ओटी

अपर्णा ओटीचं सगळं सामान नीट एका ताटात रचून ठेवत होती. आजूबाजूला खेळत असलेल्या स्वराचं लक्ष, आई काय करतेय तिकडे होतंच.
निगुतीने भरलेली कुंकवाची कुयरी चांदीच्या ताटात विराजमान झाली, तिच्या शेजारी अत्तरदाणी, बाजूलाच गुलाबदाणी ठेवून अपर्णाने फ्रिज उघडला. त्यातून कागदाची एक पुडी उघडून मोगऱ्याच्या कळ्यांचा भरगच्च गजरा गुलाबदाणीच्या शेजारी ठेवला. त्याच्या बाजूलाच एक सुबक गिफ्ट पॅक केलेला बॉक्स ठेवला. आता मात्र उत्सुकता दाबून ठेवणं स्वराला अशक्य होतं. ती हळूच अपर्णा जवळ आली.
“आई… काय करतेस?” चार वर्षाची धिटुकली स्वरा टाचा उंचावून ओट्यावर ठेवलेल्या ताटात पहायचा प्रयत्न करत म्हणाली.
अपर्णानं ताट ओट्यावरून उचलून खालीच देवासमोर ठेवलं.
“ह्म्म… स्वराबाई… आता दिसेल बरं का तुम्हाला सगळं.” ती कौतुकानं म्हणाली. “बस इथे मांडी घालून. अगं, आज अक्षय्य तृतीया ना? आपल्याकडे पूजा झाली ना आत्ताच? आता आपल्याकडे स्वाती मावशी येणार जेवायला. तिचं जेवण झालं की आपण ओटी भरू हां तिची? त्याचीच तयारी करून ठेवतेय मी.” असं म्हणत अपर्णाने स्वराच्या डोक्यावर टपली मारली.
“ओटी म्हणजे?” या प्रश्नापासून सुरू झालेल्या स्वराच्या हजार प्रश्नांना उत्तरं देत अपर्णाने नारळ, सुपारी, तांदूळ ठेवून ओटीचं ताट तयार केलं.
स्वाती मावशी येऊन तिचं जेवण, आईचं वाढणं, त्यांचं बोलणं यातली एकही गोष्ट स्वराच्या चाणाक्ष निरिक्षणातून सुटत नव्हती. जेवणं झाल्याबरोबर , “आई… स्वाती मावशीला ओटी देणार ना तू?” असं स्वराने म्हणताच अपर्णा आणि स्वाती हसतच सुटल्या.
“अगं स्वरा ओटी देत नाहीत भरतात. भर गं अपर्णा माझी ओटी.” असं म्हणत स्वाती पाटावर बसली.
ओटी भरून झाल्यावर अपर्णा तिला सगळं सामान पिशवीत भरायला मदत करताना पाहून परत स्वराच्या मनातला शंकासुर जागा झाला.
“आई… आता ही ओटी आपल्याला?” तिनं विचारलंच.
“चल वेडे… एकदा भरलेली ओटी कोणी परत घेतं का? मावशी घेऊन जाईल आता ती घरी.”
स्वरानं मान डोलावली.
“येते गं अपर्णा. आता उद्या ऑफिस मध्ये भेटू. आज रविवारी तुझ्यामुळे मस्त आयतं गरमा गरम जेवायला मिळालं.” असं काहीबाही बोलत स्वाती मावशी गेली.
“आई, तू उद्या ऑफिसला जाणार?”  स्वरा थोडी हिरमुसून म्हणाली.
“हो बेटा. जायला नको का? उद्या सोमवार. आपलं रूटीन सुरू. आणि वेडाबाई, लता मावशी येतील ना तुला सांभाळायला. तुला आवडतात किनई त्या?”
“आवडतात ना.” म्हणत स्वरा खेळायला पळाली.
दुसऱ्या दिवशी लता मावशी आल्या. आई ऑफिसला जाता क्षणी स्वराने तिच्या लाडक्या लता मावशीला आदल्या दिवशीच्या सगळ्या घटना सांगितल्या. मग अचानक काहीतरी आठवून म्हणाली, “लता मावशी, माझ्या आईला रविवारी सुट्टी असते तशी तुला पण होती ना? मग तू पण ओटी भरलीस?”
“नाही गं बाळा. आम्ही कसली ओटी भरणार? काल तुझ्या प्रसाद दादाला खूप बरं नव्हतं. ताप आला होता.”
“हो? मग? आता गेला ताप?” स्वराच्या आवाजात काळजी होती. पण लता मावशीच्या डोळ्यासमोर मात्र तिचंच स्वरापेक्षा फक्त दोनेक वर्षांनी मोठं असलेलं लेकरू होतं. तिचे डोळे भरून आले… घसा दाटला… “कसा जाईल? औषध पण घेतलं नाही लेकरानं. चार दिवस झाले “आंबा हवा” म्हणून धोशा लावलाय. आता इतका महाग आंबा आम्हाला कसा परवडावा?” लता मावशी अभावितपणे बोलून गेल्या आणि मग अचानक एवढ्याशा चिमुरडी समोर आपण काहीतरीच बोलून गेलो ही जाणीव होऊन सावरल्या…. पटकन म्हणाल्या, “होईल हो दादा बरा. तू सांग. तू काय काय जेवलीस काल?….”
स्वरा आणि लता बाईंच्या गप्पा रंगल्या तोच स्वराचे आई बाबा दोघेही एकत्रच घरी आले.
स्वरानं पळत जाऊन बाबाच्या अंगावरच उडी मारली. “अगं हो हो… सावकाश…” हातातला बॉक्स सावरत बाबा म्हणाला, “आंबे पडतील ना हातातून.”
स्वरा मागे सरकली. बाबाने बॉक्स टीपाॅयवर ठेवला. “ये आता इकडे” तो सोफ्यावर बसत स्वराकडे हात फैलावत सचिन म्हणाला. पण स्वराचं लक्ष आता बॉक्सकडे होतं…. “यात आंबे आहेत बाबा?” तिनं बॉक्सवरची नजर न काढता विचारलं.
“हो बेटा… आवडतो ना तुला आंबा?” या बाबाच्या प्रश्नावर काहीही न बोलता स्वरानं दोन्ही हातांनी तिला अवजड असणारा तो बॉक्स उचलला आणि घरी जाण्यासाठी उठत असलेल्या लता मावशींना, “मावशी” अशी हाक मारत त्यांच्या मांडीवर ठेवला.
लता मावशी, अपर्णा, बाबा सगळे अवाक् होऊन पहातच राहिले. अपर्णला स्वराच्या आगाऊपणाची चीड आली. एक कटाक्ष बाबाकडे टाकून, “स्वरा… हा काय प्रकार आहे?” असं थोडं रागाने स्वराला विचारल्यावर… थंडपणे स्वरा म्हणाली,  “मी लता मावशींची ओटी भरली.”
तिच्या थंडपणानं अपर्णा अजुनच वैतागली, “पाहिलंस सचिन, तू म्हणतोस ना मुलांचं कुतूहल मारू नये? म्हणून काल हिला ओटी भरणं म्हणजे काय ते सांगितलं तर ही आगाऊपणा करायला लागली.”
आता मात्र लता मावशींना राहवेना, “अहो लहान आहे ती. तिला नका रागवू. दिवसभर तुमची वाट पहात असते. हे ओट्यावर ठेवून मी निघते ताई, तुम्ही स्वराला आंबे चिरून द्या. टाटा स्वरा. उद्या येते काय?” म्हणत लता बाई निघाल्या.
स्वरा त्यांच्या रस्त्यात ठामपणे उभी रहात म्हणाली, “पण ओटी भरलेली ठेवायची नसते. तो बॉक्स घेऊनच जा तुम्ही.”
“अगं, वेडी आहेस का तु स्वरा? बाबांनी तुझ्यासाठी आणले ना आंबे.” लता मावशी स्वराला समजावत म्हणाल्या.
“लता मावशी, एक काम करा. त्यातले सहा आंबे तुम्ही घेऊन जा.” असा मध्यम तोडगा काढत अपर्णा आंबे काढायला जाणार तोच स्वरा म्हणाली, “पण मी तरी सगळे आंबे ओटीत भरले आहेत. त्यातले परत कसे घेणार? आत्ता मावशींना नेऊ देत. मला नकोत आंबे.”
अपर्णाचा संयम आता संपत चालला होता. मग मात्र सचिन म्हणाला, “लता मावशी स्वरानं तुम्हाला दिलेत ना आंबे? मग तुम्ही न्या बरं…. स्वरासाठी मी उद्या परत आणेन.”
लता मावशी निघून गेल्या. अपर्णा रागारागाने स्वराकडे पहात म्हणाली, “सचिन तुझ्या फाजील लाड करण्यामुळे शेफारली आहे ही….”  पुढे ती काही बोलणार तोच सचिनच्या कडेवर असलेल्या स्वराने बाबाच्या गळ्याभोवती हात टाकत भरलेल्या डोळ्यांनी आणि दाटलेल्या कंठाने त्याला विचारलं, “पण बाबा… आता आंबे खाल्ल्यावर प्रसाद दादाचा ताप जाईल आणि लता मावशी रडणार नाहीत म्हणून मी दिले आंबे.”
तिच्या या वाक्याने चकित झालेल्या सचिनने गोड बोलून चुचकारून स्वराला बोलतं केलं आणि स्वराच्या वागण्याचं कारण लक्षात येताच आपल्या पिल्लानं इतक्या लहान वयात दाखवलेली माणुसकी पाहून दोघांचे डोळे भरून आले.
सचिनचं “मुलांचं कुतूहल मारू नये” हे म्हणणं अपर्णाला आज मनापासून पटलं होतं.
Image by PublicDomainPictures from Pixabay 
Sanika Wadekar
Latest posts by Sanika Wadekar (see all)

