या वळणावर- भाग १/३
दोन दिवसांची रजा संपवून नेहा ऑफिसमध्ये आली. तिला आलेली बघून तिची कलिग सलोनी तिच्याजवळ येउन म्हणाली, “नेहा, सरांनी शेफालीचा प्रोजेक्ट ॲप्रूव्ह केला.”
“काय ? कसं शक्य आहे ? मी होल्डवर ठेवला होता तो प्रोजेक्ट. खूप चूका होत्या त्या प्रोजेक्टमध्ये. तसं मी काही चुका रेक्टिफाय केल्या होत्या, पण एवढ्या चुका असताना प्रोजेक्ट ॲप्रूव्ह कसा काय होवू शकतो? तो ही माझ्या सहीशिवाय! आणि प्रोजेक्टची डेडलाईन तर पुढच्या आठवड्यातली होती ना?” – नेहा.
“तुला फोन केला होता सरांनी, पण तुझा फोन ‘आऊट ऑफ कव्हरेज’ होता. क्लाएंटला प्रोजेक्ट थोडा लवकर हवा होता. प्रोजेक्ट याच आठवड्यात मिळावा, म्हणून क्लाएंटने रिक्वेस्ट केली आणि तनयाचा प्रोजेक्ट क्लाएंटला तितकासा आवडला नाही. मग सर म्हणाले की नेहा आल्यावर शेफालीच्या प्रोजेक्टमध्ये आवश्यक ते बदल करेल. तसंही क्लाएंटला हा प्रोजेक्ट आवडला आहे, तर हाच प्रोजेक्ट ॲप्रूव्ह करावा लागणार.” सलोनी.
“अग पण याला काय अर्थ आहे? याला प्रोफेशनॅलिझम नाही म्हणत. अर्जंट हवा होता मिन्स? डेडलाईन तर त्यांनीच ठरवली होती ना?” नेहा.
शेफाली काही बोलणार इतक्यात सरांनी कॉल करुन नेहाला केबिनमध्ये बोलावलं. नेहा केबिनमध्ये गेली.
“नेहा सॉरी, पण अर्जन्सी असल्यामुळे तुझ्या सहीशिवाय मी शेफालीचा प्रोजेक्ट ॲप्रूव्ह केला. तुझी आजची सगळी कामं सलोनीला डेलीगेट कर. आजचा पूर्ण दिवस क्लाएंट बरोबर कॉन्फरन्स रुममध्ये बसून शेफालीच्या प्रोजेक्टमधे असलेल्या मिस्टेक्स रेक्टिफाय करुन, त्यामध्ये क्लाएंटच्या इच्छेनुसार आवश्यक ते बदल करून प्रोजेक्ट फायनल कर. क्लाएंटला प्रोजेक्ट लवकर हवा आहे.” सर
खरतर नेहाला मनातून प्रचंड राग आला होता. पण तरीही शक्य तितकं शांत रहायचा प्रयत्न करत तिने ‘ओके’ म्हणून मान हलवली.
“गुड! मीट अवर क्लाएंट मिस्टर अनुप सरदेसाई.” असं म्हणून सरांनी समोर बसलेल्या क्लाएंटची ओळख करुन दिली.
सरांच्या केबिनमध्ये येताना नेहा इतकी चिडलेली होती की तिला त्यांच्या केबिनमध्ये अजून कोणी बसलं आहे हे सुद्धा लक्षात आलं नाही. नेहाने क्लाएंटकडे बघितल आणि समोर अनुपला बघून तिला कसं रीॲक्ट व्हावं तेच कळलं नाही. कितीतरी वर्षांनी ती अनुपला बघत होती.
“हॅलो नेहा?” अनुपच्या आवाजाने नेहा भानावर आली. चेहऱ्यावर कसंबसं हसू आणत त्याला ‘हॅलो’ म्हणाली.
नेहाने केबिनच्या बाहेर येऊन शक्य तितकं नॉर्मल रहायचा प्रयत्न करत सलोनीला सगळी कामं समजावली. आजचा संपूर्ण दिवस अनुपबरोबर घालवायचा या कल्पनेने ती काहीशी उदास झाली होती. तिला आठवलं, कॉलेजला असताना याच अनुपने तिचं चांगलं स्क्रिप्ट रिजेक्ट केलं होतं. पण आता जे आहे ते प्रोफेशनल रिलेशन आहे त्यामुळे शक्य तितकं प्रोफेशनली वागायचा प्रयत्न करायचा असा विचार करुन ती कॉन्फरन्स रुममध्ये गेली.
