द बेस्ट शेफ- गौरी ब्रह्मे
दुपारचे दोन वाजत आले होते. ऊन चांगलच चढलं होतं. घरी परतायची घाई होती. मुलं शाळेतून आली असणार, त्यांचं जेवण, अभ्यास, आपली काम, सगळंच वाट बघत असतं. तरीही या रस्त्यावर नेहमीप्रमाणे गाडीची गती मंदावतेच, पावलं जराशी रेंगाळतातच. कारण या रस्त्यावर आई रहाते. तिला दोन मिनिटं भेटून येऊ असा विचार मी करते. कित्येकदा इथे जवळपास कामासाठी येऊन जाते, पण तिला सांगत नाही. सांगितलं, तर घरी का आली नाहीस, म्हणून ती रागावते. पण आपल्याला कायमच घाई असते.
आज वाकडी वाट करून तिला भेटूच म्हणते.
ढळढळीत दुपारी मला दारात पाहून आई जरा चमकतेच. काय ग अचानक? म्हणत लगेच हातात पाणी देते. काही नाही ग सहज आले, म्हणत आईच्या सोफ्यावर धपकन बसते. इथे धपकन बसायला फार मजा वाटते. मग तिच्या जिव्हाळ्याचा प्रश्न येतो ‘जेवलीस?’ मी नाही म्हणते, घरी जाऊन (आपणच बनवलेलं) जेवायच असतं. जरा इकडचं तिकडचं बोलतो आम्ही, परत जिव्हाळा प्रश्न रिटर्न्स, जेवतेस का? मी नको ग म्हणत असतानाच, उशीर बघ कीती झालाय, मुलं बघतील आज एक दिवस स्वतःच, जेऊनच जा म्हणत, एकीकडे ती स्वयंपाकघरात शिरतेसुद्धा.
एकटीच असल्याने स्वतःपुरता सकाळचा स्वयंपाक करून तिने संपवलेला असतो. त्यामुळे माझ्यासाठी आता स्क्रॅचपासून सुरुवात करायची असते. तिला काम करावं लागतं या गोष्टीचं मी स्वतः आई झाल्यापासून मला फार वाईट वाटतं. पण तसंही आईचं कायम ऐकावं, हे मी नाहीतरी आमच्या लेकीला बजावत असतेच. त्यामुळे मी तिचं निमुट ऐकते. ‘जरा वेळ टीव्ही बघ, मी करते काहीतरी’ म्हणत, साठी ओलांडलेली माझी आई, एकीकडे कांदा चिरायला घेते.
काही मदत करु का ग? या प्रश्नाचं उत्तर ‘ नको, बस नुसती ‘ असं येणार हे माहीत असलं तरी मी उगाच तिला विचारते. कारण हे उत्तर ऐकायला मला आवडतं. पाच मिनिटात स्वयंपाकघरातून कांदा फोडणीत घातल्याचा वास, कुकरच्या शिट्टीचे, भाकरी थापल्याचे आवाज येऊ लागतात. मला तिच्या हातची भाकरी प्रचंड आवडते हे ती कधी म्हणजे कधीच विसरत नाही. माझ्यासाठी जगातला बेस्ट शेफ कामाला लागलेला असून सगळ्यात सुंदर अन्न बनत असतं. दहाव्या मिनिटाला माझ्यासमोर तव्यावरची तांदळाची भाकरी, वाफाळतं पिठलं, घट्ट दह्यातली कांद्याची कोशिंबीर, जवसाची ताजी चटणी, भाजलेला पापड असलेल सुग्रास ताट येतं. पहिल्या घासाबरोबरच मी आनंदाचा कढ गिळते आणि मला जेवताना बघून आईची पुढच्या चार दिवसांची भूक भागते. पांढऱ्याशुभ्र भाकरीचे पदर व्यवस्थित सुटलेले, पिठल्याची कंसिस्टंसी परफेक्ट, कोशिंबीरिला घरचं दही, इतकं साधं आणि रुचकर जेवण आपण खूप दिवसात जेवलो नाहिये हे मला जाणवतं. आजकाल इतक्या हॉटेलांचे रिव्ह्यू वाचत असतो आपण, पण या जेवणाचा रिव्ह्यू लिहायला शब्द कमी पडतील. आणि तसंही, देव, बच्चन, पुलं, लताबाई आणि आईच्या हातचं जेवण यांचे रिव्ह्यू लिहू नयेत.
आज पुन्हा एकदा पटलं, पोट भरणारं जेवण सगळीकडे मिळतं, पण तृप्त करणारं जेवण फक्त आईकडे मिळतं!
Image by Michael Schwarzenberger from Pixabay
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
परफेक्ट शेफ
धन्यवाद
Awesome short story.
त्रिकालाबाधित सत्य… आईच्या हातचे जेवण 😊
Agadich perfect….
मला फार आवडते ही छोटीशी गोष्ट गौरी. भरून येते वाचताना