महिला दिवस विशेष- उमेश पटवर्धन

आज महिला दिनानिमित्त (का होईना) माझ्या आयुष्यात आलेल्या सर्वात प्रभाव टाकणाऱ्या स्त्रीबद्दल लिहायचं ठरवलं. तशा तर एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात भावना असतात, पण आपण त्या बोलून दाखवत नाही, लिहून बघत नाही. त्यामुळे त्या मनातच राहतात. आज प्रयत्न करणार आहे त्या शब्दांत बांधण्याचा. हे कठीण काम आहे हे मला माहित आहे पण आज तरी मला ते जमेल अशी आशा आहे.
तसे तर हाच लेख ‘मी कसा घडलो’ या नावानेही लिहिला वाचला तरीही चालणार आहे कारण माझ्या आयुष्याला जिने आकार दिला त्या माझ्या आईबद्दल मी लिहिणार आहे.
तसं तर प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात आपल्या आईबद्दल एक वेगळेच स्थान असते आणि ती जागा कोणीही घेऊ शकत नाही. माझेही तसेच आहे. आज मी जे काही घडलो आहे त्यामागे माझ्या आईचे कष्ट आणि शिकवण यांचा वाटा मोठा आहे.
माझा जन्म आणि शिक्षण पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाले. घरची परिस्थिती आधी मध्यम वर्गाच्या खालची (lower middle class), नंतर ती काही काळ मध्यम वर्गावर स्थिरावून आता उच्च मध्यम वर्गीयांच्या दिशेने प्रवास करते आहे. याचे सर्व श्रेय मी आई वडिलांनी केलेल्या अथक श्रमांना आणि चिकाटीने पूर्ण केलेल्या नोकरीला देईन. ते दोघेही माध्यमिक शाळेत शिक्षक. माझ्या लहानपणी म्हणजे चौथीपर्यंत वसंतनगर या ठिकाणी अगदी छोट्या दोन खोल्यांमध्ये आईवडिलांनी संसार केला. शिक्षकी पेशा म्हणजे पोटापुरते कमवायचे आणि त्यातच भागवायचे. पण घरातील परिस्थिती आता आठवून मी हे लिहितो आहे नाहीतर आम्हाला आईवडिलांनी कधीच कशाची झळ बसू दिली नाही, ना ते आमच्या कोणत्या मागणीला पैसे नाहीत म्हणून नाही म्हणाले नाही. त्या अर्थाने माझे बालपण श्रीमंतीतच गेले. अर्थात, मूळचा स्वभाव आणि आजूबाजूचे वातावरण यामुळे आम्हीही कधी अवाजवी मागण्या केल्याचे मला आठवत नाही.
तर आई.. तिच्यातल्या शिक्षिकेकडे मी नंतर येईन कारण तो तिचा वेगळा पैलू आहे पण एक गृहिणी म्हणून तिच्यावर सर्व जबाबदारी असायची.. म्हणजे ठळकपणे सांगायचे तर घरकाम, दोन मुलांचं, म्हणजे मी आणि माझी मोठी बहीण, यांचे संगोपन आणि नोकरी अशी तिहेरी जबाबदारी तिच्यावर होती. बाहेरची कामे करण्यापलीकडे वडिलांचा घरकामात काहीही सहभाग नसायचा. आणि घरात आम्ही चौघेच. त्यामुळे घरकामाचा सगळा भार आईवरच असायचा. पण ती जात्याच एक खंबीर स्त्री आहे. त्यामुळे हे सगळे पेलूनही ती आम्हाला आनंदात ठेवायची. ती खरोखर एक सुगरण आहे. अनेक उत्तमोत्तम पदार्थ आम्हाला खायला घालून तिने आम्हाला इतकी वर्षे तृप्त केले आहे..करते आहे.
मी दुसरी तिसरीत असताना ती मला कधी कधी शाळेत घ्यायला यायची तेव्हा फार छान वाटायचे. मग तिच्याकडे हट्ट करून शाळेच्या बाहेर उभ्या असलेल्या गाड्यावर गोळ्या घ्यायच्या आणि त्या चघळत तिच्याबरोबर तिचे बँकेचे काम असेल तर तिथे जायचे. अशा छोट्या छोट्या आठवणी मनावर कोरल्या गेल्या आहेत..
ती शिक्षिका असल्याने आणि स्वभावतःच थोडी रागीट असल्याने तिचा धाकही वाटायचा. म्हणजे मी तिचा लाडका. म्हणून आई रागावली तरी नंतर प्रेमाने जवळ घेणार याची खात्री असायची, आणि घडायचेही तसेच ! शाळेतही ती विद्यार्थ्यांची लाडकी पण एक आदरयुक्त धाक असलेली शिक्षिका होती. ती मुलींच्या शाळेत आठवी ते दहावीला इंग्रजी आणि संस्कृत शिकवायची. ती वर्गात किती छान शिकवते हे मला १०० मार्कांचे संस्कृत घेतल्यावर तिच्या वर्गात बसल्यावर कळले. तसा ती माझा घरी सुद्धा अभ्यास घ्यायची पण शाळेतला तिचा ऑरा काही वेगळाच असायचा. आम्ही सगळे मुलं मुली तिच्या तासाची वाट पहायचो. त्यावेळी ती आपली आई नसून एक प्रभावी संस्कृत शिकवणारी शिक्षिका आहे हेच मनावर ठसायचे. बाईंचा मुलगा म्हणून वर्गातल्या इतर मुलामुलींकडून विशेष वागणूक मिळायची आणि नकळत तिचे मोठेपण जाणवून जायचे. तसे तर शाळेतले इतर सर्वच शिक्षक शिक्षिका ‘पटवर्धन बाईंचा मुलगा’ म्हणून मला ओळखायचे, खास वागणूक द्यायचे. त्यावेळी मनातल्या मनात (आईच्या जीवावर) मी कॉलर ताठ करुन घेत असे.
