आठवणींची कातरवेळ- कल्लोळ भावनांचा_१
दाटून आलेल्या संध्याकाळी आठवणींना पूर येतो
डोळ्यांच्या कडा ओलावतात आणि भावनांचा कल्लोळ माजतो.
जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात जीवाला वेड लावणारं एकतरी नातं असतं. मग हे नातं प्रेमाचं असेल, मैत्रीचं असेल अथवा अजून कुठलं. आयुष्याच्या प्रवासात एखादं नातं अलगद मागे पडतं कधी पण आठवणींच्या रुपात ते नेहमीच तुमच्या सोबत असतं.
हळूवार फुलणारं प्रेम असो वा प्रेम मिळविण्यासाठी जीवाचं रान करणं असो, दोन्हीही भावना तितक्याच उत्कट असतात. कधी एखाद्याचं आयुष्यातून निघून जाणं अगोदरच निश्चित असतं तर, कधी कोणीतरी अचानक आयुष्यातून निघून जातं आणि उरतो तो फक्त आठवणींचा अविरत प्रवास.
एखाद्या निवांत संध्याकाळी आठवणींचा महापूर येतो.प्रत्येकाची कथा वेगळी, प्रत्येकाची कहाणी वेगळी पण आठवणींची कातरवेळ मात्र मनात भावनांचा कल्लोळ माजवते. कधी मनात तग धरून राहिलेली आशा, तर कधी राहून गेलेले प्रश्न, कधी अलवार प्रेमाची हाक तर कधी हातातून सुटलेला हात, आठवणींच्या किती किती तऱ्हा असतात तितक्याच जीवघेण्या असतात.
शिशिरातलं प्रसन्न वातावरण, दरवळणारा बकुळीच्या फुलांचा गंध आणि उशिरापर्यंत रेंगाळणारा सूर्यनारायण हे सगळं वातावरण मला या गावात पुन्हा अनुभवायचं नव्हतं. तसंही गेल्या १० वर्षात मे महिना व दिवाळी सोडून मी एरवी कधी माहेरी आलेच नाही. अर्थात कामाच्या व्यापात जमतही नव्हतं आणि मी जमवलंही नाही. १० वर्ष… १० वर्षांनंतर यावर्षी इथला फेब्रुवारी अनुभवतेय. या महिन्यात इथे यायची इच्छा अजिबात नव्हती पण नाईलाज झाला.
‘नाही हा! कुठलंही कारण अजिबात चालणार नाही. अगं सख्खी नसलीस तरी सगळ्यात लाडकी बहीण आहेस तू अपूर्वची. करवल्यांशीवाय लग्नघरात अजिबातच मजा नाही.’ काकूने अशी प्रेमळ ताकीद दिल्यावर यावंच लागलं.
पै पाहुण्यांनी भरून गेलेलं घर, आमंत्रणं, वेगवेगळ्या कामांची लगबग, जेवणावळी, चेष्टा मस्करी सगळं वातावरण अगदी मंगलमय झालेलं. या वातावरणात मी मात्र उगाचच स्वतःला एकटं समजतेय.
दहा वर्षानंतर इथला शिशिर ऋतू आजही त्याच आठवणी घेऊन आलाय. बरोबर दहा वर्षांपूर्वी या ऋतूत बहरणाऱ्या फुलांप्रमाणे बहरत जाणारं एक सुंदर नातं अचानक कोमेजून गेलं होतं.
उद्या ग्रहमग…. घरात सगळी धावपळ, फोनाफोनी चालू आहे आणि मी मात्र अस्वस्थ. कितीही थांबवलं तरी आठवणींचं वादळ माझं भावविश्व उध्वस्त करतंय. नाही हे सगळं थांबवायला हवं. आता त्या सगळ्या आठवणी विसरायला हव्यात.
विसरता येतील का त्या आठवणी? आजही माझ्या मोबाईलमध्ये त्याने डेडिकेट केलेली गाणी फेव्हरेट लिस्टमध्ये गेली कित्येक वर्षे ठाण मांडून बसली आहेत.
