मी आणि आमचे दोस्तराष्ट्र
आमच्या काही काही मित्रांना अजब सवयी आहेत. अर्थात त्यांच्या तशा सवयी आम्हा दोस्तांना माहिती आहेत. अन तीच त्यांची खासियत पण आहे. आता आमचा पद्या, अर्थात लौकिकार्थाने प्रदीपराव असे नाव तो लावतो पण आम्हा समस्त दोस्तराष्ट्रासाठी पद्याच.
तर आमच्या ह्या पद्याला टीव्ही वरील जाहिरातींमधील वस्तू वापरण्याचा अन तसेच आपल्या घरात/आयुष्यात घडेल असा समज (की गैरसमज) करून घेण्याची सवय आहे. आम्हाला आमच्या गावच्या काकाने सांगितले होते टीव्हीवरती जाहिरात करणार्या कंपनीची कोणतीही वस्तू घेऊ नको. अरे त्यांच्या मालाची क्वालिटीच जर चांगली असेल तर गरजच कशाला पडेल टीव्हीवर जाहिरात करायची. भंपकबाजी नुसती. अर्थात हे काकाचे मत. आमचे मत इतके अत्यंतीक नसले तरी आम्ही ते पद्याला सांगून पाहिले. पण ऐकेल तो पद्या कसला?
त्याला कितीही समजावले तरी “हो यार तू म्हणतो ते खरेच आहे. आता उद्यापासून सगळे बंद” असे म्हणतो खरा पण तो उद्या काही उजाडत नाही. कारण त्याचे पाहिले पाढे पंचावन्न हे आम्हा सर्व दोस्तांना ठाऊक आहे. त्यामुळे आम्हीही आता त्याला काही समजावण्याचे सोडून दिले.
मुळात हे जाहिरात बनवणारे एकाच बहुतेकदा हिंदी भाषेत ती जाहिरात शूट करतात. मग तीच जाहिरात प्रादेशिक भाषेत भाषांतरित करण्यचा उपद्व्याप का करतात हे एक मला न उलगडलेलं कोडं आहे. जर प्रादेशिक भाषिक लोकांबद्दल एवढा कळवळा असेल तर त्या भाषेत, त्या भाषेतील कलाकार वापरून करावी ना जाहिरात. उगाच हिंदी जाहिरातीला मराठी भाषेत भाषांतरित करताना मीटर मध्ये बसावेत म्हणून काहीही शब्द घुसाडायचे ह्याला काय अर्थ आहे सांगा.
मध्ये ती एका टूथपेस्टची जाहिरात आली होती अजून ही चालू असावी. लग्नाचा विधी सुरु आहे (बहुदा लग्न घर महाराष्ट्रातील आहे) पण ते सकाळी सकाळी सुरु आहे. सगळे झोपेत आहेत. हिरो उठतो. ती टुथपेस्ट वापरून दात घासतो अन लग्नस्थळी जावून नवरी बरोबर नाचू लागतो. काय तर म्हणे “आता मजा… आता मजा… आता मजा करू या… ताजगीका चटक पटक धमाका…” अरे काय हे? आमचा पद्या गेला ना पेस्ट वापरून दात घासून दुपारी १२.३० च्या आमच्या रामभाऊंच्या लेकीच्या लग्नात.
बरं लग्न गावाला कोल्हापुरात. अन हा गेला “आता मजा… आता मजा… आता मजा करू या… ताजगीका चटक पटक धमाका…” करायला. “ह्ये पावणं असं का कारायलय? खुळं बिळं हाय काय? ” म्हणून सगळे बघू लागले. जरा जास्तच व्हायला लागलं तसे मला रागरंग कळू लागले. म्हणून पटकन त्याला बाजूला घेतला नाहीतर आमची धुलाई निश्चित होती.
