गोष्ट… एका लग्नाची – भाग – ५
रेश्मा निघून गेली आणि राजला आपल्या स्वतःचा खूप राग आला. आज तिला खरे तर सांगायला हवे होते की ती आपल्याला पसंत आहे. तिच्या मनात काय आहे? हे विचारायला हवे होते. पण… पण आपण काहीच का बोलू शकलो नाही? खूपवेळा ठरवले तिला सांगायचे ठरवले खरे, पण ती समोर आली काय आणि आपण तिच्याकडे भान हरपून पाहत काय बसलो. खरेच काहीच कळेनासे झालेय. काय जादू केली आहे रेश्माने तेच कळत नाही. म्हणजे ती आता समोर नाही तर ती समोर असावीशी वाटतेय पण ती समोर असल्यावर काळजात धडधड होते, तिने काही विचारले तर त्याकडे लक्षच लागत नाही. केवळ तिच्याकडे पाहताच राहावे असे वाटते.
तिकडे रेश्मा घरी पोहचली. येताना जरा रंगात आलेली रेश्मा घरी आल्या आल्या राजचा काही मेसेज किंवा फोन आला आहे का ते पाहत होती. त्याचा ना काही कॉल होता ना काही मेसेज. तिची उगाचच चिचिड वाढली. आईने विचारलेल्या प्रश्नांना तिने रागातच उत्तरे दिली आणि तिच्या रूम मध्ये आली. काहीही न आवरता फक्त बसून राहिली. आज काय काय झाले त्याचा ती विचार करत राहिली. आज आपण किती बोललो राजशी. क्ती पर्सनल गोष्टी शेअर केल्या आपण त्याच्यासोबत. त्यानेही आपल्याला त्याच्या अगदी लहानपणापासूनच्या गोष्टी सांगितल्या. तो ते सांगत असताना आपण किती भान हरपून त्याच्याकडे पाहत होतो. का? खरेतर तर जेव्हा आईने आपल्याला राजचे स्थळ सुचवले होते तेव्हा किती चिडलो होतो आपण? आणि आज आपण दुसऱ्यांदाच त्याला भेटलो होतो. पण आपली खूप जुनी ओळख असल्यासारखे आपण त्याच्याशी बोलत होतो.
तिकडे राज त्याच्या रूमवर आला आणि बसून राहिला. त्याला काहीच करावेसे वाटत नव्हते. आज आपण काय केले याचा तो विचार करत बसून राहिला. परवा परवा म्हणजे जेंव्हा आई आणि मावशीने आपल्या लग्नाचा विषय काढला तेव्हा आपण किती चिडलो होतो. केवळ आई आणि मावशीची इच्छा म्हणून आपण रेश्माला भेटायला गेलो. अन आपण पूर्ण हरवून गेलो? आज केवळ दुसऱ्या भेटीत आपण किती पर्सनल गोष्टी तिच्याशी शेअर केल्या. अगदी सहजासहजी ओपनअप न होणारे आपण रेश्माच्या बाबतीत कसे ओपन झालो. तिला सगळ्या गोष्टी सांगताना जसा आपल्याला आनंद झाला होता, कोणीतरी खास मित्राला शेअर कराव्या तशा आपण ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या. अन हे करत असताना खरंच मला स्वतःला छान वाटत होते. अन ती सुद्धा अगदी मन लावून ऐकत होती, हसत होती. तिलाही ते आवडत होते? आवडत असणारच ना, नाहीतर ती बोअर झाली असती किंवा तिला जर ते आवडले नसते तर तिने स्पष्टपणे सांगितले असते. तशी ती बेधडक बोलते.
इकडे रेश्मा तिच्या विचारात – आपण त्याच्याशी शेअर करताना तो किती मनापासून ऐकत होता. त्याला मी सांगते आहे ते आवडत होते? कि तो फक्त तसे भासवत होता? नाही तो खरंच मनापासून ऐकत होता. तसे कळत होते मला. पण आपण एवढा का विचार करत आहोत त्याचा? त्याचे बोलणे, अदबशीर वागणे आणि हो आज काही त्याच्या मित्राला वगैरे भेटायला आला नव्हता तो. ते आपल्याला कळले होते. तरीही मी त्याला भेटायला का तयार झाले?
तिकडे राज विचार करत होता – आज मी काही मित्राला वगैरे भेटायला गेलो नव्हतो. फक्त तिला भेटण्यासाठी म्हणून तसे म्हटले. तिला कळले असेल का ते? नसेल बहुदा. किंवा समाजालाही असेल. पण तरीही ती भेटायला आली. म्हणजे तिला राग तर नक्कीच आला नाही. म्हणजे तिलाही भेटण्याची इच्छा असेल? पण ती जाताना रागाने का गेली असेल? आपण काही चुकीचे बोललो का? कि तिला हवे ते नाही बोललो म्हणून रागावली असेल. अन मुख्य म्हणजे आपण इतका का विचार करतोय तिचा? मी रेश्माच्या प्रेमात पडलो आहे का? तिला मेसेज करावा का?