Sanika Wadekar

लेखन वाचनाची आवड. व्यवसाय - पुस्तक प्रकाशन पुस्तक प्रकाशनाच्या संदर्भात कोणतीही शंका असेल तर निःसंकोच पणे विचारा.

13 thoughts on “ओटी

  • April 27, 2020 at 4:33 pm
    Permalink

    अप्रतिम

    Reply
    • May 1, 2020 at 5:05 am
      Permalink

      धन्यवाद

      Reply
      • May 17, 2020 at 8:46 am
        Permalink

        मस्त लिहितेस ग ताई तू वेगवेगळे विषय घेऊन 😊👌

        Reply
      • June 5, 2020 at 8:30 pm
        Permalink

        छान. आवडली कथा

        Reply
    • May 1, 2020 at 5:05 am
      Permalink

      🙏🏻

      Reply
    • May 1, 2020 at 5:06 am
      Permalink

      🙏🏻

      Reply
  • April 29, 2020 at 12:58 pm
    Permalink

    किती गोड

    Reply
  • May 27, 2020 at 11:09 am
    Permalink

    Excellent ! The ” OTI” concept was exploited in the best possible manner !

    Reply
  • July 31, 2020 at 7:16 am
    Permalink

    सुंदर, लहान मुलं आणि त्यांचं वागणं निःशब्द करतं

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!