दुधावरची साय…

लॉकडाऊन ……..

तो गावीच अडकलाय ……. मुलांना सुटीला सोडायला म्हणून आला न अडकला, ……. तसा तो कधी जास्त थांबत नाही.

मित्र , नातेवाईक, आई कुठलाच पाश त्याला अडवु शकत नाही. ….. पण यावेळी मात्र अडकला.

सुरुवातीला वाटलं, ….. एक दोन दिवस , चालेल नाटक, मग निघू.

तोवर जरा गावातल्या जुन्या मित्रांना भेटू, मजेत घालवू जरा दोन दिवस.

पण पहिल्या दिवशी झाल्या तेवढ्याच गाठीभेटी, ……. नंतर वातावरण टाईट. चौकात , पारावर पोलीस उभे, …… फालतू गप्पांच्या टपर्याही बंद …… एकत्र येणं म्हणजे चोरी झाली. आणि हळूहळू तो वैतागु लागला.

पोरांची मात्र मजा होती. आजीकडून लाड करून घ्यायचे. घरभर ….. दिवसभर धुडगूस घालायचा, अन रात्री अंगणात पडल्या पडल्या आजीकडून गोष्टी ऐकायच्या. मुलांना असं एन्जॉय करताना पाहून गावी आल्याचं खरंच सार्थक झाल्यासारखं वाटत होतं……. पण ऑफिस ……. तिकडं कधीच टाळा लागला होता. Work from home चा मेल आला होता.

येऊन जाऊन खंत दिसत होती तर बायकोच्या चेहऱ्यावर……. तिचंही work from home सुरू झालं. दोघात मिळून एकच लॅपटॉप होता. पण तो ही प्रॉब्लेम नव्हता खरं तर. पण दोन दिवसापेक्षा जास्त दिवस सासरला न राहणारी त्याची बायको सतत घाम पुसण्यात व्यस्त दिसत होती. घरकाम करता करता, पदर खोवून कॉल अटेंड करायची तेव्हा, तिला खूप ऑकवर्ड व्हायचं. कॅमेऱ्यात गावचं घर दिसायचं. आजूबाजूला डिस्टर्ब असायचा. त्यामुळं ती ओशाळायची. एक दोनदा लॅपटॉपच्या कॅमेऱ्यात गव्हाची पोती आली न बॉसनं कामाचं बोलायचं सोडून दिलं. गहू कसा आहे ते दाखवा म्हणून आग्रह करू लागला. रेट विचारून त्याच्या मॅडमशी बोलून एक पोतं बुक देखील केलं.

Anyhow काम मात्र होत होतं. …… एक दोन दिवसांनी दोघांचेही बॉसेस घरकामात व्यस्त होऊ लागले, अन हळूहळू बायकोही रुळू लागली.

त्याला मोकळा वेळ आता खायला उठत होता. माळ्यावरचा पसारा काढला पठयानें. जुनी रंगपेटी, जुनी पेंटिंग्ज, काही वह्या पुस्तकं, ….. बघता बघता तिथं धुळीत फतकल मारून बसला. काय असतं त्या धूळखात पडलेल्या वह्यात, लहानपणीचा गृहपाठ, very good चे शेरे……. मिळालेली कित्येक सर्टीफिकेटं…… उगाच हुशार म्हणून मिरवायचे दिवस. मनातल्या मनात जपलेलं, शाळेतलं ते लाडकेपण……

क्षणभर वाटलं, मुलांना दाखवावं, ……. पण इंग्लिश मिडियमच्या त्या धेडगुजरी पोरांना, काय कळणार होतं, बालकवी कोण ते. …… अन त्यांच्या कवितेचं रसग्रहण……. बालवयात संस्कारांनी समृद्ध करणाऱ्या त्या वह्या पुस्तकांमध्ये अगदी रमून गेला.

