माझ्या प्रेमाची गोष्ट- विजेती कथा

“Flowers cannot blossom without sunshine” असं म्हणतात, तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. माझा आदित्य माझ्या आयुष्यात सूर्यकिरणं घेऊन आला आणि त्याने मला खुलवलं. मुळची बंडखोर व रागीट स्वभावाची मी, त्याच्या सहवासात राहून शांत, स्थिर व समाधानी झाले, अन् जीवन अधिक रम्य वाटू लागलं.

आमची ओळख कॉलेज पासूनची. पहिली मैत्री, मग प्रेम, मग लग्न. दोन्ही घरातून मान्यता. त्यामुळे प्रेमासाठी काही संघर्ष वगैरे करावा लागला नाही. एकमेकांविषयी निर्माण झालेल्या प्रेम भावना एकमेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जेवढे कष्ट सर्वसाधारणपणे काढावे लागतात, तेवढाच काय तो संघर्ष. पळून जाऊन लग्न करण्याची मनोहर खुळी स्वप्नं कारणाशिवाय पाहिल्याची जाणीव अजुनही टोचून जाते.

पहिली ‘dating’ ची सात, व लग्नानंतरची सहा, अशी तब्बल तेरा वर्षं आमच्या ह्या नात्याला झाली. बरं हे नातं पण किती खास असतं हे दर दिवशी वेगवेगळ्या अनुभवातून लक्षात आलं, अजूनही येतं. कधी मित्रांसारखे तासंतास तहानभूक विसरून आम्ही गप्पा मारतो, कधी भावंडांसारखे एकामेकांच्या खोड्या काढतो, भांडतो, कधी ह्या नात्यातून रोमान्स झळकतो, तर कधी वात्सल्य. थोडक्यात सांगायचं तर मित्र, सखा, मार्गदर्शक, गुरु, मूल व आई.. ह्या सगळ्याच नात्यांचं एकत्रीकरण म्हणजे माझा नवरा, ह्याचा पावलोपावली साक्षात्कार होत असतो. घरी आम्ही दोघंच असल्यामुळे हे जास्ती प्रकर्षाने जाणवतं. किंबहुना त्याच कारणास्तव आमच्यामधे ही इतकी सारी नाती जोडली गेली असावीत अशी माझी समजूत आहे.

‘नवऱ्याबरोबरचं भांडण’ हा तर माझ्यासाठी एक सखोल अभ्यासाचाच विषय झाला आहे. एखाद्या व्यक्तीकडे कितीही शुल्लक गोष्टीवरून कितीही मोठं भांडण कसं करावं, व कितीही मोठं भांडण झालेलं असूनही ते दुसऱ्याच क्षणी विसरून त्याच व्यक्तीच्या सहवासात रमून जावं, हे मला फक्त आदित्यमुळे व आदित्य सोबतंच जमतं. “तू toothpaste चं झाकण कधीच का नीट लावत नाहीस” ते “office पुढे तुला काहीच कसं काय सुचत नाही” पर्यंतचे सगळेच विषय हाताळले गेल्यानंतर आमच्यात भांडणासाठी काही ऊरलंच नाही. कधीकधीतर मी ही भांडणं “miss” करते. कारण त्या नंतरचा जो रूसवा-फुगवा सोडवण्याचा खटाटोप होतो, त्यातून जाणवणारं प्रेम अधिक आल्हाददायी असतं आणि मग आढेवेढेही घेववत नाहीत.

आमच्या घरात ‘gender roles’ ह्या संकल्पनेला वाव नाही. स्वयंपाकापासून धुण्याभांड्यापर्यंत सगळी कामं दोघांनीही वाटून घेतली आहेत. त्यामुळे मला त्याचा आधारच नव्हे पण आदर देखील आहे. आम्हा दोघांमध्ये सुगरण कोण? तर तोच! मी एखादं काम ऊरकुन काढल्यागत स्वयंपाक करते. आदित्यचं सगळं साग्रसंगीत असतं. आलेपाक, नाचणीचं सत्व, अळीवाचे लाडू, तसंच गोव्याचं खास खतखतं ते पंजाबी ‘माँ की दाल’ पर्यंतचे सगळेच जिन्नस तो अगदी सहजतेने बनवतो. (मग मी पण अगदी सहजतेने ते गट्टम करते) अश्यावेळी मात्र स्वयंपाक घराची काय अवस्था झालेली असते ते मी वाचकाच्या कल्पनेवर सोडते.

