आठवणींची कातरवेळ- कल्लोळ भावनांचा_४

तिन्हीसांज झाली आता तुळशीसमोर दिवा लावायला हवा. दिवा लावल्यानंतर पुन्हा घरात जावंसं वाटायचं नाही. तुझ्यासोबत घालवलेल्या कित्येक संध्याकाळी आठवत अंगणातच बसून राहते मी. 

वर्ष झालं असेल पोरीला अमेरिकेला जाऊन. पण आजही एकही संध्याकाळ तिच्या आठवणींशीवाय जात नाही. परमेश्वरा आधीच्या आठवणी काय कमी होत्या म्हणून त्या पोरीला माझ्याकडे पाठवलंस? परदेशातून भारतात येते काय, इथल्या संस्कृतीचा अभ्यास करते काय, सगळं आगळंच. तिची आणि माझी भेट घडवून आणण्यात नक्की काय प्रयोजन होतं रे तुझं? ह्यांच्यानंतर हक्काची वाटावी अशी ती एकटीच आहे. परत कधी येशील पोरी? जीव लावून पुन्हा दूर निघून गेलीस. रोज तुझ्या फोनची वाट बघत असते मी. तुझी आज्जू वेडी आहे ग अगदी. तू कदाचित काही दिवसांत विसरूनही जाशील मला पण मला मात्र नेहमीच तुझी आठवण येईल. 

आयुष्यातल्या कितीतरी गोष्टी ज्या कोणासमोर कधी बोलू शकले नाही, त्या फक्त जेनीसमोर बोलून दाखवल्या. किती गोड, निरागस मुलगी. हिच्या आईबाबांनी काडीमोड घेताना एक क्षणही पोरीचा विचार केला नसेल? असे कसे वागतात हे लोक? किती सहज नाती तोडून टाकतात. भारतातसुद्धा आजकाल तेच चालू झालं आहे म्हणा. पण नातं तुटलं तरी पोरांसाठी मात्र भांडत असतात. 

वेडी मुलगी! मला नेहमी विचारायची आजी इतके वर्ष संसार कसा काय केलास तू? ग्रेट! 

ग्रेट कसलं डोंबलाचं. गावात असे अनेक संसार सापडतील. पण तिला मात्र अप्रूप वाटायचं साऱ्याचं.

तुझ्याशी अगदी मनमोकळं बोलता यायचं ग पोरी! अचानक कोणीतरी आपल्या आयुष्यात येतं आणि आपल्या आयुष्याचा एक मुख्य भाग बनून जातं. आयुष्याच्या संध्याकाळी असं कोणी येईल याची मात्र मला पुसटशीही कल्पना नव्हती. कौतुक वाटतं मला पोरीचं, साता समुद्रापार परदेशातून दोन वर्षांसाठी भारतात अनोळखी प्रदेशात, अनोळखी माणसांच्यात येऊन राहिली. इथली भाषा, संस्कृती, इतिहास सगळं समजून घेतलं आणि जीव लावून निघून गेली. 

नीरज! पोरी तुझं त्यांच्यावरचं अबोल प्रेम कळलं होतं मला. विचारलं तेव्हा अजिबात गोंधळली नाहीस. उलट ‘मैत्रीच्या नात्याला संपवायचं नाहीये’, असं म्हणून प्रेमाचा रुजलेला प्रेमाचा अंकुर काढून टाकलास मनातून. कौतुक वाटतं तुमच्या पिढीचं मैत्री, प्रेम, करिअर, वैयक्तिक आणि व्यावसायिक नाती, सगळं वेगळं ठेवता येतं तुम्हाला. प्रत्येक नात्यांच्या मर्यादा ठाऊक असतात तुम्हाला. म्हणूनच कदाचित नाती फुलवणं अवघड जातंल असावं. काही नात्यांना मर्यादेमध्ये नाही बांधता येत. मुक्तपणे सर्वस्व उधळून द्यावं लागतं. अर्थात हे आमचे विचार झाले. सर्वस्व उधळून देतो आम्ही पण त्यावेळी स्वत्व मात्र विसरतो कधीकधी. पण तू मात्र मला ते शिकवलंस बाळा. स्वतःसाठी पण जगायचं असतं हे माहितीच नव्हतं ग मला. आयुष्याच्या उतारवयात का होईना पण तुझ्यामुळे मी स्वतःला ओळखलं. 

पण खरं सांगू बाळा, नाही जमत ग आता स्वतःसाठी जगायला. आयुष्यभर सतत दुसऱ्याचा विचार केला. सुरुवातीला संस्कार म्हणून तर कधी विरोध करायची हिम्मत नाही म्हणून आणि नंतर वाद नको म्हणून जे आहे, जसं आहे तसं स्वीकारत गेले. इतक्या वर्षांत हे सगळं अंगवळणी पडलं आहे. आता स्वतःचा विचार करायचा म्हटलं तरी जमत नाही ग. 

दोन पिढ्यांचं अंतर असूनही आपली छान मैत्री झाली. आमच्या पिढीच्या सगळ्या गोष्टी तू अगदी सहज समजून घेतल्यास. तुमच्या पिढीला समजून घेण्यात आम्ही कुठेतरी कमी पडतोय का? तू काय नीरज काय, तुम्हाला पटणाऱ्या गोष्टी तुम्ही सहज स्वीकारता. आयुष्याचे सगळे बरे वाईट निर्णय स्वतःहून घेता आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम राहता. पण भावनांनाही आयुष्यात स्थान द्या रे बाळांनो? ही कातरवेळ तुझी आठवण घेऊन येते ग जेनी. पूर्वी आवडायचं आठवणीत रमायला पण तुझी आठवण सहन होत नाही मला. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात. फोनवरून तू भेटल्याचं समाधान नाही मिळत ग. तू लवकर परत ये जेनी, लवकर परत ये!”

जेनीच्या परत येण्याच्या आशेवर असणाऱ्या रमाबाईंच्या आयुष्यात जेनी परत येईल का? कठीण खरंतर अशक्य गोष्ट आहे ही पण हे रमाबाई स्वीकारतील का? 

 

Image by ReLea from Pixabay 

Manasi Joshi
Latest posts by Manasi Joshi (see all)

Manasi Joshi

कायद्याची पदवी. सात वर्ष लीगल फिल्डमध्ये काम केल्यावर नंतर स्वखुशीने स्वीकारलेला 'हाऊस वाईफ'चा जॉब. आवड म्हणून सुरू केलेलं लिखाण आता प्रोफेशनमध्ये बदललं आहे. सध्या अर्थसाक्षर.कॉम या वेबसाईटसाठी एडिटर आणि कंटेंट मॅनेजमेंटचं काम करते. - मानसी जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!