खालून बायकोचा दोनदा आवाज आला, ….. जेवून घ्या …… नाटकाच्या तिसऱ्या घंटेपेक्षा बायकोच्या तिसऱ्या हाकेचं महत्व, तो ओळखून होता. …… तिच्या तिसऱ्या हाकेआधी नाही उठला तर जो नाट्यप्रयोग सुरू झाला असता, तो गावच्या घरी परवडणार नव्हता. तो चटकन उठला. सगळं धोकटं बांधून सोबत घेतलं अन खाली आला. भरभर चाकवताची चवदार गरगटी अन भाकरी, घशाखाली उतरवली. …… शहरात चाकवताची आठवण काढत बसणारा, …… इतका भरभर का जेवतोय, बायकोलाही कळेना. पण इतका विचार करायला तिलाही वेळ नव्हता. त्याचं लक्ष मात्र मांडीखाली दाबलेल्या धोकटी कडं होतं.

जेवण झाल्यावर, सरळ खालच्या आंब्याखाली पथारी टाकली त्यानं……. अन रमून गेला, भूतकाळाचं एकेक पान उलटत. पुस्तकातले जुने धडे वाचता वाचता मन अगदी वर्गात जाऊन बसलं.

किती गोड आवाजात, शिकवायच्या मराठीच्या पाटीलबाई. विशेष करून कविता.

” तो रविकर का गोजिरवाणा, आवडला आमुच्या राणीला ……..”

कुठूनशी कविताही कानात घुमु लागली. ….. तो तटकन उठून बसला. पटापट पानं चाळू लागला…… काहीतरी आठवलं होतं, …… पण कविता का सापडत नव्हती. …… कुठं गेली, याच तर पुस्तकात होती. एखादी अशी गोड ओळ देखील अभ्यासातून लक्ष उडवायची. पण तसं नाही झालं, त्यानं अभ्यास नेटानं केला, ….. अगदी बारावीतही, ….. हव्या त्या कॉलेजला इंजिनिअरिंगला गेला, ….. यशस्वी करिअर, मोठा पगार…….. या मनात डोकावणाऱ्या कविता अन ते धडे राहिले मागेच कुठेतरी.

काहि केल्या ती कविता काही सापडत नव्हती, …… तो घाईघाईनं पानं उलटत होता, एका ठिकाणी पान जोडून जात होतं. ….. तो थांबला, हळुवार पानं बाजूला केली, ……………. आत चिकटलेल्या गुलाबाच्या पाकळ्यानी पानं एकमेकांना जोडून टाकली होती. इतक्या वर्षानीही, पुस्तकात दाबलेल्या गुलाबाच्या पाकळ्या तिथेच होत्या. …… थोड्या सुकल्या होत्या, पण पानांवर आपला रंग उतरवून.

घाईघाईनं त्यानं आता ते धोकटं उलटं केलं. ……. आणखी काहीतरी तो शोधत होता. तिनं गुलाबाच्या फुलासोबत आणखीही काही दिलं होतं, …….. बासरी. हो, बासरी दिली होता तिनं. धुळीत माखली होता. धुवून घेतली. वाजेल की नाही, विचार करत ओठावर ठेवली, अन ……… घराच्या अंगणात खेळणारी त्याचीच मुलं त्याच्या भोवती धावत आली. बायकोही गहू निवडता निवडता, त्याचं ते वेगळंच रूप पाहून आश्चर्यचकित झाली. ठोंब्याला हेही येतं म्हणायचं. …… यावेळी जास्त दिवस राहिल्यामूळ हे समजलं, …… मनातल्या विचारांनी तिचं तिलाच हसू आलं.

त्याच्या हातून बासरी कधीच गेली होती. मुलांनी तिची फुंकणी करून टाकली. त्यानंही हसत हसत मुलांना त्याची पुस्तकं दाखवायला घेतली.

संध्याकाळी मात्र, चहाचा कप घेऊन तो, छतावर आला. इथंच बसायचा तो पावा वाजवत…… असाच सायंकाळी, हो, हो, अगदी याच वेळी…. आणि ती चार घरं पलीकडं, तिच्या छतावर…… काही ना काही निमित्त करून यायची, अन उडणारे केस सावरत, त्याचे सूर ऐकत राहायची. बऱ्याच विषयात, त्याला पैकीच्या पैकी मार्क्स, ….. छान चित्र काढायचा, …… कविता, निबंधही छान लिहायचा.

