फुलपाखरू
ते बघून खरं तर सई घाबरलीच. मैत्रिणीं मध्ये थोडी फार चर्चा झाली असली तरी नेमकं काय असतं हे तिला समजलं नव्हतं… आणि आज अंघोळ करायच्या आधी तिने पाहिलेला तो डाग… लालबुंद… ठसठशीत… हे नक्की तेच असेल का? … की त्या वृंदाताईच्या आजी सारखं कॅन्सर वगैरे काही… ती खूप घाबरली… ओटी पोटात असं का दुखतंय??? कंबर पण दुखतेय… मळमळतंय… “आईssss…. आई गं sssss” तिनं हाक मारताच आई धावत आली.
तिनं घाबरून आईला दाखवलं तर आई हसतच बसली. तिच्या चेहऱ्यावरून प्रेमानं हात फिरवून आईनं सईला सगळं नीट समजावून सांगितलं.
खरं तर आई पुढे चार दिवस खूपच प्रेमानं वागत होती. पण सईलाच काहीतरी खूप नकोसं वाटत होतं. डोकं दुखत होतं…. पायात कोणीतरी मणा मणाच्या बेड्या घातल्या सारखं वाटत होतं.
“आई …. खरंच दर महिन्याला हे असं होणार का गं?”
“हो बाळा…. आणि तेच योग्य आहे. तुला काही त्रास होत असेल तर मला सांग हं.”
आता आईला कसं सांगू मला काय त्रास होतोय ते, तिला वाटलं. तिच्यावर प्रचंड प्रेम करणारे बाबा तिच्याकडे पहातही नव्हते. आता शाळेतून आल्यावर दप्तर भिरकावून त्यांच्या मांडीवर बसता येणार नव्हतं. बऱ्याच छोट्या छोट्या आनंदाला मुकणार होती ती.
एक उदास मळभ दाटून आलं होतं. तिला काही काही नको, कोणी आजूबाजूला नको नुसतं बसून रहावं… झोपावं असच काहीतरी वाटत राहिलं. चार दिवस आई देखील तिला काहीही बोलली नाही. तिच्या आवडीचे पदार्थ आई करत होती पण तिलाच काही खावंस वाटत नव्हतं. हे सगळं मुलींनाच का? मुलांचं बरं आहे… त्यांना असले प्रॉब्लेम नाहीत… सईला वाटून गेलं. चौथ्या दिवशी तिला बरीच हुशारी वाटली.
आईनं गरम पाण्यानं शाम्पू लावून केस धुवून दिले. संध्याकाळी मात्र आईला राहवलं नाही. “पुरे आता आराम… चल… जरा फिरून येऊ मंदिरापर्यंत.” आईनं बळेबळेच तिला घराबाहेर काढलं.
मंदिरात गेल्यावर आईची जुनी मैत्रीण भेटली आणि सईला पाहून हरखुनच गेली… म्हणाली, “अगं ही सई ना? केवढी मोठी झाली गं…. केवढीशी होती मागे एकदा पहिली तेव्हा… आणि आता किती उंच झालेय… लांब केस, मोठे डोळे … वा… खूपच सुंदर आहे हं तुझी लेक… अगदी सुरवंटाचं फुलपाखरू झालेय.”
ती मावशी निघून गेली तरी तिचं तेच वाक्य सईच्या कानात घुमत राहिलं… “अगदी सुरवंटाचं फुलपाखरू झालेय.” खरंच का मी इतकी सुंदर दिसतेय. कधी एकदा घरी पोहोचते आणि आरशात पाहते असं सईला होऊन गेलं.
घरी आल्या आल्या ती आरशासमोर उभी राहिली. गोल गरगरीत चेहऱ्या भोवती काळ्या कुरळ्या केसांची महिरप… काळेभोर मोठे डोळे, गुलाबी ओठ, सुरई सारखी मान, त्या खाली नुकतीच दिसू लागलेली गोलाई, उंच सडसडीत बांधा आणि तुकतुकीत कांती… सई स्वतःवरच खुश झाली आणि स्वतःभोवती एक गिरकी घेऊन हॉल मध्ये आली.
आज सई खुश असल्यामुळं की काय तिचा बाबाही खुश होता. “काय पिल्लू…. बरं वाटलं ना थोडं फिरून आल्यावर?” सईला बाबाचा आवाज ऐकुन एकदम भरून आलं.
“हो बाबा… पण असं का असतं रे? मुली मोठ्या झाल्यावर त्यांचा बाबा त्यांच्याशी मोकळेपणाने बोलत नाही… बाबाशी मस्ती करता येत नाही… असं का असतं? मुलींनाच का ही शिक्षा?”
तिच्या या प्रश्नावर खळखळून हसत बाबा म्हणाला, “ए वेडाबाई… कोणी सांगितलं तुला हे? मी तर आताही मोकळेपणी बोलतोय की तुझ्याशी. तूही काही दुखलं खुपलं तर बिनधास्त बोल माझ्याशी. आणि दंगा मस्ती म्हणशील तर ती आताही करू शकतो की आपण. पण ते मांडीवर बसणं काय किंवा गळ्यात पडणं काय… बारा तेराव्या वर्षी मुलींचंच नाही तर मुलांचंही बंदच होतं. अगं वेडे, बाबा पण तेव्हा थोडा म्हातारा झालेला असतो ना! त्यामुळं मुलींनाच का ही शिक्षा वगैरे डोक्यातून काढून टाक बरं.”
“येस बाबा…” डोकं उघडून त्यातून काहीतरी काढून टाकल्याची अॅक्शन करत सई म्हणाली आणि दोघं खळखळून हसत राहिले.
आज सईला निरभ्र मोकळ्या अवकाशात स्वच्छंद उडणारं रंगीबेरंगी सुंदर फुलपाखरू झाल्यासारखं वाटत होतं.
Latest posts by Sanika Wadekar (see all)
- प्रगती भाग ८ – शेवटचा भाग - September 10, 2020
- प्रगती भाग ७ - September 7, 2020
- प्रगती- भाग ६ - September 4, 2020
छानच👌👌
Thanks Aparna
Mastch 😊
Thanks Ketaki