रिविजन

आज व्हॅलेंटाईन डे. आजचा दिवस वेगळा जाणार याची जाणीव तिला उठल्या उठल्या झाली आणि दिवसाची सुरुवात प्रसन्न होऊन गेली तिची. रोजचा दिवस काहीतरी वेगळं घेऊन येणार असेल तर तिला वेगळाच उत्साह यायचा. मग त्या स्पेशल दिवसाच्या आधीचे कित्येक दिवस त्या दिवसाची वाट बघत घालवणे.. त्या दिवसाची मनातल्या मनात उजळणी करणे..त्या दिवशी जे जे करायचं त्याची तयारी करणे.. सगळंच आनंददायक !

आजही संध्याकाळी त्याला भेटायचं.. ‘त्या’ नेहमीच्या ठिकाणी.. खूप दिवसांनी रोजच्या रुटीन पेक्षा वेगळं काहीतरी घडणार होतं..तिच्या डोळ्यासमोर काही दृश्य तरळू लागली.. आपण नेहमीच्या पार्कमधल्या एका कोपऱ्यातल्या ‘त्या’ बेंचवर त्याची वाट पहात थांबलो आहोत. आपण थोडंस लवकर आलोय हे माहीत असूनही ‘अजून कसा येत नाही हा?’ असा विचार करुन सतत घड्याळाकडे बघत आहोत. आणि तो येणार.. आणि मग..

आज कोणता ड्रेस घालूया? साडी तर आज नको, जीन्स-टॉप का पंजाबी ड्रेस ?..सकाळी आवरता आवरता नकळत तिने तिचा वॉर्डरोब नजरेनेच चाचपायला सुरुवात केली.. खूप इकडे तिकडे पाहिल्यावर काहीच वेगळं न दिसल्याने ती जरा हिरमुसली. वॉर्डरोबचं दार बंद करणार तोच सगळयात खालच्या कप्प्यात कोपऱ्यात जाऊन बसलेला एक फुलाफुलाचा ड्रेस तिला दिसला. परफेक्ट ! त्याला हा खूप आवडतो.. तिने तो हळुवारपणे काढून छातीशी कवटाळला.

मेकअप? नको फारसा मेकअप. त्याला नाही आवडत. “तू मेकअप विना इतकी छान दिसतेस.. जातीच्या सुंदरांना..” त्याची परिचित वाक्ये तिच्या कानाशी घोळू लागली आणि ती मनाशीच हसली.. तो अधूनमधून वाजवतो तशी चक्क शीळ वाजवावी असं तिला एक क्षण वाटून गेलं आणि ती पुढच्या तयारीत गढून गेली..

………

आणि तो? तो काय कमी हवेत होता आज? आजकी शाम प्यारके नाम ! आज व्हॅलेंटाईन डे..ऑफिसला जाताना तो मनातल्या मनात उजळणी करु लागला..

याद्या करण्याची त्याची जुनी खोड. मग मनातल्या मनात यादी तयार होऊ लागली.

१. आज पार्कात लवकर पोहोचून तिला surprise द्यायचे. ‘नेहमीच काय रे तुझं उशिरा येणं?’ हे आज नाही ऐकून घायचं तिचं. उलट ती आल्यावर ती आश्चर्याच्या धक्क्यातून सावरत असतानाच तिला उशिरा येण्याबद्दल सुनवायचं (तिला उशीर झाला असला/नसला तरी). मग ती आपले घारे गोल डोळे मोठे करेल आणि तोंडावर हात नेऊन म्हणेल, ‘बरा आहेस ना तू? इतका नको रे सुधारू एकाच दिवसांत..’ यावर आपण तोच हात हातात घेऊन.. स्वप्नरंजन सुरु झालं.. पण त्याच्या हिशोबी मनाने त्याला खेचून परत यादीकडे आणलं.

२. यासाठी ऑफिसमधून लवकर निघावं लागेल. ऑफिसला पोहोचल्यावर लगेच बॉसला मेल टाकायची. ‘Need to leave early today.. some urgent personal work ..’ बॉस शहाणा आहे. मेल वाचून गालातल्या गालात हसून तो त्याचे व्हॅलेंटाइन दिवस आठवणार..