बर नंतर त्याच कंपनीने नवीन उत्पादन बाजारात आणले. अन त्याच बरोबर नवीन जाहिरात “क्या आप के टूथपेस्ट पे नमक है?” वाली टॅग लाइन. अन मोठमोठे कलाकार त्यामध्ये घेतले. हे लोक कुठून ही उडत येउन माणूस काय करतोय, काय नाही हे काहीही न बघता धाडकन कुठूनतरी तुमच्या समोर येतात अन “क्या आप के टूथ पेस्ट पे नमक है” असे विचारतात. काय अवस्था होते त्या माणसाची असे अचानक कोणी समोर आल्यावरती?
बरं आल्यासरशी बाकी काही बोलावे गप्पा माराव्यात, एखादा फोटू बिटू काढावा तसे काही नाही. तेवढे विचारून ते नवीन उत्पादन त्या व्यक्तीच्या हाती देऊन हे आपले परत गायब. झालं. आमचा पद्या पण सुरु झाला. उगाचच घरी आला की वाहिनी हल्ली कुठली पेस्ट वापरता? असे विचारू लागला. असाच अनुभव आमच्या इतर मित्रांच्या बायकांनाही आला. “काय हो? प्रदीप भाउजी ठीक आहेत ना” हे मात्र आम्हाला ऐकून घ्यावे लागले. साहजिकच आहे म्हणा जाता येता कोणालाही “क्या आप के टूथ पेस्ट पे नमक है” असे पद्या विचारू लागल्यावर इतरांची ही प्रतिक्रिया रस्ताच होती. तर असो ते भूत काही दिवसांनी उतरले.
मागे एकदा पद्या सासरी गेला होता. संध्याकाळची वेळ होती कुणाच्या तरी लग्नाची वरात येत होती. म्हणजे तसा आवाज येत होता. पद्याने गॅलरीतून पाहिले अन लगेच कुठलीशी कॅडबरी आणली अन खाऊ लागला. आपल्या सासर्यांशी असलेले पंगे मिटवण्याची आयतीच संधी आलीय असे वाटून, त्याने सासर्यांना पण ती कॅडबरी खाऊ घातली.
अन आता तोंड गोड झाले म्हटल्यावर सासर्यांना खाली नाचायला घेऊन गेला. म्हातारा पण आपला जावयाला बरे वाटावे म्हणून उगाचच हात हवेत करून नाचाल्यासारखा करत होता. तर ह्या पठ्याने मध्ये खेचून जोरजोरात नाचायला लावले. असा दम लागला म्हातार्याला कि उचलून हॉस्पिटलात न्ह्यावे लागले. खरं खोटं कोण जाणे पण त्या दिवसापासून त्यांनी एवढा धसका घेतला की आजही त्या उत्पादनाची जाहिरात नुसती बघितली तरी म्हातार्याच्या छातीचे ठोके वाढतात, श्वास फुलल्यासारखा होतो म्हणे. त्यांनतर पद्याने ते उत्पादन वापरणे बंद केले.
हो पण जरी ते उत्पादन वापरणे बंद केले तरी पद्या थोडीच सुधारणार होता. त्याने दुसरी कॅडबरी खाणे सुरु केले. काय तर म्हणे “खाइये और खो जाइये”. आमचा पद्या रस्त्यावर, मैदानात, स्टेशनवर, कोपर्यावर आगदी कुठेही तोंडात काहीतरी चघळत, स्वामी परमपुज्य वगैरेंचे रसाळ प्रवचन किंवा सत्संग ऐकताना जो परमानंद झाल्यावर जसा चेहरा होतो तसा किंवा आगदी गर्दीच्या वेळी मुंबई लोकलच्या डब्यात पहिल्यांदा शिरून विंडो सीट मिळवलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर जे समाधान म्हणा किंवा आनंद म्हणा दिसतो तसा काहीसा चेहरा करून डोळे मिटून उभा असतो तेव्हा आम्ही समजून जातो ह्याचा सुरेश किंवा रमेश झालेला आहे. “खाइये और खो जाइये”.