माझा दहावीपर्यंतचा इंग्रजी आणि संस्कृतचा अभ्यास आईनेच घेतला. या विषयांमध्ये चांगले मार्क मिळायचे हे वेगळे सांगायला नकोच.
पुढे मात्र अकरावी-बारावीला व्होकेशनल घेतल्याने मराठी आणि संस्कृत विषय अभ्यासातून निघून गेले. इंग्रजी मात्र होता पण तो ‘ग्रुप’ चा विषय नसल्याने त्यावर तितकेसे लक्ष नव्हते. पुढे इंजिनिअरिंग ला गेल्यावर तर गणित आणि सायन्स या विषयाची वेगवेगळी रुपं बघायला मिळाली.
याकाळात आर्थिक हातभार म्हणून आईने काही वर्षे शिकवण्या केल्या. आधीच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून ही अधिकची जबाबदारी केवळ आम्हा मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून तिने अंगावर घेतली. तेव्हाचे आईचे कष्ट आजही आठवतात आणि डोळ्यात पाणी येते.
आईच्या शिकवण्यांमुळे घरात मात्र सतत शैक्षणिक वातावरण राहिले. कानांवर सतत संस्कृत वचने आणि सुभाषिते पडत राहिली. ओळखीची/अनोळखी सुभाषिते आईच्या तोंडून ऐकताना ती मनात झिरपत गेली. याहून वेगळा संस्कार करायचा तिने प्रयत्न केला नाही आणि त्याची गरजही पडली नाही. तिच्या वागण्यातून तिने एक चांगला माणूस बनायला काय करावे लागते ते आम्हाला दाखवून दिले.
आता ती रिटायर्ड आहे. कष्ट म्हणजे घरकाम अजूनही संपलेले नाही पण आता बाकी जास्त व्यवधान नसल्याने ती तिच्या मूळ आवडीकडे म्हणजे वाचनाकडे वळली आहे. मला वाचनाचा वारसा, आवड, बाळकडू तिच्याकडून मिळाले आहे. त्यामुळे आजही ती व्हाट्सअप्प वर सकाळी आलेल्या पेपरमधल्या एखाद्या चांगल्या लेखाचा फोटो पाठवते आणि वाच म्हणून सांगते. मी तो आधीच वाचलेला असतो आणि तसे तिला सांगायला मला गम्मत वाटते.
व्हाट्सअप्प? हो, ती आता काळानुरूप स्मार्ट फोन वापरायला शिकली आहे. मोठ्या जिद्दीने तिने व्हाट्सअप्प वापरणे, मोबाईलवर फोटो पाठवणे, DP बदलणे शिकून घेतले. त्यामुळे तिला भावलेलं, आवडलेलं ती मला पाठवत रहाते आणि आता आम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा व्हाट्सअप्पद्वारे भेटतो. नव्या युगाची साधने तिने शिकून घेतल्याने आता ती आमच्या सर्वांच्या जास्त संपर्कात आहे.
अशा माझ्या आईबद्दल सांगायचं झालं तर एक पूर्ण लेखमालिका लिहावी लागेल याची मला कल्पना आहे. पण या छोटेखानी लेखात तिचा चेहरा तुम्हाला दिसला तर या लेखनाचं सार्थक झालं असं मला वाटेल.
भारतातल्या असंख्य माऊल्या पैकी ही एक माझी माऊली ! तिने जगावेगळं काही केलं नसेल पण तिचं एक वेगळं जग होतं.. आहे. आणि मी तिच्या जगाचा, तिच्या भावविश्वाचा एक भाग आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. देवाकडे जेव्हाही मागतो तेव्हा एकच मागतो, आईवडील या दैवतांना सुखरूप ठेव. मग बाकी कितीही वादळं आली तरीही ती झेलायची तयारी आहे आणि ती झेलायची शक्तीही याच दैवतांनी दिली आहे.

mage by Bianca 2019log from Pixabay 

One thought on “महिला दिवस विशेष- उमेश पटवर्धन

  • March 12, 2020 at 2:15 am
    Permalink

    छानच लिहीलं आहे.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!