४० मिनिट!   

घरघर करत स्कुटी बंद झाली आणि ती साईड स्टॅन्ड ला लावून रावी ने चेहर्यावरचा स्कार्फ काढला. एक सुस्कारा टाकत तिने स्कार्फ गाडीत ठेवला आणि अगदी नकळत आरशात बघितलं. एका डोळ्यात काजळ किंचित कमी घातलं गेलं होतं. तिला त्याचं काहीच वाटलं नाही. केसांवरून नकळत हात फिरवून ती त्या निर्जन बागेच्या गेट वर आली. नुकत्याच अटपलेल्या पावसाने बाग निर्जन असली तरी हिरवीगार दिसत होती. बागेच्या गेट वर , बागेत असलेलय एखाद्या घसरगुंडी आणि झोक्यावर  असलेल्या खांबातून कोवळे कोंब बाहेर डोकावत होते. भर दुपारीही भरून आल्यामुळे गूढ थंड हवा सुटली होती. 

ती जाऊन नेहमीच्या दगडी बेंचवर बसली. घड्याळात बघितलं. अजून पाऊण तास जास्तीत जास्त. ती अंमळ लवकरच आली होती पाचएक मिनिट.

ती मोबाईल चेक करते न करते तोच तिला मोटारसायकल चा आवाज आला. हळू हळू होत जाणारी आणि मग धडधडत पटकन बंद होणारी मोटारबाइक त्याचीच. काय गम्मत आहे ! गाडी बंद करण्याची विशिष्ट पद्धत, चालण्याची विशिष्ट पद्धत, जिना चढण्याची , बेल वाजवण्याची, अगदी कडी वाजवण्याची विशिष्ट पद्धत .. हे सगळं बेमालूमपणे माणसाच्या अस्तित्वाचा एक भाग होऊन जातं. आणि मग त्या निर्जीव परक्या गोष्टींमध्येही आपण शोधत बसतो आपण जवळची माणसं ..

इतक्यात तो आला आणि तिची तंद्री तुटली. काही न बोलता तो तसाच शांत बसून राहिला. तिने बोलायची वाट बघत. तिला बोलायचं होतं पण मनावरच्या मणभर ओझ्याखाली एक एक शब्द दबून गेला आणि ती तशीच बसून राहिली.

असाच काही वेळ गेला. शेवटी तो म्हणाला “काय झालं ? परत काही झालं का ? सांगणार आहेस का ?”

“नेहमीचंच आहे, त्यात परत वेगळं काय सांगायचं आहे ?” किंचित वैतागलेल्या सुरात ती बोलली आणि हातातल्या गाडीच्या किल्लीशी उगाच चाळा करत राहिली.

“बरं.” इतकंच बोलून तो सुस्कारा देऊन जरा सैलावून बसला.

तिने घड्याळ पाहिलं. जेमतेम २५ मिनिटं राहिली होती. एक एक क्षण निसटून जात होता.

“तुला माहितीये ना मी नेहमीचंच सांगणार आहे .. तेच तेच परत बोलायचा कंटाळा येतो अगदी. आणि तुला सारखं रडगाणं ऐकवायचाही. नेहमी होतं तेच सगळं परत झालाय. वाद , भांडण आणि कारणं सगळी तीच आहेत. उठलेल्या जखमांच्या जागा बदलल्या आहेत फक्त. नेहमीप्रमाणे.”

आत हळूहळू खपली निघू लागली होती .. जखम ओलसर असल्याची जाणीव करून देत ..

“पण तू इथे थांब फक्त. माझ्या सोबत. माझ्या शेजारी. नेहमी असतोस तसा .. मी काही बोलले नाही तरीही .. ” ती अगदी हळवी हळवी होत म्हणाली.

“हम्म .. ” तो म्हणाला. पण त्या हम्म मध्ये पण इतकं आश्वासक , इतकं मऊ काहीतरी होतं कि ते हम्म ऐकूनही तिला अगदी रडू रडू यायचं ..

थोडा वेळ फक्त पक्ष्यांचे आवाज त्या शांततेचा भेद करत राहिले ..

“काल ना .. ” ती बोलू लागली .. अगदी जड आवाजात. “थांब.” तो तिला थांबवत म्हणाला. “काय झालं असेल याची कल्पना आहे मला .. ते ऐकायला नाही आलो मी इथे .. तुला काय वाटतंय ते सांग .. आतून काय बोलायचं आहे ते बोल , अगदी शिव्या दिल्यास तरी चालेल पण तुला काय वाटतंय ते बोल ग .. ” तो म्हणाला. त्याच्या डोळ्यात एक क्षणभर ओळखीची वेदना उमटून गेली पण अगदी क्षणभरच ..

