अश्रुफुले (प्रकरण ३ रे )- अभिजित इनामदार
दिवस भर भर जात राहिले… दिवस काय… महिने… वर्षे भरभर निघून गेली. अवि मृणाल रोज भेटत होते. सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करत होते. पण अवि काही आपल्या प्रेमाची कबुली देऊ शकला नव्हता. बघता बघता कॉलेजचा शेवटचा दिवस आला. कॉलेज संपले अवीची नोकरी सुरु झाली अन एकदिवस मृणाल नागपूरला निघून गेली. ती गेली अन स्वतःवरच चिडचिड करत राहिला पण आता त्याचा काहीच उपयोग नव्हता.
यशने तिचा विषय काढल्यामुळे ह्या साऱ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या…
– – – – – – – – –
आजचा दिवस
यश पुन्हा म्हणाला – अरे बोल ना तू काहीच बोलला नाहीस मृणाल बद्दल
त्याच्या त्या खट्याळ प्रश्नावर अवि इतकच म्हणाला
आठवणींच्या राज्यात
हल्ली जाणं होत नाही
कारण एकदा गेल्यावर
परत लवकर येणं होत नाही
अवीने लाईट ऑफ केली. सगळीकडे शांतता पसरली. यश सुद्धा गप्पा पडून होता…
यश – काय रे अवि… प्रेम बीम साला काय असतं रे
अवि – छान गुरु तुम्ही आणि आम्हाला विचारा…
यश – गुरु? कोण गुरु?
अवि – तू… अजून कोण?
यश – काहीतरीच काय…
अवि – नाहीतर काय? अरे एकाच वेळी २ – ३ वेगवेगळ्या मुलींबरोबर फिरत असतोस तू. त्या सगळ्यांना डेट करत असतोस अन मला विचारतोस?
यश – अरे बाबा ते काय प्रेम असते का? जे तुम्ही म्हणता तसे… अरे माझी अफेअर्स ६ महिने – वर्षभर टिकतात. त्यानंतर ती अपने रस्ते हम अपने रस्ते.
अवि – यामुळेच कुठली मुलगी तुझ्याबरोबर वर्षभरापेक्षा जास्त राहू शकत नाही.
यश – नाहीतरी कोणाला इच्छा आहे इथे? त्याचं काय आहे… आम्ही डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. शपथ घेत, भांडण करीत वेळ घालवत बसत नाही.
अवि – अरे पण आयुष्यात कधीतरी एका जोडीदाराची गरज भासेल जी तुझ्याबरोबर चालेल, तुझ्या सगळ्या गोष्टींमध्ये तुला साथ देईल… तेव्हा काय?
यश – एकतर असं काही होणार नाहीये… अन तुला सांगू मी मुळात असं काही होईल असा विचारच केला नाही. जेव्हा कधी होईल तेव्हा बघू… तूर्तास माझा मी बरा आहे. बाकी I don’t believe in love, प्यार व्यार You know that ..!!
अवि – जेव्हा तुला होईल तेव्हाच तुला कळेल. आत्ता नाही कळणार.
यश – तू मला सांग … जेव्हा एक तरुण अन एक तरुणी एकमेकांना सांगतात त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणजे नक्की काय रे?
अवि – अरे ज्यांच एकमेकांवर प्रेम असतं ते त्यांच्या सहवासात राहण्यासाठी धडपडतात, एकमेकांसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. आयुष्य भर ते एकमेकांना सुख – दु:खात साथ देतात.
यश – तुला एक सांगू का? यात काही अर्थ बिर्थ नसतो बरं… शारीरिक आकर्षण असतं… शारीरिक आकर्षण. तेच सुरुवातीला एकत्र आणतं… अन उगी आपलं प्रेम बीम नाव द्यायचं बाकी काही नाही.
अवि – आणि नंतर?
यश – नंतर काय? काही नाही… अरे तुला सांगतो प्रेम बीम सगळं झूट आहे. प्रेमाच्या नावाखाली असतात त्या फक्त तडजोडी… तुला त्या माकडाची अन त्याच्या आईची बोधकथा माहिती आहे का रे? म्हणजे जेव्हा पाण्याची पातळी वाढत असते तेव्हा ती माकडीण तिच्या पिल्लाला वरती उचलून धरते. पण जेव्हा स्वतःच्या नाका तोंडात पाणी जाऊ लागते तेव्हा तीच माकडीण त्याच पिल्लाला पायाखाली टाकून स्वतःचा जीव वाचवू पाहते. तुला सांगतो… जेव्हा सेल्फ एक्झीस्टन्सची भावना जागी होते तेव्हा काहीही शिल्लक राहत नाही.