“कुठे निघालीस? .. विचारांच्या तंद्रीत इतकी हरवून गेले होते की आईच्या आवाजनेही दचकले. ‘इथेच जाऊन येते जरा काम आहे एक’, असं म्हणून, आई काय म्हणतेय हे न ऐकता तिथून निघाले आणि थेट समुद्रकिनारी आले.
अस्ताला जाणारा सूर्य, आसमंतात पसरलेला गडद केशरी रंग, गार वारा… हे वातावरण बेचैन करतं मला नेहमी. एक हुरहूर लागते मनाला. त्यात भरीस भर म्हणून तू मला डेडिकेट केलेली गाणी… पण आज मला बेचैन व्हायचंय, बघूया किती आणि काय- काय सहन करू शकते मी.
त्या दिवशीही असाच सूर्य पाण्याला टेकला होता. शांत, निवांत किनारा… अरे वा! तो नेहमीचा खडकही रिकामाच आहे. आज तिथेच जाऊन बसायचं आहे मला. फक्त आज मी एकटी असेन. एकटी कशाने… त्या आठवणी आहेतच की सोबत!
आजूबाजूला काही जोडपी एकमेकांमध्ये हरवून गेली होती. मनात आलं, यांपैकी किती जणांचं नातं शेवटपर्यंत टिकेल? नको … माझी दृष्ट नको लागायला कोणाला…. फेसणाऱ्या लाटा, घोंगवणारा गार वारा, अंगावर उडणारे पाण्याचे तुषार हे सारं झेलणार आहे मी, तुझ्या आठवणींसारखं! दहा वर्षांपूर्वी जगलेल्या त्या क्षणांना पुन्हा अनुभवायचा प्रयत्न करतेय, कायमचं विसरण्यासाठी !
तुला अमेरिकेला जाऊन सेटल व्हायचं होतं आणि मला ते मान्य नव्हतं. माझं करिअर फक्त भारतात होतं आणि हे तुला आधीपासूनच माहिती होतं. त्यासाठी मी घेत असणारी मेहनत तू अगदी जवळून बघितली होतीस. पण तरीही….
माझी करिअरबाबतची स्वप्न मी तुला आधीच सांगितली होती आणि मी ती पूर्णही केली. या दहा वर्षात एक यशस्वी वकील म्हणून नाव कमावलं. एका नामांकित एनजीओमध्ये सिनिअर लीगल ऑफिसर म्हणून काम करतेय. स्वतःचं घर, गाडी, एक गोड मुलगी आणि महिन्याला लाखो रुपये पगार घेणारा एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत नवरा. तसं बघायला गेलं, तर काहीच कमी नाहीये आयुष्यात.
कमी आहे ना… तुझ्या निघून जाण्यामुळे एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे आयुष्यात, कधीही भरून न येणारी!
विचारात इतकी हरवून गेले की पाण्याला टेकलेला सूर्य पूर्णपणे पाण्यात कधी बुडून गेला ते कळलंच नाही मला. दिवस सरूनही संध्याकाळ थोडी उरली होती. आकाशातल्या गडद लाल केशरी रंगाची छटा हळूहळू काळी होत चालली होती. हीच ती कातरवेळ मला आवडणारी… मनाला हुरहूर लावणारी.
“ये रंग सारे हैं बस तुम्हारे, और क्या..….” गाण्याच्या या शब्दांनी हो शब्दांनीच …आठवणींची एक खपली उघडी पाडली. एक एक करून साऱ्या आठवणी डोळ्यातून वाहून जाऊ लागल्या.
आज दहा वर्षांनी या समुद्र किनाऱ्यावर यायची हिम्मत केली होती तिने, त्याला विसरण्यासाठी! पण खरंच ती त्याला विसरू शकेल का?
- माझी होशील का? - October 1, 2021
- काव्यांजली- शेवटचा भाग - February 12, 2021
- काव्यांजली- ४ - February 2, 2021
Nice