त्याची नी माझी मैत्री झाली तेव्हा मी सतरा तर तो एकोणीस वर्षांचा होता. तेव्हा पासूनची ओळख असल्या मुळे मी त्याला व तो मला अगदी पुरेपूर ओळखतो. कोणत्या वेळी माझ्या मनात काय चाललंय, ह्याचा अचूक अंदाज घेऊन, “मला माझ्या अळवाची खाज माहीत आहे!” असं वरनं ऐकवतो; अन् मी जर का त्याच्या मनातलं हेरलं तर तितक्याच आश्चर्याने मला “अरे! तुला कसं काय कळलं” असही विचारतो. कधी मला सर्दी पडसं झालेलं असलं की नेमकी ह्याला पिझ्झे, आयस्क्रिमं खायची हुक्की येणार. मग बाहेरून येताना गुपचूप हे सगळं खाऊन येऊन नामानिराळा न रहाता, गरजेशिवाय ह्याची कबुली दिली जाणार, ज्याने माझा पारा चढणार. “अरे मला सांगितलंस तरी का? आता मला पण खावसं वाटू लागलं ना!” मग मला शांत करण्यासाठी तात्पुरतं “तू एकदा ठणठणीत हो, परत जाऊया” असं आश्वासन दिलं जाणार. अश्या छोट्या छोट्या गंमतींची शृंखलाच आहे आमचा संसार.

आमचे स्वभावच नव्हे तर आवडीनिवडी सुद्धा दोन टोकांवरच्या आहेत. त्याला ऐतिहासिक चित्रपट आवडतात, तर मी हॅरी पॉटर, अव्हेंजर्स सारख्या गोष्टींमद्धे रमून जाते. तो थोरामोठ्यांची आत्मचरित्रं वाचतो, तर मी जेन ऑस्टेनची पारायणं करते. त्याला सामाजिक विषयांवर आधारीत कोंकणी तियात्र पहाणे पसंत आहे, तर मला मराठी संगीत नाटकं! सकाळी वर्तमानपत्र हातात येताच हा जितक्या रूचीने पहिलं पान वाचतो, तितक्या रूचीने मी फक्त शेवटचं पान वाचते. अश्याच अनेक लहान मोठ्या गोष्टींमुळे “opposites attract” ह्या व्याख्येत कितपत तत्थ्य आहे ह्याचा मला वारंवार अनुभव येत असतो. ह्या दोन टोकांचा मध्य गाठायचा झाला तर “प्रवास” हा एकमेव तोडगा. पाठीवर वजन घेऊन पाठ मोडेपर्यंत भटकंती, हा आमचा प्रवासातला आवडीचा प्रकार. वेगवेगळ्या देशी जाऊन, तिथल्या लोकांच्या घरी राहून, त्यांचं राहणीमान, त्यांची जीवनशैली ह्याचं निरीक्षण! नवीन नवीन माणसांच्या ओळखी! पायी, सायकल किंवा मेट्रोने फिरून, जितकं पाहता येईल तितकं पाहणं! हा तर एक छंदच जडला आहे. आणि हे परत परत करता यावं म्हणून कायम सुरू असलेल्या चर्चा, योजना आणि सेव्हिंगस् ह्याची नशाच चढली आहे दोघांना. ह्या बाबतीत मात्र दोघांचे विचार तंतोतंत जुळतात.

आता आमच्या आयुष्यातलं नवीन पर्व सुरू होणार आहे. आमच्या संसाररूपी वेलीवर लवकरच एक कळी फुलणार आहे. नऊ-मासाचा हा कालावधी मला आदित्यच्या आणखी जवळ घेऊन आला. आमच्या दोघांच्या प्रेमाचं मूर्तरूप लवकरच प्रकट होणार, हे आमच्या हक्काचं असणार, त्याच्या जडण-घडणीत आम्ही बरोबरीचे भागीदार असू ही कल्पनाच किती रोमांचकारी आहे, आतापर्यंत अनुभवलेल्या सर्व सुखांहून निराळी आहे. त्याच्या-माझ्या प्रेमाच्या गोष्टीतला हा नवा खंड लिहायला आम्ही दोघंही आतुर आहोत. आयुष्यातला हा पुढचा प्रवास कुठे घेऊन जाणार हे माहीत नाही, पण एक गोष्ट मात्र खात्रीने सांगू शकते की, हे नवं पर्व आदित्यच्या साथी मुळे अधिक रोचक होणार आहे. So let the adventure begin!

-bhakti sardesai

Image by skeeze from Pixabay 

One thought on “माझ्या प्रेमाची गोष्ट- विजेती कथा

  • March 18, 2020 at 3:00 am
    Permalink

    केवळ अप्रतिम…….❤

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!