दिलजले…

सॅम.त्याचं खरं नाव समीर होतं म्हणे. ही सॅमच म्हणायची त्याला. बहुतेक लहानपणापासून.मी हा सॅमनामाचा जप गेले दोन दिवस ऐकतोय. सॅम यंव आणि सॅम त्यंव.सॅम कित्ती हॅन्डसम दिसतो ना हल्ली..?
सॅम मदनाचा पुतळा. सॅम सर्वगुणसंपन्न.सॅम आण्णा मूव्हीजच्या हिरोसारखा आहे. दहा दहा लोकांना भारी. त्यानं जमिनीवर नुसता पाय आपटला तरी तिथली फरशी फुटते अन् सोसाट्याचं वादळ येतं म्हणे. सॅम किती केअरींग नेचरवाला आहे.सॅम किनई अगदी अस्साऽऽ आहे.अगदी लहानपणापासून.च्या मारी भेंडी.
सॅमच्या नानाची टांग.. समोर आला असता तर, मिरचीच्या पाण्यानं धू धू धूतला असता त्याला. एका हातानं पिळून काढला असता अन् दोरीवर वाळत घातला असता. चिमटा न लावता. गेलास ऊडत…
कोण आहे कोण हा यूनीसेल्यूलर प्राणी ? समीर हर्दनहळ्ळी. एक नंबरचा घासू. एकदम हुश्शार.हिच्याच बिल्डींगमधे रहायचा, नाशिकला.हिच्याच शेजारच्या फ्लॅटमधे.हिच्याच शाळेत. हिच्याच वर्गात. हिच्याच बरोबर शाळेत जायचा आणि यायचा. हिच्याचबरोबर होमवर्क करायचा. च्यामारी , मी कुठं होतो ? सगळीकडे मला नुसता सॅमच दिसतोय. नशीब, गॅलरीतल्या पिलरला लाथ नाही घातली. नाहीतर तो पिलर फुटला असता. त्यातनं सॅम नावाचा नरसिंहा बाहेर पडला असता. मांडीवर घेवून त्यानं मला फाडून खाल्ला असता. आता माझी सटकली….
सॅमच्या नावानं चांगभलं.
हा कानडा विठ्ठलू माझ्या डोक्यात गेलेला. कुठं होता कुठं हा प्राणी इतके दिवस ? तिकडे यूएसला होता म्हणे.
सहा महिन्यापूर्वीच इथं आलाय. कशाला ? लाथ घालून हाकलला असणार त्याला.मोठा सायक्रॅटिस्ट झालाय म्हणे. सायको कुठचा. फेसबुकवर सापडला म्हणे हिला तो.दोन मर्डर मस्ट. एक झुक्याचा अन् दुसरा या हर्दनहळ्ळीचा. माझ्या संसाराची वाट लावणार बहुतेक ही दोघं. काय वाट्टेल ते होवो. या दोघांना सोडणार नाही.यांना संपवून हसत हसत फासावर जाईन.
आज संध्याकाळी येणार आहे म्हणे तो.जोरदार तयारी चाललीये. आख्खं घर दोनदा धूवून पुसून लख्ख. दिवाळीत ऊटणं लावून आंघोळ केल्यासारखं सुगंधी. काल जरा सोफ्यावर आडवं होऊन आयपीएल बघत होतो, तर करकचून चिमटा काढला हिनं.
“ए बटाट्या, नीट बस जरा. सारखा पसरलेला असतोस. सोफा खराब होतो माझा..”
खूप बील झालं.ओल्या नारळाची चटणी काय ? गाजराचा हलवा काय ? त्याला आवडतात म्हणून आप्पे काय ? खिडक्यांना नवीन पडदे काय ? आधी माहिती असंत तर… माहिती अधिकाराची माहिती काढायला हवी. दणदण पाय आपटत मी आॅफीसला निघालो.
हिनं माझ्याकडे ढुंकूनही बघितलं नाही. आज घरी लवकर येशील का ? तुझ्या आवडीचं काही खायला करू का ?.मी नकोच आहे लवकर यायला. आता माझी अडचणच व्हायची. माझी गरज संपलीय आता.. मी जिन्याच्या पायर्या ऊतरत असताना, पाठमोरा निरोप सांगितला.
“ऊगाच फोन करत बसू नकोस. मी पार्लरला जाणारेय दोन अडीच तास. फोन ऊचलणार नाही. मग बसशील फुगून.नुसता फुगत चाललायेस दिवसेंदिवस.जरा त्या सॅमकडे बघ..जाऊ दे तुला नाही जमायचं”
जले पे नमक.मला जुनी दर्दी गाणी आठवू लागली. आता जिंदगीभर फक्त जळत बसायचं..मी पडेल चेहर्यानं आॅफीसला निघालो.’मी’ नावाचं मशीन गाडी चालवत होतं.बॅग्राऊंडला ऊदासी पंकज कुठली तरी गजल जीवावर आल्यासारखं गात होता. मन टुकडे टुकडे झालेलं. सॅम नावाच्या काटेरी साळींदरानं माझ्या संसाराची गाडी पंक्चर केलेली. काय चुकलं माझं ?
