अश्रुफुले (प्रकरण ९ वे)- अभिजित इनामदार
अवीच्या अपघातानंतर काही लोकांच्या मदतीने मृणालने त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल केले. चांगली बातमी अशी होती कि श्वास चालू होता. पण अवि बेशुद्ध होता. मृणालने यशला कळवले होते. तो आणि त्यांचे आणखी दोन मित्र धाऊन आले होते. हॉस्पिटलच्या सगळ्या फॉर्म्यालिटीज यश आणि त्यांच्या मित्रांनी पूर्ण केल्या. मृणालचे डोळे रडून रडून लाल झाले होते. डोळे सुजले होते. तिच्या उजव्या हाताला लागले होते आणि तिचे त्याच्याकडे लक्षच नव्हते. पण आता हात ठणकत असल्यामुळे ते जाणवत होते. तरीही ती ICU च्या बाहेर बसून होती. यशने ते पाहिले… तिला बळेच डॉक्टरांकडे घेऊन गेला. ड्रेसिंग करून घेतले. तिला आग्रह करून चहा घ्यायला लावला. त्यामुळे मृणालला जरा तरतरी आली.
अविला हॉस्पिटल मध्ये दाखल करून १२ तास उलटून गेले तरी तो अजून शुद्धीवर आला नव्हता. त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला हातापायाला कुठेही फ्रॅक्चर नव्हते. फक्त काही ठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्यातून डोक्याची जखम जरा मोठी होती. डॉक्टरांचे असे म्हणणे होते की अशा केसेस मध्ये असे होते. २४ – ४८ तास पेशंट शुद्धीवर येत नाहीत. त्यामुळे वाट पाहण्यापलीकडे कोणाच्याच हाती काही नव्हते.
बरोबर चोवीस तासांनी अवि शुद्धीवर आला. मृणालच्या जीवात जीव आला. पण मृणालला झालेला आनंद हा फार काळ टिकला नाही कारण जेव्हा अवि बोलू लागला आणि डॉक्टर्सनी सगळ्या गोष्टी चेक करून पहिल्या तेव्हा त्याने सांगितले की त्याला समोरचं काहीच दिसत नाही. बघता बघता सगळ्यांचे डोळे पाणावले. ऋतुजा सुद्धा कालपासून मृणाल बरोबर हॉस्पिटलमध्ये थांबून होती. ती सुद्धा तिला धीर देत होती. डॉक्टर साने ज्यांचा गेल्या २० वर्षांचा आय स्पेशालीस्ट म्हणून असलेला अनुभव आता पणाला लागला. त्यांनी सगळे चेकअप केलं. मग पुन्हा मेंदूच्या स्कॅनिंगच्या टेस्ट झाल्या. काहीही निष्कर्ष काढण्या आधी त्यांना सगळ्या शक्यता पडताळून पहायच्या होत्या.
मृणाल – डॉक्टर अवि ठीक होईल ना? तो पाहू शकेल ना?
डॉक्टर – हे बघा मी अजून सध्या सगळे तपासतो आहे. पण मी तुम्हाला खोट्या आशा दाखवणार नाही.
मृणाल – म्हणजे नक्की काय झालय डॉक्टर? त्याच्या डोळ्याच्या आयबॉलला इजा झालीय की रॅटिनाला इजा झालीय? कुठलाही एक डोळा सुद्धा नाही का ठीक होऊ शकत?
डॉक्टर – आयबॉल किंवा रॅटिना संदर्भात काही असतं तर काहीतरी करता आलं असतं. पण ह्याच्या डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या पूर्णपणे खराब झाल्यात. डोक्यावर पडल्यामुळे हे घडले असावे. त्यांना आधी काही त्रास होता का डोळ्यांसंदर्भात?
मृणाल – नाही त्याला काही त्रास नव्हता. पण खरच काही नाही होऊ शकत का?
डॉक्टर – मी तुम्हाला आधीच म्हणालो होतो की मी तुम्हाला खोटी आशा नाही दाखवणार. पण पाहू काही करता येईल का ते. लेट्स प्रे टू गॉड.
खोलीत भयाण शांतता पसरली.
