आईपण……

“किती गबाळेपणा हा गौरी ? तू अशीच रूम टाकून ऑफिसला जाणार आहेस का ? हे कपडे कुठं पडलेत? चादरीची घडी नाही ? लॅपटॉप तसाच बेडवर रात्रभर ? काय करावं तुझं ?”

” बाबा, बाबा …. अरे किती चिडतोस तु हल्ली, …..

तुझं बीपी , शुगर सगळं चेक करून घे बघू आजच.”

तसा तो हसू लागला, …..

“हसायला काय झालं ?”

ती थोडी आश्चर्यचकित ….. तिनं बाबाला कित्येक वर्षात असं हसताना पाहिलं नव्हतं.

“मागच्या वीकेंडलाच जाऊन आलोय, ….. डॉ मानसीकडे, …. सगळं ऑलवेल आहे म्हणाली. काहीही म्हण, डॉ मानसीच्या  ट्रीटमेंटमुळं माझे सगळे रिपोर्ट्स कंसिस्टंटली नॉर्मल येत आहेत.”

हा गौरीसाठी दुसरा धक्का होता,……

इतका कटकट्या आपला बाबा कुणाचं तरी कौतुक करत होता,

घरातल्या कामवाली पासून ते त्याच्या ऑफिसमधल्या त्याच्या बॉसलाही छळणारा तिचा बाबा , ….. थोडा वेगळा वाटत होता.

त्यानं व्हीआरएस घेतली म्हणून बॉस सुटला खरंतर….

“सँडविच खाऊन घे, ऑफिसला उशीर होईल. मी जरा मॉर्निंग वॉक करून येतो.”

तो गेला…

हा तिसरा धक्का, …..

आई गेल्यानंतर आई अन बाबा असे दोन्ही रोल करणारा बाबा अचानक कसा बदलत गेला हे तिलाही समजलं नव्हतं….

की करियरच्या नादात आपलं लक्षच नाही बाबाकडे, …

असो, ….. बदल पॉजिटीव्ह होते …..

तिनं फटाफट आटपून ऑफिसची बॅग, …. लॅपटॉप घेतला, ….

गाडी काढली ….. निघाली…

ओह नो …… पहिल्याच चौकात इतक्या सकाळी ट्रॅफिक जॅम …

ती वैतागली …..

समोरून गजरेवाले ….. साईडच्या काचेतून भिकारी …. सगळे ट्रॅफिक सिग्नलवरचा आपापला अधिकार गाजवत होते,

काचा टकटक वाजवत होते……

ती कधीच लक्ष देत नसे …

पण आज जॅम खूप जास्त होता, ती वैतागली …..

डावीकडच्या काचेवर टकटक करणाऱ्या भिकाऱ्याला झापायला काच खाली केली ……

तिचा रागीट चेहरा पाहूनच भिकारी पळाला,. … .

आणि ………….

आणि …………

पलीकडे रस्त्याच्या कडेच्या नानानानी पार्कमध्ये तिचा बाबा,……. आणि …..

ती ………

हो …… तीच ….

डॉ मानसी, ……

खरंतर फक्त मॉर्निंग वॉकच करत होते ……

पण जरा जास्तच हसतखेळत …….

इथं काय काम होतं तिचं…….

चार चौक पलीकडं राहते ती …..

चोंबडी कुठली ……..

कित्येक वर्षे एकटीनं आयुष्य काढलं होतं तिनंही,. . . . . . .

समोरून पोलिसाने काच वाजवायला सुरुवात केली तेव्हा तिच्या लक्षात आलं, ….. ट्रॅफिकसुटलं …. आणि सगळे मागचे हॉर्न ….. पोलिसांची शिट्टी  ….. सगळा गोंधळ नुसता ……

तिने गिअर टाकला …..

……………. . . . .. . . . . . .. . . . . . . . . . . .  . ..

आज ऑफिस मध्येही मन लागतच नव्हतं खरं ……

खरंच बाबा ….. आई गेल्यापासून एकटाच होता,

ही मस्ट बी फीलिंग लोनली …..

पण इतक्या वर्षात कित्येक स्त्रिया होत्याच की ऑफिसात, …. शेजारीपाजारी …..

पण बाबा तसाच होता ………

या वेळी मात्र बदलला होता …….

नाहीतर तिचा आळशी बाबा अन तिलाच आळशीपणावरून लेक्चर ….. मॉर्निंग वॉक ….. खळखळून हसणं ….

छे …. आपलीच नजर लागायची बाबाला …..

विचार करून नुसता भुगा झाला ……………

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

“आता या पोळ्यावाल्या मावशींना काय झालं ?”

” का ?”

“अरे बाबा, कशा लागतायेत या पोळ्या, …… आणि तेलाचा एक थेंब नाही.”

“मल्टीग्रेन आटा आहे तो, … मानसीने सांगितलेल्या प्रमाणात सगळं दळून आणलंय , …….. इट्स हेल्दी ….”

कसलं आलंय हेल्दी , …. ती मनात वैतागली …..