हल्ली थोडं गृहीत धरतोय हिला. घरी पोचायला आठ साडेआठ. टीव्हीसमोर बसून जेवावं लागतं. निवांत गप्पा होतच नाहीत पूर्वीसारख्या. सोशल मिडीयावर अपडेट रहावंच लागतं. निम्मं आयुष्य त्यातच संपून जातं.कुठं बाहेर जाणं नाही की हातात हात घालून फिरणं नाही.शनिवार रविवार अंगावर येतो. नुसतं लोळायचं. आठवड्याचा सूड ऊगवायचा, या दोन दिवसांवर. रात्री कुठं तरी बाहेरच जेवून यायचं. अगदी ‘तो’ कार्यक्रम सुद्धा…पाट्या टाकल्यासारखा ऊरकून टाकायचा.मनांची गुंतवणूक शून्य.काय करणार?
सगळे असेच तर जगतात.नाही..
असंच तर जगायचं असतं.
सगळ्यांना चालत असेल. हिला नाही चालणार. फार सेन्टी आहे ती. एकदम हळवी. मी ईतका बदललोय.रसिक प्रियकराचा मद्दड नवरोबा झालोय.
ती नाही सहन करू शकणार.बास झालं. बाॅसला सांगून टाकतो. यापुढे ओव्हरटाईम बंद.सहा वाजता घरी.
पाहिजे तर शनिवारी येत जाईन.रविवार फक्त आमच्या दोघांसाठी. हिचं सगळं ऐकेन. बाप्पा, फक्त एक चान्स दे मला. मी खरोखरच स्वतःला, बदल डालूंगा. आज या सॅम प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावूनच टाकतो एकदाचा. पावणेसहालाच टपकतो घरी.
हजर.. पावणेसहाला मी घरी हजर.हिनं मला बघून नाकं मुरडली. सहा वाजले. माझ्यासाठी बारा. बरोब्बर सहाच्या ठोक्याला सॅम आला. आल्या आल्या हिचा हात हातात.. दहा मिनटं साडेतेवीस सेकंद.हातात हात घेवून दारातच गप्पा. शेवटी दोघांना जागं करून घरात घेतलं. दोघं फ्लॅशबॅकमधे पोचलेली.आपली शाळा, आपलं नाशकातलं घरं, .. एकदम ती दिसली. मी कसनुसं हसत तिला म्हणलं, “तुम्ही, आत या ना !”
रेवथी. मिसेस सॅम. हाय हिल्सवाली. चमकीली ब्लॅक साडी. स्लीव्हलेस ब्लाऊज. कुरळे केस.मनमोकळं हासू.
मनमोकळा स्वभाव.वेव्हलेंग्थ एकदम जुळल्या. साडेनऊ मिनटं झाली असतील. फक्त एवढाच वेळ गप्पा मारल्या असतील आम्ही.असं वाटलं,की आमची ओळख निदान साडेनऊ जन्मांपूर्वीची असावी.छानच दिसत होती ती. म्हणलं, हिला मारू दे गप्पा निवांत त्या सॅमशी. मी व रे वथी.एकदम जाणवलं, रेवथी हसली की डाव्या गालाला मस्त खळी पडते.अचानक काय झालं कुणास ठावूक.?
सॅमनं रेवथीचा हात धरला, आणि फरफटत घेवून गेला तिला. ते आप्पे तसेच राहिले..ही नुसती बघतच राहिली. एकदा आप्प्यांकडे आणि एकदा सॅमकडे.मला मात्र रेवथीचे ते गहिरे करूण डोळे घायाळ करीत होते..
मौसम है सुहाना… मजा येतेय.आज सकाळीच आलोय माथेरानला.हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट.
आज मुक्काम इथंच. मी , ही आणि हसीन वादियाँ.
एकदम मी किलोभर हसतच सुटलो.ही कनफ्युजलेली.
तुझ्या सॅमच्या नानाची टांग…येडंय ते. त्याची सगळी कुंडली आहे माझ्याकडे. म्यारेज काऊन्सीलर आहे तो. मला जळवण्यासाठी हे नाटक करत होता. ‘दिलजले’ थेरपी म्हणतात त्याला.तुमच्या गप्पा चालल्या होत्या, तेवढ्यात  त्याच्या बायकोला पटवली. म्हणलं, जरा गंमत करू. त्याची ‘दिलजले’ थेरपी त्याच्यावरच ऊलटवली. बुडाला आग लागल्यासारखा गेला पळून.
“तुम मेरी हो, मेरी थी, और मेरी रहोगी…”
मी हिचा हात हातात घेवून डायलाॅगलो.ही दीड किलो लाजली. ” तुम बडे वोऽऽ हो…”
“तशी रेवथी सुद्धा काटा पीस होती..”
हिनं पोटाला जोरात चिमटा काढला.” मै तो मजाक कर रहा था..”प्रेमाच्या स्टोरीत ‘दिलजले’ ला जागा नसतेच मुळी.
आम्ही दोघं प्यारवाल्या लवस्टोरीत बुडून गेलो.
Image by congerdesign from Pixabay 
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

5 thoughts on “दिलजले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!