३. जाताना फुलं घ्यायची आहेत. त्यासाठी ऑफिसमधून निघाल्यावर थोडी वाकडी वाट करुन नेहमीचा फुलवाला गाठायचा.. तो सुद्धा ओळखीचा. आपल्याला बघून गालातल्या गालात हसत लाल गुलाब न देता निशिगंध हातात ठेवणार.. सगळं कसं ठरलं आहे.

त्याची संध्याकाळच्या भेटीच्या तयारीची यादी पुढे पुढे सरकू लागली..

……..

आणि तो भेटीचा क्षण आला.. कितीही प्रयत्न केला तरी त्याला उशीर झाला होता.. पाठमोरी ती नेहमीप्रमाणे ‘त्या’ नेहमीच्या बेंचवर बसून त्याची वाट पहात असलेली त्याला दिसली आणि हलकीच शीळ वाजवायचा मोह त्याने आवरला..तिची अस्वस्थता तिच्या हालचालीतून स्पष्ट दिसत होती..तो तिच्या मागून हळू हळू पावलं टाकत बेंचच्या मागे जाऊन उभा राहिला आणि त्याने दोन्ही हातांनी पटकन तिचे डोळे झाकले.

“कोण सांग?”

तिचा राग घालवण्याच्या त्याच्या या नेहमीच्या ट्रिक्स. तिला माहीत आहेत. “एक माझ्याहीपेक्षा जास्त प्लॅंनिंग करुनही उशीर करणारा..”

“अहो, बाईसाहेब..जरा ऐकून तर घ्या..” त्याने पटकन निशिगंधाच्या फुलांचा गुच्छ तिच्यासमोर धरत तिचे बोलणे मधेच तोडले.

“या कळ्या मला म्हणाल्या आम्हालाही थोडं उमलू द्यात की.. मग काय? थांबावं लागलं त्या उमलेपर्यंत..”

“चल, चल.. तुझी नेहमीची नाटकं बस झाली आता”

ती फुलं प्रेमाने हातात घेत ती म्हणाली. पण ती पांढरीशुभ्र फुलं, त्यांचा तो मंद सुवास आणि त्याचं ते खट्याळ हसत चतुराईने बोलणं..तिचा राग क्षणात पळून गेला. पण तरी तिने चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही.

“थांब जरा, मी आलोच..” तो तिथून  जाण्याचा अभिनय करत म्हणाला.

‘आता काय, कुठे चाललायस?’ त्याच्याकडे रोखून बघत तिने नजरेनेच विचारले.

“काही नाही अगं, हेल्मेट बाईकलाच लावलं आहे ते घेऊन येतो. कसंय ना, समोरची व्यक्ती चिडलेली असली की मी आपलं हेल्मेट घालून घेतो, म्हणजे ना जरा सुरक्षित वाटतं”

“चल !” असं म्हणत तिने त्याच्या डोक्यावर हलकेच एक टपली मारली. दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. ती संधी साधून त्याने पटकन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तो तिच्या शेजारी बसला.

मग काही वेळ हातात हात गुंफून ते दोघं नुसतेच बसून राहिले. एक मूक संवाद दोघांमध्ये पाझरत होता.

“छान दिसते आहेस” त्याने तिच्या डोळ्यात पाहत सुरुवात केली.

“हुंs” तिची ही खासियत. सुरुवातीची खडखड संपून गाडीने वेग घ्यायला सुरुवात करावी तसं तिला वाटलं.. पण ते तिला दाखवायचं नव्हतं.

पण त्याला हे सगळं नवीन थोडीच होतं?

“आज जरा वेगळीच दिसते आहेस..” त्याने वेग कायम ठेवला.. मग मात्र ती हळूहळू खुलू लागली. तिने एक सहेतुक कटाक्ष तिच्या ड्रेसवर टाकला.

“हा, मस्त! माझा आवडता फुलाफुलांचा ड्रेस.. आठवणीने घातलास ना?”

“हुंs” पण यावेळी हे थोडं लाजत.. खाली पहात.

“नुसतं हुं हुं करु नकोस, बोललीस का तू घरी?” त्याने पुढचा गियर टाकला.

“कशाबद्दल?” तिचा भोळा चेहरा.

