या वळणावर- भाग ३/३

“सगळं काही एकट्याने किती सहज ठरवून टाकलंस ना तू. माझा विचारही नाही केलास. तुझ्यामुळे मला आयुष्यात पहिल्यांदा जाणवलं होतं की विकास आणि माझ्यामध्ये खूप छान मैत्री आहे खूप छान बॉन्ड आहे, पण ते प्रेम नाही. पण तरीही मी कनफ्युज होते. मनातल्या विचारांचा गुंता सुटत नव्हता. कळत नव्हतं नक्की मला वाटतंय तसंच आहे का तुझ्याबद्दल वाटणाऱ्या क्षणिक आकर्षणामुळे असं वाटतंय? एकीकडे मी अशा गोंधळलेल्या मनस्थितीत होते आणि दुसरीकडे तू मला टाळतोयस हे मला स्पष्ट जाणवत होतं. कळतंच नव्हतं मला काय करावं.  तुझ्याशिवाय याबद्दल मी  कोणाशीच बोलू शकत नव्हते. पण तू तर माझ्यापासून शक्य तितका दूर रहायचा प्रयत्न करत होतास. तुझ्या मनात नक्की काय आहे हेच मला कळत नव्हतं. सगळ्यांना वाटत होतं तू माझं स्क्रिप्ट रिजेक्ट केल्यामुळे आपण दुरावलोय पण प्रत्यक्षात जे काय घडलं होतं ते आपल्या दोघांशिवाय कोणालाच माहिती नव्हतं”, नेहा.

“मला माफ कर नेहा पण मला तुमच्यामध्ये यायचं नव्हतं. मुख्य म्हणजे मला विकासची मैत्री गमवायची नव्हती. जी माझ्यासाठी खूप महत्वाची होती. पण आज विकासच या जगात नाहीये तर स्वतःच घातलेली स्वतःवरची बंधन झुकारुन मी तुझ्याशी बोलायचं ठरवलं. आज मी प्रामाणिकपणे कबूल करतो की हो प्रेम करत होतो मी तुझ्यावर अगदी मनापासून!” अनुप

हे सगळं ऐकून नेहा सुन्न झाली. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळू लागले. थोडावेळ कोणीच काही बोलत नाही.

“नेहा, फक्त एवढंच नाही, तर अजूनही खूप काही सांगायचं आहे तुला.” अनुप.

“बोल अनुप, जे काही बोलायच असेल ते आज बोलून टाक. बोलायचं होतं पण बोलता आलं नाही असं नंतर नको वाटायला”, नेहा.

“विकासच्या बाबांनी मला तुझ्याशी लग्न करशील का? असं विचारलंय”, अनुप.

“काय ? हे कसं…. कधी?…. मला काहीच माहिती नाही यातलं”, नेहा.

“गेल्या आठवड्यातच विचारलं त्यांनी. त्यांना तुझी खूप काळजी वाटते नेहा. एकदा का तू तुझं आयुष्य नव्याने सुरु केलंस की ते रिलॅक्स होतील, असं वाटतंय त्यांना. खरंतर माझ्यासाठीही हा प्रश्न अनपेक्षित होता. पण ‘मी विचार करतो’ असं म्हणून विषय थांबवला”, अनुप.

“सॉरी अनुप. पण तू त्यांच्या बोलण्याचा एवढा सिरिअसली विचार नको करुस. मी समजावेन त्यांना.” नेहा.

“मी सिरिअसली विचार करतोय नेहा. पण त्यापूर्वी मला तुझं मत जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठीच भेटलोय आपण आज”, अनुप.

“पूर्वीची गोष्ट वेगळी होती अनुप आता मी एक विधवा आहे. एका मुलाची आई आहे आणि तू सिंगल आहेस. उगाच भावनेच्या भरात असा कुठलाही निर्णय घेऊ नकोस ज्याचा पुढे जाऊन आपल्या दोघांनाही त्रास होइल.” नेहा.

