करोना हनीमून
‘पोस्टपोन्ड करू या का ? सहा महिन्यानंतरची टूर घ्या. कॅन्सल नका करू. ऊगाचच 30% कॅन्सलेशन चार्जेस लागतील…’ टूरवाला कळवळून सांगत होता.काय करायचं ? क्या क्या सपने देखे थे ?
खरं तर ,आण्णांची आणि माईंची ही पहिली फाॅरेन टूर. खरं सांगू ? फाॅरेनचं सोडा हो. त्या दोघांचीच ही पहिलीच टूर. आयुष्यात पहिल्यांदा ती दोघं टूरला निघालेली.सेकंड कसला ? पहिलाच हनीमून म्हणा हवं तर.
स्वतःसाठी जगलीच नाहीत हो दोघं कधी.दोन खोल्यांची चाळीतली जागा. माई लग्न होऊन घरात आल्या तेव्हा पाच माणसं घरात. ऊंबरठ्यावरचं माप ओलांडलं. तेव्हाच नव्याची नवलाई संपली. तेव्हापासून पदर खोचून ज्या कामाला लागल्या ते आजपर्यंत.
आण्णांच्या तीन बहिणी होत्या लग्नाच्या. आण्णा शाळेत शिक्षक. कितीसा पगार असणार ? कसा पुरणार ? मग माईंनी खाणावळ चालू केली. डबा पुरवायच्या.माई साक्षात अन्नपूर्णा. शंभर शंभर पोळ्या लाटायच्या.टाईमप्लीज नाहीच. शाळेत जाताना आण्णा डबे पोचवून येत. तीनही बहिणींची लग्नं लावून दिली.त्या चांगल्या घरी पडल्या. त्यांची बाळंतपणं. सासू सासर्यांची मर्जी सांभाळली.एकामागे एक. नुसता खोखो. प्रत्येक महिनाअखेर रडवायची. आण्णा आणि माई. दोघांच्या चेहर्यावरचं हसू कधी मावळलं नाही. कधीही कुणाचा दुस्वास केला नाही. येईल ती परिस्थिती स्वीकारली. दिलसे. मनसे.
हिंमत हारली नाही.
स्वतःसाठी…? स्वतःसाठी जगणं सोडा हो. स्वतःसाठी विचार करायलाही वेळ मिळाला नाही दोघांना कधी.माईंचे सासरे आधी गेले. मग सासूबाई. शेवटी तर सगळं अंथरूणातच. माईंनी सगळं न कंटाळता केलं.म्हातारी समाधानानं गेली.
घटका गेली, पळे गेली. वर्षामागून वर्षे गेली.आता तर रिटायर्ड होवून आण्णांना पंधरा वर्ष झाली. आण्णा आणि माई. एकदम ठणठणीत. अजूनही धावपळ चालूच.
एका बाबतीत मात्र दोघं श्रीमंत. विवेक आणि राजन. विवेक आण्णांसारखाच शिक्षक झालाय. राजन पोस्टात आहे. दोघांनाही सरकारी नोकरी. छान चाललंय.
संस्कार म्हणजे काय हो ?
मुलं जे बघतात ते शिकतात. अगदी टीव्ही बघितल्यासारखं.माई आण्णा.
मेड फाॅर ईच आदर. आण्णांनी आईबापाला कधीही अंतर दिलं नाही. तेच विवेक आणि राजनचं. सुना अगदी सोन्यासारख्या मिळाल्यात हो माईंना. मिळून सार्या जणी.सगळ्यांनी मनापासून ठरवलं. एकत्र राहू यात. थोडीशी लांबऊडी.आण्णांनी पीएफ ओतला. विवेक आणि राजननं कर्ज काढलं. गावापासून थोडं लांब. चालतंय की.पाच खोल्यांचं टुमदार घर. आजूबाजूला अंगण. बाहेर व्हरांडा.झोपाळा. झोपाळ्यावर आण्णा. संध्याकाळ झाली की माई देवापुढं दिवा लावतात. चारही नातवंडं शुभंकरोति म्हणतात.छान मांडी खालून सगळ्यांचं प्रीतीभोजन.
झोपाळ्यावर आण्णांनी सांगितलेल्या गोष्टी. बस… सुखाचा हा टीव्ही आण्णांच्या घरात रोजच दिसतो.
मला सांगा ? सुख म्हणजे नक्की काय असतं ? हेच… और जीने को क्या चाहिये ?
हुश्श ! दीड वर्ष झालंय.घरावरचं कर्ज ऊतरलंय.तरीही काटकसर चालूच. चांगल्या सवयी लगेच कशा सुटणार ?
19 मार्च. माई आण्णांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस.मागच्याच वर्षी
राजननं झाडून सगळ्यांचा पासपोर्ट काढलाय. पोस्टात सोय होती.सोप्पं झालं. तेव्हापासून सरप्राईझची तयारी.दीड वर्ष घरानं हौसमौज मारलेली.राजन आणि विवेक. हॅटस् आॅफ..! दोघांनी मिळून सव्वादोन लाख रूपये भरलेत.माई आण्णांची, सिंगापूर बॅकाॅक मलेशियाची टूर बुक केली..माई आण्णांना सरप्राईझ.कसंबसं तयार केलंय दोघांना.सगळी तयारी झालेली…
कसंच काय ? देवाची करूणा भाका आता.करोनामुळे सगळं मुसळ केरात..
ते काही नाही.कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. आण्णांचा पोपटलाल झालेला. जे काही पैसे परत मिळाले त्याच्या चारही नातवंडांच्या नावाने एफडी केल्या. माईंची स्वतःची एक गुपचूप सेव्हींग्ज बँक होती.माईंचा आदेश.येस मॅम. आण्णांनी हुक्म की तामील. आण्णांनी एक ट्रॅव्हलर बुक केली आणि सगळे कुणकेश्वराला.
आण्णांच्या दोस्ताची वाडी. तिथलं घरगुती रिसाॅर्ट. सगळ्यांना चार दिवस सुट्ट्या. लग्नाचा पन्नासावा वाढदिवस जोशात साजरा झाला. आणि हनीमून सुद्धा. पोराबाळांसकट. असली मजा तो सबके साथ आता है !
रात्री माई दुधाचा पेला घेवून आण्णांच्या खोलीत. ‘सुटलो बुवा एकदाचे.. ‘
दोघांवर एवढा पैसा खर्च करायचा म्हणून टेन्शन आलेलं दोघांना. दहा मिनटांत खोलीचा दरवाजा ऊघडतो आणि नातवंडांची झुंड आत शिरते.
रंगतदार गोष्ट सुरू होते.
आणि ‘कोरोना हनीमून’ची गोष्ट सुफळ संपूर्ण…!
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
अप्रतिम …….positivity तुमच्या कडून शिकावी ….प्रत्येक गोष्ट सकारात्मक संदेशच देते…..खूप छान