रानडे आजी- महिला दिवस विशेष- लेखक- हर्षद बर्वे

नानासाहेबांचा नातू न रे तू, अरे आपण किमान कोणाचे काय आहोत हे तरी ध्यानात ठेवत जा. तुझ्या आजोबांनी इंग्रजाविरुद्ध लढतांना चार वर्षे जेलात काढली आणि तू मूर्खांसारखे इथे रस्त्यावरचे दिवे फोडतो आहेस. बारा वर्षांचा घोडा झालास तरी अक्कल मात्र शून्य.
एकेकाळी स्ट्रीटलाइट फोडण्याचा नवा छंद जडला होता. रानडे आजींनी एक दिवस रंगेहात पकडले. पाठीत दोन सणसणीत धपाटे टाकून वरील वाक्ये ऐकवली होती. माय बेबी वगरेचा जमाना नसल्यामुळे कोणीही सुज्ञ माणूस आमच्या पाठीत धपाटे टाकू शकत असे. बरं घरी जाऊन तक्रार केली तर उत्तरपूजा फिक्स असल्यामुळे सांगायची सोय नव्हती. आज तीस वर्षे झाली असतील त्या धपाट्याला पण अजूनही तो रानडे आजींचा हात आठवतो, मन फुलपाखरासारखे गावाकडे धावते. वकिललाईन्सच्या त्या गल्लीत धावते, कधी रडते, कधी हसते तर कधी खट्टू होऊन जाते. कधी वाटत की देवाने अक्कल किंवा मॅच्युरीटी थोडी लवकर द्यायला हवी होती. या सर्व देव माणसांची कदर जरा जास्त झाली असती. आता त्या वकीललाईन्स मधले सगळे वाडे गेले, आमचाही गेला, तिथे आता मोठ्या इमारती उभ्या झाल्यात पण त्या इमारतींच्या पायथ्यात काही आठवणी अजूनही जागृत आहेत. काही गोड आहेत, थोड्या कडू आहेत. कडवटपणा सरतोय हळूहळू पण गोडवा मात्र आपली चव टिकवून आहे.
मक्या रानडेची आजी म्हणजेच रानडे आजी. त्या संपूर्ण वकीललाईन्सच्या आजी होत्या. त्यांच्यापेक्षा तब्बल पाच वर्षे मोठे असलेले माझे आजोबा देखील त्यांना रानडे आजी अशीच हाक देत असत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की गावाकडे जाणे आणि दिवसभर उंडारणे हा माझा आणि मक्याचा फिक्स कार्यक्रम असायचा. फोन , मोबाईल अशी सोय नसतांना देखील मी आणि मक्या दोन चार दिवसांच्या फरकाने गावाकडे पोहोचायचो आणि मग महिनाभर नुसता उच्छाद मांडायचो. मक्याच खरे नाव मकरंद, मकरंद रानडे. रानडे आजी आणि माझी माझी आजी सख्या मैत्रिणी. जवळपास अर्धे शतक त्यांचा शेजार होता. आजोबांना इंग्रजाने बोलावले की आजी देव पाण्यात घालून जप करत बसायची ती केवळ रानडे आजींच्या जीवावर. संपूर्ण घराची काळजी त्या घेत असत. अवघ्या पंचविशीत विधवा झालेल्या पण हिकमती. स्वतःसाठी आणि एकुलत्या एक पोरासाठी त्यांनी सासऱ्याकडून इस्टेटीत हिस्सा पाडून घेतला आणि मग आयुष्यभर कोणाकडे हात पसरावा लागला नाही. थोडीशी शेती, भाड्याने दिलेले समोरच असलेलं दुकान, चार म्हशी यांच्या भरवश्यावर त्यांनी मुलाला मोठे केले, सासाऱ्यांचा सांभाळ केला आणि मग यथा अवकाश मक्याचा आणि माझा देखील.
-अगो माई, पट्टीने फोडून काढ या वांडाला, नाहीतर तर एक दिवस कुठेतरी तोंड काळे करून येईल बघ.
माझ्या आजीला असा सल्ला त्या सकाळ संध्याकाळ देत असत. आजीची कुशी माझ्यासाठी रेफ्युजी कॅम्प होता. काहीही करायचे आणि मग कोणी मागे लागले तर आजीच्या कुशीत घुसायचे. तिथे जवळपास सगळे माफ होते.