अनुप आणि नेहा एकाच कॉलेजमधले. अनुप नेहाला दोन वर्षांनी सिनिअर पण कॉलेजच्या कल्चरल ॲक्टिव्हिटीजमूळे दोघंही एकाच ग्रूपमध्ये होते. कॉलेजचा कल्चरल ग्रूप सोडून या दोघांना जोडणारा अजून एक कॉमन धागा होता, तो म्हणजे विकास. नेहा विकासची बालपणापासूनची मैत्रीण, तर विकास आणि अनुपची मैत्री कॉलेजमधली. अनुपची नेहाशी ओळख झाली तिच मुळी विकासची गर्लफ्रेंड म्हणून. अनुपचं विकास आणि नेहा दोघांबरोबरही छान जमत असे. विकासने अनुपला प्रत्येक गोष्टीत मदत केली होती. या नवीन शहरात विकासामुळेच अनुप चटकन रूळला होता. दोघंही एकदम खास मित्र बनले होते. नेहा आणि अनुपचंही एकमेकांशी छान पटायचं. त्या दोघांच्या आवडीनिवडीही बऱ्यापैकी कॉमन होत्या. विकास शांत सिन्सिअर तर अनुप आणि नेहा एकदम त्याच्याविरुद्ध बिनधास्त, मस्तीखोर. विकास आणि नेहाच्या लुटूपुटूच्या भांडणात मात्र नेहमीच अनुपचं सॅण्डविच होत असे. पण हे सारं तो छान एंजॉय करत असे.
सगळं सुरळीत चालू असताना अचानक या तिघांच्याही मैत्रीला वेगळच वळण देणारी एक घटना ग्रूपच्या पावसाळी पिकनिकच्या दिवशी घडली. त्यानंतर मात्र अनुप नेहा आणि विकासापासून हळूहळू दुरावत गेला.
“एस्क्युज मी सर मे आय कम इन?” , नेहाच्या आवाजाने कॉन्फरन्स रुममध्ये विचारांच्या तंद्रीत हरवलेला अनुप भानावर आला.
“ओह येस शुअर! टेक युअर सिट प्लीज. सॉरी माझ्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होतोय”- अनुप.
“इट्स ओके, डोंट माईंड प्लीज! आपण प्रोजेक्टवर वर्किंग सुरु करुया का?” अस म्हणत नेहा पुढे येउन त्याच्या समोरच्या चेअरवर बसली .
अनुपनेही मानेनेच होकार दिला. खरंतर अनुपला तिच्याशी खूप काही बोलायचं होतं पण कुठून सुरुवात करायची हेच त्याला कळत नव्हतं. तो विचारात हरवलेला असतानाच नेहा त्याच्याकडे लॅपटॉप सरकावत म्हणाली, “या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच चुका आहेत. यातल्या काही चुका आणि त्यांची करेक्शन्स मी रजेवर जाण्यापूर्वी या फाईलमध्ये स्टोअर करुन ठेवली होती. उरलेल्या चूका कशा सुधारायच्या यावर आपण नंतर चर्चा करुच, पण तुम्ही आधी ही सजेशन्स तुम्हाला पटतायत का ते बघाल का?” नेहाने शक्य तेवढं प्रोफेशनली बोलायचा प्रयत्न करत अनुपला विचारल.
तिचं असं प्रोफेशनल वागणं बघून अनुप काहीसा निराश झाला. पण तरीही क्षणात स्वतःला सावरुन तो लॅपटॉपवरची फाईल काळजीपूर्वक बघू लागला. दोघांमध्ये बराच वेळ प्रोजेक्ट या विषयावरच चर्चा सुरु होती. दोघं चर्चेमध्ये इतके गढून गेले की, तहान भूक कशाचच भान उरलं नाही. अखेर संध्याकाळी साडेचारच्या सुमारास सगळं वर्किंग पूर्ण झालं. नेहाने अतिशय हुशारीने शेफालीच्या मूळ प्रोजेक्टला धक्का न लावता त्यातल्या त्रूटी दूर केल्या होत्या. तिची हुशारी आणि कामाप्रतिचं डेडीकेशन बघून अनुप चांगलाच इंप्रेस झाला होता. प्रोजेक्ट पुन्हा एकदा नजरेखालून घालत अनुप नेहाकडे बघत म्हणाला, ‘परफेक्ट!’ … हे ऐकून नेहाही रिलॅक्स झाली.
“ओके, आता मी जाऊ शकते का?”नेहा.