परवाच पद्या कुठल्याती कामासाठी नागपूरला गेलेला. अन मध्येच हुक्की आली म्हणून त्याने केला “खाइये और खो जाइये”. ह्याच गुणांमुळे एका माणसाच्या गाडीखाली येता येता राहिला.
“अबे भैताडा… माहीच गाडी तुला जीव द्यायला सापडून राहिली बे? काहून डोळे मिटून चालून राहिला बे? जे काय मराचं असंल ते तिकडं साईडला जाउन मर ना बे… ” असं काहीसं बोलून तो सभ्य नागपूरकर निघून गेला. न बोलता राहील तो नागपूरकर कसा म्हणा. अन काय आहे ना.. न बोलता नुसत्या डोळ्यांनी किंवा हावभावांनी किंवा कमीत कमी शब्दात बोलायला पद्या पुण्यात नव्हता ना.
मध्यंतरी भेटला तेव्हा कपडे जाम मळलेले होते त्याचे. मी विचारले “काय पद्या? कुठे लोळून आलायस”. तर मला म्हणे “काही नाही रे नवीन वाशिंग पावडर आणलीय. काही काळजी नाही”. मी तरीही म्हणालो “अरे ते ठीक आहे पण वाहिनी ओरडणार नाही का?” तर मला म्हणे “आमची बायको स्टार आहे. तिचा धुणं दमदार आहे” आम्ही काय समजायचं ते समजलो. दुसर्या दिवशी त्याच्या त्या कपड्यांसोबत वहिनीनी त्याचीही तीच पावडर लाऊन दमदार धुलाई केली होती असे मला त्याच्या समोर राहणाऱ्या अजून एका मित्राकडून समजले. 😉 😉 😉
मध्यंतरी त्याच्यावरती गोरे होण्याचं भूत सवार झालं होतं. मग काय विचारू नका मेन्स क्रीम, सहा आठवड्यांची ट्रीटमेंट तीही घरच्या घरी वगैरे वगैरे प्रकार त्याने केले. हे गोरं होण्याचं खूळ हे आमच्या देशातील लोकांच्या मनाला लागलेली कीड आहे कीड हे माझे परखड मत आहे. उगाच आपल्या परदेशी कंपन्या सांगतात आमुक आमुक वापरा अन आमच्याकडच्या मुली तर सोडाच मुलं – माणसं सुद्धा ह्याला बळी जातायत. पद्यानेसुद्धा हेच केले अन भरपूर पैसा अन वेळ वाया घालावून अन आता चेहऱ्यावर कसलेसे डाग घेवून बसलाय.
मध्यंतरी त्याने कुठलासा नवीन मोबाइल घेतला त्याला 3G कि 4G कसलीशी सुविधा आहे म्हणे. त्याबरोबर कुठल्याश्या कंपनीचं नवीन सीम कार्ड पण घेतलं आहे. बरं ह्यांचं नेटवर्क शहरात बर्यापैकी असते पण सगळीकडेच असते असे नाही. आम्ही परवा शिरवळच्या इथून साताऱ्याला जात असताना पोलिसांनी गाडी अडविली. काद्पत्रे, लायसन्स वगैरे मागितली. पी. यु. सी. ची तारीख उलटून गेली होती. म्हणून मग मी किती दंड आहे वगैरे विचारत होतो तर हा आपला पोलिसांशी हुज्जत घालू लागला असा नियम कोठे आहे दाखवा. आम्ही तुम्हाला माघारी जाताना दाखवतो आणून पी. यु. सी. वगैरे वगैरे. तुमच्या RTO च्या वेबसाईटवर तसे आहे म्हणाला.
पोलिस पण उखडले कुठे आहे दाखव म्हणाले. हा गेला शायनिंग करायला. कशाचं काय तिथे धड 2G नेटवर्कपण नव्हते. ते वेब पेज काही लोड होईना अन पद्या पण काही ऐकेना. आत्ता होईल आत्ता होईल करत बराच वेळ पद्याने घालवला. मोबाइल रेंज मध्ये येण्यासाठी इकडे धर तिकडे धर, इकडे जा तिकडे जा असे प्रकार सुरु होते.