निकम सरांनी नोटीस बोर्डवर लावलं होतं, त्यानं केलेलं कवितेचं रसग्रहण,……. खूप गाजलं होतं. मधल्या सुट्टीत तिनं त्याला गाठलंच, ती कविता तिला त्याच्या तोंडून ऐकायची होती. ……. मुलं ग्राउंड वर खेळण्यात दंग होती,……. दहावीच्या वर्गात,….. दोघेच,……. तो वाचत होता, ती ऐकत होती. …….. बस्स , ती दहा मिनिटं आयुष्यावर कोरली होती. नंतर होस्टेलवर, पावसात, कुठं किशोरचं गाणं लागलं की आठवायची, …… ती…… दहा मिनिटं.

एव्हाना, चहा संपला, त्यानं मुलांपासून लपवून वर आणलेली बासरी, टी शर्ट मधून बाहेर काढली, …….. वर्षानुवर्षे जणू थांबलेले श्वास अलगद, त्या बासरीत जीव ओतू लागले.

“लय नाद त्याला, तासं तास वाजवीत बसायचा ……” असं म्हणत आईनं सुनेकडं समाधानानं नजर टाकली……. अन सूनही अगदी गोड हसली.

त्याचे सूर मात्र आसमंतात भिनले, …….. तो आल्याची बातमी घेऊन गल्लीभर नाचले………. सवयीनं त्याची नजर, तिच्या छताकडे गेली, एक पाचवी सहावीतली पोर, मन लावून ऐकत होती. तोच चेहरा, तीच नजर, तेच भुरभुरणारे केस, ……… त्याच्या बासरीत गुंतली तेव्हाचं वयही तेच. …..कदाचित, ………. तिचीच मुलगी. तरीही काही प्रश्न, पूर्वीसारखेच,….. छतावरून उतरताना, त्याच्या सोबत खाली आलेच.

दिवेलागणीची वेळ होती, मुलं आजीच्या सांगण्यावरून, पण त्यांच्या बोबड्या व्याकरणातली, “शुभम करोती” म्हणत होती. आत स्वयंपाक सुरू होता. आई न तो, बाहेरच्या पिंपळाची सळसळ ऐकत बसले होते. आईनंच शांतता भंग केली,

“चार वरसं झाली बघ आता, ‘ती’ गेली त्याला, ……. तवापासून, तिची पोरगी, तिच्या आई बापानं इकडंच ठेवून घेतली,…….. त्यानला बी सोबत नातीची, ……. आक्षी ‘ति’च्या वानीच गोड हाय बघ, “दुधावरची साय………”

अंगणातल्या रेडिओवर, …..शास्त्रीय संगीत सभेत, उस्ताद रशीदखानची सोहनी रागातली बंदिश सुरू होती,

” मोरा, देख वे को जी ललचाय ……..”

Image by Bessi from Pixabay 

B_R Pawar
Latest posts by B_R Pawar (see all)

B_R Pawar

बी आर पवार , भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याखेरीज कथा, कविता, चित्रकलेत रमतो. जीवनानुभव शब्दात चितारायला आवडतो.

20 thoughts on “दुधावरची साय…

  • May 13, 2020 at 4:00 pm
    Permalink

    खूपच छान

    Reply
      • May 16, 2020 at 9:30 am
        Permalink

        दुधावरची साय खूप छान

        Reply
    • May 17, 2020 at 6:47 am
      Permalink

      धन्यवाद 🙏

      Reply
  • May 18, 2020 at 3:27 pm
    Permalink

    खूप सुंदर कथा , त्यातल्या प्रसंगांची आणि पात्रांची वर्णनं वाचताना ती डोळ्यांसमोर उभी राहतात आणि आपण त्या कथेचा एक भाग आहोत एका कोपऱ्यातून हे सगळं बघतो आहोत असं वाटतं.

    Reply
  • July 5, 2020 at 1:16 am
    Permalink

    वा!👍👍 सुंदर कथा. आवडली.

    Reply
  • September 4, 2020 at 6:28 am
    Permalink

    अप्रतिम
    काय बोलावं हे कळत नाही..
    अफलातून

    Reply
  • April 10, 2021 at 9:58 am
    Permalink

    Apratim katha…..No words to express comment…..Superb

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!