या वळणावर- भाग २/३

तेवढ्यात विकासची आई गरमागरम पोहे आणि चहा घेवून आली आणि अनुपला म्हणाली, “तू आल्याचं कळलं आणि लगेच पोहे करायला घेतले. तू आणि विकास दोघांनाही माझ्या हातचे पोहे खूप आवडायचे. आठवतंय का तुला तुमच्या दोघात पैज लागायची कोण जास्त पोहे खातंय …… बोलता बोलता विकासच्या आईचा स्वर कापरा झाला. नकळत अनुपचे डोळे पाणावले. तेवढ्यात  एक तीन साडेतीन वर्षांचा मुलगा  स्कूल ड्रेस घालून बाहेर आला आणि विकासच्या बाबांना बिलगला. हा नक्कीच विकासचा मुलगा असणार हे अनुपने लगेच ओळखलं.

“विहान, हा अनुप काका आहे तुझा कसा फ्रेंड आहे अर्णव, तसा हा तुझ्या बाबांचा फ्रेंड अनुप”. विकासचे बाबा म्हणाले.

“हॅलो अनुप काका” विहान गोड आवाजात म्हणाला.

अनुपने त्याला जवळ बोलावल आणि खास त्याच्यासाठी आणलेली कॅडबरी त्याच्या हातात दिली. कॅडबरी बघून सहाजिकच विहान खूष झाला. तेवढ्यात नेहा बाहेर आली.

“आई, मी विहानला शाळेत सोडून पुढे ऑफिसला जाते. आज त्याची स्कूलबस येणार नाही त्यामुळे तुम्हाला किंवा बाबांनाच त्याला आणावं लागेल.” नेहा.

नेहा आणि विहान निघून गेल्यावर विकासचे बाबा अनुपला म्हणाले, “या दोघांकडे बघूनच जगतोय आता आम्ही. नाहीतर एकूलता एक मुलगा निघून गेल्यावर आम्ही अगदी खचून गेलो होतो. पण नेहा आणि विहानकडे बघून सावरलं स्वतःला. विकास गेला तेव्हा दिड वर्षांचा होता रे विहान. त्याला तर विकास आठवतही नसेल. पण बाबाची कमी मात्र जाणवते. नेहापुढे तर अख्ख आयुष्य पडलंय पण विकास गेल्यापासून ती हसणंच विसरलेय. अनुप, कॉलेजला असताना तू नेहाचाही चांगला मित्र होतास ना? जमलं ना तर तिला या दु:खातून बाहेर काढशील? आम्ही थकलो आता तिला समजावून.” बोलता बोलता विकासच्या बाबांना रडू कोसळलं.

“रडू नका काका. होईल सगळं व्यवस्थित. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं ना, ‘विकास नसला तरी मी आहे. तुम्हाला कधीही काहीही वाटलं तरी हक्काने सांगा मला आणि हो काळजी करु नका मी बोलेन नेहाशी.” अनुप.

विहानला शाळेत सोडून नेहा ऑफिसला गेली. पण अनुप आणि त्याच्यामुळे पुन्हा आठवलेली पावसाळी पिकनिक काही तिच्या डोक्यातून जात नाही. दिवसभर ऑफिसमध्ये नेहा यांत्रिकपणे वावरत होती.

असेच काही दिवस सरले. अनुप आणि नेहाची ऑफिसच्या कामानिमित्त अधूनमधून भेट होत होती. पण नेहा मात्र त्याच्याशी शक्य तितकं प्रोफेशनल वागत होती. अनुप अधूनमधून विकासच्या आई बाबांना भेटायला त्यांच्या घरी जात होता, पण नेहा नसताना. कारण नेहाचं प्रोफेशनल वागणं बघून मनातून कुठेतरी तो दुखावलेला होता. नेहाच्या मुलाची; विहानची आणि अनुपची मात्र खूप छान गट्टी जमली होती.

