शालू विकायचा आहे…गौरी ब्रह्मे
‘लग्नातला लेहंगा, साडी, कुर्ता विकायचाय’ अश्या जहिराती, पोस्ट्स दिसतात. त्यातला प्रॅक्टिकल भाग पटतो. महागाची वस्तू आहे, एकदाच वापरली आहे, आता बसत नाही, सध्या फॅशन नाही, दुसऱ्या कोणाच्या तरी कामी येईल, चार पैसे येतील. सगळं पटतं.
पण मग मन आपसूक कपाटाच्या खणात अगदी मागच्या बाजूला एका कापडात घडी करुन ठेवलेल्या माझ्या लग्नातल्या शालूपाशी जातं. हाच तो शालू ना, जो दुकानात अंगावर घेतल्या घेतल्या सगळ्यांनी पसंतीची मान डोलावली होती? हेच ते मऊ तलम सिल्क, ज्याच्या आमसूली रंगाचं प्रतिबिंब लगेच आपल्या डोळ्यात उमटलं होतं, ज्याचे गोल गरगरीत सोनेरी बुट्टे पाहिल्यापाहिल्या मनात भरले होते. काठ जरा मोठे होते, पण कीती उठून दिसत होते. वधू इतरांपेक्षा वेगळी, उठून दिसायला पाहिजे, हा सगळ्यांचा गोड हट्ट मान्यच होता आपल्याला. एरवी कायमच, पण विशेष करुन लग्नाचे सगळे हिशोब नीट बघणाऱ्या बाबांनी एकदाही कींमतीचं लेबल न पहाता, ‘तुला आवडली आहे ना? मग घेऊन टाक’ असं सांगितलं होतं ती हीच साडी ना?
लग्नातली पिवळी साडी बदलून हा शालू नेसायला घेतला तेव्हा कीती चटकन नेसून झाला! बरोबर पाच सुबक निऱ्या झाल्या, अगदी चापूनचोपून की काय ती बसली. एकदाही बोजड वाटली नाही. त्यानंतर कीतीतरी साड्या नेसल्या असतील, पण या शालूसारखी चप्प आणि मस्त दूसरी कोणतीच साडी बसत नाही. शालू नेसून आले तेव्हा आजेसासूबाईंनी त्यांचे खरबरीत हात तोंडावरुन फिरवून सांगितलं होतं, ‘आता दिसतेस खरी वधू’. याच शालूवर गुरुजींकडून थोडी हळद सांडली गेली आहे. तिचा वास अजूनही येतो पदराला. लग्नानंतर नेसला तो थेट पहिल्या मंगळागौरीला. कोणीतरी लांबच्या नातेवाईक बाई मनाला लागेलसं काहीतरी बोलल्या होत्या, तेव्हा कोणी बघत नाहीये ना याची खात्री करत डोळ्यांतून दोन थेंब खळ्ळकन याच शालूवर तर घरंगळलेले होते. बाकी कोणालाच माहीत नसलेलं फक्त माझं आणि माझ्या शालूचं सीक्रेट आहे ते!
तो वास, ते सीक्रेट साडीबरोबर कसं विकणार? आता आउटडेट झाला म्हणतात, फार भावनिक होऊ नये म्हणतात, पण आपली इतक्या वर्षाची सख्खी मैत्रीण अशी सहज कोणाला कशी देऊन टाकणार? येणाऱ्या चार पैश्यात कदाचित दोन नवीन साड्या घेता येतील, पण आठवणी कश्या विकत घेणार?
जाऊ दे, शालूची घडी उघडून त्याचा वास मनभरून घेऊन ठेवते. त्याच्या किंचितही धस न लागलेल्या नाजूक कलाकुसरीवर हळूच हात फिरवते. कधीतरी लेक, सून “वॉव, काय एथनिक पीस आहे!” म्हणत नेसतील, अपसायकल करतील, त्यांच्या नाती, पणतींना दाखवतील अशी मनोमन इच्छा बाळगते. मायेच्या आठवणींसकट माझ्या शालूची परत कपाटाच्या खणात रवानगी करते.
©गौरी ब्रह्मे
Image by Pete Linforth from Pixabay
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
खूप आठवणी आहेत शालू मध्ये, खूप आवडला लेख👌👌
मस्त