“भावनेच्या भरात नाही नेहा. गेला आठवडाभर विचार करत होतो मी यावर. विहानच आणि माझं छान जमतं. त्याला या वयात आई इतकीच पित्याच्या प्रेमाचीही गरज आहे. कुठेतरी तो माझ्यामध्ये त्याचे वडील शोधत असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विहान विकासचा मुलगा आहे. त्याची शेवटची आठवण! ही आठवण मला आयुष्यभर जपायची आहे. माझ्याकडून विहानला कधीच सावत्र वागणूक मिळणार नाही. पण या साऱ्याबरोबरच मला तुझा विचार पण तितकाच महत्वाचा वाटतो. म्हणूनच तू कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी तुला माझ्या भूतकाळाबद्दल सांगायच आहे”, अनुप.

“भूतकाळाबद्दल? आता अजून कुठला भूतकाळ अनुप?” नेहा

“तुमच्या दोघांपासून दूर जायचं म्हणून मी यु. एस. ला निघून गेलो. तिथे शिक्षण पूर्ण झाल्यावर सुदैवाने मला नोकरीही मिळाली.  नोकरीत स्थिरावत असतानाच तुमच्या लग्नाची बातमी कानावर आली. मनातून जेवढा आनंद झाला तेवढच अंतर्मनात खोल कुठेतरी प्रचंड दु:ख झालं होतं. या सगळ्यातून सावरणं मला खूप कठीण जात होतं. त्याचवेळी ‘सारा’ माझ्या आयुष्यात आली. आधी खूप छान मैत्री झाली पण नंतर एका रात्री आम्ही खूप जवळ आलो. साराला लग्न करायचं नव्हतं. तिचा विवाहसंस्थेवर विश्वासच नव्हता. त्यानंतर आम्ही दोन वर्ष ‘लिव्ह इन” मध्ये रहात होतो. मी जेव्हा भारतात परत यायचा निर्णय घेतला तेव्हा तिने खूप विरोध केला. पण माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. बाबांसाठी मला परत यावच लागणार होतं. भावनिकदृष्ट्या आम्ही दोघंही एकमेकांमध्ये गुंतलो होतो. मी सारासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण ती तिच्या मतावर ठाम होती. अखेर नाईलाजाने मला ते रिलेशन तोडावं लागलं. सारानेही प्रॅक्टिकल विचार करुन हे “ब्रेकअप” स्विकारलं. त्यानंतर मी भारतात परत आलो. भारतात परत आल्यावर मात्र माझा आणि साराचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. हे सगळं तुला सांगण खूप आवश्यक वाटलं मला म्हणून मी सांगितलं. बाकी  तुझा जो काही  निर्णय असेल तो मला मान्य असेल. पण माझा निर्णय झालाय. मी तुला विहानसकट स्विकारायला तयार आहे”, अनुप.

“आपण सगळं बोलतोच आहोत, तर इतके दिवस मनात साठवलेलं बोलून मी ही मोकळी होते. माझं आणि विकासचं लग्न झाल्यानंतरही मी तुला विसरु शकले नव्हते अनुप. विकासला मला कधीच फसवायचं नव्हतं, पण माझ्या मनातला गोंधळ मी त्याच्यासमोर व्यक्तही करु शकत नव्हते. कारण मुळात माझं मलाच काही कळत नव्हतं. विकास नेहमीच आदर्श नवरा आदर्श मित्र होता. पण तो माझा प्रियकर नाही होऊ शकला. विकासबद्दल माझी काहीच तक्रार नाही/ नव्हती; कारण मुळात चूक माझीच होती. मी  स्वतःच्या भावना समजूच शकले नाही. माझ्या मनातल्या  ‘त्या’ भावना विकासासाठी कधीच नव्हत्या त्या तुझ्यासाठी होत्या हे मला खूप उशीरा समजलं. पण समजूनही मी काहीच करु शकले नाही आणि जे समोर आहे ते स्विकारत गेले. पण तरीही आज आपण एकत्र नाही येऊ शकत. कारण जे नातं कोणाच्यातरी नसण्यावर अवलंबून आहे असं नातं मला जोडायचंच नाहीये”, नेहा.

“कोणाच्यातरी नसण्यावर? म्हणजे मी समजलो नाही. तुला नक्की काय म्हणायचं आहे”,अनुप.

“मला जे म्हणायचं आहे ते तुला कितपत समजावता येईल ते नाही माहिती, पण प्रयत्न करते.