भरून भरून आलेलं काळाकुट्ट आभाळ बरसावं अशी ती बरसू लागली .. डोळ्यातून .. शब्दातून .. त्या पावसाचा निचरा होईपर्यंत तो फक्त निश्चल पहाडासारखा तिच्याकडे बघत होता .. काही त्याच्यावरून वाहून जात होतं .. काही त्याच्या आत आत अगदी आत शिरत होतं .. काहींनी त्याच्या अगदी ठिकर्या ठिकर्या होत होत्या .. खूप वेळाने तिच्याकडचे शब्द हि संपले आणि अश्रू हि .. आणि मग हळूहळू मुसमुसणं हि बंद झालं ..

“बरं वाटतंय आता ?” त्याने विचारले .. “हम्म” डोळे पुसत ती म्हणाली.

“निघूया मग ? तुलाच उशीर होईल म्हणून .. मला अशी काही घाई नाहीये .. ” तो म्हणाला ..

“चल .. ” बॅग उचलून ती चालू लागली ..

“मला हे सगळं फक्त तुझ्याशीच बोलता येतं .. का माहित नाही पण फक्त तूच ..” ती म्हणाली ..

“हम्म .. ” तो खिशातली सिगरेट काढत म्हणाला ..

“कधी तरी हम्म शिवाय काहीतरी बोल कि .. नुसतं आपलं हम्म .. इकडची तिकडची २-४ वाक्य आणि झालं तुझं बोलणं .. ” आता ती अगदी नेहमीच्या आवाजात म्हणाली ..

सिगरेट पेटवता पेटवता तो हसायला लागला , सिगरेट तशीच बोटात ठेवून ..

“मी बोलायला लागलो तर काय होईल माहितीये ??” तो म्हणाला ..

“काय?” तिने विचारले.

“तू बोलणार नाहीस .. ” तो सिगरेट चा कश घेत म्हणाला ..

“असं का वाटतं तुला .. ” थोड्या नाटकी स्वरात तिने विचारले ..

“कारण मी तुझा आरसा आहे .. तुझं आउटलेट आहे .. सगळं रिकामं करण्याचं .. जेव्हा तू बोलतेस ना, तेव्हा खरंतर तू माझ्याशी बोलतच नसतेस , तू स्वतः शी बोलत असतेस .. मी फक्त निमित्तमात्र असतो तिथे .. ” तो म्हणाला ..

ती बघतच राहिली त्याच्याकडे .. “मग हे सगळं का करतोस तू .. ” तिने विचारलं ..

त्याने एकटक तिच्याकडे बघितले .. “माझ्यासाठी असं कोणी केलं नाही ना, म्हणून तुझ्यासाठी करतो .. आणि आपली गरज कोणालातरी आहे हि गोड टोचणी कोणाला नको असते ? बघ , पुढेमागे जमलं तर तू हि कर .. छान वाटतं खूप !” तो म्हणाला ..

खरंतर त्याचा भारदस्त आवाज आणि त्याचं ते लयीतलं गूढ बोलणं ऐकतच राहावं असं वाटायचं तिला .. तासंतास ..

“तुझी बायको फार लकी आहे रे .. ” ती म्हणाली. “तुझा नवरा किती लकी आहे हे मी म्हणल्यावर तुझ्या मनात जे येईल तेच माझं उत्तर समज ! असो , निघूया! गाडी सावकाश चालव !” म्हणत तो मोटारसायकल वर बसला देखील.

“हम्म .. भेटू परत .. ” ती म्हणाली. “परत यासाठी भेटायची वेळ तुझ्यावर येऊ नये हीच इच्छा .. नेहमीप्रमाणे .. ” तो म्हणाला ..

काही न बोलता तिने स्कुटी सुरु केली .. डोळ्यांनीच शेवटचा निरोप घेऊन दोन गाड्या विरुद्ध दिशेला निघाल्या ..

आता मळभ जाऊन रस्त्यांवर किंचित ऊन पसरलं होतं .. आणि मनातही !

Image by Olessya from Pixabay 

Pooja Pathak
Latest posts by Pooja Pathak (see all)

Pooja Pathak

कम्प्युटर इंजिनियर, सध्या ह्युमन रिसोर्स विभागात कार्यरत. वाचनाची आणि लिखाणाची प्रचंड आवड. इतरही बरेच छंद - गायन, चित्रकला, मिमिक्री, स्केचिंग. क्रिएटिव्हिटी ला वाव असणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. पेनपूजा हे स्वतः साजे लिखाण असणारे फेसबुक पेज Oct 2018 पासून चालवत आहे.

3 thoughts on “४० मिनिट!   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!