शंकेचे डायनोसॉर आणि आपण…- गौरी ब्रह्मे

“आई, मला इंस्टाग्रामवर यायचं आहे. माझे बरेच क्लासमेट्स तिथे आहेत.” इति आमचं लेकरु, इयत्ता नववी. (फेसबूकवर यायचंय नाही म्हणाला, कारण तिथे घरातल्या सर्वात मोठ्या वॉचमनचा संचार आहे हे त्याला बिचाऱ्याला आतापर्यंत कळून चुकलंय!) माझ्या मनात शंकेची पहिली पाल चुकचुकली. हा क्लासमेट्स का बरं म्हणाला, फक्त मित्र का नाही? नववीतल्या मुलांच्या आयांच्या डोक्यातल्या शंकेच्या पालींचे डायनोसॉरचं पिल्लू व्हायला वेळ लागत नाही.
आपली मुलं कधी ना कधी मोठी होणार, ती सोशलमीडियावर येणार, पोस्ट, लाइक, कॉमेंट करणार, हे माहीत असतं, पण प्रत्यक्षात ती वेळ आली, की आपण याची काहीच पूर्वतयारी केली नसल्याने नक्की कसं रिएक्ट करायचं ते समजत नाही. आपण स्वतः एका गर्दीच्या, अनोळखी, चांगल्यावाईट गोष्टींची सरमिसळ असलेल्या ठिकाणी, काही वर्षांच्या अनुभवानंतर एका सराइताप्रमाणे वावरत असतो तोवर ठीक, आपलं लेकरु जेव्हा याच गर्दीत यायचं म्हणत तेव्हा थोडीशी काळजी वाटतेच. शंकेच्या डायनोसॉरचं पिल्लू मोठं होत असतं.
मी, कश्याला हवंय अकाउंट? तिथे काय करणार? कोणाशी बोलणार? वगैरे जराशी तोंडी परीक्षा घेत ठीक म्हणाले. असंही त्याला त्याच्या शाळा, अभ्यास, क्लास, फुटबॉल, बॅडमिंटन, यूट्युबवर बॉटलफ्लिप, फनी व्हिडियोज बघणे, बहिणीशी भांडणे यातून इंस्टाग्रामसाठी कीती वेळ मिळेल ते माहीत नाही, पण नववीतल्या मुलांशी फार आर्ग्यू करु नये, अख्खा दिवस त्यात जातो.
“अकाउंट कोण ओपन करणार?” उत्तर आलं, “अर्थात तू!” “अच्छा! म्हणजे पोट्ट्याची अगदीच बेसिकपासून सुरुवात होती तर. आम्ही दोघांनी मिळून अकाउंटचे सोपस्कार केले. पासवर्डची वेळ आली, “ए इकडे दे ग फोन” असं म्हणून हळूच लपतछपत काहीतरी टाईपण्यात आलं. पण स्ट्रेंथ कमी पडली. परत आईचाच आधार. पासवर्ड कसा महत्वाचा असतो यावर मी एक छोटं लेक्चर झाडणार तोवर “माहित्येय मला”नी आमच्या चर्चेची सांगता झाली. आपल्या मुलांना आपल्यापेक्षा आधीच काही गोष्टी नीट माहीत असतात, मी मनातल्या शंकेच्या डायनोसॉरच्या पिल्लाला बजावलं.
मग फोटो अपलोड करणे, फॉलो करणे, होणे, कॉमेंट करणे, बदाम देणे, वर एक छोटं सेशन झालं. “आता इथे चॅट उघडून दे” इति लेकरु. इथे चॅट पण करतात? माझ्या माहितीत नवीन भर पडली. “हो, आम्ही फ्रेंड्स इथे चॅटींग करतो.”(परत फ्रेंड्स! मित्र नाही. म्हणजे स्त्री+पु, फक्त पु. नाही🙈 शंकेचा डायनोसॉर मोठा होत होता!) हे लोक इकडे का चॅटींग करतात असा प्रश्न मला पडलेला असतानाच एकदम आठवलं, बरोबर. वॉट्सऍप आणि फेबूवर यांच्या आईवडिलांनी, तथा सगळ्या चाळीशीतल्या चोरांनी ठाण मांडलय, या बिचाऱ्यांना तिथे मुभा कुठाय?
ते चॅटींग शेवटी आम्हाला सापडलं, मग तिथे त्याचे काही “फ्रेंड्स” पण दिसले. तोवर इकडे त्याच्या प्रो पिकला दोनचार बदाम आले. लेकरु खुश झालं. ते बघून लगेच मला “आता तू जा” म्हणालं. गरज सरली होती, त्यामुळे वैद्य मेला तरी चालणार होतं. पण मी जाताजाता निग्रहाने सोशल मिडियाचे काही एटिकेट्स त्याला आईच्या कर्तव्याने सांगितलेच. विशेषतः कोणत्याही अनोळखी माणसांशी, मुलींशी बोलतानाच्या काही मॅनर्स पाळायच्या असतात हे सांगितलं. “हो ग बाई” म्हणून मला कटवण्यात आलं.
जाताजाता मी हळूच विचारलं, “मी करु का फॉलो तुला?” इंस्टंट उत्तर आलं,” हो कर की. त्यात काय!” मुलं जेव्हा तडक उत्तर देतात तेव्हा त्यांच्या मनात काही फार काळंबेरं करण्याची शक्यता नसते, आपला त्यांच्यावर विश्वास मात्र हवा, असं म्हणून मी शंकेच्या डायनोसॉरला गपगुमान झोपवलं.
कालच लेकरु सांगत आलय, त्याचा एक फोटो इंस्टाग्रामवर भलताच पॉप्युलर (म्हणजे १८/२० बदाम! त्याच्या दृष्टीने ते खूssप आहेत) झालाय. मी विचारलं, कोणता फोटो? तर म्हणे, त्याच्या मुंजीतला, मी त्याला भिक्षावळ घालतानाचा.
मनातल्या शंकेच्या डायनोसॉरच्या पिल्लाला आणि त्याच्या आईला, म्हणजे पालीला पार हाकलवून दिलय सध्या!
😊😊
Image by Pete Linforth from Pixabay 
Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

One thought on “शंकेचे डायनोसॉर आणि आपण…- गौरी ब्रह्मे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!