करणी- गौरी ब्रह्मे
पन्नासएक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
सदानंद एका मोठ्या कुटुंबातला सर्वात थोरला मुलगा. वडिलांची सरकारी पण तुटपुंज्या कमाईची नोकरी आणि घरी खाणारी तोंड सात. वाड्यातलं स्वतःच घर होतं तोच काय तो एक दिलासा होता. त्याच्यापाठी घरात चार लहान भावंडं. सदानंद हुशार होता, दिसायला देखणा होता. लवकरच इंजिनियर होणार होता. संपूर्ण घराची भिस्त आता त्याच्यावरच होती. तो इंजिनीयर होईल, त्याला नोकरी लागेल, मग घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या तो घेईल याच आशेवर होते सगळे.
वाड्यात इतर अनेक कुटुंबं होती. यातल्या एका कुटुंबाकडे अलीकडे सदानंद सारखा जायला लागला होता. साहजिक होतं, त्या घरात एक त्याच्या इतकीच एक तरुण मुलगी होती. कमीचं कुटुंब म्हणू आपण त्याला. वाड्यातल्या सर्वाना आश्चर्य वाटायचं की हा सदानंद कमीकडे जातो तरी कसा? कारण कमी म्हणजे साक्षात चेटकिणीचं रूप! दोन पुढे आलेले दात, कुरूप चेहरा, बेढब शरीर आणि याउपर अगदीच जेमतेम बुद्धिमत्ता. देवाने देताना सगळ्या वाईटच गोष्टी कश्या काय एकाच मुलीला दिल्या होत्या कोण जाणे. त्यात सदानंदशी तिची कुठल्याच बाबतीत बरोबरी नाही, काँपॅटीबीलिटी नाही.
आणि एक दिवस ज्या गोष्टीची सर्वाना भीती वाटत होती तेच झालं. सदानंद आईच्या दोन सोन्याच्या बांगड्या घेऊन कमीबरोबर घरातून पळून गेला. कायमसाठी. घरातल्या सर्वांनी, विशेषतः सदानंदच्या आईने हाय खाल्ली. घरातला कर्ता मुलगा, ज्याच्यावर सर्वात जास्त आशा केंद्रीत होत्या, जो सगळ्यात प्रिय होता, तो न सांगता सवरता निघून गेला. या गोष्टीचं दुःख ती माऊली कधीच विसरू शकली नाही. सदा sss नं ss द अशी तिची भेसूर किंकाळी वाड्याच्या भिंती अनेक वर्षे भेदत राहिली.
कोणी म्हणतात सदानंदवर कमीच्या आईने करणी केली. ती करणी, काळी जादू वगैरे करायची. अनेकदा लोकांनी तिच्या घरात काळ्या बाहुल्या, कुंकू, तांदूळ वगैरे पाहिले होते. आपल्या मुलीला कोणताच मुलगा लग्नासाठी मागणी घालणार नाही हे तिला चांगलंच माहीत होतं, त्यामुळे सदानंदला तिने हेरलं आणि वश केलं. खरखोटं देव जाणे पण अनेक लोक याची ग्वाही देतात.
गोष्ट इथेच संपत नाही. आयुष्य कोणासाठी थांबत नाही. यथावकाश लोक दुःख विसरतात आणि पुढे जगू लागतात. सदानंदला मी मधूनमधून भेटते. आता त्याला पतवंडं पण झाली आहेत. घर सोडल्यावर स्वतःच्या हुशारीमुळे वैयक्तिक प्रगती खूप केली त्याने पण कौटुंबिक सुख, आनंदी सहजीवन हे त्याला कधीच मिळालं नाही. कमीच्या विचित्र स्वभावामुळे तो आयुष्यभर पिचत राहिला. कोणत्या क्षणी त्याला हे असं वागण्याची विचित्र बुद्धी झाली हे तो आत्ताही सांगू शकत नाही. पण त्या क्षणाची किंमत तो आयुष्यभर फेडत राहिला, अजूनही फेडतो आहे. आपल्या अवतीभवती किती अनाकलनीय, कल्पनेबाहेरच्या गोष्टी घडत असतात हे सदानंदकडे पाहून समजतं.
त्याला आता विचारलं, आयुष्यभर इतकं सोसलंस, तुझी शेवटची इच्छा काय असेल? तर त्याचं उत्तर येतं, ‘फक्त एकदा आई ssss अशी वाड्याची भिंती भेदणारी किंकाळी मारत तिच्या कुशीत शिरायचंय ग!’
Image by Pete Linforth from Pixabay
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
Why I am not able to read free content
You should be able to read it. please try again and let us know.
Today I renewed my membership and now I was able to access. Thanks