प्रेम- गौरी ब्रह्मे
एके दिवशी वेडेपणाच्या मनात आलं, आपल्या सगळ्या मित्रांना एक जंगी पार्टी देऊ. त्याने सर्वांना आमंत्रण दिलं. सर्वजण आले. वासनेने कल्पना मांडली, “चला सगळे लपाछपी खेळूया.”
“लपाछपी? हे काय असतं?” अज्ञानाने विचारलं.
कपट म्हणालं, “लपाछपी हा एक खेळ असतो, ज्यात एकजण १०० पर्यंत आकडे मोजतो, बाकीचे लपतात आणि मग आकडे मोजणारा नंतर त्यांना शोधून काढतो.’’ सगळेजण खेळायला तयार झाले, अगदी आळस आणि भीती सुद्धा.
वेडेपणा उत्साहात होता त्यामुळे लगेचच आकडे मोजायला तयार झाला. सगळीकडे एकच गडबड सुरु झाली आणि प्रत्येकजण लपण्यासाठी चांगली जागा शोधायला बागेकडे पळाले. खात्री शेजारच्या घराच्या पत्र्यावर लपायला गेली. निष्काळजीपणा पलीकडच्या शेतात जाऊन लपला. उदासीनता नुसतीच रडत बसली आणि शंका तर ठरवूच शकली नाही, भिंतीच्या पुढे लपाव की मागे.
९८, ९९, १०० …. वेडेपणा मोजत होता, “मी येतोय तुम्हाला शोधायला!”
सगळ्यात पहिली सापडली ती उत्सुकता, कारण तिला, सर्वात पाहिलं कोण पकडलं जातंय, हे पहायचं होतं, आणि या नादात ती लपायच्या जागेवरून खूप बाहेर आली होती. आनंद सुद्धा लवकर सापडला कारण खूश असल्यामुळे त्याला फुटणाऱ्या उकळ्यांचा आवाज सगळीकडे ऐकू येत होता. हळूहळू वेडेपणाला सगळे सापडले, अगदी खात्री सुद्धा!
मग संशयखोर वृत्तीने विचारलं, “अरे पण प्रेम कुठे आहे?”
सगळ्यांनी “काय माहीत!” असं म्हणत खांदे उडवले, कारण कोणीच तिला पहिले नव्हते. मग सगळे तिला शोधायला निघाले. सगळ्यांनी तिला दगडांखाली पाहिले, झाडांवर पाहिलं, इंद्र्ध्नुष्यामागे शोधलं, पण प्रेम कुठेही सापडेना.
शेवटी वेडेपणा हातात काठी घेऊन तिला शोधायला काटेरी झुडूपांमध्ये गेला. त्याने काठीने ढोसलं तर तिथून एक किंकाळी आली. ते प्रेम होतं. वेडेपणाने चुकून प्रेमाच्या डोळ्यांना काठीने दुखापत केली होती. वेडेपणाला अतिशय वाईट वाटलं, त्याने प्रेमाची मनापासून क्षमा मागितली, आणि जन्मभर प्रेमाचे डोळे बनून तिच्या सोबत रहायचं वचन दिल.
प्रेमाने अर्थातच ते वचन मान्य केलं.
तेव्हापासून प्रेम आंधळं आहे आणि वेडेपणा तिचे डोळे बनून तिची जन्मभर साथ देतो आहे.
Image by Pete Linforth from Pixabay
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022