एक दिवस संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर नेहा पार्किंगमध्ये गाडी काढायला जात असताना नेमका त्याच वेळी अनुप तिथे आला. अनुप समोर आल्यावर कसं रिॲक्ट व्हावं तेच तिला कळत नव्हतं. भूतकाळात काहीही घडलेलं असलं तरी वर्तमानात अनुप तिच्या ऑफिसच्या रेग्युलर आणि महत्वाच्या क्लाएंटपैकी एक क्लाएंट होता. त्यामुळे त्याला डावलून पुढे जाणं तिच्या प्रोफेशनल एथिक्समध्ये बसणारं नव्हतं. ती काही बोलणार इतक्यात अनुप तिला म्हणाला, “मी तुलाच भेटायला आलो होतो नेहा. मला खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी.”

“प्रोफेशनल का पर्सनल?” नेहाने अलिप्तपणे विचारलं.

“पर्सनल !” तिने जितक्या अलिप्तपणे विचारलं अनुपने तितक्याच सहजपणे तिला सांगितल.

“बोल, काय बोलायचं आहे ? नेहा

“इथे नको आपण बाहेर जाऊया. तुझी गाडी राहूदे इथेच मी घरी सोडतो तुला. तसंही उद्या सकाळी मला तुमच्या ऑफिसला यायचंच आहे. मी येता येता तुला पिक करेन. चालेल ?” अनुप.

“ठिक आहे. तू हो पुढे मी घरी कळवते उशीर होइल म्हणून.” नेहा.

तिचं असं चटकन ‘हो’ म्हणणं त्याच्यासाठी अनपेक्षित होतं. पण ही तर फक्त सुरुवात होती. त्याला जे बोलायचं होतं ते ऐकल्यावरही ती इतक्याच शांतपणे रीॲक्ट होइल ही अपेक्षा करणंसुद्धा चूकीचं आहे याची त्याला कल्पना होती. पण तरीही त्याला आज मनातलं सगळं तिच्याशी बोलायचं होतं. खास करुन त्या पावसाळी पिकनिकच्या दिवसाबद्दल!

अनुपची गाडी हायवे सोडून एका गावाकडच्या रस्त्याला लागली. अगदीच निर्मनुष्य नसला तरी रस्ता तसा शांत होता. तिथल्याच एका चहाच्या टपरीच्या थोडं पुढे जाऊन अनुपने गाडी थांबवली आणि नेहाला विचारलं, “नेहा इथेच गाडीबाहेर उभ राहून चहा घेत बोलूया का? मिन्स इफ यू आर कंफर्टेबल.”

“इट्स ओके नो प्रॉब्लेम”, नेहा.

अजूनही तिच्या बोलण्यातला अलिप्तपणा गेलेला नाही, हे अनुपला पुन्हा जाणवलं.

गाडीतून बाहेर येवून नेहा गाडीला टेकून उभी राहिली. समोरुन आलेल्या गार वाऱ्याच्या झुळूकीमुळे तिला अगदी प्रसन्न वाटत होतं. कितीतरी दिवसांनी नव्हे महिन्यांनी ती अशी मोकळं वातावरण अनुभवत होती. या अशा वातावरणात ती आणि विकास खूप वेळा फिरायला येत असत. विकासच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले.

“नेहा चहा!” अनुपच्या आवाजाने नेहा भानावर आली.

अनुपच्या हातातला चहाचा ग्लास बघून अचानक तिला पावसाळी पिकनिक आठवली. क्षणभर तिची आणि अनुपची नजरानजर झाली. त्याच्या नजरेत तिला आजही तेच भाव दिसत होते जे तिला ‘त्या’ दिवशी दिसलेले होते. “पण मग  नक्की  कुठे  चुकलं आणि काय?” नेहाच्या मनात भूतकाळातल्या विचारांची गर्दी झाली.

“नेहा चहा घे गार होतोय… आणि मला माहिती आहे तुला एकदम कडक चहा लागतो. तुझ्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुला मिळतील. खरंतर त्याचसाठी आपण आलोय इथे”, अनुप.

“इतक्या वर्षांनंतर आज तुला ती सगळी उत्तरं द्यावीशी वाटतायत?”  नेहाने चहाचा ग्लास हातात घेत विचारलं.

” हो! या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची वेळ येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. इनफॅक्ट ही वेळ यावी असंही मला वाटत नव्हतं. पण दुर्दैवाने म्हण किंवा आणखी काही, पण आज ती वेळ आलेय”, अनुप.

“प्रेम करत होतास माझ्यावर?” नेहा.