आणि पुन्हा मानसी …… फक्त मानसी ….. मागचं डॉक्टर राहीलं मागेच …..

” बाबा ,……. अरे काय त्या डॉक्टर मानसीचं ऐकतोस ….. वेडी वाटते मला ती.”

गौरी मुद्दाम म्हणाली ….

” वेडी ?”

” नाही तर काय , काय येतं रे तिला ?”

” हे बघ गौरी, विद्वान डॉक्टर आहे ती ”

” हो का ? …….. दिसते तर काय …. स्वतःला 21 वर्षांची तरुणींच समजते ….”

” ……..”

” शोभतं का हे असं राहणं तिला ?” गौरी बॉम्बवर बॉम्ब टाकत होती.

“गौरी मला तरी ती डिसेंट वाटते, ……. आणि किती छान … सोपे सल्ले देते. बघ तुझ्या बाबाची तब्येत कशी ठणठणीत आहे. मला वाटतं you should have some respect for senior citizens. हो …. आणि दिसण्याचं काय ? छान दिसते की ….. हा बघ फोटो, …… आताच अपलोड केलाय तिनं .”

बोलताबोलता समोर पडलेल्या मोबाईलवर तिचा एफबी प्रोफाइल बाबा दाखवून गेला, ……. अन चाचपडला…… गौरीचे मोठे डोळे पाहून. ……

एवढंच बोलून बाबा खालमानेनं जेवण उरकू लागला.

म्हणजे एफबी फ्रेंडशिपनंतर फॉलोइंग सुरू आहे तर,

भांडी विसळतानाही बाबा काहीच बोलला नाही.

नंतर बाल्कनीत जाऊन उभा राहिला.

गौरीने आणलेला डार्क चॉकलेटचा एक पीस न बोलताच घेतला अन तोंडात टाकला.

हम्म्म …… बाबा रुसला होता तर.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

नेहमी प्रमाणे ती तिच्या ऑफिसला जायला निघाली, चौथ्या चौकात अभावीतपणे स्टीअरिंग डावीकडे वळलं अन सरळ डॉक्टर मानसी’ज क्लिनिक समोर तिची कार थांबली.

मानसीनं गौरीला कधीही पाहिलं नव्हतं.

“डॉक्टर मानसीना भेटायचंय,  …. अपॉइंटमेंट घेतलेली नाहीये, पण something urgent. मी मधूबन सोसायटीतून आलेय.”

ती रिसेप्शन काउंटरवर एका दमात बोलून मोकळी झाली.

इतक्यात आतून फोन आला,

“काय गोंधळ सुरू आहे, बाहेर. . . .”

“कुणीतरी मुलगी आलीय, मधूबन सोसायटीतून. . . . . Urgent काम आहे म्हणतेय.”

“मधूबन सोसायटी ? . . . . . ठीक आहे, आत पाठव.”

“आत बोलावलंय तुम्हाला ……”

गौरी आत गेली,

“या बसा , काय काम होतं.”

“सॉरी हो, … अपॉइंट्मेंट न घेताच आले, ….. पण ते तुमचे पेशंट आहेत ना मधूबन सोसायटीत,……”

“हो , हो माधव …..”, मानसी थोडी एक्साईट झाली, गौरीचं बोलणं मध्येच तोडत बोलून गेली…. ” काय झालं त्याला?”

ती काळजी …… एक्साईटमेंट . . … गौरीला स्पष्ट दिसत होती. अन माधवरावांचा माधव झालेलाही तिला दिसत होता.

“माणूस फार विचित्र होत चाललाय हो, मी शेजारीच राहते त्यांच्या.”

“विचित्र म्हणजे नक्की काय करतात”

“अहो, रात्रीचे करावके लावून गाणी काय म्हणत बसतात, बाल्कनीत उभे राहून स्वतःशीच हसत राहतात. कानात ब्लुटूथ लावून कुणाशी बोलत चालत असतात, माहीत नाही, . . . .”

“हो हो पण यात त्रासण्यासारखं काय आहे?”

मानसी अगदी प्रसन्न हसत म्हणाली. तिचं ते गोड हसू गौरीलाही शहारे देऊन गेलं. बिचाऱ्या बाबाचं काय होत असेल? ……गौरीला मोठी गम्मत वाटली.

“अहो, रात्री बेरात्री कधीही गाणी म्हणायला सुरू करतो हो हा माणूस, . ….. गाणी म्हणत रस्ता क्रॉस करतो, . …ऍक्सिडेंट वगैरे झाला तर . .  ……  परवा कसला कुकिंगचा प्रयोग करता करता, कुकरची शिट्टी उडाली,. . …. काही सांगायला घरी गेलं की हसत सॉरी म्हणतो, अन परत आपल्याच धुंदीत. ……. तुमच्याकडे ट्रीटमेंट सुरू आहे, असं त्यांची मुलगी म्हणाली, ….. म्हणून तुमच्या कानावर घालावं म्हटलं, …… खरंतर ती पण वैतागलीय, या बदलाला, ……”

“ओह, …. असं आहे तर, नका काळजी करू तुम्ही. मी बोलीन त्यांच्याशी …..पण गौरी का वैतागलीय …….. तिला तर, आनंद व्हायला ह्वा खरंतर”

“ते माहीत नाही, ….. पण पॉजिटीव्हिटी सिंड्रोम अ‍सं काही असतं का हो ?”