अनुपला मनातून तिला सांगावसं वाटत होतं, “थांब ना थोडावेळ इतके वर्षांनी भेटलोय…’ पण मनातलं सगळं मनातच ठेवून तो म्हणाला, “ओके थॅंक्स ॲंड सॉरी!”
“इट्स ऑल राईट ॲंड आफ्टरऑल इट्स माय ड्युटी!” असं म्हणून नेहा जायला निघाली. तेवढ्यात अनुपने तिला विचारलं, “तुझ्या मुलाला बरं नव्हतं असं कळलं कशी आहे त्याची तब्येत आता?”
“ठिक आहे, म्हणूनच आज ऑफिसला आले ना?” नेहा
“आणि विकास कसा आहे?”- अनुप
या प्रश्नावर नेहा क्षणभर स्तब्ध झाली. पण मग स्वतःला आणि डोळ्यात जमा झालेल्या अश्रूंना थांबवत ती म्हणाली, “विकास आता या जगात नाही, ही इज नो मोअर.”
तिचं उत्तर ऐकून अनुपला धक्का बसला. काय बोलायचं त्याला काहीच सुचत नव्हत. स्वतःला सावरुन तो नेहाला काही विचारणार तोपर्यंत नेहा निघून गेलेली होती. त्यानंतरही कितीतरी वेळ तो कॉन्फरन्स रुममध्ये तसाच बसून होता. “विकास आता या जगात नाही, ही इज नो मोअर….” नेहाचे हे शब्द त्याच्या कानात गरम तेल ओतल्यासारखे घुमत होते. विकासच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले.
कॉलेजला असताना दोघांनी मिळून केलेली धमाल, ते कल्चरल प्रोग्रॅम्स, रुमच्या कट्ट्यावर आणि विकासच्या घराच्या गच्चीत जागवलेल्या रात्री….. सगळं एका क्षणात त्याच्या डोळ्यासमोर आलं. आणि त्यानंतरची पावसाळी पिकनिक …… पावसाळी पिकनिक आठवली आणि अनुप विकासच्या आठवणींमधून बाहेर आला.
दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी अनुप विकासच्या घरी गेला. दार नेमकं नेहाने उघडलं. नेहाला समोर बघून अनुप गोंधळला पण लगेच स्वतःला सावरत म्हणाला, “विकासच्या आई बाबांना भेटायचं आहे.”
नेहाने त्याला आत बोलावून बसायला सांगितल. हॉलमध्ये भिंतीवर टांगलेला विकासचा फोटो बघून अनुपचे डोळे पाणावले. तो त्या फोटोसमोर गेला, पण तेवढ्यात विकासचे बाबा बाहेर आले. त्यांना पाहून अनुपने चटकन पुढे होवून त्यांना नमस्कार करत अनुप म्हणाला, “काका मला ओळखलत? मी अनुप … विकासचा मित्र .आम्ही कॉलेजला एकत्रच….. ”
“अरे हो…. ओळखलं ना. तू तर गायबच झालास एकदम. कुठे होतास इतकी वर्ष?” विकासचे बाबा.
“पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मी पुढच्या शिक्षणासाठी म्हणून US ला गेलो आणि मग तिथेच नोकरी मिळाली. आत्ता दोन वर्षांपूर्वीच आई गेली. बाबा तिकडे यायला तयार नाहीत म्हणून मग मी इकडे भारतात परत यायचा निर्णय घेतला. आता वर्षभरापूर्वीच इथे स्वतःचा छोटासा बिझनेस सुरु केला आहे. योगायोगाने ऑफिसच्या कामानिमित्त काल नेहाची भेट झाली आणि विकासाबद्दल कळलं. ते ऐकल्यावर मी सून्न झालो एकदम. काल रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. कसं झालं हे काका?” -अनुप.
“नियतीच्या मर्जीपुढे कोणी जाऊ शकत नाही. साधासा ताप वाटला होता पण तपासण्या केल्यावर डेंग्यू आणि मलेरिया दोन्ही एकदम झाल्याचं निदान झालं. दिड महिना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. पण …….बोलता बोलता विकासच्या बाबांचा कंठ दाटून आला.
“काका मी समजू शकतो तुमचं दु:ख. मी विकासची जागा नाही घेऊ शकत, पण एक सांगतो, विकास नसला तरी मी आहे. कधीही कसलीही गरज लागली तर मला हक्काने सांगा.” अनुप.
Image by Godsgirl_madi from Pixabay
- माझी होशील का? - October 1, 2021
- काव्यांजली- शेवटचा भाग - February 12, 2021
- काव्यांजली- ४ - February 2, 2021