अवि – अरे तू तुझ्या आई बद्दल पण असेच बोलशील?
यश – का नाही? ती आणि मी दोन वेगवेगळे जीव आहोत… तिला तिचा सेल्फ एक्झीस्टन्स आहे… मला माझा आहे. अन मी कोणाला त्याबद्दल दोषी म्हणत नाही. प्रत्येकला स्वतःचा जीव प्यारा असतो…
अवि – अरे पण त्याचा इथे आपल्या मुद्द्याशी काय संबंध?
यश – आहे ना… संबंध कसा नाहीये? मला सांग प्रेम म्हणजे काय? तर एका तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी इतरांचा रोष ओढवून घ्यायचा. इतर मित्र मैत्रीणीना, घरच्यांना वेळ द्यायचा नाही. कारण काय तर तिला किंवा त्याला जास्तीत जास्त वेळ देता यावा म्हणून… बरं वेळ देऊन करतात काय तर भांडण… मी कित्येकाना पाहिले आहे फुटकळ फुटकळ गोष्टींवरून भांडत बसतात… तू ह्याच्याशी का बोलतेस तू तिच्याशी का बोलतोस? हाच ड्रेस का घातलास… तुला माहित आहे ना मला तू हा ड्रेस घातलेला आवडत नाही… पासून आगदी टोकाची भांडणं. मग केवळ त्याला किंवा तिला आमुक आमुक आवडतं म्हणून ते स्वतःला आवडत नसेल तरीही आवडून घ्यावं लागतं. आणि आपल्या कित्येक आवडत्या गोष्टीना त्याला किंवा तिला आवडत नाही म्हणून मुरड घालावी लागते. मला सांग ह्याला काही अर्थ आहे?
अवि – अरे पण प्रेमात असं काही नसत रे… प्रेमात आधी नेहमी आपल्या जोडीदाराचा विचार केला जातो.
यश – तेच सांगतोय त्यामुळेच तर मग समस्या निर्माण होतात. सुरुवातीचे काही दिवस केल्या जातात ह्या तडजोडी पण काही काळानी समोरचा आपल्याला सोडून कुठे जाणार नाही हे कळलं की आपल्याला हवे तसे वागायचं. आधी समोरच्याच्या ज्या गोष्टी आवडायच्या त्याच आता आवडेनाश्या होतात. त्यावेळी मात्र समोरच्याचा विचार केला जात नाही. मग होते काय तर वाद… भांडणं आणि मग फक्त मनस्ताप. तुला सांगतो हे प्रेम बीम करून प्रेमविवाह केलेल्यांच असाच होतं बघ.
अवि – अरे आपण फक्त प्रेम ह्या गोष्टीबद्दल बोलत होतो. तू तर प्रेमविवाह वगैरे आगदी पुढे जाउन पोहचलास.
यश – हो कारण त्यांची ही प्रेम गाडी कधीतरी प्रेमविवाह ह्या स्टेशनवर जाउन धडकतेच…
अवि – अरे प्रेम काय फक्त लग्न आधीच होतं असा थोडीच आहे? आपल्या जुन्या पद्धतीने ठरवू लग्न झालेल्या पिढीतील लोकांनी काय प्रेम केलंच नाही होय? लग्नानंतर ही प्रेम होऊ शकतेच ना.
यश – त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्याय असतो का सांग बरं मला. पदरी पडले ते पवित्रच आहे असेच मानावे लागते ना… त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय असतो का?
अवि – अरे म्हणजे आपल्या आधीच्या बहुतांश पिढ्या ज्यांची लग्न ठरवून झाली ते लोक लग्नानंतर आपल्या पतीवर किंवा पत्नीवर प्रेम करून सुखी झाले नाहीत असे म्हणायचे आहे का तुला?
यश – कोण जाणे? पण असे किती जण असतील रे की ज्यांना खर्या अर्थाने समजून घेणारा जीवनसाथी मिळाला??? असतील ही काही भाग्यवान तसे… पण इतरांचं काय? त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या मनाप्रमाणे जगायला मिळते?
अवि – म्हणजे तुला काय म्हणायचे आहे?
यश – अरे सुख सुख म्हणून जे मिरवलं जातं ते खरच सुख असतं का हे नको का बघायला? अरे दसऱ्याच्या दिवशी वाटलेलं आपट्याचं पान हे जितकं खरं बावनकशी सोनं… तसच ह्या लोकांचं सुख असतं.
अवि – म्हणजे ते सुखी नाहीत असे म्हणायचे आहे का तुला?