इकडे रेश्मा – बरं मी त्याला भेटायला तयार झाले. भेटून आले. अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या. पण मी निघताना चिडले का? म्हणजे त्याने काहीतरी स्पेशल सांगावे अशी माझी अपेक्षा होती का? मी एवढा का विचार करतीय त्याचा? त्याच्या फोनची, मेसेजची मी एवढी का वाट पाहते आहे? आणि त्याचा मेसेज आला नाही म्हणौन का माझी चिडचिड होते आहे? मला का हक्क वाटायला लागला आहे त्याच्यावर? कदाचित तो मला आवडायला तर नाही लागला? मी त्याच्या प्रेमात? छे छे कसे शक्य आहे ते…
तेवढ्यात राजचा तिला मेसेज येतो.
राज – हाय
मेसेज टोन ऐकून तिला अनामिक असा आनंद होतो. राजाचा मेसेज पाहून तिची कळी खुलली. तिनेही लगेच रिप्लाय केला
रेश्मा – हाय
अन अरे आपण तर चिडून आलो होतो. लगेच रिप्लाय करायला नको हवा होता. असे तिला वाटून गेले. पण आता रिप्लाय गेला होता आणि त्याने तो पहिला होता याचे कन्फर्मेशन पण मिळाले होते.
राज – थँक्स तू आलीस आज भेटायला
रेश्मा – हो का? मला पण छान वाटले. हेच सांगायला मेसेज केलास का?
राज – तसे नाही ग. पण एक विचारू का?
रेश्मा – विचार…
राज – मघाशी तू जाताना चिडून गेल्यासारखी वाटलीस. माझे काही चुकले का? मी काही मिसबिहेव्ह केले का?
रेश्मा विचारात… किती हा अदबशीरपणा. खरेच असा आहे कि मला इम्प्रेस करण्यासाठी असे वागतोय आणि बोलतोय?
रेश्मा काही उत्तर देत नाही हे पाहून राजच्या मनात कालवाकालव. तेव्हढ्यात ती काहीतरी टाईप करते आहे असे त्याला दिसते.
रेश्मा – असे का वाटले तुला? कि तू काही मिसबिहेव्ह केले आहेस असे?
आता आपण काय बोलावे यावर राज विचार करतो आणि रिप्लाय देतो
राज – मघाशी नाही का म्हटले, तू जाताना रागावली आहेस असे वाटले म्हणून विचारले.
रेश्मा – असे का वाटले तुला कि मी रागावली आहे म्हणून?
राज – कारण तसे तुझ्या चेहऱ्यावर दिसत होते.
रेश्मा – अरे वा. तुला फेस रिडींग येते का?
राज – तसे काही नाही गं. पण एक सांगू का?
रेश्मा – काय?
राज – तुझा चेहरा बोलका आहे. आणि तुझ्या मनात जे आहे ते स्पष्ट दिसते चेहऱ्यावर. म्हणून तसे विचारले.
आता गोंधळण्याची वेळ रेश्माची होती. आता काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून मग ती म्हणाली
रेश्मा – नाही रे असे काही नाही? अन तुला असेच सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव कळतात का?
राज – तसे नाही गं पण तुला तुच्या मनातले विचार लपवता येत नाहीत. ते स्पष्ट दिसतात तुझ्या चेहऱ्यावर. म्हणजे तू
एवढे बोलून तो शांत बसला
रेश्मा – म्हणजे तू च्या पुढे काय? म्हणजे मी काय?
राज – काही नाही जाऊ दे
रेश्मा – असे काय? जे काय आहे ते मनात ते सांगायला हवे. सांग म्हणजे मी काय?
राज – रागावू नकोस. मी स्पष्ट बोलतोय आणि मला जे जाणवतेय ते सांगतोय
रेश्मा – बोल आता…
राज – तुला तुच्या मनातले विचार लपवता येत नाहीत. ते स्पष्ट दिसतात तुझ्या चेहऱ्यावर. म्हणजे तू एकदम निरागस आहेस. मनात एक बाहेर एक असे तुला जमत नसणार.
आता रेश्मा चक्क लाजली…
रेश्मा – चल काहीतरीच काय? मी अजून बऱ्याच गोष्टी सांगितल्या नाहीत. अन तुला काय माहिती रे मी निरागस आहे कि काय?
राज – म्हणजे आता पुन्हा लवकरच भेटायला हवे
रेश्मा – आता कशाला?
राज – अगं तूच म्हणालीस ना की अजून बऱ्याच गोष्टी सांगितल्या नाहीस. मग त्या ज्या काही गोष्टी आहेत ते जाणून घ्यायला भेटायला हवे ना.
रेश्मा – सोचकार बताऊंगी
राज – अच्छा जी. जरूर बताइये मैं इंतजार करता हूँ
आपण अचानक हिंदी का बोललो ते रेश्माला कळेना. पण मघाशी असलेला राग कुठल्याकुठे पळून गेला होता. दोघांनी एकमेकांना गुड नाईट विश केले आणि आता पुढची भेट कधी आणि कशी होईल याचा विचार करू लागले.
Image by rajesh koiri from Pixabay
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021
Sahi
Next part kadhi yenar…very eager for it