“तुला वाटतंय असं?” अनुपने प्रतिप्रश्न केला.

“मला काय वाटतं यापेक्षा तुला काय वाटत होतं हे जाणून घ्यायचं आहे मला”, नेहा.

“तू आवडायचीस आधीपासून. आपलं ट्युनिंगही खूप छान जुळलं होतं. पण यापलीकडे जाऊन त्यावेळी माझ्या मनात दुसरी कुठलीच भावना नव्हती किंवा दुसऱ्या कुठल्या भावनेचा मला विचार करायचा नव्हता. कारण तू विकासची गर्लफ्रेंड होतीस. पण मला आजही आठवतोय तो पावसाळी पिकनिकचा दिवस…..
सम्याची गाडी बंद पडली आणि विकास त्याच्याबरोबर थांबला. खरतर तेव्हा मी सम्याबरोबर थांबाणार होतो पण विकासचं आणि सम्याचं घर एकाच रोडवर असल्यामुळे तो त्याच्याबरोबर थांबला.” अनुप.

“त्यादिवशी मी तुझ्या गाडीवर बसले आणि आपण दोघं एका वेगळ्याच विश्वात वावरू लागलो. आपण दोघंही भिजून ओलंचिंब झालो होतो. अशा परिस्थितीत तुझा ओझरता होणारा स्पर्शही मनात एक अनामिक धडधड निर्माण करत होता. मला तुझ्याबरोबरचे ते क्षण हरवू द्यायचे नव्हते. जास्तीत जास्त वेळ तुझ्याबरोबर घालवायचा होता. म्हणूनच नंतर चहाची टपरी दिसल्यावर जेव्हा आपण चहा घ्यायला थांबलो  तेव्हा मी  समोरच्या डोंगरावर जायचा हट्ट केला, मुद्दाम ठरवून नाही; ती अगदी सहज रिॲक्शन होती मनाची. हे सगळं मी आयुष्यात पहिल्यांदा अनुभवत होते. विकासबरोबर असताना या अशा भावना कधी निर्माणच झाल्या नव्हत्या मनात”, नेहा.

“त्या डोंगरावर गेलो तेव्हा पहिल्यांदा ग्रूप किंवा विकास सोडून फक्त आपण दोघंच एकत्र होतो. त्या दिवशी मला आयुष्यात पहिल्यांदा  तुझ्यावरच्या प्रेमाची जाणीव झाली. तुला मनमोकळेपणे बोलताना, हसताना मी प्रथमच इतकं निरखून बघत होतो. अचानक एका क्षणी तू अगदी जवळ आलीस आणि स्वतःवरचा ताबा सुटतोय की काय असं वाटत असताना मी स्वतःला सावरलं. त्या क्षणी स्वतःला तुझ्या मिठीतून बाजूला केलं ते कायमच दूर होण्यासाठीच. त्यानंतर मी जाणीवपूर्वक तुझ्यापासून लांब रहायचा प्रयत्न केला म्हणूनच कल्चरल प्रोग्रॅमच्या वेळी तुझं स्क्रिप्ट उत्तम असतानाही मी ते रिजेक्ट केलं कारण मला तुझ्यापासून लांब रहायचं होतं. तुझ्या आणि विकासच्यामध्ये मला कधीच यायच नव्हतं. कारण तुझ्यापेक्षा विकास आणि त्याची मैत्री माझ्यासाठी खूप महत्वाची होती”, अनुप.

Image by Godsgirl_madi from Pixabay 

Manasi Joshi
Latest posts by Manasi Joshi (see all)

Manasi Joshi

कायद्याची पदवी. सात वर्ष लीगल फिल्डमध्ये काम केल्यावर नंतर स्वखुशीने स्वीकारलेला 'हाऊस वाईफ'चा जॉब. आवड म्हणून सुरू केलेलं लिखाण आता प्रोफेशनमध्ये बदललं आहे. सध्या अर्थसाक्षर.कॉम या वेबसाईटसाठी एडिटर आणि कंटेंट मॅनेजमेंटचं काम करते. - मानसी जोशी

One thought on “या वळणावर- भाग २/३

  • May 21, 2020 at 5:29 pm
    Permalink

    कथेचा तिसरा भाग कुठे वाचायला मिळेल?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!