गोष्ट… एका लग्नाची – भाग – ४ – अभिजीत इनामदार

कॉफीशॉपला गाड्या लावून, दोघे जण आत जाऊन बसले. राजने ऑर्डर दिली आणि मग इकडचे तिकडचे बोलणे सुरु झाले. आज तिच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचेच असे राजने ठरवले. इकडे रेश्माला सुद्धा आता त्याच्याशी जास्तवेळ खोटं वागणं अवघड जात होतं. तो आवडलाय खरं पण सांगायचे कसे?

राज – मग? कसे चालू आहे ऑफिस?
रेश्मा – (वैतागून माझे ऑफिस कसे चालले आहे हे विचारायला बोलावले आहे का याने) माझे ऑफिस छान. तू सांग ना का बोलावले होतेस?
राज – चाचरुन अगं तुला नाही का म्हटले होते की माझ्या एका मित्राकडे आलो होतो. तुझे ऑफिस जवळ होते म्हणून तुला कळलं केला होता.
रेश्मा – अच्छा. कुठे आहे रे तुझ्या मित्राचे ऑफिस? म्हणजे कोणत्या बिल्डिंग मध्ये? माझ्या ऑफिस जवळ म्हणजे कुठे?
आता राज निरुत्तर झाला होता. आता काय सांगावे हे त्याला सुचेना. ती मिश्कीलपणे हसू लागली. आपण पकडलो गेलोत हे कळून राज नजर चोरून दुसरीकडे पाहू लागला. शेवटी धीर धरून त्याने एका कॉम्प्लेक्स चे नाव सांगितले. तरीही पुढे रेशमाचे प्रश्न संपणार नव्हते.
रेश्मा – काय नाव रे तुझ्या मित्राचे? कोणते ऑफिस आहे तिथे त्याचे?
राज – ते जाऊ दे गं… ते एवढे महत्वाचे नाही.
रेश्मा – तशी माझी काही हरकत नाही… पण म्हटले तू त्या मित्राकडे नेहमीच येतोस का ते विचारावे.
राज – नाही गं. आपण दुसरे काहीतरी बोलूयात का?

रेश्माने पण हसून होकार दिला. मग गप्पांची गाडी घर, घरातले, स्वभाव, आवडीनिवडी यांकडे वळली.
घरात कोणाकोणाला काय आवडते, कोण कसे आहे वगैरे दोघांनी एकमेकांना सांगून टाकले. स्वतःला काय आवडते हे सांगून झाले. इकडे मोजीतोचे २ राऊंड झाले. पण मुद्द्याचे बोलायला काही राजला धीर होईना. रेश्माच्या मनात चलबिचल सुरु आहे. मी इकडे सगळ्या माझ्या आवडीनिवडी, माझ्या घरच्यांचे स्वभाव हे शेअर करते आहे म्हणजे तरीही काळात नाही का याला? मी काही इतर कोणत्याही व्यक्तीशी हे शेअर कारेन का? एवढे साधेपण कळत नाही का याला? आपणच विचारावे का? नको… आपण कशाला विचारायचे? ह्याला जर एवढेही कळत नसेल तर मग पुढे कसे होणार? हा कधीतरी मनातील ओळखेल काय माझ्या? की दरवेळी मलाच बोलावे लागेल?

तर राजच्या मनात आपल्याला ही खूप आवडली आहे हे सांगायला धीर का होत नाही? बाकी बाबतीत आपण कसे हजरजबाबी आहोत आणि पुष्कळ बडबड करतोय पण हिच्यासमोर आपली बोलती का बंद होते आहे तेच त्याला कळेना. पण ती आज आपल्याला भेटायला आली तेही अगदी सहज विचारल्यावर लगेच. म्हणजे तिला मी बासनात असेन का? त्यामुळेच तर ती आली असावी ना? पण जर तसे काही नसेल ती अगदी कॅज्युअली आली असेल तर? तर ठीक आहे ना? तिच्या मनात काय आहे हे जाणून तर घ्यायला हवे ना. पण जर तिला मी पसंत नसेन तर? नसेन तर नसेन? मी एवढा का विचार करतोय? नक्की काय जादू केली आहे हिने एकाच भेटीत? केवढी अधीरता लागून राहिली आहे. अन तिचा नकार असेल तर? मला एवढी का भीती वाटते आहे नकाराची? मी तिच्या प्रेमात तर नाही पडलो? लव्ह एट   फर्स्ट साईट?

तिच्या सोबतीची आस त्याच्या मनात
त्याने विचारावे हि इच्छा तिच्या मनात

तिच्या होकाराची आस त्याच्या मनात
तर असंख्य विचारांचे काहूर तिच्या मनात

या अवस्थेत बराच काळ लोटला. दोघेही एकमेकांकडे चोरून पाहत होते. नजरानजर झाली तर पटकन नजर चोरत होते. त्याच्या तसे पाहण्यामुळे रेश्माच्या गालावर मंद हसू येत होते अन ती चक्क लाजून चूर चूर होत होती. दोघांचीही चलबिचल वाढत होती.
शेवटी  तो काहीच बोलत नाही हे पाहून
रेश्मा – चला खूप उशीर झाला निघायला हवे
राज – थांब ना जरा वेळ
रेश्माला वाटले आता तरी राज काहीतरी बोलेल…
रेश्मा – कशाला आता बोलणे तर झाले. उशीरही झालाय. तुला अजून काही सांगायचे आहे काय?
राज – नाही अगदीच तसे नाही पण… तू आणखी काही घेणार का? खायला किंवा प्यायला?
रेश्मा – आपण फक्त खायला प्याला आलो आहोत का इथे? दुसरे काही काम नाही का?
राज – अगं तसे नव्हे. पण तो वेटर देखील आता पुन्हा आपण काही ऑर्डर करतोय का ते बघतोय?
रेश्मा –  अच्छा. म्हणजे त्या वेटरची तुला पडलीय? आपण इथे कशासाठी आलोत?
राज – अगं म्हणजे
रेश्मा – हे बघ ना तू काही बोलत आहेस ना काही विचारात आहेस. नुसतेच बघत बसायचे का? बोलण्यासारखे काही नसेल तर निघूया.
पुढे काय बोलावे ते त्याला सुचले नाही. रेश्मा उठली आणि निघायला लागली.
रेश्मा – बाय राज
राज – ओके… परत कधी भेटूयात?
रेश्माला राग आला
रेश्मा – आता परत कशाला? मला वेळ नाही आता ह्या आठवड्यात.
ती गाडीवर बसून निघून गेली… राज केवळ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बसला… आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची त्याला कल्पना नव्हती.

Image by rajesh koiri from Pixabay 

Abhijit Inamdar

Abhijit Inamdar

लेखक परिचय : नाव- अभिजित अशोक इनामदार. सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे माझे बालपण हे (वयाची पहिली १४ - १५ वर्षे) हे खेडेगावामध्ये गेले. मी इंजिनिअरिंग केले असून एमबीए इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये केले आहे. नोकरीनिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरून झाल्यानंतर सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राबद्दल जिव्हाळा आहे. काही नाट्यप्रयोग तर काही म्युझिकल शोज चे अँकरिंग केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपणही काहीतरी लिहू शकतो याची मनाला आस लागून राहिली होती अन म्हणूनच मग फेसबुक वर २०१२ पासून लिखाण सुरु केले. माझे क्षेत्र जरी यांत्रिकी असले तरी लिखाणामुळे नवी उर्जा मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!