जाळीचं पान…

    हॉस्पिटलच्या आवारात शिरताच  तो नकोसा  असा  नाकात आणि एकूणच शरीरा भोवती रेंगाळणारा दर्प जाणवलाच . अदितीला हे वातावरण काही नवीन नव्हतं . गेले सहा महिने सतत इथल्या चकरा आणि आता महिन्यापासून तर कायमचा मुक्कामच होता इथे . 

आधी घेतलेली स्पेशल रूम सोडून आता पाच जणांच्या वॉर्ड मध्ये हलवलं होतं  सचिन ला .  शेवटी व्यवहार कुणाला चुकलाय !  आणि  साक्षी – शिवम चं पुढचं सारं आयुष्य …शिक्षण..

अदिती कुठे कुठे पुरणार होती . 

“काय म्हणतोय आमचा फायटर?”  बॅग मधील वस्तू छोट्या कपाटात ठेवत तिने विचारले .

आपल्या कृश हाताने तिचा हात धरत म्हणाला , 

” फायटर म्हणतोय , की  आता हसत हसत अलविदा करा .” 

तिला वाटलं , की मोठ्याने रडून ओरडून त्या विधात्याला हाक द्यावी .

प्रत्यक्षात मात्र त्याच्या डोक्यावर हात फिरवून म्हणाली , 

” तू कधीपासून नकारात्मक बोलायला लागलास ?” 

” नकारात्मक नाही ग , सत्याचा स्वीकार जितक्या सहज कराल न  तितक्या सोप्याने तुम्ही परिस्थिती वर विजय मिळवू शकता . मी हे स्वीकारलंय , की माझं आयुष्य इतकं आहे ..मी ते भरभरून जगलोय . आणि ..” त्याला धाप लागली होती. तिचा हात थोपवत तो म्हणाला ,

” आदी , हे जे काही दिवस माझ्याकडे आहेत , त्यात आपण पुढील काही वर्षांचं प्लॅनिंग करू …मी नसतांनाचं …..”   

मग दम लगे पर्यंत  बोलत राहिला सचिन. तिचा हात हातात घेऊन बरंच काही बोलला. तिला ही आज खूप मोकळं वाटलं. हलकं हलकं . मृत्यू चं अंतिम सत्य लपवता लपवता तिचीही दमछाकच होत होती. वाटलं , मृत्यू स्वीकारला की त्याचं भय कमी होतं का ?.. होतच असणार. आपण नाही का स्वीकारलं , आपल्या लग्नाचं सत्य ? 

सचिन ने किती सहज सांगितलं होतं ..

” मला  लग्न करण्याची इच्छा नाहीये. हे लग्न माझ्यावर लादल्या जातंय. आपण एक करार करू . मी तुला कशाचीही कमी जाणवू देणार नाही ; भरपूर प्रेम देईल. तू मला  आणि घरच्यांना ह्या विषयावर कधीच कुठलाच  प्रश्न करायचा नाही. मंजूर?”    

आणि त्याने खरंच खूप प्रेम दिलं आपल्याला. इतकं स्पष्ट सांगूनही का तयार झालो आपण? 

ही असली अट  विचित्र वाटली होती , पण  मग का ?

त्याचा सच्चेपणा आवडला म्हणून , की …आई बाबांची इच्छा म्हणून ? की यांची श्रीमंती भुरळ पाडून गेली ? ..तसं कमी नव्हतं आपल्याला . बाबांच्या तुटपुंज्या कमाईत देखील  समाधानी होतो आपण . पण पहिल्याच भेटीत सचिन आवडला होता आपल्याला  , हे नक्की .  माईंना तीन चार वेळेला आडून आडून विचारलं होतं . त्यांनी कधीच स्पष्ट काही सांगितलंच नाही . म्हणाल्या ,

”तू  आम्हाला खूप आवडली होतीस . म्हणून त्याला जरा आग्रह केला की हिच्याशीच लग्न कर म्हणून . बाकी काही नाही ग .”  इतकंच काय ते बोलल्या होत्या . 

  ***** सत्य कितीही स्वीकारलं तरी प्रत्यक्ष वेळ आली की माणूस हदरतोच .  आज तेरावं झालं सचिनचं . चौदा वर्षांचा संसार  झाला . चौदा ? ती चमकली . म्हणजे सचिन च्या जिवाने  आपल्यासोबत चौदा वर्षांचा वनवास सोसला की काय ? …

नाही तर !  त्याने भरपूर प्रेम केलं आपल्यावर , मुलांवर  . तो आतल्या आत जळत असेलही , पण निदान वर तरी त्याने जाणवू दिलं नव्हतं … आणि विचारायची सोय  नव्हती …शेवटी करारच होता तसा .

