आठवणींची कातरवेळ- कल्लोळ भावनांचा_२
आजची संध्याकाळ एक वेगळीच हुरहूर लावतेय मनाला. मावळत्या सूर्याने आणि गाडीमध्ये लागलेल्या “तुम आए तो हवाओमें… या गाण्याने तुझ्या आठवणींनी पुन्हा माझ्या मनाचा ताबा घेतला आणि इच्छा नसतानाही मी गाडी पार्कच्या रस्त्याकडे वळवली. आज सकाळपासूनच एक वेगळीच हुरहूर लागली होती. दिवसभर कामात लक्ष लागलं नव्हतं आता ही कातरवेळ … शक्यच नाही तुझ्या आठवणीतून सुटका होणं.
दहा वर्ष…. दहा वर्ष होऊन गेली तरी आजही तुला मनातून दूर करता येत नाहीये. सुदैवाने पार्कमध्ये नेहमीची कोपऱ्यातली जागा आजही रिकामीच होती. तिथे बसून मावळत्या सूर्याच्या विविधरंगी छटा बघत बसायला मला खूप आवडतं.
अमेरिकेत नवीन आलो तेव्हा वीकेंड त्याला खायला उठायचा. आशा निराशेचा खेळ मनात चालू असायचा. त्यावेळी इथेच बसून तुला आठवत कितीतरी सूर्यास्त पाहिले. सूर्यास्त बघायचं हे वेड तुझ्यामुळेच लागलं होतं मला. आयुष्यातला पहिला स्नो फॉलही मी याच जागेवर अनुभवला. त्यावेळीही तुझी आठवण होती, ती तर कायमच असते मनात, आजही आहे!
असाच सूर्यास्त बघत, लाटांचे तुषार अंगावर झेलत भविष्याची कितीतरी स्वप्ने रंगवली होती मी…तुझ्यासोबत! थोडं थोडकं नाही ७ वर्षांचं नातं होतं आपलं. आजच्या भाषेत सांगायचं तर ७ वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो आपण. पण एक क्षणात सगळं संपून गेलं. काही नात्यांना अपूर्णतेचा शाप असतो बहुदा. सगळं जुळून येऊनही ती नाती पूर्णत्वाला जात नाहीत.
“तू नाही म्हणून निघून गेलीस त्यावेळी एकदाही मागे वळून बघावंसं वाटलं नाही का ग तुला? का? तुझी स्वप्न, तुझं करिअर मी कुठेच नव्हतो का ग तुझ्या स्वप्नात? आपणहून चालून आलेली अमेरिकेची संधी नाकारू शकत नव्हतो मी. एवढी चांगली संधी नाकारणं म्हणजे मूर्खपणा होता.
तुझी स्वप्न, तुझं करिअर … माझ्याबाबतीत हाच प्रश्न तुलाही पडत असेल, कदाचित!
तुझी स्वप्न…या तुझी स्वप्नच्या नादात आपण कधी आपली स्वप्न जपलीच नाहीत ग. ना तू एक पाऊल पुढे आलीस ना मी एक पाऊल मागे आलो. म्हटलं तर चूक दोघांची म्हटलं तर कोणाचीच नाही. तुझं एक वाक्य मात्र नेहमी आठवतं मला, “चूक बरोबर असं काहीच नसतं, असतात ती मतमतांतरे. माणूस चूक नसतो परिस्थिती वाईट असते. पण ही परिस्थिती आपल्याच बाबतीत का अशी झाली? … का? .. ‘का’ या प्रश्नाचे उत्तर बरेचदा मिळत नाही किंवा मिळालेच कधी तर ते समाधानकारक नसते.
तुला सोडून इथे येऊन १० वर्ष झाली. पण आजही तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण अगदी काल परवा जगल्यासारखा वाटतोय. तू ‘नाही’ म्हणून निघून गेलीस. तरीही मी कितीतरी वेळ तिथल्या खडकावर तसाच बसून होतो, तुझी वाट बघत! वाटत होतं तू धावत येऊन मला पाठीमागून बिलगशील आणि म्हणशील, “मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय…” पण तू आलीच नाहीस. त्या दिवसानंतर मी कित्येकदा त्या गावात…आजीकडे गेलो, पण त्या समुद्रकिनारी जायचं धाडस कधीच झालं नाही. तुझ्यासोबत त्या समुद्र किनाऱ्याचीही ती शेवटची भेट होती.”
या पार्कमध्ये क्वचितच कोणी येतं खूप निवांतपणा असतो इथे. कदाचित त्यामुळेच माझ्याही नकळत तुझ्या आठवणी मला भूतकाळात घेऊन जातात. पण कितीही आठवणीत रमलो तरी सत्य हे आहे की तू माझा भूतकाळ होतीस आणि रिया माझा वर्तमान आणि भविष्य आहे. तिचं प्रेम मला वर्तमानात यायला भाग पाडतं. सूर्यास्ताच्या रंगांसारखं रंगवलेलं आपल्या प्रेमाचं स्वप्न अचानक अंधारून गेलं. आता इथून निघायला हवं. मला वर्तमानात यायलाच हवं.
“हॅलो… जेनीच्या आवाजाने भानावर आलो. तिच्याशी मोघम बोलून तिथून निघालो. या पार्कमध्ये येणाऱ्या बहुतेक माणसांना एकांत हवा असतो. ही जेनी पण तुझ्या-माझ्यासारखी कातरवेळेला वेडी होणारी! तिलाही या वेळेला कोणाशी बोलायची इच्छा नसते माझी आजी सोडून …
नाईलाजाने तो घरी जायला निघाला, तिच्या आठवणींसोबत! तिला विसरायचा त्याने कधी साधा प्रयत्नही केला नाही. कारण त्याला माहिती होतं ते खूप कठीण आहे जवळपास अशक्यच! पण तिच्या आठवणी झेलणंही सोपं नव्हतं. दोन्ही गोष्टी तितक्याच त्रासदायक!
- माझी होशील का? - October 1, 2021
- काव्यांजली- शेवटचा भाग - February 12, 2021
- काव्यांजली- ४ - February 2, 2021
Doghanchi baju Chan madali ahe…sampurn nasali tari purn vatali story