अविचा हात हातात धरून मृणाल बसून होती. काहीतरी मार्ग निघेल असा त्याला धीर देत होती. त्याला धीर देताना स्वतः मात्र मनातून प्रचंड घाबरली होती. कधी कधी आयुष्यात अशी एखादी गोष्ट घडते की सगळं होत्याचं नव्हतं होऊन जातं. सगळं कसं छान सुरु आहे असं वाटत असताना असं काहीतरी घडून जातं. आपल्याच बाबतीत असं का घडतं हे मात्र काही कळत नसतं. माणुस कितीही मोठा झाला, कितीही शोध लावले तरीही काही गोष्टी ह्या माणसाच्या हाताबाहेरच्या असतात. आणि जेंव्हा गोष्टी आपल्या हाताबाहेर जातात तेंव्हा त्याला कळून चुकते की आपण सर्वोच्च शक्ती नाही. आपल्यावरती एक अज्ञात शक्ती प्रभुत्व गाजवीत असते.
जेंव्हा डॉक्टर त्यांच्या हाताबाहेर एखादी गोष्ट जाते तेंव्हा चमत्काराची अपेक्षा ठेवतात, तेंव्हा तिच शक्ती काही माणसांना वाचवीत असावी का? आणि ती अद्भुत शक्ती म्हणजेच… देव असावा का? पण हि शक्ती असे का वागते? एवढ्या आनंदाच्या क्षणांची दानं पदरात टाकलेली असताना अचानक हि अशी उलटी दानं का पडतात पदरात? ह्या प्रश्नाला काही उत्तर नाही. खरच माणसाचं प्रारब्ध असतं? ते जर असेल तर आयुष्याच्या या वळणावर अविच्या भाळी असे भोग का लिहिले गेले असावेत? एखाद्याचं भाग्य आपण लिहिण्याचा कंट्रोल हा नक्की कुठे असेल? कोणाजवळ असेल? कसा असेल? आयुष्यात आपण कितीतरी गोष्टींवर आपण कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करतो, काही बाबतीत ते आपल्याला शक्यही होतं, पण काही काही गोष्टी का सध्या होत नाहीत ह्याला काही उत्तर नाही.
असेच अनेक विचार, प्रश्न मृणालच्या मनात फेर धरत होते.
अवि शुद्धीत आल्यानंतरचा दुसरा दिवस –
मृणालने अजून जिद्द सोडली नाही. तिने अजून काही आय स्पेशालीस्टना भेटण्याची तयारी केली. सगळे रिपोर्ट्स जमा केले. अविला तसे सांगितले. त्या स्पेशालीस्ट डॉक्टरांच्या व्हिजिट अरेंज केल्या. दिवसभर त्यांच्या मागे धावली. पण सगळे व्यर्थ गेले. कोणाही डॉक्टरकडून काही सकारात्मक उत्तर आले नव्हते. ती पुरती निराश झाली. हताश होऊन अवीच्या डोक्यापाशी बसून राहिली. सगळा दिवस त्यातच गेला.
अवि शुद्धीत आल्यानंतरचा तिसरा दिवस –
मृणाल शांत विचार करत बसली होती. आता अवि आयुष्यात कधी पाहू शकेल? पाहू शकेल का नाही हेच प्रश्नचिन्ह उभे होते. यापुढे अविला प्रत्येक गोष्टीत कोणाच्यातरी आधाराची गरज भासेल. मीच तो आधार त्याला देऊ शकेन. पण. पण ते कसे शक्य आहे? चार दिवसांनी मला अमेरिकेला जायचे आहे. मला खूप प्रयत्नांनी माझे स्वप्न पूर्ण करण्याची संधी. एम.एस. करण्याची संधी मिळाली आहे. ते सोडून देऊ काय? अविला काय वाटत असेल आत्ता. मी त्याच्या सोबत असणे गरजेचे आहे. तो किती हळवा आणि भावनिक आहे. मी त्याच्या सोबत राहावे असेच तर त्याला वाटत असेल. पण मी जर हि संधी सोडून दिली तर मी स्वतः खुश राहू शकेन? काय करू? आपण जो काही निर्णय घेऊ त्याने नक्कीच आपल्या दोघांची आयुष्य बदलणार आहेत. तिच्या मनात दोन मी चं वादंग काही केल्या शमत नव्हतं.