जे काही जवळचे पाहुणे होते , ते एकेक करून येऊन गेले . मुलं शाळेत. ती एकटी निवांत होती. गेल्या अनेक वर्षांपासून खोल खोल आत पुरलेले अनेक प्रश्न डोकं वर काढून  अस्वस्थ करत होते .  निग्रहाने थोपवलेला बांध  आता आवरणे अवघड होते. उंच स्टूल घेऊन तिने माळ्यावरची छोटी सुटकेस काढली . केव्हातरी मध्यरात्री ती  सुटकेस उघडून बसलेला सचिन दिसला होता तिला . ती नसतांना तो नक्की ती बॅग उघडून बसत असणार . 

तिने कुलूप तोडलं . तिच्या अपेक्षेप्रमाणेच  आत पत्रांचा गठ्ठा. लग्नाआधी सहा सात वर्षांपासून च्या तारखा . सगळी पत्र तारखानुसार लावलेली . त्यात एक कागद सापडला .

त्यावर एक नजरेत भरणारं पेंसील स्केच होतं .

 ‘नैना  शाळीग्राम ? ‘ 

ही  ‘ती’ नैना आहे ? 

इतक्या वर्षांत चुकूनही तिचा उल्लेख केला नाही सचिनने !  सात आठ वर्षांपूर्वी तिच्या काव्यसंग्रहास पुरस्कार मिळाल्याची बातमी आली . तेव्हा आपण जाऊन  आवर्जून तो संग्रह आणला होता . 

 “””तुला  अर्पण”””  असं लिहिलेला !

तेव्हाही काहीच बोलला नव्हता .

आता हे तिचं चित्र .

अप्रतिम स्केच ! सुरेख रेषा …हुबेहूब ! चित्राखाली नाव  …सचिन .

सचिन स्केचिंग करायचा ? पत्नी असून आपल्याला माहीत पण झालं नाही ?

इतका साफ हात  पुन्हा कधीच पेन्सिल हाती न घेता राहिला ? 

त्याच्यातील कलाकार गुदमरला नाही ?इतके  वर्ष एकत्र राहूनही  त्याचं हे विश्व पूर्णपणे  त्याचं एकट्याचंच होतं . त्याभोवती एक अभेद्य भिंत उभारली होती त्याने ..

तिने एक एक पत्र बघायला सुरुवात केली .   नैना चं सुरेख अक्षर , तिच्या काव्यमय भाषेतील लिहिलेल्या भावना , आणि तितकंच उत्कट प्रेम शब्दाशब्दात . 

तिला आणखीन काही सापडलं .     

एका वहीत एक पत्र ,आणि दोन पानांमध्ये  एक नाजूक पिंपळाचं पान !

सुरेख जाळी पडली होती पानाला . ते पत्र सचिन ने  नंदिनीला लिहिलेलं होतं . पोस्ट न केलेलं . तारीख पंधरा वर्षे आधीची . 

म्हणजे आपल्या लग्नाच्या एक वर्ष आधीची . 

 तिने पत्र उघडलं …….अतिशय भावपूर्ण ….तिचं मन भरून आलं . अक्षरं धूसर झाली  . प्रचंड अपराधीपणाची भावना भरून आली , तिची काहीच चूक नसतांनाही !

पत्ता शोधत ती  कल्याणी नगर ला पोहोचली .  

खुद्द नैनानेच दार उघडलं .  साधी , शांत मूर्ती ,  प्रगल्भ चेहरा ..आता त्यावर हलकसं प्रश्नचिन्ह .

” मी अदिती .”   

” ओह ..या न .”  तिने हसत दरवाजा पूर्ण उघडला . 

बाहेरच्या खोलीत काचेचं कपाट , त्यात भरपुर पुस्तकं आणि मोजकं फर्निचर . 

पाण्याचा ग्लास समोर करत  नैना म्हणाली , 

” त्याला शेवटी खूप त्रास झाला का ग ?”

” त्रास तर होतंच होता , पण बाहेर कधी दाखवलं नाही त्याने.  तसा भावना लपवण्यात  निष्णात होताच तो . ” 

…हिला कसं समजलं की सचिन आता ह्या जगात …

तिचा चेहरा वाचत नैना म्हणाली ,

” अभय , आमचा कॉमन फ्रेंड , त्याने सांगितलं .” 