“अगं, कशाबद्दल म्हणजे काय? आपल्या नात्याबद्दल..म्हणजे तुझ्या आईबाबांचं काय म्हणणं आहे ते..”

“हे बघ प्रशांत, अजून कशातच काही नाही आणि..”

“कशात काही नाही म्हणजे?” तो एकदम उसळून म्हणाला..”म्हणजे आपलं प्रेम खोटं आहे असं म्हणायचंय का तुला?”

“तसं नाही अरे, पण तुझी ही नोकरीची धरसोड.. अजून पर्मनंट नाहीस तू आत्ताच्या जॉब मध्ये.. माझंही अजून..”

“मग असेच भेटत राहुयात का जन्मभर? या पार्कमध्ये याच बाकावर?” तो परत उसळून म्हणाला.

“हे बघ ए, चिडू नकोस. मला नको का आहे रे आपलं सगळं नीट झालेलं? बरं, तू काढलास विषय तुझ्या घरी?”

“अंss, हो म्हणजे.. परवा संधी साधून आईला हळूच म्हणालो, एक मुलगी आवडल्यासारखी वाटतेय मला..”

“आवडल्यासारखी वाटतेय??” तिने डोळे मोठे केले. त्याच्याकडे रोखून बघताना तिचे घारे डोळे अजूनच टपोरे झाले.. तेव्हढ्यात वाऱ्याची एक झुळूक आली आणि केसाची एक बट तिच्या कपाळावर आली. मंद वाऱ्यामुळे कपाळावर भुरभुरणाऱ्या त्या बटेमुळे तिच्या सौन्दर्याला आता एक वेगळीच धार आली. तो मोहित होऊन तिच्याकडे फक्त पहातच राहिला..आता मात्र इतका वेळ रोखून धरलेलं हसू ती आवरु शकली नाही.

“आता हे तुझं असं पाहणं तरी खरं, का ही सुद्धा पार्ट ऑफ ‘रिविजन’? चला बच्चमजी, तेव्हा असायचा तितका आता नाहीये बरं वेळ आपल्याला.. मुलं क्लासवरुन घरी आली असतील, मला घरी जाऊन अजून स्वयंपाक करायचा आहे, तुझं काय? तू जाऊन तंगड्या पसरशील लगेच TV समोर बसून..”

त्याचं विमान तिने क्षणात धावपट्टीवर आणलं आणि लग्नापूर्वीचे सुगंधी क्षण मनात घोळत ते जोडपं हातात हात गुंफून घराच्या दिशेने चालू लागलं.

Umesh Patwardhan

Umesh Patwardhan

उमेश पटवर्धन, पुणे हे इन्फोसिस या IT कंपनीमध्ये गेली काही वर्षे कार्यरत आहेत. लेखनाची सुरुवात इंजिनियरिंगला असताना एका कथास्पर्धेद्वारे झाली. त्यावेळी लिहिलेल्या कथा किर्लोस्कर, उत्तमकथा आदी मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. पुढे काही वर्षांचा खंड पडून २०१६ मध्ये एका कथालेखन कार्यशाळेद्वारे पुन्हा लेखनाला सुरुवात केली. या काळात नुक्कड, अक्षरधन, Lekhakonline अशा साहित्याला वाहिलेल्या ग्रुपवर सातत्याने कथालेखन केले. २०१८ मध्ये एक कथासंग्रह ईबुक आणि ऑडिओबुक स्वरूपात प्रसिद्ध झाला. लेखनाच्या या दुसऱ्या टप्प्यात उत्तमकथा, शिक्षण विवेक, निरंजन, रोहिणी अशी दर्जेदार मासिके आणि दिवाळी अंकात अनेक कथा प्रसिद्ध झाल्या. अलीकडच्या काळात काही कथांना विविध स्पर्धांमध्ये पारितोषिकं मिळाली आहेत.

3 thoughts on “रिविजन

  • April 16, 2020 at 7:26 am
    Permalink

    छान लेख

    Reply
  • April 16, 2020 at 12:19 pm
    Permalink

    मस्तच👌👌

    Reply
    • July 14, 2020 at 4:02 am
      Permalink

      धन्यवाद !

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!