संध्याकाळी ती हॉस्पिटल मध्ये आली.
अविला ती आल्याचे समजले.
अवि – मृणाल. थकलीस ना धावपळ करून?
मृणाल – नाही रे.
थोडावेळ शांत गेला तिने त्याचा हात हातात घेतला. त्याला खूप बरे वाटले. ह्या अचानक आलेल्या अंधात्वाने पहिले दोन दिवस तो प्रचंड घाबरला होता. रडला होता. पण आता त्याने स्वतःला सावरले होते.
मृणाल – अवि अरे साखरपुडा.
पुढचे तिला बोलू न देता अवि म्हणाला
अवि – आता कसला साखरपुडा? आता अशा अवस्थेत तुझे आई बाबा माझ्याशी तुझे लग्न लाऊन देतील असे वाटते तुला? अगं तुला इथे मला भेटायला येऊन देतायत हेच खूप नाही काय?
मृणाल – असे रे काय बोलतोस अवि?
तेवढ्यात मृणालचे आई बाबा आत आले.
बाबा – आगदी बरोबर मृणाल. अरे अवि बेटा हेच जर साखरपुडा किंवा लग्नानंतर झाले असते किंवा देव न करो पण असेच माझ्या मुलीबद्दल झाले असते तर तू तिला वाऱ्यावर सोडून दिले असते काय?
अवि – अहो बाबा तसे नाही पण. हे खूप अवघड होईल आत्ता. आत्ता वाटतात तेवढ्या गोष्टी सोप्या नसणार आहेत. हे नवीन अंधत्व माझी खुप परीक्षा पाहिल. त्यात मृणालच्या इच्छा, आकांक्षा, तुम्ही तिच्यासाठी पाहिलेली स्वप्नं सगळं धुळीस कसं मिळवून देऊ तुम्हीच सांगा?
बऱ्याच चर्चेनंतर आत्ता साखरपुडा नको, असे ठरले अन मृणालचे आई बाबा आणि मृणाल घरी गेले.
अवि विचार करत राहिला –
आता इथून पुढे मला स्वतःला सावरायला वेळ लागेल. माझ्या हक्काचं माणुस मला सावरायला असेल तर मला का बरं वाटणार नाही? पण तिची स्वप्नं धुळीस मिळवून मला ते नकोय. माझ्या बरोबर तिची अशी फरफट नको.
इकडे मृणाल विचार करत होती आणि तिच्या बाबांशी बोलत होती
मृणाल – बाबा मी काय करू हो?
बाबा – आता हे मी कसे सांगू बाळा?
मृणाल – असे हो काय? तुम्हाला काय वाटते?
बाबा – हे बघ कोणत्या बाबाला आपल्या लेकीचं स्वप्नं पूर्ण झालेलं बघायला नाही आवडणार? पण तुला एक सांगू तू तुला हवा तो निर्णय घे. मी काहीही म्हणणार नाही. पण निर्णय विचारपूर्वक घे. तू कोणताही निर्णय घे मी तुझ्या पाठीशी असेन याची खात्री बाळग. बाकी जग, इतर कोण काय म्हणेल ह्याची पर्वा करू नकोस. पण निर्णय घेताना ह्याचही विचार कर की आजपासून दहा वर्षांनी जेव्हा तू आयुष्यात मागे वळून बघशील तेव्हा तुला तुझा हा निर्णय योग्यच होता असेच वाटायला हवे. तेव्हा जर तर तुला असे वाटले की अरे आपण जर वेगळा निर्णय घेतला असता तर बरे झाले असते तर मग काही उपयोग नाही.
सो थिंक अबाऊट इट. आणि मी तुझ्या सोबत आहे हे विसरू नकोस.
क्रमश:
Image by Pete Linforth from Pixabay
Latest posts by Lekhak Online (see all)
- प्राजक्ताचा दरवळ - September 7, 2023
- सोळा नंबरच्या आजी - February 10, 2022
- पुढचं पाऊल- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सुचेता गोखले - July 7, 2021