दुपारी दोन्ही आज्या गप्पा मारायला आणि विश्रांती घ्यायला आमच्याकडे जमत असत. अगो, रानडे आजी आल्यात असा आवाज माझे आजोबा द्यायचे. माझी आणि मक्याची धावाधाव सुरू असे घरात. मग आजीच्या खोलीत जातांना ज्या कोणाची पाठ हातात लागली त्या पाठीवर धपाटा पडायचा. इतके रोज मैदानावर धावलात तर त्या मिल्खासिंगला मागे टाकाल असा टोमणादेखील. आम्ही पण मग थोड्यावेळाने गोष्ट सांग या नावाखाली माई आजीच्या खोलीत जात असू. मातीची ती खोली आजही आठवते. तिथला गारवा त्या मातीमुळे थोडीच होता. तो गारवा होता आमच्या आज्यांच्या ममतेचा. आजही एसीत बसून तसा गारवा मी अनुभवलेला नाही. आठवणी ताज्या होतात, डोळे डबडबून जातात. तसाही माझा जीव माझ्या आईपेक्षा माझ्या दोन्ही आजीत जास्त. रानडे आजी तरी एक्सट्रा बोनस होता. त्या कधीही परक्या वाटल्या नाहीत. त्यांच्या मनाने आणि धपट्याने माझ्यात आणि मक्यात कधी तसूभरही फरक कधी केला नव्हता.
रामायण, महाभारत, शिवाजी महाराज, थोरले बाजीराव, राणी लक्ष्मीबाई या सर्वांना आमच्या आयुष्यात आणले ते रानडे आजींनी. त्यांनी एखादी गोष्ट सांगितली की माईआजी लगेच त्या गोष्टीला अनुरून गाणे म्हणून दाखवत असे. दुपारचे ते दोन तास म्हणजे केवळ स्वर्ग होता.
माईआजी अचानक गेली आणि रानडे आजींचा देखील माझ्यासारखाच देवावरचा विश्वास काही दिवसांकरता का होईना पण उठला. आजीचे वय नव्हते जाण्याचे पण त्या हारामखोराला पण चांगली माणसे हवी असतात. माझ्या कोलमडून गेलेल्या मनाला सावरले ते रानडे आजींनी. आजी गेल्यावर त्या वर्षीच्या सुट्ट्यात मी गावाकडे गेलो नव्हतो. जावेसे वाटतच नव्हते. त्या वर्षी दिवाळी ही नव्हती. पण आजोबांना भेटून यावे म्हणून मी आणि आलमगीर दोन दिवसांकरता गावाकडे आलो होतो. आम्ही फ्रेश होऊन आजोबांशी बोलत बसलो होतो.
रानडे आजी तरातरा चालत आल्या. त्यांची तब्येत अजूनच खालावलेली दिसत होती. मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि उभा राहिलो. एक सणसणीत झापड माझ्या गालावर पडली.
-जी गेली ती आजी आणि मी कोण रे?
माझा बांध फुटला. कितीतरी वेळ मी रानडे आजींच्या कुशीत शिरून लहान लेकरासारखा रडत होतो.
अभियंता झाल्यावर आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. रानडे आजींनी आता ऐंशी गाठली होती. तुझे आणि मक्याचे लग्न बघितल्या शिवाय येणार नाही असे सांगून ठेवले आहे रे तुझ्या माई आजीला. ती पण एकटीच आहे तिकडे. लवकर बस्तान बसवा, लग्न करा, म्हणजे मी जायला मोकळी. मी रानडे आजीच्या तोंडावर हात ठेवला आणि कुशीत शिरलो. गाढवा, घोड्यासारखा झालाय आता तू, कुशी पुरणार नाही आता.
माझ्या लग्नाला त्या आल्या होत्या. सगळ्या मावश्या, आत्या, मामा त्यांना नमस्कार करत होते. बायको कुलकर्णी, मी आधीच सांगितले होते तिला, लग्नात जीन्स टी शर्ट घालून आली तरी चालेल, सेकंदभर उशीर करू नकोस. बायको आडनावास जागत उशीरा आली. लग्नानंतर आम्ही नमस्कार करायला लागलो तर एका मावशीने वचपा काढला. आजी, काहीही म्हणा, हर्षदची बायको सावळी आहे. मावशीच्या पाठीत देखील एक धपाटा पडला होता हे सांगायला नको.
रानडे आजींना जाऊन आता पंधरा वर्षे होतील. पाठीत परत कोणी धपाटा मारला नाही आणि मी काही सुधरलो नाही.
Image by Bianca 2019log from Pixabay 

One thought on “रानडे आजी- महिला दिवस विशेष- लेखक- हर्षद बर्वे

  • March 11, 2020 at 4:37 am
    Permalink

    बर्वे, मस्त लेख👍

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!