अनुप तू विकाससाठी माझ्यापासून लांब राहिलास. आज विकास नाही म्हणून तू तुझं  माझ्यावर असणारं प्रेम व्यक्त केलंस. पण परिस्थिती जशी आहे तशी नसती तर? विकास आज आपल्यामध्ये असता तर? तर काय अनुप? आयुष्यभर मी हे कधी समजूच शकले नसते की तुझंही माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे हे नातं नेहमीच विकासच्या अस्तित्वावर अवलंबून होतं. कदाचित नियतीला आपण एकत्र येणं कधी मंजूरच नव्हतं”, नेहा.

“इथे नियतीचा प्रश्न कुठे आला नेहा? तू चुकीच्या दिशेने विचार करतेयस. जर तू ठरवलंस तर आपण आजही एकत्र येऊ शकतो” , अनुप.

नाही, मी कुठलाही चुकीचा विचार करत नाहीये. आज आपल्यात ते नातं निर्माण नाही होऊ शकत जे तेव्हा होऊ शकलं असतं. जर त्यावेळी हे नातं निर्माण झालं असतं तर विकास दुखावला गेला असता, पण त्याने हे सगळं मोकळ्या मनाने  स्विकारलं असतं आणि आपल्यामध्ये प्रेमाचं एक सुंदर नातं निर्माण झालं असतं. पण आज सगळीच परिस्थिती बदलली आहे.”, नेहा.

“नेहा  रिमॅरेज हे बहुतांश वेळा कोणाच्यातरी नसण्यावरच अवलंबून असतं.”, अनुप.

“हो पण ते पूर्णपणे नव्याने तयार होणारं नातं असतं. आपल्याबाबतीत तसं नाही. आपलं नातं नेहमीच ‘विकास’ या एकाच गृहितकावर आधारित होतं आणि ही परिस्थिती कायम अशीच राहील.

तू एक चांगला माणूस आहेस म्हणूनच मला तुझी आयुष्यभर सोबत हवी आहे, पण एक चांगला मित्र म्हणून. कारण प्रेमापेक्षा जास्त चांगलं तू मैत्रीचं नातं निभावशील. आयुष्याच्या ‘या वळणावर’ मला खरंच एका मित्राची गरज आहे. आणि तुझ्यापेक्षा चांगला मित्र मला दुसरा कोणी मिळूच शकत नाही, म्हणूनच मला हे मैत्रीचं नातं गमवायचं नाहीये.  आपण आज पुन्हा नव्याने या मैत्रीच्या नात्याला सुरुवात करुया अर्थात तुझी इच्छा असेल तर”, नेहा.

“मी तुझ्याबरोबर नेहमीच असेन नेहा. मग ती मैत्री असो वा प्रेम! नात्याचं नाव महत्वाच नाही.  माझ्यासाठी तू खूश असणं महत्वाचं आहे. आयुष्यातल्या त्या सुंदर वळणावर आपण एकत्र नाही येऊ शकलो पण ‘या वळणावर’ मात्र पुन्हा एकदा जगातल्या सगळ्यात सुंदर आणि निरपेक्ष अशा मैत्रीच्या नात्याची सुरुवात करुया आपण!” अनुप.

नेहाच्या चेहऱ्यावर आज कितीतरी दिवसांनी समाधान दिसत होतं. आयुष्यात प्रथमच तिला हवं असणारं नातं निर्माण झालं होतं आणि ते ही अगदी आयुष्यभरासाठी!

Image by Godsgirl_madi from Pixabay 

Manasi Joshi
Latest posts by Manasi Joshi (see all)

Manasi Joshi

कायद्याची पदवी. सात वर्ष लीगल फिल्डमध्ये काम केल्यावर नंतर स्वखुशीने स्वीकारलेला 'हाऊस वाईफ'चा जॉब. आवड म्हणून सुरू केलेलं लिखाण आता प्रोफेशनमध्ये बदललं आहे. सध्या अर्थसाक्षर.कॉम या वेबसाईटसाठी एडिटर आणि कंटेंट मॅनेजमेंटचं काम करते. - मानसी जोशी

4 thoughts on “या वळणावर- भाग ३/३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!