” ओह .  तुम्ही  दोघं   फोनवर कधीच बोलला नाहीत?” 

” आधी फोन नव्हते , फक्त पत्र पाठवायचो . नंतर फोन होता , पण अधिकार  राहिला नव्हता .” 

” इतकं  प्रेम होतं तर का दूर झालात ? का वनवास घडवलात स्वतःला ?” 

“लग्न करून एकत्र राहण्यातच प्रेमाची इतिश्री आहे , असं थोडीच आहे ?” 

यावर अदिती काही बोलणार इतक्यात एक वयस्क स्त्री बाहेर आली . 

तिने अदितीच्या हातात भरपूर खाद्यपदार्थ असलेली ताटली दिली , आणि नैनाकडे वळली .

नैना लगेच दिवाणावर आडवी झाली .   पोटात असलेल्या नळी ला  एक मोठी सिरिंज जोडून त्या मधून तिला अन्न देण्यात आले . अदिती  ला हा मोठा धक्का होता .त्या महिलेने आणखी एक मशीन तिथे आणून ठेवली .अदिती ने ओळखली , ती डायलिसिस ची मशीन होती . इतकी वर्ष ओठावर न आलेल्यातिच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली होती . असे प्रश्न , ज्यामुळे तिचा अर्धा संसार व्यापून होता कायमचा .

खाणं संपवून ताटली ठेवायला ती आत गेली . तिथे आणखीन कुणी रहात नसावं .  घर तसं स्वच्छ होतं . बाहेर नैना चं फीडिंग झालं होतं . 

” कधीचा आहे हा आजार ? ”  

” पूर्ण पंधरा वर्षे  चार महिने . पण पहा न , अजूनही टिकून आहे  मी .” 

अदिती ला भडभडून यायला लागलं . अन्न नलिकेच्या कॅन्सर मुळे नैना ने सचिन ला दुर केले ,  त्या आजारा सकट ती आजही जगतेय …आणि ह्याच आजाराने केवळ सहा महिन्यात त्याचा बळी घेतलाय . 

” ह्याच कारणामुळे तुम्ही दोघे दूर झालात ?”

” नाही ग ! आजाराची कुठली तेव्हढी ताकद ? …माझा आजार समजल्यावर तर त्याला तिथल्या तिथेच लग्न करायचं होतं . मी सरळ त्याच्या घरी गेले . आई वडिलांना सगळं सांगितलं , आणि इथे मुंबईला वापस आले . काही वर्ष माझे आईवडील होते सोबत . असं वाटलं , की मी त्याच्या शिवाय तेही ह्या असल्या कॅन्सर ला घेऊन कितीशी जगणार ? पण मृत्यू हा फार विक्षिप्त असतो न ग?कधी कधी जीवना पुढे नांगी टाकतो .” 

” आणि कधी संपूर्ण नामोहरम करतो .

सचिन ने स्वतःला कधीच माफ केलं नाही . तुझ्या हट्टा पुढे नमतं घेतल्याची कुर्तडणारी जाणीव इतकी तीव्र होती की  ….त्याने आमच्या लग्ना आधी तुला एक पत्र लिहिलं होतं ..पोस्ट न करता तसंच ठेवलेलं …

तिने ते पत्र वाचायला घेतलं …

 प्रिय  नैना ,

हे माझं तुला लिहिलेलं शेवटचं पत्र , जे मी माझ्याजवळच ठेवणार , कायम ..कारण  “””तू , मी आणि शेवट””   हे शब्द एकत्र येऊच शकत नाहीत . इतरांना एकच असेल , पण मला मात्र दोन हृदय आहेत .एकात फक्त तू आणि मी . दुसऱ्या हृदयात बाकी नाती . तू सांगितल्या प्रमाणे मी लग्न करणार आहे . आता खूष? मुलगी कोण अजून माहीत नाही . 