तो पर्यंत साहेबही वैतागले अन अजून खोलात शिरू लागले. इन्शुरन्सचे पेपर मी गाडीत ठेवायचे विसरलो होतो. साहेबांनी आता ते मागितले. आता आली पंचाईत. नुसत्या पी. यु. सी. चा दंड भरून आम्ही बर्याच वेळापूर्वी पुढे गेलो असतो. पण पद्याच्या घोळामुळे गुमान दोन्हीचा दंड भरून जवळ जवळ बळजबरीने पद्याला गाडीत बसवला. अन मी गाडीत बसण्यासाठी वळलो.
तेवढ्यात पोलिस दादा तोंडातला ऐवज रस्त्यावर रिकामा करून मला म्हणाले “ओ साहेब, कुणाचं किती ऐकायचं जरा शिकुन घ्या. उगी त्याचं ऐकून सोताची नुस्कानी करून घेतलीसा बघा. ” असे म्हणून मी काही म्हणायच्या आत पुढच्या गाडीला शिट्टी मारण्यासाठी ते निघून गेले. खरंच होतं म्हणा पद्याच्या नेटवर्कची वाट बघत माझ्या खिशाला आणखीनच फाळ लागला होता. तर असा हा आमचा पद्या.
काल काही कामानिमित्त बाहेर चाललो होतो, जात असताना मला पद्या आमच्या गॅरेजवाल्या बरोबर काहीतरी चर्चा करताना दिसला. मी काही थांबलो नाही. माझे काम करून माघारी येताना पाहिले तर गॅरेजवाल्या राजूने आवाज दिला. मी म्हणालो “बोल राजू, आता काय नवीन खूळ आहे आमच्या दोस्ताच्या मनात?” तर तो म्हणाला “काय नाही हो. नीट काही सांगितले नाही. पण त्यांची बाइक मॉडीफाय करायची आहे असे काही तरी म्हणत होते. पाण्यावर तरंगणारे स्केट आणून देतो ते दोनी बाजूला लावायचे असे काहीतरी म्हणत होते. मला तर काही समजलं नाही. तर मला म्हणाले मी सांगतो तुला कसे करायचे ते अन गेले”
राजूच्या लक्षात आले नसले तरी माझ्या डोक्यात प्रकाश पडला. पटकन आमच्या डॉक्टरना फोन केला. सगळी परिस्थिती सांगितली. मेडिकलवाला एक मित्र आहे त्याच्याशी ही बोलून ठेवले. आता येणाऱ्या काही दिवसात फोन आला की धावत जायचे हे नक्की आहे.
कारण…? अहो कारण काय विचारता? येत्या काही दिवसात आमचा पद्या “आज कुछ तुफानी करते है” म्हणत बोटीतून गाडीवर बसून समुद्रात गाडी सहित उडी घेईल आणि समुद्रातून डोंगरावरून जाणार्या शीतपेयाच्या गाडीकडे बजरंगीच्या आवेशात झेपावेल.
पद्या मीच काय इतर कोणीही आणि कितीही अन काहीही सांगितले तरी ऐकत नसतो. त्यामुळे तूर्तास त्याच्या बजरंगीच्या आवेशातील झेपेच्या बातमीची माहिती देणाऱ्या फोनची वाट पाहणे इतकेच काय ते माझ्या हाती.
तेव्हा कळावे… म्हणजे कळावे इति… मधला कळावे… लोभ असावा.
ता. क.: बाकी पद्याच्या झेपेची बातमी काळातच तुम्हास कळवतो… काळजी नसावी 🙂 🙂 🙂 🙂
Image by Clker-Free-Vector-Images from Pixabay
Latest posts by Abhijit Inamdar (see all)
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021