेल…आई मोठ्ठी झाली होती..

माझं लग्न लवकर झालं..मुलगी लवकर झाली..मोठ्ठी पण लवकर होणार न?..तश्या अर्थी मी काही म्हातारा नाही..पण तिच्या अर्थी आहेच कि..बाकीच्या मित्रांची मुल आत्ता कुठे कोलेजात पोचली..माझी मात्र घोडी लग्नाची झाली..

काळ बदलला..मी बदललो..मुलीला वाढवत होतो..स्वतः सुद्धा वाढत होतो..लहानपणी मी तिला influence करायचो..आता ती मला करते. लहानपणी मी तिला डॉमीनेट करायचो..आता ती करते…मला तर यात सुद्धा मज्जा येते…

‘मुलीने बापाला वेसण घातली’..समवयस्क मित्रांनी चिडवण्यासाठी उच्चारलेल वाक्य सुद्धा माझ्यातल्या बापाला सुखावतं…असू दे कि त्यात काय झालं?…शेवटी ती माझी मुलगी…माझी मुलगी…माझीच मुलगी…….

Image by Bianca 2019log from Pixabay 

2 thoughts on ““आई मोठ्ठी झाली”-महिला दिवस विशेष

    • March 12, 2020 at 9:02 am
      Permalink

      कथा नाही.. ही माझी आणी माझ्या मुलीची खरी गोष्ट आहे.

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!