प्रिय नवऱ्यास

प्रिय नवऱ्यास,
खरंतर सनविवि च म्हणणार होते पण तुझे सध्याचे काही प्रताप पहाता फक्त सानविवि म्हणू शकते. तर साष्टांग नमस्कार विनंती विशेष. पत्रास कारण की तुला हे सांगायचं होतं, की तू एक चांगला शिकलेला सवरलेला सुशिक्षित, सुसंस्कारित मुलगा आहेस याचा मला आनंदच होतो, पण त्याच बरोबर तुझ्याकडे स्वयंपाकघरात वावरण्याचे कौशल्य सुद्धा आहे याचा मला रास्त अभिमान वाटतो. तू एक मुलगा मुलगी एकसमान, कश्याला वाटायची आहे स्वयंपाक करण्याची लाज? हे एका अजिबात यमक न जुळणाऱ्या नाऱ्याचं  प्रतिनिधित्व करतोस हे पाहूनही मला अतिशय बरं वाटतं. तुला फ्रीजमध्ये भाज्या कश्या ठेवायच्या, आमटी दाटसर व्हायला त्यात काय घालायचं आणि तुपाची कणी कशी छान पडेल या इतर अनेक पुरुषांनी जन्मतःच ऑप्शनला टाकलेल्या गोष्टी व्यवस्थित माहीत असतात याचाही मला अभिमानच वाटतो.
पण मुद्दा काय आहे माहीत आहे का मित्रा, तू दरवेळी हौशीने “आज स्वयंपाक मी करणार”, ही घोषणा करताच माझ्या पोटात गोळा येतो. अहंहं, तू जे बनवशील त्याची चव चांगलीच  असणार याची खात्री आहे मला, पण या सगळ्या तुझ्या स्वयंपाकासाठी तू जे मला नाचवणार याची भीती वाटते. सुरवात होते ती तांदूळ कुठे आहेत? पासून. अरे इतकी वर्षे घरात राहता, दाढीच सामान बरं आठवत असतं कुठे आहे ते, सिगरेटचं एखाद पाकीट ठेवलेली सिक्रेट जागा बरी आठवत असते पण तांदूळ कुठे आहेत ते मात्र माहीत नाही. असो, मग सुरू होतं,  ते विशिष्ट भांड कुठे आहे? आपल्याकडे तो मसाला नाही का? तमालपत्र हवंच (मला चालतं रे कधीतरी तमालपत्र नसलं तरी) त्यानंतर टोमॅटो चारच आहेत का? मला पाच लागतील (माझी पावभाजी चार टोमॅटोत झकास होते, तुझी का होत नाही?) शेवट तर असा होतो की “या किचनची ना अरेंजमेंट जरा बदलायला हवी!” ( मी गेली सतरा वर्ष स्वयंपाक करते आहे याचं अरेंजमेंटमध्ये🙄 मग तुला काय एकदम बदल करावेसे वाटतात?)  हे आणि असलं काय काय ऐकावं लागतं.
“मला मदत नको, तू पूर्ण अराम कर” हे वाक्य तू शॉर्ट टर्म मेमरी चा त्रास असल्यासारखं विसरतोस आणि जरा फक्त एवढा कांदा चिरून दे, हे मिक्सर मध्ये वाटून दे, फक्त दही फेटून दे म्हणत तुझा पाऊण स्वयंपाक होतो सुद्धा! स्वयंपाकघरातून वास दरवळायला लागतात, मुलं ” Wow आज बाबांनी काहीतरी मस्त बनवलंय ” म्हणत आशेने बघत असतात (जसं काही मी रोज कोंडाच घालते खायला🙄) पण असो.
“सगळं झालंच आहे, एवढी भाजी फक्त रटरटव, कुकरकडे लक्ष दे, वाफ नीट येते आहे ना ते बघ, हे परत, ते उलट” करत तुझा स्वयंपाक शेवटी होतो आणि तूला नेमका फोन येतो. मित्राला तू फोनवर मंद हसत “काही नाही रे जरा स्वयंपाक करत होतो” म्हणतोस, तिकडून मित्र, “वा मस्त रे दोस्ता” असं उघडपणे म्हणत पण मनातल्या मनात हे स्वतःच्या बायकोला अजिबात कसं न सांगता येईल याचा विचार करत असतो.
इकडे मी ताट, वाटी, पाणी घेते, कारण स्वयंपाक तू केलेला असतोस. थोडं काम तरी मी करायलाच हवं, नाही का? ओट्यावर तयार झालेले पदार्थ टेबलावर आणून ठेवते कारण स्वयंपाक तू केलेला असतोस. सगळ्यांना वाढते, काय कमीजास्त आहे, काय हवंनको पहाते कारण स्वयंपाक तू केलेला असतोस. जेवणं मजेत होतात, तू केलेला पदार्थ अप्रतिमच झालेला असतो. प्रत्येकाच्या हाताला एक वेगळी चव असते, तुझ्याही हाताला ती आहे.
पिक्चर संपत आलेला असतो. मी दी एन्ड ची आतुरतेने वाट बघत असते. शेवट छान झाला तरच सिनेमा उत्तम होता म्हणणार ना! तुझ्या पाककौशल्याचा शेवट बघायची मला उत्सुकता लागलेली असते. अगदी बरोबर ओळखलंत. ओटा कोण आवरणार? आणि तिथेच नेमका तू मार खतोस! तुझं म्हणजे असं आहे, की विद्यार्थी हुशार, सगळा पेपर तुफान सोडवलाय,पण महत्त्वाच्या उत्तरांना खाली रेघाच मारायच्या राहिल्या अन व्यवस्थित समास पण आखायचे राहिले! सगळा स्वयंपाक उत्तम केलास, तो लडबडलेला ओटा मात्र स्वच्छ करायचा राहिलास. सगळा अभ्यास तोंडपाठ असून दहावीत मेरीट मध्ये यायचे राहतात ते हे असले विद्यार्थी!
इतकी वर्ष स्वयंपाकघरातल्या अनुभवावरून एक नक्कीच सांगू शकते मी तुला. स्वयंपाक म्हणजे फक्त पदार्थ शिजवणे नाही, तर त्याची पूर्वतयारी, सगळी कृती, त्या कृतीतील तन्मयता,त्यात ओतलेली माया, शेवटची आवराआवर आणि सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकघराची साफसफाई. असा सगळा साग्रसंगीत कार्यक्रम आहे तो. दुसऱ्या दिवशी ओट्यापाशी उभं राहताना माणसाला प्रसन्न वाटायला असा आपल्या आदल्या दिवशीचा स्वयंपाक हवा, असं माझी आई, बरं चल तुझी आई देखील म्हणते. असं असेल तरच अन्नपूर्णादेवी भरभरून आशीर्वाद देते.
तू हुशार आहेसच. मी काय म्हणते आहे हे तुझ्या आतापर्यंत लक्षात आले असेलच. हे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून स्वयंपाकघरात तू जो भार उचलायचा ठरवलेला आहेस त्याबद्दल मला छानच वाटतंय, पण तेवढा दी एन्ड मात्र नीट करत जा एवढंच मनापासून सांगायचं होतं. प्रश्न मी चांगला स्वयंपाक करते की तू, किंवा तू ओटा जास्त चांगला आवरतोस की मी हा नाहीये. प्रश्न आपण एकमेकांना किती पूरक आहोत, आपण एकमेकांचे कच्चे तसेच पक्के दुवे ओळखून एकत्र काम करतो आहोत की नाही हा आहे.
मित्रा, मग आजचा मेन्यू काय? मला अवश्य कळव. आणि हो, ती बिर्याणीची रेसिपी पण मला आठवणीने सांग. काही रेसिपीज फक्त तूच बनवाव्यास, इतका त्यात तुझा हातखंडा असतो. दी एन्ड आपण दोघं मिळून करू कारण सध्या तरी आपण made for each other नसून maid for each other आहोत!
काळजी घे, तुझी आणि आपल्या ओट्याची.
तुझीच,
बायको.
Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