त्याने फरकही पडत नाही . डोळे मोठे करू नकोस ! मी तिला अत्यंत प्रेमाने , सन्मानानेच वागवेन . पण ….हे आपल्या बाबतीत का झालं , माहीत नाही . कदाचित प्रेमाची नवी व्याख्या जगाला कळावी असा नियतीचा डाव असेल . आठवतं , तू मला दिलेलं पिंपळपान त्याला हळू हळू जाळी पडतेय . ते पूर्ण जाळीदार झालं की भेटायचं ठरलंय न आपलं ? नाही म्हणू नकोस ग ! त्या आशेवर जगतोय मी . तुला भेटायला येईन ..जास्त बोलणार नाही  . त्रास होईल न तुला ?तुझ्या हाताने त्यातलं अर्ध पान कापून मला देशील . माझ्या उरलेल्या आयुष्या साठी  अनमोल ताकद . लवकरच पडणार आहे ही जाळी …आलोच मी नैना !! ” 

हे वाचताना अदिती गदगदून रडत होती . “वेडा !” असं म्हणूननैना कोरड्या डोळ्याने देवघराकडे एकटक बघत होती . अदिती ने ते जाळीदार पान काढले .अलगद हाताने त्याचे दोन तुकडे केले , आणि एक नैना ला  दिला .नैना ने लगेच तो देवघरात ठेवला . 

” तुझी बाकी पत्र आहेत माझ्याकडे . ती सगळी ..”

” जाळून टाक अदिती . आता ह्यातून पूर्णपणे मोकळी हो …मला देखील खूप मोकळं वाटतंय …

तुझे आभार मानून तुला परकं नाही करणार . “

अदिती बस मध्ये बसली होती .नैना चे शब्द कानात घुमत होते …

” अदिती , तू स्वतःला  अपराधी  मानण्याचा संबंधच नाही .  तू त्याची पत्नी आहेस , हे सत्य आहे .  खरं तर सचिन  फार भाग्यवान निघाला . तुझ्यासारखी सहचारिणी लाभली … दुसऱ्याच्या प्रेमाची ताकद समजण्यासाठी  माणूसही तितकाच ताकदीचा असावा लागतो न ?

 माझं म्हणशील तर मी त्याच्यावर प्रेम करत आलेय आणि करत रहाणार . ह्या पिंपळ पानासाठी मात्र जिवंत असेपर्यंत मी तुझ्या ऋणात राहीन .”

 *****  अदिती ला एक मोठं  पाकीट मिळालं होतं . पोस्टाने काही कागदपत्र  आले होते . नैना ने आपली सगळी मालमत्ता अदितीच्या नावे केली होती . 

Image by truthseeker08 from Pixabay 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

31 thoughts on “जाळीचं पान…

    • May 12, 2020 at 7:50 am
      Permalink

      अपर्णा ताई, छान आहे जाळीचं पान

      Reply
      • May 12, 2020 at 10:22 am
        Permalink

        थँक्स डिअर

        Reply
    • May 12, 2020 at 10:23 am
      Permalink

      धन्यवाद

      Reply
        • May 28, 2020 at 5:52 pm
          Permalink

          अपर्णा , खूपच सुंदर कथा

          Reply
          • May 31, 2020 at 7:01 am
            Permalink

            धन्यवाद

    • May 13, 2020 at 3:40 pm
      Permalink

      अप्रतिम

      Reply
    • May 17, 2020 at 10:39 am
      Permalink

      खूप छान कथा अपु

      Reply
      • May 31, 2020 at 7:01 am
        Permalink

        थँक्स मिनू

        Reply
  • May 13, 2020 at 6:42 pm
    Permalink

    अपर्णाताई…खुपच छान…

    Reply
    • May 18, 2020 at 3:05 pm
      Permalink

      Thank you prajakta

      Reply
  • May 14, 2020 at 6:16 am
    Permalink

    अतिशय तरल

    Reply
    • May 14, 2020 at 6:34 am
      Permalink

      धन्यवाद सर

      Reply
  • May 31, 2020 at 2:17 am
    Permalink

    मस्त मस्त👌

    Reply
    • May 31, 2020 at 7:02 am
      Permalink

      धन्यवाद

      Reply
  • June 2, 2020 at 12:21 pm
    Permalink

    वाह
    जळीचं पान खूप सुरेख 👌👌

    Reply
    • June 2, 2020 at 6:17 pm
      Permalink

      थँक्स अपर्णा

      Reply
    • June 6, 2020 at 8:25 am
      Permalink

      सुरेख कथा

      Reply
      • June 6, 2020 at 4:01 pm
        Permalink

        थँक्स पूजा जी

        Reply
  • June 17, 2020 at 10:16 am
    Permalink

    खूपच छान

    Reply
  • July 29, 2020 at 11:05 am
    Permalink

    Khupach sundar katha. Touching.

    Reply
    • August 7, 2020 at 5:08 pm
      Permalink

      धन्यवाद

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!