आता मात्र मानसी खळखळुन हसली,

“असं काही नाही हो, प्रेमात पड्ल्यावरही असं होउ शकतं की.” हे बोलताना, मानसीच्या गालावरची खळी खुप काही सांगुन गेली.

“ते ही आहेच म्हणा, ….” गौरी उगाच अलिप्तपणा दाखवत म्ह्णाली, “पण समजा हे सगळं तुम्ही सांगताय तसंच असेल अन त्या स्त्री ने धोका दिला तर हा माणुस तर कोलमडून जाईल. …. नंतर शेजाऱ्यानाच सगळं पहावं लागतं हो, ….. म्हणुन म्हटलं. तशीही त्यांची मुलगी काही लक्ष देत नाही. त्या पेक्षा आधीचा भांड्कुदळ शेजारीच बरा होता, असं व्हायला नको.”

“असं कसं म्हणता तुम्ही? ती का सोडुन जाईल माधवला? ……तुम्ही त्याच्या काळजीमुळं बोलत आहात, म्हणुन काहीही बोलाल का ?………” मानसी थोडी ओरडुनच बोलली…..

“काही सांगता येत नाही हो हल्ली,…….आणी त्या माधवरावांचं काय घेउन बसलात, कोण वेडी प्रेम करेल अशा माणसावर?”

“बस्स, खुप बोललात आता,……. माधव काय आहे, आणी कसा आहे, हे मला चांगलं माहीत आहे. तुम्ही मला सांगायची गरज नाही. प्रेम कशाशी खातात हे तरी माहीत आहे का आपल्याला ?”

“ ……… …….. …..” गौरीनं तोंड उघडायचा निष्फळ प्रयत्न करुन पाहीला.

“हे पहा, मला काहिही ऐकुन घ्यायचं नाही, तशीच वेळ पडली तर माझा नंबर घेउन ठेवा. सोसायटीचं काही म्हणणं असेल तर मी बोलुन घेइन त्यांच्याशी….ही डायरी घ्या,” असं म्ह्णत तिनं आपली डायरी समोर सरकवली, यात तुमचं नाव अन मोबाइल नंबर टिपुन ठेवा,…. आणी निघा, …..”

नाव लिहिता लिहिता गौरी मनातल्या मनात हसत होती, अन म्हणत होती, बरंय ग बाई, तुला तरी माहीत आहे, प्रेम काय असतं ते, शिकीन आता तुझ्याकडुनच.

केबिन मधून बाहेर पडता पडता गौरी मागे वळून हसली फक्त, अन बाहेर पडली.

एका लेकीमध्ये दडलेली आई, निर्धास्त झाली होती, …… चेहऱ्यावरचा आनंद लपवू शकत नव्हती.

रिसेप्शन जवळ येते न येते तोच, रिसेप्शनिस्ट चक्क उठून उभी राहिली,

गौरीला काही समजेना, …… ती एक क्षण थबकली,

इतक्यात मागुन आवाज आला,

“ग़ौरी माधवराव बर्गे”

डॉ मानसी डायरीतलं नाव वाचत बाहेर येत होती. आणी गौरी तिच्याकडे खट्याळपणे हसत पहात होती.

मघाशी केबिन मधलं ते, कधी जाळ, तर कधी मधाळ, असं वादळ अश्रुत पार विरघळलं होतं.

ती आता गौरी समोर, गौरीचे हात हातात घेउन उभी होती. डोळे काठोकाठ भरुन दोघी एकमेकींकडे पहात होत्या.

“माझीच परीक्षा पहात होतीस होय गं ?” घनभरल्या आवाजात मानसी म्हणाली, “तु लेक असुनही, आईपण निभावलंस…….”

Image by pasja1000 from Pixabay 

B_R Pawar
Latest posts by B_R Pawar (see all)

B_R Pawar

बी आर पवार , भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याखेरीज कथा, कविता, चित्रकलेत रमतो. जीवनानुभव शब्दात चितारायला आवडतो.

8 thoughts on “आईपण……

  • April 10, 2020 at 3:30 am
    Permalink

    अतिशय सुंदर कथा

    Reply
    • April 12, 2020 at 8:22 am
      Permalink

      धन्यवाद

      Reply
    • April 21, 2020 at 1:25 pm
      Permalink

      मस्त कथा

      Reply
  • April 12, 2020 at 8:22 am
    Permalink

    धन्यवाद

    Reply
    • April 7, 2021 at 9:06 am
      Permalink

      Sarvat sunder katha……
      Awesome…..
      lihile ahe…

      Reply
  • April 12, 2020 at 6:10 pm
    Permalink

    अप्रतिम

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!