यश – ते सुखी वाटतात… कारण ते तडजोड करतात. आगदी कोणते कपडे घालायचे ह्या पासून ते घरातील टेलिव्हिजन वर कोणती मालिका बघायची हे एकजण ठरवतो अन दुसरा तसे वागतो. अशाप्रकारे प्रत्येक गोष्टीत ते तडजोड करतात त्यामुळे ते सुखी वाटतात. पण अशा तडजोडी करून मिळवलेल्या सुखाला मुळात मी सुखच मनात नाही आणि त्या प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारले तर त्यांचे त्यांना उत्तर मिळून जाइल…. ते सुखी आहेत की नाहीत ते. तुला सांगतो हे सुख म्हणजे फक्त मनाला दिलेली “तसल्ली” असते कारण पुढे जाउन पदरी मनस्ताप येण्यापेक्षा हे बरे… हे खरा त्या मगच गमक असतं.
अवि – पण त्यात वाईट ते काय? तडजोड हि प्रत्येकालाच करावी लागते
यश – चल म्हणजे तू हे तर मान्य करतोस की ते लोक तडजोडी करत जगतात…
अवि – होय
यश – मला हेच सांगायचे आहे की कोणतही नातं हे फक्त तडजोडींच्या पायावर फार वेळ नाही उभा राहू शकत. त्यामुळे काय होते की एकजण तडजोड करत राहतो अन दुसरा आपल्याला हवे तसे वागत राहतो अन मग एक दिवस तडजोड करणाऱ्याचा उद्रेक होतो. अन हे खूप धोकादायक होऊ शकते.
अवि – पण मग याला सोलुशन काय?
यश – म्हटलं तर आगदी सोपं सोलुशन आहे. पण आमलात आणायला तितकेच अवघड आहे. म्हणजे जर मला स्वतःला माझ्या मनासारखे जगायला आवडत असेल तर तर समोरच्यालाही त्याच्या मनाप्रमाणे जगण्याचा हक्क आहे हे मी विसरता कामा नये. पण हे बर्याच जणांना कळत नाही…. मी माझ्या मनाप्रमाणेच जगणार पण सामोरच्यानेही माझ्या मनाप्रमाणेच जगावे… वागावे असा हट्ट मी का करावा हे मात्र कळत नाही. ज्याला हे कळले तो सुखी होतो. बाकीचे आपले दसऱ्याच्या दिवशीची आपट्याची पानं…. एक दिवस सोनं म्हणून मिरवायचं म्हणजे प्रत्यक्षात तसे नसतानाही फक्त दाखवायलाच सुखी म्हणून जगायचे. शिवाय प्रत्यक्षात ही अशी आपट्याच्या पानांचीच संख्या जास्त असते अन ते उगाच समोरच तडजोड करतोय म्हणून त्याच्यावरच आपल्या मनाप्रमाणे वागण्याची सक्ती प्रेम नावाचं लडिवाळ लेबल लाऊन करतात. अन तडजोड करणारा पण बिचारा प्रेम लेबलला भुलून दुसऱ्याच्या मनाप्रमाणे वागत राहतो. पण अशी ही सक्ती सुद्धा नात्यामध्ये धोकादायक ठरते…
अवि – पण कोणी सक्ती का करेल?
यश – तूच सांग…. आणि कृपा करून प्रेमापोटी अशी सक्ती केली जाते म्हणा किंवा अपेक्षा म्हणा ठेवल्या जातात असे बावळट उत्तर देऊ नकोस…
अवि – हो तसच तर होतं
यश – अवि इतका वेळ मी काय सांगत होतो ते कळलं की नाही? का डोक्याच्या वरून गेलं?
अवि – अरे पण
कूस बदलून यश एवढेच म्हणाला – अवि गुड नाईट… तेरा तो भगवान भी कुछ कर नाही सकता…
अवि – गुड नाईट यश
सगळीकडे निरव शांतता पसरली होती. अंधारातील हवेची लयबद्ध हालचाल मध्येच अडखळल्यासारखी होत होती. दोघेही आता शांतपणे झोपेच्या स्वाधीन झाले होते…. आणि हो कुठलीही तडजोड न करता…
अभिजीत अशोक इनामदार
क्रमश:
Image by Pete Linforth from Pixabay
Latest posts by Lekhak Online (see all)
- प्राजक्ताचा दरवळ - September 7, 2023
- सोळा नंबरच्या आजी - February 10, 2022
- पुढचं पाऊल- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सुचेता गोखले - July 7, 2021
Mast waiting for next part