15 thoughts on “प्रिय नवऱ्यास

  • April 15, 2020 at 6:40 am
    Permalink

    हं. वेवस्थित द्यावं नं ट्रेनिंग. अगदी लिहून हाणलंच पाहिजे का? 😁

    Reply
    • April 15, 2020 at 9:19 am
      Permalink

      अगदी अचूक शब्दात आणि स्पष्टपणे मनातले विचार मांडलेत. आपल्या अपेक्षा समोरच्याला कळल्या की आयुष्य सोप्पं होतं. खूप गंमत वाटली वाचताना आणि खूप मज्जा आली. एक नंबर 👌👌👌

      Reply
  • April 15, 2020 at 7:03 am
    Permalink

    वाह वाह जबरदस्त

    Reply
  • April 15, 2020 at 9:20 am
    Permalink

    Mast ch ki…..

    Reply
  • April 15, 2020 at 9:21 am
    Permalink

    मस्त, नेहमीप्रमाणेच

    Reply
  • April 15, 2020 at 4:56 pm
    Permalink

    👍👍

    Reply
  • April 15, 2020 at 6:09 pm
    Permalink

    छानच 👌👌

    Reply
  • April 15, 2020 at 6:33 pm
    Permalink

    Mastch.. As usual.. Manatla ekdam👍

    Reply
  • April 16, 2020 at 9:20 am
    Permalink

    Fantastic …. मस्त लिहिलंयस गौरी

    Reply
  • April 18, 2020 at 6:46 pm
    Permalink

    Good one👍👍

    Reply
  • April 19, 2020 at 10:35 am
    Permalink

    पत्र छानच लिहिले आहे,👌

    Reply
  • April 21, 2020 at 3:09 pm
    Permalink

    Khupch mast 👌👌😊

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!